नवी मुंबई बातमीदार : निवडणुकीच्या कामात जुंपलेल्या अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे.,पालिकेचा अर्ध्याअधिक कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त असल्याने व आयुक्त देखील उत्तर प्रदेशात निवडणूक कामात असल्याने फेरीवाल्यांच्या गंभीर समस्येकडे सध्या दुर्लक्ष झालेले असल्यानेळा गोंधळ सुरू आहे. पालिकेच्या या दुर्लक्षामुळे फेरीवाल्यांनी डोके वर काढले असून बिनधास्तपणे हे फेरीवाल्यांच्या संख्येत पूर्वीपेक्षा वाढ झालेली दिसत आहे.त्यामुळे स्वच्छ सर्ववेक्षणात दिसणारे शहरातील चित्र व आयुक्तांची पाठ फिरताच दिसणाऱ्या चित्रात बराच फरक पडलेला दिसून येऊ लागला आहे.

लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कामास जुंपण्यास येत आहे.पालिकेचे कर्मचारी देखील यात आहेत. मात्र त्यामुळे शहरातील कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यात फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करणारे आयुक्त नसल्यामुळे इतर अधिकारी वर्ग तितक्या गांभीर्याने फेरीवाल्यांच्या समस्येकडे बघेनासा झाला आहे.नवी मुंबईत पालिका हद्दीत ११ रेल्वे स्टेशन्स आहेत. मात्र सध्या स्थानकांचे सर्व परिसर फेरीवाल्यानी ग्रासले आहेत.त्यास पालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे.

मुंबई व ठण्यातील स्थानकांपेक्षा उत्कृष्ठ असलेली स्थानके गलिच्छ होऊ लागली आहेत. या रेल्वे स्थानकांच्या बाहेर राजकीय नेते,पालिका व सिडको अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाले बसत असतात.मात्र निवडणुकीच्या कामामुळे पालिका कर्मचारी कामात जुंपलेले असताना मात्र फेरीवाल्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. त्यात विभाग अधिकाऱ्यांना भासणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनि पदपथ व रस्ते व्यापले आहेत.तर रेल्वे स्थानक परिसरात लोकांना चालण्यास जागा कमी व फेरीवाले जास्त असे चित्र दिसू लागले आहे. तर या फेरीवाल्यांना कोणी हटवू नये म्हणून राजकीय नेत्यांचे बागलबच्चे हफ्ते घेऊन त्यांना संरक्षण देताना दिसत आहेत. त्यात आयुक्त निवणुकीच्या कामासाठी बाहेर असताना सर्व कारभार रामभरोसे चालू असल्याची टीका नागरिकच करू लागले आहेत.

रेल्वे स्थानकांचा परिसर व्यापलेला असताना या फेरीवाल्यांची मजल थेट स्थानकातील पायऱ्यांपर्यंत गेली आहे. सिडकोकडून या रेल्वे स्थानकांसाठी सुरक्षा रक्षक आहेत. स्थानकात कोणताही फेरीवाला बसू नये यासाठी सुरक्षा रक्षक असताना हेच सुरक्षा रक्षक चक्क या फेरीवाल्यांकडून भाज्या,फळे, किंवा चिरीमिरी घेऊन फेरीवाल्यांनाच संरक्षण देऊ लागले आहेत. त्याचाच फायदा घेत रेल्वे स्थानकांच्या ब्रिजवर बसून उग्र वास येणारी सुकी मच्छीसारख्या गोष्टी विकेपर्यंत या फेरीवाल्यांची मजल गेली आहे.त्यामुळे सिडकोनेदेखील स्वतः बनवलेल्या व या वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेल्या स्थानकांचे नेहमीच मार्केटिंग करून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सिडकोने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कडक उपाययोजना करून फेरीवाल्यांकडून होणारे स्थानकांचे विद्रुपीकरण थांबवण्याची गरज भासू लागली आहे.
निवडणूक कामामुळे थंडावलेल्या पालिकेच्या कारभाराचा फटका शहराला बसू लागला असून आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या फेरीवाल्यांमुळे नवी मुंबई शहर गलिच्छ व विद्रुप झाले आहे.त्यामुळे स्वच्छ गणली जाणारी स्थानके व परिसर मुंबईसारख्या रेल्वे स्थानकांसारखी भासू लागली आहेत. पालिकेकडून सिडकोलासोबत घेऊन प्रत्येक भागात विभागवार कारवाईची गरज भासू लागली आहे.

फेरीवाल्यांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. स्थानकातून बाहेर पडताना व पडपथांवरून चालताना अनेकदा त्रास होतो. सध्या सुविधा उपलब्ध होणार नसतील तर मग पालिकेला कर भरून उपयोग काय? रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच हेच का स्वच्छतेत देशात ७ वा क्रमांक प्राप्त झालेले शहर अशी शंका वाटते.
– शंकर जाधव, नागरिक, नेरुळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *