प्रसिद्ध चित्रकार नवज्योत अल्ताफ यांच्या कलाकृतीचं प्रदर्शन नुकतंच मुंबईच्या राष्ट्रीय कला दालनात भरलं होतं. द अर्थस हॉर्ट यॉर्न आऊट या नावाने असलेल्या या प्रदर्शनात बेलगाम विकासामागील विनाश ऊोरेखित केला होता. या प्रदर्शनविषयी…

सुरूवातीलाच प्रवेशद्वाराशी दोन समांतर भव्य स्क्रिनस्. त्यावर आदिवासी, त्यांचं जीवन, त्यांच्या जमिनींवर विकासाच्या नावाखाली चाललेलं अतिक्रमण दाखविणारा माहितीपट, पुढल्या दालनात एका टिव्ही स्क्रिनवर तिस्ता सेतलवाड आणि रूपा मोदींची गुजरात दंग्यावर भाष्य करणारी मुलाखत, त्याच दालनात सलग मांडलेल्या तीन स्क्रिनस् ज्यावर समुद्राच्या लाटा आणि त्यांचा आवाज चालू असतानाच त्या लाटांच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक घटना उमटत जातात आणि तसतसा समुद्र करड्या रंगात परिवर्तित होत जातो. स्क्रिनवरील हे दृष्य त्याला लागूनच जमिनीवर मांडलेल्या आरश्यांवर प्रतिबिंबीत होताना बघणार्‌याच्या मनाची पकड घेतल्याशिवाय राहत नाही. पुढल्या दालनात आणीबाणीच्या काळात एका व्यक्तिवर गुदरलेल्या घटनेचा व्हिडीओ आहे. स्क्रिनच्या बाजूला ठेवलेला हेडफोन कानावर चढवून ऐकण्याची सुविधा आहे. शेवटच्या दालनात आठ ते दहा टिव्ही स्क्रिनस् एकाच वेळी सतत चालू आहेत.

तुम्ही हव्या त्या स्क्रिनसमोर उभं राहून बाजूला ठेवलेला हेडफोन कानाला लावा. प्रत्येक स्क्रिन वेश्या व्यवसायातील एक वेगळी मर्मभेदक गोष्ट उलगडत जाते. त्यात काही सेक्सवर्करस् च्या घेतलेल्या मुलाखती आहेत. या सार्‍या कलाकृतींतून एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे अवती भवतीच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीतून आलेली अस्वस्थता. कॅनव्हासवरील रंगांच्या मर्यादांना ओलांडून टिव्हि स्क्रिनवरील चालत्या-बोलत्या मुलाखतींमधून वा माहितीपटांतून स्वतःच्या कलाकृती अधिक जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध चित्रकार नवज्योत यांनी नवजोत विद्यार्थिदशेत असतानाच विद्यार्थि चळवळीत सहभागी झाली होती.जातियवाद आणि त्यातून फोफावत जाणारी सामाजिक विषमता, शोषण तिला अस्वस्थ करायचे. त्याबद्दल नवजोत सांगते की, मी स्वतःला ऍक्टिवीस्ट समजत नाही मी आर्टीस्टच आहे, पण आर्ट आणि ऍक्टीवीजम यांना एकमेकांपासून वेगळं करून मी पाहत नाही. किंबहुना सामाजिक , राजकिय प्रश्नांवर कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणच आता माझं जगणं झालं आहे. आज देशातील एकूणच परिस्थितीकडे पाहता, एका ठराविक पक्षाची किंवा व्यक्तिची हुकुमशाही मुळातच मला मान्य नाही. लोकशाही व्यवस्थेत कुणी काय खावं, काय ल्यावं हाज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यावर कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. नवज्योतची मुंबईच्या नॅशनल गॅलरीतील कलात्मक मांडणी लक्षवेधक ठरली.

विकासाच्या मॉडेलवर आसूड ओढताना नवजोत म्हणते की, विकासाचं हे मॉडेल योग्य आहे की नाही हे कोण ठरवतंय? आणि कशाच्या आधारावर?… आजपर्यंतचा अनुभव आहे की, ज्यांच्यासाठी विकासाच्या गोष्टी घडवल्यात असं दाखवलं गेलंय त्या समाजातील गरजू वर्गाला त्याचा काहीच फायदा मिळालेला नाही. विकासाच्या नावावर ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मिळालेल्या पर्यायी व्यवस्थेत अनेकत्रुटी आहेत. ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ते जगत होते, त्या जगण्यापासूनच त्यांना वंचित केलं गेलं. तुम्ही जर नीट पाहिलंत तर आपल्या व्यवस्थेतील विषमता, भेदभाव निसर्गाती कोणत्याचत्रघटकांत नाही. तिथे एक परस्परसंवाद आढळतो.

झाडं, पशु, पक्षी, नद्या, डोंगर या सार्‌यांमध्ये परस्परांवर अवलंबून असण्याची सुंदर प्रक्रीया सातत्याने घडत आहे. विकासाच्या नावावर आपण तेही उध्वस्त करतोय. पर्यायाने आपल्या आणि पृथ्वीच्या र्‌हासाला आपणच कारणीभूत ठरत आहोत. हे सारं प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावरच कळतं. म्हणूनच माझ्या कलाकृतीतून मी जे काही मांडते ते प्रत्यक्ष त्या ठीकाणी राहून, त्या माणसांशी बोलून, त्यांचे प्रश्न समजून घेऊनच निर्मित होतं. नवज्योत सांगते, गेली अनेक वर्षांपासून नवजोत छत्तिसगढमधील बस्तर या ठिकाणी जाते तिथले आदिवासी, खाणकामगारांशी संवाद साधते. त्यांच्या मुलांसाठी जो कम्युनिटी प्रोग्राम राबविला जातो त्यात आर्ट वर्कशाप घेते.

आर्ट गॅलरी म्हटलं की, काही छोट्या, काही थोड्याशा मोठ्या किंवा कधी कधी तर लार्जर दॅन लाईफ भासावं अशा भल्या मोठ्या कॅनव्हासवर चितारलेली चित्र नजरेसमोर येणं साहजिकच आहे. पण गेल्या दशकभरात आता या पारंपारिक फॉर्ममध्येही उलथापालथ झालेली आहे. तसं पाहता हे परिवर्तन दशकभराआधी युरोपात झालंच होतं. परंतु आपल्याकडे त्याचा प्रभाव अलिकडे दिसू लागला आहे. नवजोत अल्ताफ यांच्या कलाकृतींचं नुकतच मुंबईत झालेलं कलाप्रदर्शन. मुंबईच्या नॅशनल आर्ट गॅलेरी ऑफ मॉडर्न आर्टने आजपर्यंत नेहमीच देशभरातील अनेक नामांकित चित्रकारांच्या कलाकृतींना कलाप्रेमींपर्यंत पोचविण्याचं काम केलं आहे. नवजोत अल्ताफ हे मॉडर्न आर्टच्या जगातील असंच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे.

यात प्रदर्शित झालेली द अर्थस् हार्ट, थॉर्न आऊट हि विविध फॉर्ममधील आगळीवेगळी अभिव्यक्ति नवजोतने सादर केली होती. आपण याला फक्त चित्रप्रदर्शन असं निश्चितच म्हणणार नाही. नवजोतने गेल्या पाच दशकात, तिच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ,वेगवेगळ्या ठिकाणी जे काही मॉडर्न आर्टचे प्रयोग केलेले आहेत किंवा स्वतःच्या अभिव्यक्तिला विविध फॉर्ममध्ये साकारलेलं आहे ते विस्मयकारी आहे.

एके काळी जे जे स्कुल ऑफ आर्टमधून बाहेर पडलेली नवज्योत तिच्या पेंटिंग्सच्या फॉर्ममधून तर दिसतेच. शिवाय फोटोग्राफी, स्कल्पचर, इंस्टॉलेशन, व्हिडीओ सोबतच ओडीओ अशा फॉर्ममधूनही प्रकट होताना दिसते. हे प्रकटिकरण नुसतं तिच्यातल्या कलाकाराच्या काल्पनिक विश्वातून आलेलं नसून गेल्या पाच दशकातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भही त्यात सामावलेले आहेत. मग त्या धार्मिक दंगली असोत, बॉंब स्फोट असोत, आदिवासींच्या समस्या, खाण कामगारांचे प्रश्न, औद्योगिकरण, शहरी कामगारांचं शोषण, स्रियांवरचे अत्याचार, वेश्या व्यवसाय, पर्यावरणाचा र्‌हास ते थेट जगाच्या नकाशावर चाललेल्या इस्रायलमधील घडामोडी असोत.

नवज्योतच्या सर्व कलाकृती जरी सामाजिक-राजकिय विषयांतून प्रेरीत झालेल्या असल्या तरी एका दालनातील ‘टच वन, टू, थ्री’ या तीन स्क्रिनस् वर उमटणारी चलतचित्र नवजोत आणि तिचा दिवंगत पति अल्ताफच्या भुतकाळातील आठवणींना उजाळा देणारी आहेत. अल्ताफ ज्या वळणावर नवज्योतला भेटला तिथून पुढील नवजोतच्या कलाकृतींवर डाव्या विचारसरणीच्या अल्ताफची छाप ठळकपणे दिसते. नवजोतचं नाव जरी मॉडर्न आर्टशी जोडलं गेलेलं असलं तरी बस्तरमधील आदिवासी भागात काम करणारी, कोळश्याच्या खाणीत काम करणारं तिच्यातील सामान्य कार्यकर्ता हि तिची पार्श्वभूमीही दुर्लक्षित करून चालणार नाही. कलाकाराच्या संवेदनशील मनाला सामान्यांच्या, शोषितांच्या प्रश्नांचे स्पर्श जेंव्हा होतात तेंव्हा त्याची अभिव्यक्ति नुसतीच खुलत नाही, तर पूर्वापार चालत आलेल्या चौकटी तोडून सुस्पष्टपणे व्यक्त होण्याचे आणखी नवे मार्ग शोधते. वेगवेगळ्या फॉर्ममधून व्यक्त होणारं नवजोतचं द अर्थस् हार्ट, थॉर्न आऊट हे याचं उत्तम उदाहरण आहे.

-संतोष खामगांवकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *