नुकताच राज ठाकरेंच्या पनवेल रॅली वरून परततोय. लोकांमध्ये बसून ही पूर्ण सभा ऐकली. ही काही निरीक्षणं आहेत. वाचणा-यांनी आपल्या सोयीनुसार निष्कर्ष काढावेत.

* राज यांना ऐकायला येणाऱ्यांना वयाची मर्यादा नाही. अगदी १८ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंतचे लोक ऐकायला येतात.

* महिलांची संख्या लक्षणीय आहे. काही नोकरदार तरुणी व मध्यमवयीन महिला भेटल्या. राज हे एकमेव नेते आमचं म्हणणं स्टेजवरून मांडतायत अशी भावना आहे म्हणाल्या. काही महिला तर 2-2 तास आधी येऊन बसलेल्या बघितल्या.

* तरुण मुलं जी येत आहेत त्यात अनेकजण प्रामुख्याने मध्यमवर्गीय आहेत. अनेक जण नोकरदार.

* आलेले लोकं मित्र-मित्र सोबत येतात. एकत्रित नोकरी करणारे किंवा एका सोसायटीत वा गल्लीत राहणारे सोबत येतात. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की एकेकटे आलेले आणि एकेकटे बसलेले पण अनेक जण बघितले.

* आलेल्यांमध्ये २०१४ ला मोदींना मतदान केलेले खूप जण आहेत. जेव्हा राज ठाकरे स्टेजवरून ‘तुम्ही मूर्ख बनवले गेलाय, तुम्हाला मोदी आणि शहाने फसवलंय, खोटे बोललेत ते तुमच्याशी’, असं त्वेषाने बोलतात तेव्हा आजूबाजूला बसलेले अनेक जण अस्वस्थ झालेले बघितले.

* आलेल्यापैकी बहुतांश जण मीडियाला प्रचंड शिव्या घालणारे असतात. भारतीय मिडियाचा क्रेडीबिलिटी क्रायसिस आता टोकाला पोचलाय.

* मी राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी आलोय आणि मला बसायला जागा मिळालीय असं सामान्य श्रोता जेव्हा आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल करून सांगतो तेव्हा तो एक नुसता फोन नसतो. ती एक राजकीय दिशा दाखवणारी स्पष्ट कृती असते. असे अनेक व्हिडीओ कॉल वाले बघायला मिळाले.

* सभेच्या सुरक्षेला आलेले पोलिस क्वचितच इतक्या प्रेमाने आलेल्या लोकांशी बोलताना दिसतात. हे असे वर्तन मी बाळासाहेबांच्या सभांमध्ये बघितले होते. राज यांची २००८/०९ ची लाट मी कव्हर केलीय, पब्लिक मध्ये उभा राहून सभा बघितल्यात. एकदा तर गुजराती महिलांच्या मागे उभा राहून डोंबिवली भागशाळा इथली एक सभा ऐकली होती. पोलिस तेव्हाही इतके प्रेमाने वागलेले नव्हते.

* गळ्यात मनसे चे पट्टे घातलेले आणि जय भीम म्हणून एकमेकांना अभिवादन करणारे लोक होते.

* मैदानात शेंगदाणे विकणा-यापैकी दोघे जण उत्तर भारतीय होते. त्यांना विचारलं की राज ची भीती वाटत नाही का तर म्हणाले, “अब वो बदल गये हैं, अब वो हिंदी में भी टीव्ही पर बोलते हैं.”

* दोन मनसे फाउंडर मेम्बर मधल्या काळात पक्षाच्या activity पासून दूर होते. आता परत active झालेत. ते आपापसांत बोलत होते की आता परत चांगले दिवस येणारेत. (हे अच्छे दिन चं मनसे व्हर्जन आहे.)

* सभा संपल्यानंतर “राजसाहेब बरोबरच बोलतायत. हे माजलेत, यांना घालवलं पाहिजे” अश्या आशयाची (माजलेत हा फारच सौम्य शब्द वापरतोय. समजून घ्या.) वाक्य निघणा-या लोकांनी आपापसांत बोललेली मी ऐकलं.

* मनसेला एका उत्तम गाण्याची गरज आहे. गाणी आहेत खुप. आले आले मनसे आहे, प्रिय असोत संपन्न सुंदर चे एक modified गीत आहे पण ज्याने आलेल्या क्राऊडला ठेका धरता येईल, ओठी बसेल असे गाणे हवे.

शेवटचं आणि महत्त्वाचं निरीक्षण.

* बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेला मतदान केलेली काही लोकं भेटली. त्यांची उद्धव ठाकरेंवरही निष्ठा आहे. ‘काहीतरी मजबुरीतून उद्धव यांनी युतीचा निर्णय घेतला असावा’ असा अंदाज व्यक्त केलेले ४ साधारण पंचावन्न साठीचे शिवसैनिक भेटले. ‘राज जे बोलतायत ते बाळासाहेब बोलतायत असं वाटतं’ हे त्यांचं म्हणणं होतं. (माझ्याकडे त्यांची नावं आहेत. पण मी कुठे तुमची नावं सांगणार नाही असा शब्द त्यांना दिलाय. त्यामुळे मी त्यांची नावं सांगणार नाही. ते कुणाला मतदान करणार हा प्रश्न मी विचारला नाही. असले प्रश्न मतदारांना विचारायचे नसतात इतकंही भान आजकाल मेनस्ट्रीम मीडियाला नसावं हे बघून वाईट वाटतं.)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *