डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे नाही की माझ्याकडे देश-विदेशातल्या मोठमोठ्या पदव्या आहेत, माझे दुश्मन मला घाबरतात याचं कारण हेही नाही की माझा विविध विषयांचा व्यासंग आहे. माझे दुश्मन मला घाबरतात यामागचं हेही कारण नाही की माझ्यामागे लाखोंचा जनसमुदाय आहे… तर माझे दुश्मन मला यामुळे घाबरतात की माझ्याकडे ‘कॅरेक्टर’ आहे, चारित्र्य आहे. मित्रांनो, बाबासाहेबांचं आयुष्य समजवून घेत असताना ज्याप्रमाणे आपण त्यांना उच्चकोटीचा अर्थतज्ज्ञ म्हणून जाणतो किंवा इतिहास, मानववंशशास्त्र, गणित, भूगोल, स्थापत्यकला, संगीत, राज्यशास्त्र, धर्मचिकित्सा, वाङ्मय, तत्त्वज्ञान या आणि अशा कित्येक ज्ञानशाखांचा एक साक्षेपी, तटस्थ अभ्यासक म्हणून त्यांना पाहतो. अगदी याच वेळेला त्यांच्या वरील विधानामुळे त्यांच्यातल्या एका उच्च चारित्र्यवान व्यक्तिची ओळखसुद्धा झटकन होऊन जाते.

ज्या काळात बाबासाहेब समाजविश्वामध्ये आपल्या चिंतनाच्या साहाय्याने समोर येणार्या हरएक समस्येला बाजूला करत जात होते, त्याच वेळेला त्यांच्या वैयक्तिक जीवनाची संक्रमण अवस्था विविध अशा असह्य, वेदनादायी घटनांनी भरलेली होती. मात्र तरीही वैयक्तिक जीवनात आलेलं दुःख किंवा विविध स्वरूपाच्या अडीअडचणींचं भांडवल न करता त्यांनी कठोर परिश्रम घेत देशातल्या तमाम ओबीसी आणि दलित वर्गाला त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष केला. हा संघर्ष साधासुधा नव्हता. त्यावेळी देशात असलेले पुढारी देशस्वातंत्र्याच्या चळवळीला महत्त्व देत होते. मात्र बाबासाहेबांना देश स्वातंत्र्यासह देशातल्याच करोडो जनतेच्या अस्तित्वस्वातंत्र्याचा सवाल सतावत होता. माणसाला माणसासारखं जगू दिलं जात नव्हतं. अस्पृश्यता पाळणारी विकृत माणसं टोळ्याटोळ्यांनी समाजात बिनधास्त वावरत होती. या अशा दडपलेल्या, नाकारलेल्या, अन्यायग्रस्त समाजाचा एक बुलंद असा आवाज त्याकाळी फक्त आणि फक्त डॉ. भीमराव रामजी आंबेडकर एवढाच आणि इतकाच होता.

‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल’, असा त्यांचा मूलभूत विचार आजही प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तिच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो यामध्ये कुठलंही दुमत नाही.

बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीवर कुणीच संशय घेऊ शकत नाही, हेही तितकंच सत्य. मात्र त्याविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट होती ते म्हणायचे, I am First and last Indian. मात्र याचवेळी त्यांचा दुसरा विचार महत्त्वाचा वाटतो. ते एकदा म्हणाले होते की, ‘मी आणि देश यांच्यात जर संघर्ष झाला तर मी देशाचीच बाजू घेईन, मात्र देश आणि दलित, शोषित जातिंमध्ये जर संघर्ष झाला तर मी केवळ दलित जातिंचीच बाजू घेईल.’

तत्कालीन पुढार्यांनी बाबासाहेबांची मोठ्या प्रमाणावर धास्ती घेतलेली असायची. त्यांचा अभ्यास, व्यासंग, चिंतनाचा आवाका त्यांना माहीत असल्यामुळे अनेकजण बाबासाहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आतुर असायचे. त्याकाळी विद्वान समजले जाणारे मदन मोहन मालवीय यांनी तर बाबासाहेबांना त्यांचं पुस्तक संग्रहालय मला अगदी दीड लाखपेक्षाही अधिक किमतीत देऊन टाका म्हणून विनंती केली होती. मात्र पुस्तकावर जीवापाड प्रेम करणार्या आंबेडकरांनी स्पष्ट नकार दिला होता.

संपूर्ण भारतात पुस्तकांवर आपल्या मुलाबाळांइतकंच प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आंबेडकर हेच होते, याबाबतही कुणाचे दुमत असू नये. सर्वसामान्य असू द्या की एखादा विद्वान, ती व्यक्ती आपल्या जीवनात आपल्या पिढीसाठी, वंशासाठी घरदार बांधताना सहज दिसून येतो. मात्र बाबासाहेब ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी मुंबईला, दादरला हिंदू कॉलनीमध्ये केवळ ग्रंथांसाठी एक ‘राजगृह’ नावाचा बंगला बांधला.

या आणि अशा कित्येक बाबींकडे पाहिल्यावर निश्चितच प्रेरणा मिळते. अपयशाने खचून जाणार्या प्रत्येक युवक-युवतीने नेहमी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, सलग दोन वर्षं उपाशीपोटी राहून बाबासाहेबांनी चार वर्षांचा अभ्यासक्रम केवळ दोनच वर्षांत पूर्ण केला होता. कुठलंही व्यसन नाही, कुठला शॉर्टकट नाही. केवळ संघर्ष, संघर्ष आणि कठोर संघर्ष… बस्स! हेच काय त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब होतं. आपलं राहणीमान असेल, भाषा प्रभुत्व असेल या अशाही बाबींना त्यांनी त्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्व दिलं होतं. इतर विविध गुणांप्रमाणेच ‘स्वच्छता’ आणि ‘शिस्त’ या दोन शब्दांची झलक त्यांच्या प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक दिवशी सगळ्यांना दिसायची. या सर्व बाबींवर बाबासाहेबांच्या विरोधकांनीही नेहमीच आश्चर्य आणि अभिनंदनीय भावना सादर केलेली दिसून येते. आरक्षणाच्या मुद्यावर विरोध करणार्या सरदार पटेल यांनी तर बाबासाहेबांविषयी असे उद्गार काढले होते की, Dead Ambedkar is more dangerous than alive Ambedkar.  पटेल यांच्या या विधानावरून बाबासाहेबांच्या वर्तमान संलग्नेतेचीही व्यापकता आणि गंभीरता स्पष्टपणे दिसून येते यात कुणालाच संशय असण्याचं कारण नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *