कॉर्टिकोस्टीरॉइड (संक्षिप्तरूप स्टीरॉइड) हा एक फार शक्तिशाली औषधांचा समूह आहे. जो वैद्यकशास्त्रातील बहुतेक सर्व शाखांमध्ये वापरला जातो. या औषधांचा उपयोग वेगवेगळ्या अॅलर्जी तसेच रोगप्रतिकारशक्तिच्या अतिप्रभावामुळे होणार-या आजारांवर होतो. अशा आजारांमध्ये ही औषधे चटकन प्रभाव दाखवतात व प्रसंगी जीव वाचवण्यामध्ये मदत करतात. ही औषधे क्रिम,ऑइंटमेंट व लोशन या प्रकारातही उपलब्ध असतात व त्यांचा उपयोग इसब, अॅलर्जी व सोरीयासीस अशा गंभीर आजारांसाठी केला जातो. ही मलमे कमी अधिक तीव्रतेची असतात. यांच्यामध्ये हायड्रोकॉर्टीसोन ऍसीटेट एकदम  कमी तीव्रतेच्या मलमापासून ते क्लोबीटासॉल प्रोपीओनेट या अति तीव्रतेच्या मलमापर्यंत अनेक मलमांचा समावेश आहे.

या मलमांचा त्वचारोग बरे करण्यासाठी उपयोग होतो. परंतु या मलमांचे त्वचेवर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. ही मलमे त्वचेवरील लाली,पुरळ व सूज लवकर कमी करतात. अशी लाली,पुरळ व सूज जशी इसब व सोरीयासीसमध्ये असते. तशीच ती बुरशीजन्य व जिवाणूजन्य त्वचारोगामध्येही असते. पण बुरशीजन्य व जिवाणूजन्य आजारात जर स्टीरॉइड मलम वापरले तर सुरुवातीला लाली व पुरळ कमी झाल्यामुळे तत्काळ बरे वाटते पण स्टीरॉइडमुळे त्या त्वचेची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे खरे तर तो बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य आजार आणखी बळावतो. त्यामुळे वरवर जरी ते तात्पुरते बरे झाल्यासारखे वाटले तरी आतून रोग वाढीला लागलेला असतो.

स्टीरॉइड मलमांमुळे त्वचेवरील काळपट डाग व व्रण थोडे सुधारतात. संपूर्ण चेहर्यावर एखादे स्टीरॉइड क्रिम लावले तर सुरुवातीला चेहरा गोरा वाटतो व त्वचा थोडी पातळ होते.

स्टीरॉइड मलमांचे दुष्परिणाम असल्यामुळे भारतीय औषधकोषामधे या औषधांचा समावेश शेडयूल (H) या वर्गात केलेला आहे. या वर्गातील सर्व औषधे ही सरकारमान्य व पात्रता असणा-या डॉक्टरच्या  निर्देशपत्राने  विकली जाणे आवश्यक आहे. अशी औषधे डॉक्टरांच्या सल्याशिवाय थेट औषधविक्रेत्याकडून विकत घेता येत नाहीत.

हल्ली आम्हा त्वचारोगतज्ञांच्या निदर्शनास आले आहे की अति तीव्रतेची स्टीरॉइड क्रिम्स वर्तमानपत्र व दूरदर्शनवर सर्व त्वचारोगांवर रामबाण अशी जाहीरात करून जनसामान्यांना विकली जातात. त्वचेवरील पुरळ,खाज,डाग,व्रण,फोडी,जखमा,मुरमे,भाजणे इ.वर हमखास उपाय अशी जाहिरात केली जाते. कायद्यातील त्रुटींचा फायदा घेऊन औषध कंपन्या अशी मलमे, साबण आणि शांपूसारखी विकतात. ही मलमे शेड्यूल (H) मध्ये असून देखील औषधविक्रेते अशी मलमे डॉक्टरांच्या निर्देशपत्राशिवाय थेट जनसामान्यांना विकतात. या मलमांच्या दुष्परीणामांमुळे ब-याच जणांना नंतर त्वचारोग तज्ञांकडे जावे लागते. त्यांपैकी कित्येकांना बुरशीजन्य त्वचारोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो. सतत अति तीव्र स्टीरॉइड मलम लावल्यामुळे त्यांच्या त्वचेची रोगप्रतिकारक शक्ति कमी होऊन संसर्गजन्य रोग बळावलेले असतात.

या मलमांचा समाजात दुसरा एक दुरूपयोग केला जातो. तो म्हणजे चेहरा व हात गोरे होण्यासाठी वापरली जातात. आपल्या समजात गोरी त्वचा ही सुंदर मानली जाते, त्यामुळे प्रत्येकाला आपण आहोत त्यापेक्षा उजळ दिसावे ही तीव्र इच्छा असते. असे तरूण तरूणी स्टीरॉइड मलमांचा वापर करतात व त्यामुळे चेह-याची कधीही भरून येणार नाही अशी हानी करून घेतात. याबाबत अखिल भारतीय त्वचारोगतज्ञाच्या संघटनेने २०११मधे भारतातील वेगवेगळ्या शहरांत पाहणी करून ही माहिती उजेडात आणली. यामधे असे आढळले की चेहर्यावर त्वचारोग असणा-या रूग्णांपैकी ६० प्रतिशत लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टीरॉइड मलमे वापरली होती. त्यामुळे स्त्रियांच्या चेहर्यावर लव व केस आले होते व स्त्रीपुरूषांच्या चेहर्यावर मुरमे येऊन त्यांची त्वचा पातळ झाली होती. थोड्याशा सूर्यप्रकाशातही त्यांचा चेहरा लाल होऊन त्यावर पुरळ येत असे. अशा व्यक्तिने चेह-याला स्टीरॉइड लावणे अचानक बंद केले तरी त्यांच्या चेह-याची आग होते व पुरळ आणखी वाढते. त्यामुळे तो सतत स्टीरॉइड मलम लावत राहतो. याला स्टीरॉइड डिपेंडंट फेस – स्टीरॉइडची सवय लागलेला चेहरा असे नाव दिले आहे. जास्त माहितीसाठी पहा http://www.ijdvl.com/text.asp?2011/77/2/160/77455

आधी उल्लेखल्याप्रमाणे भारतामध्ये स्टीरॉइड मलमांचा वापर फक्त त्वचारोगतज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानीच होत नाही तर मित्रमंडळी,नातेवाईक, सौदर्यतज्ञ व भोंदू वैद्य यांच्या शिफारशींवर देखील केला जातो. हा वापर सध्या एवढा वाढला आहे की त्याने एकप्रकारचे साथीचे स्वरूप धारण केले आहे. भारतामध्ये एकूण मलमांच्या विक्रीपैकी ८२% विक्री ही स्टीरॉइड मलमांची आहे. स्टीरॉइड मलमांची २०१३सालची बाजारपेठ ही जवळजवळ १४०० कोटीची आहे. जास्त माहितीसाठी पहा  http:// //www.ijdvl.com/text.asp?2014/80/3/201/132246

अखिल भारतीय त्वचारोगतज्ञांच्या संघटनेने स्टीरॉइडच्या गैरवापराबद्दल जनतेमध्ये जाणीव निर्माण व्हावी म्हणून एक राष्ट्रव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी एक वेगळे कृतीदल तयार केले आहे त्याचे नाव आहे ITATSA IADVL Task force Against Topical Steroid Abuse आमच्या डॉक्टर सभासदांनी या संकटाशी सामना करण्याचा चंग बांधला आहे. ते स्वत: देखील पेशंटवर स्टीरॉइड मलमांचा वापर जरूरीपुरताच करतात. आम्ही आमच्या जास्तीत जास्त सभासदांच्या सह्याचा विनंती अर्ज सप्टेंबर २०१४ मध्ये भारतीय मुख्य औषध नियंत्रकांना

(Drug  controller general  of India)  दिला आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातील वरीष्ठ अधिका-यांच्या भेटी घेऊन त्यांना डॉक्टरी सल्ल्याशिवाय स्टीरॉइड विक्री करण्याविरोधात योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ITATSA ने या समस्येवर उपाय म्हणून वेगवेगळ्या पातळीवर उपक्रम राबवले आहेत. स्टीरॉइडचा दुरूपयोग टाळावा व डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करावा हा संदेश जनतेमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रसारमाध्यमांना आवाहन करत आहोत.

आम्ही औषध कंपन्यांशी संवाद साधून त्यांना तर्कविसंगत समिश्र स्टीरॉइड मलमांची निर्मिती व विक्री बंद करावी असे आवाहन केले आहे.

आम्ही फॅमिली डॉक्टर व इतर विषयांचे तज्ञ डॉक्टर्स यांच्या सोबत सभा घेऊन व संवाद साधून त्यांना अति तीव्र स्टीरॉइड मलमांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत आहोत.

आम्ही औषधांच्या दुकानदारांसोबतही सभा घेऊन त्यांना डॉक्टरांच्या सल्लाशिवाय किंवा जून्या निर्देशपत्रावरून रूग्णाला स्टीरॉइड मलम विकण्यामागचे गंभीर परिणाम समजाऊन देत आहोत. अशा दुकानांमध्ये लावण्यासाठी भिती पत्रेही तयार केली जात आहेत.

आम्ही अन्न आणि औषध प्रशासनातील अधिका-यांना आवाहन केले आहे. की त्यांनी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची काटेकोट अंमलबजावणी करावी व डॉक्टरांच्या निर्देशपत्रांशिवाय होणार्या स्टीरॉइड मलमांच्या विक्रीवर बंद आणावी. स्टीरॉइडच्या संमिश्र उत्पादनांना नव्याने परवानगी देऊ नये व आधी परवानगी दिलेली अशी मलमे बाजरातून काढून घ्यावीत व त्यांची उत्पादने थांबवावीत असे आवाहन आम्ही अधिका-यांना केले आहे.

जनसामान्यांसाठी हा आमचा संदेश आहे:  कृपया घरात पडलेले किंवा मित्राने शिफारस केलेले मलम तुमच्या त्वचारोगावर लावू नका. तुमच्या त्वचारोगावर सुरक्षित उपाय योजना करण्यासाठी तुमचे डॉक्टर अथवा त्वचारोगज्ञांचा सल्ला घ्या. तसेच कुठलेही मलम, मग जरी ते तुम्हाला डॉक्टरांनी लिहून दिले असले तरी, महिनोनमहिने व वर्षानुवर्षे वापरत राहू नका. तुमच्य आजाराबद्दल डॉक्टरांशी चर्चा करा व अधूनमधून त्यांना भेटून त्यांच्या सल्ल्याने मलमांचा वापर चालू ठेवा. जर काही संभ्रम असेल तर दुस-या डॉक्टरांचे मत घ्या. लक्षात असूद्या गोळ्या व इंजेक्शनप्रमाणे मलमे ही देखील औषधे आहेत. आम्हाला आशा आहे की अखिल भारतीय त्वचारोगतज्ञसंघटनेतील सर्व सभासदांच्या एकत्रीत प्रयत्नाने या सामाजिक उपक्रमात चांगले यश येईल व स्टीरॉइड  मलमांच्या गैरवा
पराचे जनसामान्यांवरील संकट कायमचे दूर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *