रायगड |  रायगड जिल्हयातील धीरुभाई अंबानी रुग्णालय़ हे सर्वात मोठे आरोग्य सेंटर आहे. सध्या हे रुग्णालय सोयी-सुविधांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावकर्‍यांच्या जमिनींवर हे रुग्णालय उभे करण्यात आले होते. त्याबदल्यात गावकर्‍यांना आरोग्य सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातील. असे आश्‍वासन दिले होते. मात्र हे रुग्णालयच मृतावस्थेत असल्यानं गावकर्‍यांच्या जमिनी लाटून त्यांची फसवणूक केली असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. त्यामुळे धीरुभाई अंबानी रुग्णालयाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सरकारने किंवा रिलायन्सने पर्यायी सोय केल्याशिवाय हे रुग्णालय बंद करू नये, अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सोयी-सुविधांचा अभाव
धीरुभाई अंबानी रुग्णालय़ हे रायगडमधील सर्वात मोठे आरोग्य सेंटर आहे. मात्र अपूरा कर्मचारी वर्ग, डॉक्टरांची कमरता तसेच इतर सोयी-सुविधा अभावी सध्या रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, येथील सफाई कामगारच रुग्णांची रक्ततपासणी करत असल्याच समोर आलं आहे. कोणतंही वैद्यकीय आणि तांत्रिकबाबीचं ज्ञान नसलेल्या कर्मचार्‍यांकडून सीटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी करुन घेतल्या जात आहे. त्यामुळे येथे सर्रास रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरच नसल्याने येथे असलेल्या एनआयसीयू, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, अपघात कक्ष, डिलिवरी रूम यांचा वापरच होत नसल्याचे समोर आले आहे.

  • काय आहे गावकर्‍यांची मागणी
    सोयी-सुविधांअभावी रायगडमधील धीरुभाई अंबानी रुग्णालय सध्या मृताअवस्थेत आहे. याचा सर्वाधिक फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. गावातील रुग्णांना उपचारासाठी पनवेल रुग्णालयात १५ किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. सरकारने किंवा रिलायन्सने पर्यायी सोय केल्याशिवाय हे रुग्णालय बंद करू नये, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
    गावाचा आणि येथील लोकांचा विचार करुन रिलायन्स कंपनीने रुग्णालयाला पुनरुजीवित करावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
  • तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी हे रायगडमधील एकमेव जवळचे रुग्णालय आहे. हेच रुग्णालय मृतावस्थेत असल्याने येथील लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. याचा रिलायन्स कंपनीने विचार करावा.
  • धीरूभाई अंबानी रुग्णालय बंद करू नये. तसेच इथे एक वृद्धाश्रमही आहे. त्यांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने मोठी पंचायत निर्माण होते, असे लोकसभा मावळ मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
  • एचआयव्ही रुग्णांसाठीच्या ‘नाको’ ने मान्यता दिलेल्या रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सेंटरमध्ये ५४% पदं रिक्त आहेत. अंबानी रुग्णालय हे सेंटर चालवतं. २००० हून अधिक एचआयव्ही रूग्ण इथं नोंदणीकृत आहेत, पण त्यांच्यासाठी मेडिकल ऑफिसर, समुपदेशकच उपलब्ध नसल्याची धक्‍कादायक माहिती महिला व बाल कल्याण अधिकारीनी आपल्या रिपोर्टमधून दिली.

रुग्णांच्या आरोग्यविषयक कोणत्याही नोंदी नाही
पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) कायद्याअंतर्गत रेकॉर्डस नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं असतं. मात्र रुग्णालयात कोणत्याही प्रकारची नोंदणी केली जात नाही. रुग्णांची, रुग्णांच्या आरोग्याविषयीची माहिती, तसेच इतर महत्वाच्या फाईलींची देखरेख नसल्याने त्या गहाळ झाल्याचे ठाणे जिल्हा आरोग्य सेवा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

अद्यापही कारवाई नाही
रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा प्रश्‍न उपस्थित करुनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे प्रशासनही अशा बडया धेंडांना पाठीशी घालत नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *