एक विशिष्ट धर्माला लक्ष्य करून त्यांनीच कसा जगभर हिंसाचार माजवला आहे यावर गल्लीबोळात, गावातल्या पारावर, चहाच्या टपरीवर जिथे जिथे लोक एकत्र जमा होत अशा सर्व ठिकाणि सोशल मीडिया विद्यालयात उत्तीर्ण झालेले सर्व विद्वान चर्चा घडवत होते परंतु २०१४ ची भारतातील सार्वत्रिक निवडणूक संपली आणि जणूकाही त्या सर्व देशातील आतंकवाद संपला अशा प्रकारे या चित्रफीतींचा व संदेशांचा वावर भारतीय समाजात संपुष्टात आला. आता २०१९ मध्ये पुन्हा निवडणूका होऊ घातलेल्या आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण देशात पुन्हा वातावरण तापविण्याचे व माथी भडकविण्याचे प्रकार पहिले मंदिर फिर सरकार व मंदिर वही बनायेंगे च्या माध्यमातून व्यवस्थित सुरू झाले आहेत.

हिंदू खतरे मे च्या आरोळ्या ऐकू यायला लागल्या की एके काळी परकीय आक्रमण झाले असे समजले जायचे आज या आरोळ्यांचा अर्थ निवडणूक जवळ आली असा असतो. २०१२ ते २०१४ या काळात अफगाणिस्थान, सीरिया, इराक आणि आफ्रिका खंडातील काही देशांतून मानवी कत्तलींच्या चित्रफिती व संदेश बहुसंख्य भारतीयांच्या मोबाइल मध्ये आश्रयाला होते, फेसबुक व तत्सम सोशल मीडियाच्या अनेक संकेतस्थळांच्या माध्यमातून राजकीय दृष्ट्‌या आवश्यक त्या पद्धतीने अनावश्यक भीती निर्माण करण्याचे कार्य या चित्रफीतींच्या व त्यासोबत प्रसारित होणार्‍या संदेशांच्या माध्यमातून एका रणनीतीचा भाग म्हणून व्यवस्थित पद्धतीने करण्यात आले होते.
आतातर या घोषणा कानावर आदळताच बर्‍याच वेळा ध्वनी संभ्रम निर्माण होत मंदिर वही बनायेंगे च्या ऐवजी सरकार फिर बनायेंगे असे काहीतरी ऐकू येते. राजकारण्यांनी आपल्या सोयीनुसार धर्माला निवडणुकांत रस्त्यावर आणलय आणि यापुढेही आणतीलच. महाराष्ट्रातील पाहिले धार्मिक क्रांतिकारी समाजसुधारक माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वातंत्र्यानंतरची काही भारावलेली वर्षे अनेक संतांनी आणि समाजसुधारकांनी अथक प्रयत्नांनी सैल केलेली जाती धर्माची जोखडे आज पुन्हा मजबूत होताना दिसत आहेत. राम मंदिर, बाबरी मस्जिद, शहाबानो प्रकरण, सुवर्ण मंदिर, ते आता हनुमानाची व इतर दैवतांची जातिगत व प्रांतवार विभागणी म्हणजे निवडणुकांच्या बाजारात उत्पादन विकण्यासाठी चाललेला खटाटोप आणि ही सर्व प्रतीके म्हणजे राजकीय पक्षांचे जाहिरातीचे प्रतिरूप ज्याला आपण इंग्रजीत मॉडेल म्हणतो त्यापेक्षा जास्त काहीच नाही असे सातत्याने जाणवत राहते.

माझे सामाजिक व राजकीय ज्ञान अतिशय कमी असणार्‍या काळात माझ्या एका मित्रांसोबत माझाच धर्म कसा श्रेष्ठ व तुम्हीही पूर्वाश्रमीचे हिंदूच वैगेरे गरळ ओकत वाद घालत असताना त्याने विचारलेल्या काही प्रश्नांनी मी निरुत्तर झालो माझ्या मित्राने हसत आणि अतिशय शांतपणे मला विचारले जर त्याने सध्याचा त्याचा धर्म सोडायचा ठरवला तर त्याला हिंदू धर्मात कसे येता येईल? त्यासाठी आदर्श अशी एखादी प्रणाली हिंदू धर्मात आहे का? हिंदू झाल्यानंतर धर्मात त्याचे काय स्थान असेल? हिंदू धर्म त्याला कोणत्या जातीत स्वीकारेल? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य की पुन्हा दलित? त्याच्या या प्रश्नांनी निरुत्तर होऊन मी नंतर हेच प्रश्न हिंदू धर्म प्रसार व भारतात हिंदू राष्ट्र बनविण्याची अविरत धडपड करणार्‍या अनेक विद्वानांना विचारले परंतु कोणालाही या प्रश्नांची व्यवहार्य व समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

जर हिंदू धर्मातील सर्व बांधवांना आपण हिंदू म्हणून समान दर्जा आणि सन्मान देऊ शकत नाही आहोत तर आपल्या धर्मात इतर धर्मीय कसे येतील याचा विचार हजारो वर्षे जुना असलेला आणि प्राचीन संस्कृतीने संपन्न असलेल्या हिंदू धर्मातील विद्वानांनी कधीच कसा केला नाही? हिंदूंनी जास्त अपत्ये जन्माला घालावीत असे अव्यवहार्य सल्ले देणार्‍या ब्रह्मचारी साधू आणि स्वयंसेवकांनाही याविषयी विचार करावा असे कधीच का वाटत नाही? हिंदू अथवा सनातन धर्मातून बाहेर निघून तयार झालेले अनेक धर्म व पंथ आज जगभरात फोफावत असताना हिंदू धर्म का कोमेजतोय आणि जगात फक्त एकाच देशापुरता का मर्यादित राहतोय याचा विचार हिंदू धर्माच्या मुळाशी खताऐवजी विष पेरणार्यांनी कधीतरी इतरांचा द्वेष बाजूला सारून मोकळ्या मनाने करणे गरजेचे आहे.

ज्या धर्मात फक्त जन्मानेच प्रवेश व धर्मातील स्थान ठरते अशा धर्माला वाढविण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ते यशस्वी होतील का? जेव्हा समाज शिक्षित होऊ लागतो त्यावेळेस त्याला त्याच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव होऊ लागते. हिंदू धर्मातही बहुजनांचे शिक्षणाचे प्रमाण जसे वाढू लागले तशी त्यांना त्यांच्यावर होणार्‍या जातिगत अन्यायाची जाणीव होऊ लागली व त्यानंतर त्या धर्माला लागलेल्या गळतीचे खापर दुसर्‍या धर्मांवर कसे फोडता येईल? शांतिप्रिय, तथाकथित उदारमतवादी व हजारो वर्षे जुना हिंदू धर्म इतर धर्मातील सोडाच पण स्वधर्मीयांनाही आधुनिक काळात त्यांच्या पात्रतेनुसार सन्मान देऊ शकत नसेल तर मग इतर धर्माच्या तुलनेत हिंदू धर्माची होणारी हानी थांबविण्यासाठी बहू विवाह व जास्त अपत्ये जन्माला घालणे असे उपाय म्हणजे हास्यास्पद प्रकारच.

शाळेत भूगोल विषयात स्थलांतरा विषयी शिकत असताना देशात प्रति वर्षी नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात असे वाक्य वाचनात आले होते त्यात दिलेले आकडे मला जास्तच आश्चर्यकारक वाटले होते. माझे शेजारी कित्तेक वर्षात बदलले नव्हते, माझ्या परिवाराने कित्तेक वर्षात घर बदलले नव्हते मग ही काय भानगड असा प्रश्न माझ्या मनात उद्भवला होता परंतु नंतरच्या वाक्याने मला पहिल्या वाक्याचा अर्थ लागला होता. देशात सामाजिक प्रथेनुसार लग्नानंतर मुलगी सासरी राहायला जाते आणि जवळजवळ सर्वच धर्मात ही प्रथा प्रचलित आहे. या प्रथेनुसार देशात दर वर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असत यादृष्टीने जर विचार करायचा झाला तर बर्‍याच ठिकाणी धर्म परिवर्तन हे विवाहाच्या मार्गाने झाले असेल परंतु हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात दुसर्‍या धर्मातील मुलींचे आनंदाने स्वागत होते. दोन जीवतील प्रेम, आपुलकी या मानवी भावनांव्यतिरिक्त एक बाब या प्रकारे लग्न झालेल्या परिवारात मुलाच्या घरचांच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळते की धर्मात एकाने वाढ झाली हे चूक की बरोबर हा विषय प्रत्येकाच्या विवेकावर सोडला तरी ते लोक मात्र आनंदी असतात परंतु बहुसंख्य हिंदू कुटुंबात आजही दुसर्‍या धर्मातील मुलीचे आनंदाने स्वागत होत नाही. अशावेळी फक्त इतर धर्मियांनी हिंदू मुलींसोबत लग्न करून लव जिहाद म्हणून कारस्थान केल्याचा उर बडवून आक्रांत करून काय साध्य होणार आहे.

२०१० च्या जनगणनेनुसार पाकिस्तानात २ टक्के हिंदू जनसंख्या आहे आणि ती २०५० सालापर्यंत वाढून पाकिस्तान हे जगातील ४ थे मोठ्या हिंदू जनसंख्येचे राष्ट्र होणार आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी झाली त्यानंतर अनेक मुस्लिम कुटुंब पाकिस्तानात व हिंदू कुटुंब भारतात स्थलांतरित झाली. १९५१ च्या जनगणनेनुसार त्यावेळच्या अखंड पाकिस्तानात(बांगलादेश सहित) १३ हिंदू राहत होते त्यापैकी जास्त हिंदू लोकसंख्या आजच्या बांगलादेश मध्ये होती परंतु १९९७ सालच्या जनगणनेनुसार पाकिस्तानातील हिंदूंचा टक्का कायम राहिला परंतु बांगलादेशातील हिंदू जनसंख्या २३% वरून ९% पर्यंत घसरली आहे. दुश्मन राष्ट्र पाकिस्तानात हिंदू कमी न होणे आणि ज्या बांगलादेशला भारताने सर्वतोपरी मदत केली त्यांच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध केले त्या बांगलादेशात हिंदू जनसंख्या कमी होणे हे पुन्हा सिद्ध करते की धर्म आणि राजकारण हे दोन्ही वेगळे विषय आहेत.

बांग्लादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, इंडोनेशिया अशी अनेक राष्ट्रे आहेत जिथे हिंदू धर्माचा टक्का घसरतो आहे परंतु जगात धर्मांतर केलेल्या सर्वच हिंदूंनी इस्लामचा स्वीकार केला असे नाही तर शांतीच्या मार्गावर चालणार्‍या बौद्ध धर्मकडेही बर्‍याच लोकांची पाऊले वळल्याचे प्रकर्षाने जाणवते. जगात ख्रिश्चन, इस्लाम धर्म जसे वाढले तसाच बौद्ध धर्म ही वाढला, आशिया खंडातील अनेक देशात बौद्ध धर्म शासनकर्ता धर्म आहे अनेक देशात बौद्ध धर्मीय बहुसंख्य आहेत परंतु ज्या भारतातून ज्या हिंदू धर्मातून बौद्ध धर्माने आपला वेगळा कल्याणकारी मार्ग शोधला तो हिंदू धर्म फक्त भारतापुरता मर्यादित झाला आहे.

या विषयीचा शेवटचा मुद्दा भारत फक्त हिंदू राष्ट्र बनले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपल्या इतिहासाने वारंवार दिले आहे हजारो वर्षांच्या गुलामी नंतर १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य आणि दूरदृष्टी असणार्‍या त्याकाळच्या नेतृत्वाने स्वीकारलेल सर्वसमावेशक संविधान याच्या बळावरच भारताने कधी नव्हे ती स्थिरता व संपन्नता अनुभवली आहे.

आठव्या शतकात इराकी शासक मुहम्मद बिन कासीम, दहाव्या शतकात तुर्की साम्राज्याचा शासक महंमद गजनवी गजनी ने १७ वेळा केलेली आक्रमणे, भारतात तुर्क साम्राज्याची स्थापना करणारा मोहम्मद घौरी, तेराव्या शतकातील गुलाम वंशाचा पहिला शासक कुतूबुद्दीन ऐबक, चौदाव्या शतकात तुर्कस्थानातल्या कविल्यातून आलेला जलालूद्दीन खिलजी, तुघलक वंश, १३९९ मध्ये तैमुरलंग, मंगोलियातून आलेला चंगेज खान, मंगोलियातील मुघल ज्यांनी नंतर इस्लाम स्वीकारला, उजबेक शासक शैबानी, १५२६ साली पानिपत युद्धानंतर बाबर ने भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली, सतराव्या शतकात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या विविध परकीय आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली व इथे राज्य केले परंतु १९४७ नंतर चीनचा अपवाद सोडला तर इतर कोणालाही भारताला त्रास देने शक्य झालेले नाही. अखंड भारत ही संकल्पनाच मुळात १९४७ नंतर मिळालेले स्वातंत्र्य आणि वल्लभ भाई पटेल यांनी भारतातील शेकडो राजे आणि त्यांची राज्ये भारतात समाविष्ट केल्याने अस्तित्वात आली आहे आणि कधी नव्हे ती ७० वर्षे टिकली आहे. भारत हिंदू राष्ट्र बनले तरच भारत महासत्ता बनू शकतो असा समज पसरवणारे अक्कल शून्य व इतिहासाचे अज्ञानी लोकांनी भारताचा खरा इतिहास चांगल्या प्रमाणित पुस्तकांतून वाचणे आवश्यक आहे. इतिहासात भारतावर आक्रमण केलेल्या देशांच्या यादीतील एकही देश आज सेक्युलर भारतावर आक्रमण करण्याइतका सक्षम राहिलेला नाही आहे याला कारण भारतात रुजलेली लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक भारतीय संविधान ज्याच्या बळावर भारताने प्रत्येक धर्मातील, समाजातील, जातीतील विद्वान व्यक्तींच्या ज्ञानाचा व कर्तबगारीची उपयोग करून घेत स्वतःचा केला उत्कर्ष.

इतिहासात भारताची अनेक शकले करणार्‍या धर्मांध राष्ट्रप्रेमींपेक्षा आजचे धर्मनिरपेक्ष देशप्रेमीच भारताला एकसंघ ठेऊ शकतात. कोणत्याही धर्मावर आधारित संविधान नसणे म्हणजेच भारताचं भारतीयत्व असणे हेच एकमात्र सत्य आहे. सत्यमेव जयते!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *