क्वचित एखादं पर्यटन स्थळ अस असतं, जिथे आपल्याला वारंवार जायला आवडतं. असच एक म्हणजे खजुराहो, मध्यप्रदेश.

मध्यप्रदेश मध्ये पन्ना जवळ छतरपूर जिल्यात असणारं खजुराहो म्हणजे भारतीय कलासंस्कृतीचं हृदय आहे. ४६ जणांचा ताफा घेऊन आम्ही खजुराहो मध्ये दाखल झालोत. बुंदेलखंड प्रांत म्हणतात तो हाच. म्हाकाव्यामध्ये जे चित्रकूट प्रांताचं वर्णन मिळतं ते देखील याच प्रदेशातील आहे.

१० व्या आणि ११व्या शतकात चांदेल राजवंशकडू इथे प्रतिस्वर्ग वाटणार्‍या अद्भुत मंदिरांची बांधणी झाली.नागर शैलीतील मंदिरे आणि भारतीय शिल्पकला यांचा सर्वोत्कृष्ट मिलाप येथे झालेला पाहायला मिळतो. पर्वताच्या शिखरासारखी आकाशात झेपावणारी उंच शिखरे, आणि अगणित कोरीव सुंदर मुर्त्या यांची सुबक रचना म्हणजे खजुराहो मंदिरे. म्हटलं जातं की इथे एकापेक्षा एक असणारे ८५ मंदिरे होती मात्र आज २५ पाहायला मिळतात. बाकी इतिहासाच्या उदरात गडप झालेली आहेत.

प्रमुख मंदिरामध्ये लक्ष्मण मंदिर,विश्वनाथ मंदिर, कंधारिया मंदिर ,जगदम्बा मंदिर , चित्रगुप्त मंदिर आणि जैन मंदिरामध्ये पार्श्वनाथ मंदिर इत्यादी आहेत.

सर्वच मंदिरे उंच जगतीवर बांधलेले असून सूर-सुंदर्‍या, यक्ष ,गंधर्व, देवी देवता, नानाविध प्राणी ,कालिदासाच्या नायिका, प्रेमी युगुले यांच्या रोचक कथा दर्शवणार्या मूर्त्यांनी नटलेली आहेत. मूर्त्यांचा रेखीव पणा, कलाकारी भुरळ पाडणारी आहे. माझ्यासारख्या शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तर मेजवानीच होती.

संपूर्ण मंदिरावर प्रामुख्याने चार पुरुषार्थ – धर्म, अर्थ, काम ,मोक्ष या विषयावर शिल्पांकन केलेलं दिसून येते. त्यामुळे इथे मैथुन शिल्पे सुद्धा जास्त पाहायला मिळतात. कामसूत्राच्या आधारावर विविध आसने, मैथुनाचे प्रकार, पद्धती या सर्वच गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे.

ही मंदिरे पाहून किमान त्याकाळच्या जीवन शैलीचा अंदाज येतो, काही शिल्पात नायिका लिखाण करताना दिसते, म्हणजे स्त्री शिक्षण सुद्धा होतं, काही शिल्पात नायक नायिका सोबत मदिरापण करताना दिसतात, काही ठिकाणी आजची फॅशन असणारी लेडीज पर्स सुद्धा दिसते.विविध पोशाख, केश रचना, अनेक स्त्रियांना शिकवणारे गुरू दिसतात, प्रेमाचे खट्याळ चाळे , मैथुन मध्ये गुंतलेली कपल्स, समलैंगी मैथुन करणार्‍या मुर्त्या आहेत. सर्व प्रकारच्या ज्या विषयावर आज उघड उघड बोलता येत नाही त्या विषयावर मंदिरांमध्ये भाष्य करण्याचं प्रयोजन काय असावं? हा नक्कीच उत्सुकतेचा पण विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि या गोष्टींना हीन संबोधणारे , धर्महीन म्हणणार्‍या संकुचित विचारधारेला सडेतोड उत्तर आहे खजुराहो. आपल्या उज्वल भूतकाळाचा आरसा आहे खजुराहो . फक्त पूजेची मंदिरे नसून जगण्याचा मन्त्र आहे खजुराहो.

भारताच्या उज्वल विचारधारेचा, स्थापत्य कलेचा, शिल्पकलेचा पोवाडा गात खजुराहो हजारो वर्षांपासून आजही दिमाखात उभा आहे. प्रत्येक मूर्ती पाहताना त्यामागे राबलेल्या हजारो त्या अज्ञात शिल्पकारांपुढे नतमस्तक व्हायला होतं|

सुना है किसीं पुराणे पत्थरोके खंडहर मे सेकडो प्रेमी अपने प्रेमीकाओके साथ प्रेम की समाधी लगाये बैठे है|
क्या उनके इस चिरंजीवी प्रेम ने ऊन पत्थरोको भी फुल की भांती कोमल बनाया होगा|

कीन अज्ञात शिल्पकारोने ऊन बेजान पत्थरोमे डाली है जान,सजाया है प्रतिस्वर्ग
और नाम दिया खजुराहो!
और नाम दिया खजुराहो!!

– प्रतिक जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *