शनिवार, दिनांक ३० मार्च २०१९ हा दिवस साधना विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांसाठीच मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस होता. सालाबादप्रमाणे याही वर्षी शाळेत पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन वर्गखोल्यांचा उद्घाटन सोहळा, पालकांसाठी विविध खेळ आणि त्यानंतर सहभोजन अशा काहीशा घटनांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अहेरी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या १५ वर्षांपासून प्रमुख स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेले व लोक बिरादरी आश्रम शाळेतील पहिले विद्यार्थी डॉ. कंना मडावी तसेच जिंजगाव येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करून गावाचा विकास साधणारे सीताराम मडावी हे प्रमुख पाहुणे लाभले. तसेच हेमलकसा गावातील जय सेवा बचत गटाच्या महिला, नेलगुंडा गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती व शाळेतील मुले व त्यांचे पालक असे साधारण ३५०-४०० लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. इयत्ता चौथी व पाचवीच्या काही विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन उपस्थितांचे स्वागत केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘बी चे झाडात रूपांतर’ या विषयावर इंग्रजी लघुनाट्य सादर केले. तसेच तिसऱ्या वर्गातील मुलांनी ‘बेडकाचे जीवनचक्र’ या विषयावर नृत्य सादर केले. यानंतर डॉ. कंना मडावी व सीताराम मडावी यांनी पालकांशी व मुलांशी माडिया भाषेतून संवाद साधला. पालकांशी बोलताना डॉ. कंना मडावी यांनी निसर्ग आणि वृक्ष संवर्धन तसेच व्यसनांचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गावचे व देशाचे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये याबद्दलही मार्गदर्शन केले. सीताराम मडावी यांनीही दारू व खर्रा बंदीचे महत्त्व समजावून सांगितले. यांनतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात बांधण्यात आलेल्या तीन नवीन लाकडी वर्ग खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालकांसाठी नावीन्यपूर्ण खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्लो सायकलींग रेस, काठीने टायर पळवण्याची शर्यत, उलटे धावण्याची शर्यत, लहान नळीच्या साहाय्याने एका डब्ब्यातील पाणी दुसऱ्या डब्ब्यात खेचणे, पाण्याने भरून ठेवलेल्या पेल्यांमधील बॉल फुंकर मारून पुढे पुढे ढकलणे, धनुष्याच्या सहाय्याने लक्ष्य साधणे अशा विविध खेळात दुपारच्या रणरणत्या उन्हातही पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली. मसालेभात व कांदा भजी असा बेत होता.एकूणच हा पालक मेळावा मनोरंजक रित्या पार पडला.

2015 रोजी सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या साधना विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि लोक बिरदारीचे कार्यकर्ते यांनी हा हा कार्यक्रम यशस्वी केला. बालवाडी ते 5 वी पर्यंतची ही शाळा आजूबाजूच्या 6 किलोमीटर परिसरातील 9 खेड्यातील 120 विद्यार्थ्यांना सध्या शिक्षण देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *