मराठी पडद्यावर अधूनमधून एखादा गूढ चित्रपट येतो आणि अशाप्रकारच्या चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिकांना सुखावह धक्का देतो. ‘सावट’ हा चित्रपट या पठडीत बसणारा आहे. मात्र तो अगदीच ‘हॉरर’च्या वाटेवर चालणारा नसला, तरी त्यात ‘सस्पेन्स’ ठासून भरला आहे. आता अशी पार्श्वभूमी निर्माण झाल्यावर, त्यातली उत्कंठा वाढीस लागणार हे तर ओघाने आलेच. हा चित्रपटही उत्कंठा ताणून धरतो खरा; मात्र यातल्या काही प्रसंगांमुळे या चित्रपटाचा पसारा वाढला आहे आणि त्यामुळे हा ‘सस्पेन्स’ अधिक प्रभावी होता होता राहिला आहे. पण कल्पनेच्या गूढ खेळात रमवण्याची कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न मात्र तो करतो.
       एका हत्येचा छडा लावण्यासाठी एसीपी अदिती देशमुख ही पोलिस अधिकारी एका गावात येते खरी; मात्र तपास करता करता तिला त्या गावातल्या अजून एका घटनेविषयी कळते. प्रथमदर्शनी ही घटना अंधविश्वासावर बेतली आहे असे तिला वाटते; पण नंतर त्यात काहीतरी काळेबेरे असल्याचा दाट संशय तिला येतो. विशेष म्हणजे, या घटनेचा परिणाम त्या संपूर्ण गावावर होत असतो. गावात प्रत्येक श्रावण महिन्यात एकाची हत्या होते आणि अशा सात हत्या या गावाने पचवलेल्या असतात. शेवटी ही ‘केस’ अदिती हातात घेते आणि सुरु होतो एक थरारक खेळ!
       सौरभ सिन्हा यांचे लेखन आणि दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. या गोष्टीचा प्लॉट उत्तम आहे; मात्र तो मांडताना पुनरावृत्तीचा मोह टाळायला हवा होता. ‘त्या’ सात हत्यांमध्ये हुबेहूब साम्य असतानाही, त्या प्रत्येक हत्येची पार्श्वभूमी उलघडून सांगण्यात काय विशेष? पण चित्रपटात तसे होत असल्याने, त्यात बरेच फूटेज वाया गेले आहे. तसेच काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. चित्रपटाला दिलेल्या ट्रीटमेंटमध्येही ताजेपणाचा अभाव जाणवतो. आता, ‘क’च्या बाराखडीतले प्रश्न मनात आले नाहीत आणि डोक्याला जास्त ताण न देता, या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा ठरवल्यास मात्र ही गोष्ट सहज पचनी पडू शकेल. कारण त्यात ‘सस्पेन्स’ ठेवण्यात आला आहे; त्यामुळे गोष्टीत उत्कंठा नामक प्रकार कायम आहे.
       या चित्रपटाचा यूएसपी म्हणावा लागेल, तो म्हणजे यात एसीपीची भूमिका साकारणारी स्मिता तांबे!  मराठी चित्रपटांत नायिकेला केंद्रस्थानी ठेवत अपवादानेच काही चित्रपट निर्माण झाले आहेत. ‘सावट’ या चित्रपटाने हा कित्ता गिरवत, यातली एसीपीची भूमिका नायिकेकडे सोपवण्यात आली आहे. स्मिता तांबे या गुणी अभिनेत्रीने ही एसीपी टेचात उभी केली असून, एसीपीचा अवतार कडक साकारला आहे. स्मिताच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली ही वेगळी भूमिका आहे आणि तिच्या या भूमिकेनेच या चित्रपटाला तारले आहे.
       इतर भूमिकांमध्ये मिलिंद शिरोळे, शीतांशु शरद यांची कामगिरी चांगली आहे. अधिरा व अशिनीच्या भूमिकेत श्वेतांबरी घुटे हिने आश्वासक रंग भरले आहेत. संजीवनी जाधव यांना यात फारसा वाव मिळाला नसला, तरी त्या त्यांचे अस्तित्त्व दाखवून देतात. विनोद पाटील यांचे छायांकन आणि वैभव भोसले व अभिनव कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन चित्रपटातली गूढता गडद करणारे आहे. संकलन व ध्वनी रेखाटन ठीक आहे. एकूणच, फार खोलात न शिरता या ‘सावटा’खाली आल्यास, दोन घटका करमणूक करण्याची हमी मात्र हा चित्रपट देतो.
चित्रपट:   ‘सावट’ 
दर्जा:    * *  १/२   (अडीच स्टार) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *