मुंबई जवळील नालासोपारा येथून श्री राम सेनेच्या वैभव राऊत याच्या घरी काही स्फोटके सापडली. यावर सोशल मिडीया आणि वृत्त वाहिन्यांवर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. या चर्चेत काही म्हणतात की वैभव राऊत हा शिवप्रतिष्ठानचा तर काही म्हणतात की तो सनातन संस्थेचा आहे परंतु या वैभव राऊत ने स्वतः एका वाहिनीवर बोलताना तो श्री राम सेनेचा असल्याचे कबूल केले आहे. तसे म्हटले तर या तिनही संस्थाचे ध्येय आणि उद्दिष्ट सारखेच असल्याने यावर चर्चा नको. याच चर्चेत अजून एक भगवा दहशतवाद हा शब्द सतत चर्चेत येतोय.
या अगोदर सुद्धा अशाच काही प्रकरणात हा शब्द वापरला गेला होता. काही कारस्थानी मुद्दामहून भगवा दहशतवाद शब्द वापरून हिंदुत्वाच्या बुरख्याखाली स्वतः ची कुटनिती साळसुदपणे लपवत आहेत. तर हे कट कारस्थान न समजून घेता काही शिक्षित अडाणी त्यांचा हिरवा दहशतवाद ना मग घ्या आमचा भगवा दहशतवाद असा चुकीचा वाक्यप्रचार वापरून भगव्या रंगाचा तसेच आपल्याच महापुरुषांना बदनाम करीत आहेत. तर काही अर्ध्या हळकुंडात निळवटलेले अर्धवट भगवा दहशतवाद शब्द वापरून आपण कसे पुरोगामी आहोत असे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करित आहेत. त्याना हेही समजत नाही कि या शब्दप्रयोगाने आपण या देशातील सर्वच क्रांतीच्या लढायांचा किंबहुना आपल्याच महापुरुषांचा अपमान करतो आहोत.
भगवा रंग म्हणजे तो क्रांतीचा आणि समर्पणाचा रंग म्हणून ओळखला जातो. तो हिंदू अथवा इतर कोणत्याही धर्माशी संबंधीत अथवा धर्माची ओळख नाही. भगवा रंग हा भर उन्हात शेतात कष्ट करीत असताना पायाला पोळणार्‍या मातीचा आहे, त्याच उन्हात चमकणार्‍या क्षितिजाचा आहे, शेतकरी, कष्टकरी आणि मातीशी नाते असणार्‍या सर्वांचा आहे. वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध आणि शोषणा विरुद्ध पहिली क्रांती घडवून आणताना गौतम बुद्धांचा आहे, गौतम बुद्धानी आणि त्यांच्यानंतर त्यांच्या अनुयायांनी अंगावर चढवलेल्या चिवराचा आहे. तीच समानतेसाठीची आणि अन्यायाविरुद्धची क्रांतीची लढाई सुरू ठेवणार्‍या संत नामदेवांचा आहे.
संत नामदेवानी वारकरी संप्रदायाचा पाया रचताना खांद्यावर घेतलेल्या झेंड्याचा आहे. कलयुगी बुद्धरुप हरी धरी, तुकोबा शरीरी प्रगटला असे म्हणणार्‍या बहिणाईच्या ज्याना दुसरा बुद्ध म्हणून ख्याती मिळाली अशा संत तुकारामांचा आहे. पुढें याच संताचीच शिकवण खांद्यावर भगवा घेवून वारीद्वारे गावागावांत पोहचविणार्‍या सर्वच संताचा आणि वारकर्‍यांचा आहे.
छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे प्रतिक म्हणून भेट देणार्‍या स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचा आहे. मोगली आणि स्वकियातीलच अत्याचारी शत्रूच्या छातीत धडकी भरवणार्‍या छत्रपती शिवरायांचा आहे. स्वराज्यासाठी शिवरायांच्या एका शब्दावर प्राण अर्पण करणार्‍या मावळ्यांचा आहे. स्वतःला बुद्धांचा शिष्य संबोधून बुद्धाचा विचार जनमानसात पोहचविण्यासाठी दिक्षा घेणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे.
मेरा रंग दे बसंती चोला असे म्हणत देशासाठी हसत हसत फासावर जाणार्‍या शहिद भगतसिंग यांचा आहे.
भगवा रंग हा त्यांचा आहे ज्यानी कधीही एका जातीचा, धर्माचा किंवा स्वस्वार्थाचा विचार न करता सर्व समाजाचा त्यातील शोषितांचा विचार केला.
या सर्व महापुरुषांनी भगवा रंग आपले कार्य करताना क्रांतीचा रंग म्हणून वापरला. म्हणूनच हा भगवा देशाच्या राष्ट्रध्वजात मानाने मिरवणारा आहे.असे असतानाही आपण या क्रांतीच्या भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडून या सर्व महापुरुषांचा किंबहुना या देशाचा अपमान करतो आहोत. सध्या जगभरात जिहाद च्या नावाखाली जे चालू आहे. त्याच धरतीवर इथलेसुधा काही तसेच विकृत कार्य करीत आहेत. त्याचा संबंध कुठेही भगव्या रंगाशी अथवा हिंदू धर्माशी नाही, हे अगोदर समजून घ्यायला हवे. तसा असता तर त्यांनी गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि कलबुर्गी या स्वधर्मियानाच मारलेच नसते. त्यांचा उद्देश वर्ण वर्चस्वाचे समर्थन करणार्‍या ब्राम्हणी किंवा सनातनी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आहे. त्यासाठीच तर ते सतत समानतेचा आग्रह धरणार्‍या संविधानाला विरोध करीत आसतात. बलात्कारी आणि अत्याचारी बुवा बाबांचे समर्थन करीत असतात.

त्यामुळे यापुढे अशी कृत्ये पुढे आल्यास त्याला भगवा दहशतवाद म्हणू नये. त्याला ब्राम्हणी किंवा सनातनी दहशतवाद असेच म्हणावे.

– प्रमोद शिंदे
-९९६७०१३३३६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *