राहुल गांधींचा अहिंसक, शांततेवर विश्वास असणारा मार्ग आणि नरेंद्र मोदींचा मार्ग यातल्या कशाचा विजय होणार आणि का हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

गेल्या महिन्यात अलाहाबादमधल्या टाळं लागलेल्या उद्योगधंद्यांबाबतचा अहवाल तयार करत असताना एका स्थानिक रहिवाशाशी माझी बाचाबाची झाली. तो त्या शहरातला माझ्या ओळखीचा पत्रकार होता. अशा टोकाच्या विभाजित वातावरणात मी सहसा राजकीय विषयांवर वाद घालणं टाळतो कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. पण त्यावेळी आम्ही कोणालातरी भेटण्यासाठी जात होतो आणि गाडीत बसून फारसं काही कारण्याजोगं नव्हतं.

दुबळ्या युती सरकारपेक्षाआपल्याला एका बलाढ्य नेत्याचीअधिक गरज आहे या मुद्द्यावर तो वाद घालत होता. मी त्याच्याशी वाढती बेरोजगारी, शेतीतले प्रश्न आणि नियंत्रणरेषेवर घडणाऱ्या चकमकी याबाबत बोलत राहिलो. मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनातली पाच टक्के आश्वासनेदेखील पाच वर्षात पूर्ण केलेली नाहीत हे त्यानं मान्य केलं पण तो बोलता बोलता थांबला आणि ड्रायव्हरकडे पाहत म्हणाला, ” कुणी मुस्लिम तर नाही ना आपल्या गाडीत?” त्त्याचं बोलणं अपेक्षेप्रमाणे त्याच वळणावर जाऊन थांबलं आणि ते म्हणजे ‘मुस्लिमांना त्यांची जागा दाखवून देण्यात आलेली आहे.

गेले अडीच महिने छत्तीसगढ, बिहार आणि उत्तर प्रदेश या अस्सल हिंदी भाषिक पट्ट्यात मी रोजगारीचा मागोवा घेत फिरतो आहे. ४० अंश सेल्सियस तापमान दाखवणाऱ्या पाऱ्यापेक्षा मला सार्वत्रिक मुस्लिमविरोधी भावनांनी अधिक कातर करून टाकलंय. मुस्लिमांचा छळ करण्यात बहुसंख्य हिंदूंना काहीही गैर वाटत नाही हे वास्तव चिंताग्रस्त करणारं आहे. मुस्लिमांना ठेचून मारावं असं काही प्रत्येक हिंदू व्यक्तीला वाटत नाही परंतु बहुतेकांना त्यामुळे काहीही फरक पडत नाही हे मात्र खरं आहे.

या द्वेषाची तीव्रता सामाजिक स्तरानुसार बदलत जाते. उच्च जातीयांच्या बोलण्यात मुस्लिमद्वेष्टा स्वर सहजपणे येतो. यादवेतर ओबीसी आणि जातवेतर दलितांना बोलतं करायचं तर थोडे अधिक प्रयत्न करावे लागतात. पण यथावकाश ते बोलतातच.

मोतीहारीच्या सुप्रसिद्ध (की आता कुप्रसिद्ध) साखर कारखान्याच्या परिसरात तिथे कधीकाळी काम करणारे कामगार राहतात. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ साखर कारखाना बंद असल्याने ते बेरोजगार झालेले असून कशीबशी आपली गुजराण करत आहेत. बिहारच्या राजकारणात हा मुद्दा चर्चेत आहे.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मोतीहारीला भेट दिली होती. त्यावेळचे त्यांचे सुप्रसिद्ध उद्गार असे होते की, “पुढच्या खेपेस मी येईन तेव्हा याच कारखान्यात तयार झालेल्या साखरेचा चहा घेईन.” त्यांचे हे आश्वासन अर्थातच पूर्ण झालेले नाही.

असे असूनही यातील बहुतेक कामगार (जे उच्च जातीचे आहेत) मोदींना मत देऊ इच्छितात कारण देशाला त्यांची गरज आहेआणि हिंदूंनी एक होण्याची गरज आहे.” जे हिंदूंच्या हिताचे तेच देशहिताचे ही भावना पाठ सोडत नाही. यादवेतर ओबीसी हिंदू अस्मितेच्या मुद्द्याला हात घालण्याआधी उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना याबाबत बोलतात.

लोकांना मतदानाला प्रवृत्त करणारा हिंदुत्व हा काही एकमेव मुद्दा नाही. अर्थकारण, जातीय समीकरणे, व्यक्तिपूजा मुद्द्यांपैकी एक तो आहे. केंद्रात मोदींना निवडून देणारे विधानसभेत केजरीवालला मत देऊ शकतात. २०१४ मध्ये भाजपने दिल्लीच्या सातही जागा मताधिक्याने जिंकल्या परंतु २०१५ मध्ये त्याच मतदारांनी आपला निवडून दिले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या. मी अशा अनेकांना भेटलो जे मोदींचे कौतुक तर करतात परंतु विधानसभेसाठी हिंदुत्वाचा चेहरा असणाऱ्या आदित्यनाथऐवजी अखिलेश यादवला निवडून देऊ इच्छितात. मात्र मुस्लिमांच्या प्रति असणारा राग लपून राहत नाही आणि त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही.

याबाबत मी एक ट्विट केले आणि त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आले. बहुतेक सर्व प्रतिसाद हे निंदा करणारे असले तरी मुस्लिम विरोधी भावना कायमच असल्याचे नमूद करणारे अनेक प्रतिसाद होते. अर्थातच ती भावना नवीन नाही. मोदी आणि अमित शहांच्याही आधीपासून ती अस्तित्वात आहे. बाबरी मशीद १९९२ मध्ये पाडण्यात अली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर १०० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे.

मात्र मुस्लिमांबद्दल अनुद्गार काढणं हे आजकाल अधिक सर्वमान्य झालंय हे मात्र नक्की. मतदारांना राज्य, जिल्हा आणि गावपातळीची नस नेमकी ठाऊक असते. कायद्याच्या मर्यादा आणि चौकटी त्यांना पक्क्या ठाऊक असतात. २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अंदाज याबाबतीत सपेशल चुकले. डोनाल्ड ट्रम्प याना मत देणाऱ्या अनेकांनी डेमोक्रॅट्सना खुला पाठिंबा दिलेला होता. ट्रम्पना पाठिंबा देणं हे फारसं ‘कूल’ समजलं जात नव्हतं. तीन वर्षांनंतर हे चित्र नक्कीच बदललेलं आहे.

भारताबाबत विचार करायचा तर व्हॉट्सऍपमधून माहिती मिळवणारा तरुण वर्ग मुस्लिमांच्या होणाऱ्या छळाबाबत तितकासा गंभीर नाही ही चिंतेची बाब आहे. याचं समर्थन म्हणून मोदींच्या विकासनीतीचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट्स फॉरवर्ड होतात. आर्थिक विकास हा बहुसंख्यांकवादावरील उतारा असल्याचे यातून सूचित होते.

दरभंगा या बिहारमधील शहरापासून ७५ किमीवर गोरा नावाचे खेडेगाव आहे. इथली मुस्लिमबहुल लोकसंख्या गुरांचा व्यापार करते. २०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर एकेक करून सर्व शासकीय यंत्रणांनी या गावाचं जिणं मुश्किल करून टाकलं. आज या गावातले लोक योग्य नोकरीविना खडतर आयुष्य जगत आहेत, जिथे संधी मिळेल तिथे रोजंदारीवर काम करत आहेत.

पूर्वी गुरांचा व्यापार करणाऱ्या काहीजणांना मी एका लेखाच्या निमित्ताने भेटलो. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर एका चहाच्या टपरीवर मला एक तरुण भेटला. मी गोरा इथं कशासाठी आलो असं त्यानं मला विचारलं आणि मी माझं कारण सांगितलं. गोरामधल्या मुस्लिमांवर अन्याय झाला हे त्याला मान्य होतं. पण तो पुढे असं म्हणाला, ” मुस्लिम लोक भाजपापासून जरा फटकूनच राहतात. त्यांनीही थोडं समजून घ्यायला हवं. हिंदूंना पसंत नसेल तर गुरांचा व्यापार करायचा कशाला?”

म्हणूनच मला प्रश्न पडतो तो असा की भले विरोधी पक्षाला सद्यस्थितीतील राजकीय समीकरणे उधळण्यात यश आले तरी समाजाला गेलेले तडे सांधण्याचं धाडस त्यांच्या ठायी आहे का? कुठलाही राजकीय पक्ष इतकी मोठी व्होट बँक गमावू शकणार नाही. मुस्लिमांविषयीच्या तिरस्कारातूनच हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

आतापर्यंत झालेल्या दुजाभावाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण संघटित झाल्याची मनोमन खात्री पटलेले हिंदू आपल्या कल्पनेपेक्षा खूप अधिक संख्यने आहेत. भाजपची विकृत परंतु परिणामकारक आणि पद्धतशीर सोशल मीडिया यंत्रणा बहुसंख्यांच्या मनात हा भयगंड निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली आहे.

ही फाजील देशभक्ती पोसण्यासाठी साधे सोपे दाखले वापरले जातात, उदा. घरातले आणि बाहेरचे शत्रू. काश्मीरवर डोळा ठेवून बसलेला आणि अणवस्त्रसज्ज असा हा बाहेरचा शत्रू कोण हे ओळखणे सोपे आहे. त्याच्याविरोधात दंड थोपटून उभा राहणारा बलाढ्य नेता आपल्याला हवा आहे. या नेत्याला विरोध करणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारे सर्वजण बाहेरच्या शत्रूला मदत करत असतात. आणि म्हणूनच विरोधी पक्षाचे नेते, बुद्धिजीवी, स्वतंत्र विचारांचे पत्रकार आणि अभ्यासक हे सर्वजण घरातले शत्रू ठरतात. मुक्त विचारसरणी असणे, सर्वसमावेशक विचार करणे म्हणजे घरातला शत्रू असण्यासारखेच आहे. आणि त्यामुळेच अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी भूमिका घेणाऱ्यांना घरातल्या शत्रूंच्या पंगतीत बसवणे सोपे जाते.

जनमानसावर प्रभाव पडू शकणारी हिंदी माध्यमे याचीच री ओढत अल्पसंख्याकांना परके ठरवण्याच्या कामी पुरेपूर योगदान देताना दिसतात. हिंदू अस्मितेला खतपाणी घालण्यासाठी हिंदूंना त्यांचे राममंदिर केव्हा मिळणार यासारखे प्रश्न तावातावाने विचारणारे कार्यक्रम पुन्हापुन्हा प्रसारित होत राहतात. एका नामांकित हिंदी वाहिनीत काम करणारे जेष्ठ पत्रकार मला असं म्हणाले की जर या माध्यमांनी आपल्या कामात २५% प्रामाणिकपणा आणला तरी मोदींचा खेळ खलास होऊ शकेल.”

पण.. माध्यमे आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने आणि भाजपच्या समोर विश्वासार्हता गमावलेला आणि मूलभूत संपर्क यंत्रणेत मागे पडलेला पक्ष उभा असल्याने स्वतःला तारणहारसिद्ध करण्यात मोदी यशस्वी होत आहेत. आणि हे करत असताना देश म्हणून आपण सर्वसमावेशकतेचं तत्व नाकारणारे आणि सहनशीलतेला दुर्बलता मानणारे होत चाललो आहोत.

म्हणूनच, ‘भारताचं स्वत्व जपण्याचीराहुल गांधींची मोहीम कितीही अर्थपूर्ण आणि गरजेची भासत असली तरीही ती वास्तवात उतरण्याबाबत मी साशंक आहे. राहुल गांधींचा अहिंसक, शांततेवर विश्वास असणारा मार्ग आणि नरेंद्र मोदींचा देशभक्तीचा मार्ग यातील एकच कुणीतरी विजयी होणार आहे.

मूळ इंग्रजी लेखाची लिंक: https://www.firstpost.com/politics/between-rahul-gandhis-pacifism-and-narendra-modis-nationalism-its-becoming-clear-which-idea-will-win-and-why-6513341.html/amp?__twitter_impression=true

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *