‘चौकीदार चोर हैं’ हे न्यायालयानंही मान्य केलं आहे. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली होती. या प्रतिक्रियेवर सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावली आहे. ‘येत्या २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना आज नोटीस बजावली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं राहुल यांना नोटीस बजावली. ‘राफेल प्रकरणात न्यायालयानं पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात कोणतंही मतप्रदर्शन केलेलं नाही. राहुल गांधींनी त्याचा विपर्यास केला आहे,’ असं खंडपीठानं नमूद केलं.

‘राफेल’ खरेदी प्रकरणात नवी माहिती समोर आल्यानं त्यावर फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयानं मान्य केली. न्यायालयाच्या या निर्णयावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर हैं’ आता सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी तीव्र आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. ‘राहुल हे स्वत:ची मतं सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळं न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ असं लेखी यांनी याचिकेत नमूद केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *