स्त्रीचे काम फक्त चूल आणि मूल सांभाळणे यासारखी विधानं आता कोणी करत नसलं तरीही आपलं आयुष्य कसं असावं हे तिच्यासाठीचं दुर्धर स्वप्नच ठरलय आजवर.. आपला जीवनसाथी आपण निवडणं आपला सेक्सपार्टनर आपल्या  इच्छेनुसार असावा अशी अपेक्षा करणं नव्हे त्याचा उच्चार ही महापाप ठरवणं ; हे सगळं आहे त्या जागेला आहे..खाप पंचायत , ऑनरकिलींग हे वेगळे मुद्दे असले तरीही स्त्री च्या जीवनसाथी निवडण्याच्या मताशी संबंधीत आहेत , जे तिच्या त्या मताचा किंवा निवडीच्या अधिकाराचीच हत्या करतात. अशा अनेक ज्वालामुखींचे उद्रेक मनाच्या तळात खोलवर दाबून सुखाची रागदारी गात स्त्री आजही पुढच्या पिढ्या घडवण्याचे , फुलवण्याचे काम हसतमुखाने करतेय…समाज मात्र आपली भुमीका बदलण्यास आजही फारसा राजी दिसत नाही.

काळ कोणताही असो..विषय स्त्रीशी संबंधीत असेल तर तो वेगळ्याच विचारधारेने हाताळला जातो.. कधी अस्मितेच्या नावाखाली , कधी संस्कृतीच्या नावाने तर कधी कौटुंबीक प्रतिष्ठा किंवा स्टेटसच्या बुरख्याआड हे स्त्री विषयक मुद्ये किंवा प्रश्न नेहमीच झाकोळले जातात. महिलांच्या  संदर्भातील  अनेक मुद्द्यांचा उहापोह केला जातो तो ही आधीच ठरवलेल्या दृष्टीकोनातून.स्त्री कशी अबला आहे पासून स्त्री  कशी सबला आहे पर्यंतचे अनेक वादविवाद  रंगतात.आपणच कसे सच्चे फेमिनिस्ट आहोत , आपण स्त्रीदाक्षिण्य कसे पाळतो..वगैरे वगैरे रंगवून सांगीतले जाते..स्त्रीयांबद्दलची मते पेजथ्रीचे रकाने भरून ओसंडतात.. बाकिचे कसे पांडू आहेत हे दाखवण्याची चढाओढ लागते. महिलादिनाच्या कार्यक्रमांचे पूर  वाहतात..अशावेळी  नेहमीप्रमाणे रेडलाईट एरीयात काम करणाऱ्या , आदिवासी महिलांसाठी काम करणाऱ्या , अशा अनेकजणी लाईमलाईटमधे प्रकाशतील पण…
या” पण “ने च मला अस्वस्थ केलंय.महिला दिन साजरा करताना तो साजरा करण्यामागचा उद्देशच फसवा आहे असं वाटतय. कधीकाळी  महिलांवर होणाऱ्या शारीरीक , मानसीक , आर्थीक बलात्कारांपासून ( बलात्कार हा केवळ  शरीरावर नाही तर स्त्रीच्या अस्तित्वावर , आत्मभानावर , तिच्या वैचारीक क्षमतेवरही केला जातो असे माझे वैयक्तीक मत आहे. ) वाचवण्यासाठी महिला सबलीकरणाची चळवळ सुरू झाली..1980 च्या दशकात ही चळवळ जगभर पसरली आणि मोठ्या प्रमाणात स्त्रीयांनी उचलून धरली.अगदी आफ्रिकेसारख्या मागास खंडापासून अमेरीकेसारख्या प्रगत खंडापर्यंत सर्वत्र स्रियांच्या हक्कासाठी लढे उभारले गेले..स्त्रीची काही प्रमाणात जोखडातून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल ही सुरू झाली..पण त्याचवेळी भांडवलशाही अर्थव्यवस्थेने या मोकळ्या होणाऱ्या स्रीला आपले मार्केटिंग चे बाहुले बनवले..त्याचबरोबर मिळालेल्या शिक्षणाने सक्षम होत चाललेली स्त्री स्वतःला स्वतःच्या इच्छांना प्राधान्य देताना स्त्रीमुक्तीच्या मुळ उद्देशापासून बाजूला होत गेली आणि स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ स्वतःच्या सोयीने लावू लागली. इथेच स्त्रीमुक्ती चळवळ मागे पडत गेली.आणि आता खूप कमी संस्थांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे स्त्रीयांसाठी काम केले जातयं इतर ठिकाणी केवळ स्त्रीमुक्ती लाईमलाईटपुरती उरलीय.
स्त्रीमुक्ती चळवळ भरकटलीय.तिचा मुळ उद्देशच विसरलीय.कोणी म्हणेल आम्ही स्त्रीमुक्तीसाठी हे केलं ते केलं पण प्रत्यक्षात घटना वेगळ्याच घडत असतात.स्त्रीच्या कातडीचा रंग कोणताही असो प्रत्येक पिढीसाठी ती गुलाम या भुमिकेतच जन्माला येते..
स्त्रीचे काम फक्त चूल आणि मूल सांभाळणे यासारखी विधानं आता कोणी करत नसलं तरीही आपलं आयुष्य कसं असावं हे तिच्यासाठीचं दुर्धर स्वप्नच ठरलय आजवर.. आपला जीवनसाथी आपण निवडणं आपला सेक्सपार्टनर आपल्या  इच्छेनुसार असावा अशी अपेक्षा करणं नव्हे त्याचा उच्चार ही महापाप ठरवणं ; हे सगळं आहे त्या जागेला आहे..खाप पंचायत , ऑनरकिलींग हे वेगळे मुद्दे असले तरीही स्त्री च्या जीवनसाथी निवडण्याच्या मताशी संबंधीत आहेत , जे तिच्या त्या मताचा किंवा निवडीच्या अधिकाराचीच हत्या करतात. अशा अनेक ज्वालामुखींचे उद्रेक मनाच्या तळात खोलवर दाबून सुखाची रागदारी गात स्त्री आजही पुढच्या पिढ्या घडवण्याचे , फुलवण्याचे काम हसतमुखाने करतेय…समाज मात्र आपली भुमीका बदलण्यास आजही फारसा राजी दिसत नाही..अगदी किशोरवयीन मुलं देखील समोरच्याला खुन्नस देण्यासाठी आई-बहिणीवरून शिवी देताना दिसतात.वैयक्तीक वैराचा किंवा कौटुंबीक , जातीय , धार्मिक वैराचा पहिला बळी  स्त्रीला केले जातेय.अशा बळींची संख्या दिवसेंदिवस  वाढत चाललीय त्यात एज डजन्ट मॅटर..तीन महिन्यांपासून ते सत्तर वयापर्यंत कोणिही चालतेय..इथे जातपात धर्म वय यांचे अडसर येत नाहीत की संस्कृती रक्षण आठवत नाही..
स्त्रीभृण हत्येच्या उसळलेल्या लाटेमुळे आपल्या पुढच्या पिढ्यांमधे कमी होत चाललेला स्त्री जन्मदर कोणत्या संकटाची नांदी आहे..? यासाठी चालणाऱ्या रॅकेट्स मधे अनेक डाॅक्टर्स स्त्रीया आहेत हे कोणत्या अधोगतीचे प्रतिक आहे ? एकीकडे स्त्री आस्मानात झेपावतेय त्याचवेळी  चांगल्या शिकलेल्या सुसंस्कृत घरातल्या मुली चंगळवादाला भुलून प्राॅस्टिट्यूशनच्या बिझनेस मधे उतरत आहेत..हि कोणती प्रगती आहे ? एकाचवेळेस  आपण सिंधूताई सपकाळ हा चित्रपट बघतो त्याचवेळेस सात च्या आत घरात हा सिनेमाही बघतो..
 आजही स्त्रीला स्वतःच भवितव्य नाहीच..की दत्तक मातृत्वाचाही पर्याय थोडा न झेपणाराच वाटतो तिला.स्वतःचे गर्भाशयात तिच्या स्वतःच्या  इच्छेप्रमाणे ती कुणाचा गर्भ वाढवू शकत नाही..पण तेच जर त्यात आर्थिक  गणित असेल तर तिला जबरदस्ती सरोगेट मदर व्हावे लागते ..हे काय आहे ??काही वर्षांपुर्वी सरोगसी हा पैसे कमवण्याचा प्रमुख उद्योग होवू घातला होता.याचा किती विचार होतो ?? किंवा केला जातो ??
हे सगळे  मुद्दे निराशाजनक किंवा उद्विग्न मनस्थितीचे वाटतील पण परखड आणि तितकेच खरेही आहेत. समाजात वावरताना डोळे  आणि कान उघडे ठेवल्यास या गोष्टी नक्कीच दृष्टीस पडतील…..
अशा कितीतरी घटना आहेत ज्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या उद्देशाला आव्हान देताना दिसतात.
मला माझ्या मुलीला घराबाहेर पाठवताना दडपण येतं आजकाल ….
या ही वर्षी नेहमीप्रमाणे येतो पावसाळा च्या धर्तीवर महिलादिन येईल आणि जाईल
समारंभ साजरे होतील..फ्लेक्स झळकतील.. पेजथ्री सेलिब्रेटीज महिलांच्या अवस्थेबद्दल आपल्या काळजीचे पोवाडे गातील  …पण किती गांभिर्याने आणि उद्देशाशी प्रामाणिक राहून साजरा होईल हे गुलदस्त्यातच राहिल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *