बस्ती मे अपनी हिन्दू मुसलमॉं जो बस गए इंसॉं की शक्ल देखने को हम तरस गए… मानवतेचा कट्टर पुरस्कार करणारे इन्कलाबी शायर कैफ आझमी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांची शायरी, गाणी ही सर्वश्रृत आहेतच, पण एक कम्युनिस्ट विचारवंत म्हणूनही आपली लेखणी परिवर्तनासाठी झिेवली. कैफिचं समृद्ध साहित्य आणि इन्कलासी जीवन याचं सुवर्ण दालन मराठी वाचकांसाठी यानिमित्ताने सिद्ध होत आहे. अखिल भारतीय साहित्य संमलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सिदहस्त लेखणीतून ही मालिका….

यवतमाळच्या साहित्य संमेलनात इंग्रजीची साहित्य अकादमी पुरस्कार विजेती लेखिका नयनतारा सहगल यांना आधी उद्घाटनाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देऊन ते मग रद्द केल्यामुळे संमेलनाला व महाराष्ट्राच्या सहिष्णु उदारमतवादी परंपरेला कलंक लावला. तो पुसून टाकण्यासाठी राज्यातील लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात नयनतारा सहगल यांचे विचार ऐकून त्यांना सार्‍यांनी उभं राहत टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. त्यामुळे काही अंशी का होईना महाराष्ट्राला व साहित्य संमेलनाला लागलेला अनुदारतेचा तसंच असभ्यतेचा कलंक धुवून निज्ञाला, अशी माझी भावना त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सहभागी असताना झाली होती.

या कार्यक्रमात मला सातत्यानं उर्दू शायर कैफी आझमीची आठवण येत होती. त्याचं कारण नयनतारा सहलग यांनी व्यक्त केलेले विचार कैफी डॉक्टराईन या सिद्धांताशी मिळते जुळते होते. नयततारा सहलगनी आपल्या भाषणात ‘हिंदु राष्ट्राला स्पष्ट नकार देत बहुधार्मिकता गाभा असलेली सहिष्णु स्वरूपाची हिंदुस्थानियत किंवा भारतीयत्व अबाधित राखलं पाहिजे’ असे विचार मांडले होते. याच साठी तर कैफी आझमी आयुष्यभर आपली कला वापरत होते, लेखणी झिजवत होते. प्रेम, भाईचारा आणि धार्मिक सलोख्याचा आवाज बुलंद करत होते. भारताची साझा वारसा असणारी ‘मिली-जुली’, ‘गंगा-जमनी’ तहजीब (संस्कृती) आणि सर्वधर्म, जात, पंथ, लिंग, वंश रंगाच्या माणसांचे शांततामय सहअस्तित्व यासाठी कैफी आझमी आयुष्यभर काम करीत होते. त्यामुळे या कार्यक्रमातलं नयनतारा सहगलचं भाषण ऐकताना खचितच ही तर आपली सहोदर भगिनी शोभतेय असंच कैफीच्या आत्म्यास – रुहला खचितच वाटून गेलं असणार, अशी माझी भावना झाली होती.

१४ जानेवारी १९१९ हा कैफी आझमीचा जन्म दिवस. यंदा २०१९ ला त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झालं आहे. एकदम माझ्या मनात जन्मतारखेवरून एक लोभस गंमतीचा विचार चमकून गेला. चौदा जानेवारी हा हिंदूंचा संक्रांतीचा सण. संक्रांत म्हणज गोड बोलण्याचा आणि तीळगुळाने तोंड गोड करण्याचा दिवस. कैफी आझमींना हिंदू आणि मुस्लीम समाजात प्रेम, भाईचाराची स्निग्ध गोडी असावी असं सदैव वाटायचं. त्यामुळं संक्रांतीला त्यांचा जन्मदिवस असणं हा हिंदुस्थानच्या गंगा जमनी म्हणजेच बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक संस्कृतीसाठी नियतीनं कदाचित दिलेला शुभसंकेत आहे… नेहरूंनी जसा नियतीशी करार केला होता, तसाच भावोत्कट असा कैफीनंही करार केला होता. तो म्हणजे, ’अ ींीूीीं ुळींह र्ाीश्रींळ ीशश्रळसर्ळेीी र्लीर्श्रींीीश’ हा करार कैफींनी आयुष्यभर अव्यभिचारी निष्ठेनं पाळला.

आज धार्मिक विद्वेषाच्या विखारी वातावरणात मनामनात संशय, भीती व सूडाच्या भावना भडकत असताना व माणसामाणसात धर्म, खाणंपिणं, पोषाख, प्रार्थना-उपासनेवरून भिंती पडत असताना कैफी आझमीनी आपल्या शायरीतून आणि कृतीने -वागण्यातून बंधुतेचा आणि समता, लोकशाही, सामाजिक न्याय आणि विवेकादी आधुनिक पुरोगामी मूल्यांचा पुरस्कार केला; त्यासाठी आपली साहित्यकला वापरली. म्हणून त्यांचा जन्मशताब्दीच्यसा निमित्ताने त्यांनी भारतीय साहित्य कलेला, चित्रपटसृष्टीला आणि पुरोगामी, आधुनिक विचारांना जे अनमोल असं योगदान दिलं आहे, त्याचा उर्दू भाषा-विश्व वगळता अन्य भाषिक साहित्य व कलांनी त्याचं पुरेसं मोल जाणलं आहे, असं वाटत नाही. मराठी साहित्यातही कैफीवर काही नैमित्तीक फुटकळ लेख सोडले तर त्यांच्या शायरीचा व ध्येयसक्त जीवनाचा समग्रतेने वेध घेतलेला दिसून येत नाही.

मी कैफींना विसाव्या शतकातला एक श्रेष्ठ उर्दू शायर मानतो. मीच कशाला साहित्याचे जाणकार त्यांचं निर्विवाद शीर्षस्थान निःसंदिग्धपणे मानतात. त्यांची विपुल काव्यसंपदा, चित्रपट कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन, त्यांचं प्रगतीशील लेखक चळवळ आणि इप्टाद्वारे कलेच्या माध्यमातून आम आदमीचा आवाज होणं त्यांच्या दुःख, वेदनेचा स्वर व शब्द होणं आणि मुशायरा, जलसे, व्याख्याने व सार्वजनिक कार्यक्रमातून वाणीद्वारे पुरोगामी मूल्यांची पेरणी करत समाज प्रबोधन करणे… हे पाहिलं की त्यांचा जावई आणि त्यांची अभिनेत्री कन्या शबाना आझमीचा पती जावेद अख्तरनं म्हटल्याप्रमाणे खरोखरच कैफी एक ‘अजीब आदमी’ होता… त्याचं हे वेगळं कलंदरपण सांगताना जावेदच्या शब्दांना खुमारी चढते व ते कैफीचं श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात,
‘‘अजीब आदमी था वो
मुहब्बतों का गीत था बगावतोंका राग था
कभी वो सिर्फ फूल था कभी वो सिर्फ आग था
आदमी अजीब था वो’
त्यांचं वेगळेपण – अजीबपण कशात होतं?
‘वो मुफलिसोंसे कहता था
कि दिन बदल भी सकते है
वो जबिरोंसे कहता था
तुम्हारे सरपे सोने का जो ताज है
कभी पिघल भी सकता है’

वो ख्वाबसे कहता था
के तुझको सच करुंगा मै
वो जिंदगी से कहता था
कि तुझको सजाऊंगा मै
वो आदमी से कहता था
कि आदमी से प्यार कर
उजड रही है ये जमीं
कुछ अब इसका सिंगार कर!
अजीब आदमी था वो’’

एकमेकांवर प्रेम करावं व एकत्र गुण्यागोविंदानं रहावं, ही तर साधी सरळ मानवी संस्कृती आहे. तसेच ती माणसांची सहज प्रेरणा असते. पण माणूसजात ती विसरून गेलाय. त्याच्यातलं दैवत्व दबलं जाऊन त्याचं पशुत्व-त्याची हैवानियत आज त्याचा मनावर अधिराज्य करताना दिसतेय. धर्म आणि हिंसेच्या जहरी कॉकटेलातून निर्माण झालेला कडवा (अ)धर्म प्रेरित दहशतवाद, जागतिकिकरणातून आलेला चंगळवाद, पैशाला प्राप्त झालेल्या महत्त्वामुळे माणुसकीचा त्या प्रमाणात झालेला र्‍हास आणि दमनकारी राज्ययंत्रणा, तिची असहिष्णुता पुराणातली वांगी शोधून काढणारी व काळाचे काटे उलटे फिरवत भूतकाळातील अनिष्ट प्रथा-परंपरांचं केलं जाणारं पुनर्जीवन… धर्म, जात, पंथ, लिंग, भाषा व रंगामुळे माणसाचं परस्परांपासून दुरावणं, एवढंच नव्हे तर परस्परांकडे संशयानं पाहणं, मनात घट्ट अढी धरणं.. यामुळे जावेद अख्तरच्या शब्दात कैफीचा ध्यास की, ‘वो आदमी से कहता था कि आदमी से प्यार कर’ आज अवघी माणुसजात विरून गेलीय की काय, असं अंधकारमय गडद वातावरण जगात व आपल्या देशातही दिसत आहे.

त्या पार्श्वभूमीवर कैफीची शायरी खरा प्रकाश दाखवणारी आहे, प्रेम-माणुसकीचा संदेश देणारी आहे व प्रत्येकाचं दुःख-दर्द वेदनेचं हरण झालं पाहिजे अशी मनस्वी असणारी भावना आहे. ती आजच्या काळात समजून घेत आत्मसात करणं किती महत्त्वाचं आहे, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही.
कैफी आझमींचा एक अजरामर शेर आहे,
‘‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा.
गम किसी दिल मे सही गम को मिटाना होगा’’

हे तर त्यांचं मनापासून स्वीकारलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं व ते तसे जगलेही. शेतकरी-कामगारांचं दुःख, गम, गरिबी आणि अभावाचं जगणं, स्त्रीचं दुःख पुरुष प्रधान व्यवस्थेनं दिलेल्या दुय्यमत्त्वाचं-असमानतेचं दुःख आणि कट्टर धर्मांधांनी धर्म-जातीत पडलेली फूट ही… सारी दुःखं, गम मिटवली जाऊन प्रेमाचा जश्न नव्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे, हा कैफींच्या शायरीचं एक प्रकारे प्राणतत्त्व होतं! फाळणीचा आघात आणि आई-वडिलांचं पाकिस्तानला निघून जाण्याचं दुःखं पचवूनही कैफीची हिंदू-मुस्लीम एकतेवरची श्रद्धा कायम होती. अगदी बाबरी मशिदीच्या पतनानंतर आणि शेवटच्या काळातील गुजरातच्या नरसंहारानंतर. पण ज्याच्या बातम्या टीव्हीवर पाहत आजारी, विकलांग कैफी आसवं ढाळायचे, तरीही ते कधी कडवट झाले नाहीत. कारण भारताची परंपरा सहिष्णु आहे व या दंगली, हे खून खराबे प्रासंगिक, अपवादात्मक असतात, यावरची कैफींची श्रद्धा कधी कमी झाली नाही.

ते हाडाचे कम्युनिस्ट होते. पण त्यांचं गांधीजींशी दोन बाबतीत साम्य होतं किंवा गांधीच्या दोन विचारांचे ते प्रामाणिक आणि डोळस पुरस्कर्ते होते. एक म्हणजे अंत्योदय. गांधींची अंत्योदयाची कल्पना होती, शेवटच्या गरीब माणसाचा अश्रू पुसणे. ती कैफींच्या ‘गम किसी दिल से सही गम को मिटाना होगा’ या विचारांशी मिळती जुळती आहे. किंबहुना कैफींना हा शेर अंत्येदयाच्या तत्त्वज्ञानातून स्फुरला तर नसेल? (अर्थात ही माझी कवी कल्पना समजा.. पण ती बरोबर वाटू शकते ना?) दुसरी गोष्ट म्हणजे कौमी एकता तसंच धार्मिक सद्भाव. कैफींची ‘सांप’ ही गाजलेली कविता हाच विचार अत्यंत जोरकसपणे मांडते. ते धर्मांधतेच्या जहराला सांपाची उपमा देत म्हणतात, जेव्हा विज्ञान पैशांचं -अर्थाचं दास झालं आणि विद्या तसंच ज्ञानावरचा विश्वास उडाला, तेव्हा या धर्मांधतेच्या सांपाला नवजीवन मिळालं. यावर उपाय काय? असा प्रश्न उपस्थित करीत ते शेवटी लिहितात,

‘‘ये हिंदू नही है मुसलमां नही
ये दोनो के मगज और खूं चाटता है
बने जब ये हिंदू मुसलमां इन्सां
उस दिन ये कंबख्त मर जायेगा !’’

पण हा धर्मांतधतेचा सांप आजही जिवंत आहे. तो कंबख्त मरावा म्हणून महात्मा गांधींनी हिंदू-मुस्लीम ऐक्य घडून यावं म्हणून फाळणीच्या हिंसामय आणि माथं भडकलेल्या वातावरणात उपोषण केलं, नौखाल पदयात्रा केली. खून झाला नसता तर पाकिस्तानातही ते कौमी (धार्मिक) शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाणार होते. कैफ या बाबतीत कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांचा पट्टशिष्य शोभतात. ‘सोमनाथ’ कवितेतून मुस्लीमांच्या मूर्तीभंजनाच्या अपकृत्यांवर कोरडे ओढले, तर ‘दुसरा बनबास’मध्ये बाबरी मशिदीच्या विध्वंसनाचं श्रीरामाला पण ही रक्तरंजित अयोध्या नगरी रास आली नाही म्हणून ते पुन्हा दुसर्‍या वनवासाला निघून गेले; हा भाव प्रगट करीत कट्टर हिंदुत्ववाद्यांचा डोळ्यातही चरचरित अंजन घालण्यास त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही. एवढंच नव्हे तर बाबरी मशिदीच्या पतनापूर्वी व्हील चेअरवर असतानाही त्यांनी कानपूर ते अयोध्या शांतीमार्चमध्ये भाग घेत दोन्ही धर्मीयांना शांततेचं आवाहन केलं. ‘नसिम’ चित्रपटात वृद्ध आजोबांचं बहारदार काम करून बाबरी विध्वंसनापूर्वीच्या असंख्य मुस्लीम माणसाची खदखद व्यक्त केली व सुजाण प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केलं.

खरंच जावेद अख्तर म्हणतात, तसा हा ‘अजिब आदमी’ होता.
त्यांचा ‘अजबपणा’ किंवा वेगळेपणा काय, कसा व किती सांगावा? काही किस्से सांगतो वानगी दाखल.

पहिला किस्सा ‘तमस’ फेम लेखक भीष्म सहानी यांनी एका लेखात वर्णिला आहे.
कैफी, सरदार जाफरी, भीष्म सहानी, इस्मत चुगताई आदी सर्वजण एकत्र ‘कम्युन’मध्ये १९४०च्या दशकात राहायचे, तेव्हा कैफीचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि कम्युनिस्ट पार्टी प्रत्येकाला ते फुलटाईम वर्कर असल्यामुळे दरमहा चाळीस रुपये मानधन द्यायची. ते दुसर्‍या महायुद्धामुळे भडकलेल्या महागाईत पुरे पडायचे नाहीत. म्हणून त्यांना तेव्हा रेडिओवर कार्यक्रम करून वरकमाई करावी लागायची.

एकदा दहा-बारा जण मिळून रेडिओ स्टेशनला डबिंगच्या कामासाठी पायी निघाले होते. सर्वांचीच पादत्राणे झिजलेली, पण त्या दिवशी कैफी आझमींच्या पायात नवे काळे पंपशू होते. सार्‍यांनी त्यांना त्यावरून बरंच छेडलं. पण कैफी नव्या बूटांमुळे बालसुलभ आनंदात होते. काही वेळानं मित्रांना समजलं की त्यांना हे सूट कामगारांनी भेट म्हणून दिले आहेत. हा रहस्यस्फोट करीत कैफी म्हणाले,
‘जानते हो यह किसने दिये है? एक मजदूर बस्तीके मजदूरोंने. हम उनके यहां शेर – गझल सुनाने गये थे. उन्होने हमारे शेर सुनकर हमे गले लगाया और फिर जूतोंका ये जोडा नजर किया’

पादत्राणे बनवणारे चर्मकारही कैफींच्या शायरीवर फिदा होते आणि त्यांना आपला हमदर्द मानत होते. त्याचा हा खरा किस्सा भीष्म सहानीनं एका लेखात कथन करीत पुढे असंही लिहिलंय की,

‘यह सुनकर हम लोग सचमुच चुप हो गये और बडी श्रद्धासे उन जूतों की ओर देखने लगे, जो अब जूते न रहकर हमारी नजरमे एक बहुत बडा खिताब (सन्मान) लग रहे थे, जिससे हमारे एक साथीको सन्मानित किया गया था. और सच मानिये तो वह सन्मानही था. मेहनतकश जनता के शायर को मजदूरोंनेही सन्मानित किया था. यह तोहफा उन्ही की इस पहचान और महोबत की निशानी थी. फिर क्यो न उन्हे पहनकर कैफी इठला उठला कर चलता’

दुसरी आठवण कैफीची पत्नी शौकत आझमी यांनी त्यांचा ‘कैफी और मे’ या पुस्तकात वर्णिली आहे. १९७२ साली कैफींना अर्धांगवायूचा झटका आला होता व ते बीच कँडी या मुंबईच्या दवाखान्यात डमिट होते. त्यांना विलक्षण त्रास होत होता, पण अशाही अवस्थेत त्यांना ‘धमाका’ नावाची नज्म सुचली, ती त्यांनी अडखळत्या स्वरात सांगितली व शमा जैदी या आजच्या प्रसिद्ध लेखिकेनं लिहून घेतली. ही नज्म पुस्तकात छापताना ‘धमाका’ शीर्षकाखाली कंसात ‘चारू मुझुमदार की यादमें’ असं लिहिलेलं आहे. चारू मुझुमदार हा हिंसक नक्षलवादी चळवळीचा प्रवर्तक. त्याचा मृत्यु २४ जुलै १९७२ ला झाला. त्याच्या मृत्युपूर्वी काही महिने आधी ‘धमाका’ ही कविता कैफीनी बीच कँडी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी असताना लिहून नक्षली हिंसेची आणि सर्वहारा वर्गाची राजवट स्थापण्याबाबतची व्यर्थता नेमकेपणानं या कवितेद्वारे व्यक्त केली होती. शायरी हा त्यांचा श्वास होता. शरीर विकलांगतेतही अगदी शेवट पर्यंत ही सखी त्यांच्या जवळ होती – ताजी व तल्लख!

तिसरा किस्सा शबाना आझमीनं – कैफीच्या प्रिय कन्येनं कथित केला आहे, तो असा आहे. बालपणापासून शबाना आपल्या अब्बाची शायर म्हणून असणारी लोकप्रियता आणि मैफिल जिंकण्याची हातोटी जाणून होती. ते जेव्हा केंव्हा मुशायराहून मध्यरात्री घरी परतायचे, शबाना त्यांना मुशायरा झाला हे उत्सुकतेनं विचारायची, ते म्हणायचे ‘ठीक था’ एकदा तिनं आग्रह केला, मुशायराचा अनुभव तपशीलानं सांगण्याचा; तेव्हा कैफी म्हणाले, ‘छिछोरे लोग अपनी तारीफ करते है जिस दिन मुशायरे मे मै बुरा पेश करूंगा, उस दिन आने के बात बताउंगा’ अर्थात अशी वेळ कधी आली नाही, हे सांगण्याची गरज नाही.

कैफी आझमीच्या खिशात सदैव कम्युनिस्ट पार्टीचा बिल्ला असायचा. मरतानाही तो होता. एवढी त्यांची पक्षावर व पक्षाच्या विचारधारेवर त्यांची श्रद्धा होती. याबाबत शबानाची मोठी रोमांचक आठवण आहे, ती तिच्या शब्दात अशी आहे.
‘मैने जब इस दुनिया मे आंखे खोली तो जो पहला रंग मैने देखा था, वो रंग था लाल’ मै अपने बचपनमे अपने मां-बापके साथ रेड फ्लैग हॉल मे रहती थी, जहां बाहर की दरवाजेपर एक बडासा लाल रंग का झंडा लहराता था. जरासी बडी हुवी तो बताया गया की लाल रंग मजदुरोंका रंग है

मेरा बचपन या तो अपनी मां के साथ पृथ्वी थिएटर के ग्रुप (शौकत संसाराला हातभार म्हणून पृथ्वीराज कपुरांच्या नाटक कंपनीत काम करायची.) के साथ या अपने बाप के साथ मजदूर किसानों के जलसे मे. मदनपुरा बंबई की इक बस्ती है जहां मे अब्बा के साथ ऐसे जलसों मे जाती थी. हर तरफ लाल झंडे, गुंजते हुवे नारे और अन्याय के खिलाफ शायरी और फिर गुंजता हुवा नारा – इन्किलाब झिंदाबाद!’
प्रगतीशील लेखक चळवळीमध्ये सारे डाव्या पुरोगामी विचारांचे असले तरी कैफी आणि सरदार अली जाफरी प्रमाणे कट्टर कम्युनिस्ट नव्हते. पण कैफींच्या पक्षावरील अव्यभिचारी निष्ठेची कमाल पहा. एका मुलाखतीमध्ये संजीव चौहानांनी ‘जिंदगी की आरजू क्या है?’ असा प्रश्न विचारला तेव्हा कैफी ताडकन म्हणाले,

‘मै गुलाम हिंदुस्थान में पैदा हुआ था. अब आझाद हिंदुस्थानमे जी रहां हुं. और सोशालिस्ट हिंदुस्थान मे मरने की तमन्ना है ’

अर्थात त्यांची ही मनिषा काही पूर्ण झाली नाही. भारतीय संविधानात समाजवाद हा शब्द असला तरी १९९१ नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं यु टर्न घेत जागतिकिकरणाची आणि बाजारी अर्थकारणाची कास धरली आणि परिणामी कुठलाही पक्ष उघडपणे बोलत नसला तरी भारतानं समाजवादाला मूठमाती दिलीय हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे गरिबांची गरिबी मिटवणारा आणि श्रीमंत-गरिबातली दरी मिटवणारा समाजवाद त्यांच्या नजरेत दूर दूर कुठंही दिसत नव्हता. आणि आता तर समाजवाद शब्द उच्चारला पण जात नाही.

कैफी आझमींचं निधन १० मे २००२ रोजी झालं, त्यापूर्वी मार्च २००२ मध्ये झालेली गुजराथची भीषण दंगल त्यांनी टीव्हीवर आसवे ढाळत पाहिली. या दंगलीत मुसलमानांचा नरसंहार झाला व स्त्रियांवर बलात्कार-अत्याचार फार निर्घृण क्रूरपणे करण्यात आले. हा पाक इन्सान जन्नतच्या (मुस्लीम धर्मश्रद्धेप्रमाणे पण कैफी तर संदेहवादी किंवा नास्तिकच होते,) वाटेवर असताना प्राण जाण्यापूर्वी आणि नजर मिटण्यापूर्वी त्यांना कौमी एकतेची चिता पहावी लागली होती… त्यावेळी कदाचित पूर्वी लिहिलेला हा आपलाच शेर उदास होऊन स्वतःशीच ते पुटपुटत असतील का?

‘‘मै ढूंढता हूं जिसे वह जहा नही मिलता
नयी जमीं नया जहां नही मिलता
वह तेग मिल गयी जिससे हुवा है कत्ल मेरा
किसी के हात का उस पर निशां नही मिलता’’
हा खून कैफींच्या, कौमी एकतेवर असणार्‍या स्वप्नांचा व विश्वासाचा होता, समाजवादाला तिलांजती देत गरिबांना वार्‍यावर सोडून दिल्यामुळे ‘हर दिल का गम मिटाना होगा’ या प्रगतीशील लेखक चळवळीतील तत्त्वज्ञानाचा आणि जीवन मूल्यांचा खून होता. ज्यांच्या तलवारीनं खून झाला, ती आपल्याच माणसांच्या हातात आहे, ही विदारक जाणीव कैफींना त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या दशकात – नेमकेपणानं सांगायचं झालं तर बाबरी मशिदीचा विध्वंसाचा काळ १९९२ ते गुजराथ दंगलींच्या २००२ च्या दशकात झाली होती. त्यानं त्यांना किती वेदना होत असणार, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

पण कैफींच्या शायरीला सत्याचा पाया आहे व चिरंतनतेचा स्पर्श आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार, ज्याची आज शक्यता धूसर वाटत असली तरी तो उद्या – भविष्यात पुन्हा माणसांना जाणवणार व त्या दिशेनं मानवाची वाटचाल होणार हे नक्की. तेवढे सामर्थ्य व तेवढा कालातीतपणा कैफींच्या शायरीत आहे. आणि भविष्यात क्रांती होईल हा कैफीचा विश्वास शेवटपर्यंत कायम होता. पण त्याची मशाल आता नव्या पिढीनं घेतली पाहिजे, असं सांगताना कैफी लिहितात,

‘‘कोई तो सूद चुकाये कोई तो जिम्मा ले
उस इन्किलाब का जो आज तक उधार सा है |’’
१९३० च्या दशकातील प्रगतीशील लेखक चळवळ, जिचे कैफी आझमी बिनीचे शिलेदार होते; ती प्रामुख्याने उर्दू हिंदी भाषेत प्रभावी होती. मराठीतले आण्णाभाऊ साठे आणि अमर शेख हे या चळवळीशी जोडलेले लेखक-शाहीर होते. पण त्यांचा अपवाद वगळता मराठी साहित्याने या पुरोगामी, जनवादी चळवळीकडे दुर्लक्ष करीत निरर्थकपणे कलेसाठी कला की जीवनासाठी कला असा लुटपुटीचा वाद खेळत राहिले. प्रायः रंजनवाद आणि काही प्रमाणात रूपवाद-सौंदर्यवाद या वर्तुळातच मराठी साहित्य घुटमळत राहिले. ज्या १९३० ते ६० च्या तीन दशकाच्या कालखंडात प्रगतीशिल लेखक चळवळ प्रभावी होते आणि तिनं उर्दू-हिंदी साहित्याला नवे सामाजिक परिमाण दिले, त्या काळात मराठी साहित्य हे रंजनवादी व अभिजनवादीच राहिले. पुढे प्रथम दलित, मग ग्रामीण, स्त्रीवादी साहित्यानं कोंडी फोडली हा भाग वेगळा. आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रगतीशील साहित्य चळवळ काही प्रमाणात कार्यरत झाली आहे. आणि मुख्य म्हणजे एकूण भारतीय साहित्यानं प्रगतीशील चळवळीचं सारतत्त्व अंगीकारलं आहे, पण चळवळ म्हणून ती आज देशभरात सर्वत्र थंडावली असल्यामुळे बहुसंख्यांच्या लेखनातला पुरोगामी आशय बराचसा निसटून जातो वा पातळ होतो, हे आपण पहात आहोतच.
या पार्श्वभूमीवर प्रगतीशील लेखक चळवळीतले हिंदी-उर्दू शायर व अफसानाकार (कथाकार) यांच्या लेखनांचा नव्याने डोळसपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच वाचकांनीही त्याची तोंडओळख होणे पण तितकेच महत्त्वाचे आहे.
त्यामुळे कैफी आझमीच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची अर्थपूर्ण, कालातीत शायरी, तिचा पुरोगामी आशय समजून घेतला तर लेखकाची लेखणी समृद्ध होईल, वाचकही वाचून भावसंपन्न होतील, या विश्वासानं मला कैफीच्या समृद्ध तसंच भरगच्च साहित्याचे सुवर्णदालन मराठी वाचकांना उलगडून दाखवायचे आहे. त्यांचं जीवनपण कितीतरी नाट्यपूर्ण व तत्त्वाधिष्ठित आहे, ते जाणणं आणि त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेणं हा एक वाचकांचं मनमानस समृद्ध करणारा अनुभव ठरेल. या विश्वासानं कैफींचं मी जीवन आणि काव्य उलगडून दाखवणार आहे. कारण तो आजही उर्दू-हिंदी वाचकांच्या मनात वसलेला आहे. जावेद अख्तरच्या शब्दांत कैफींचं ते गेल्यानंतरही मागे उरलेलं चिरंजीवित्व आणि आम आदमी प्रती असणारा लगाव आत्मीयता सांगायची झाली तर अशी सांगता येईल.
‘‘वो जिंदगी के सारे गम, तमाम दु:ख
हर इक सितम से कहता था
मै तुमसे जीत जाऊगा

ये आंख जिनमे ख्वाब है
वे दिल है जिसमे आरजू
वो बाजू जिनमे है ताकत
वो होंट जिनमे लफ्ज है
रहूंगा इनके दरमियॉं
के जब मै बीत जाऊगा !’’
आणि मग कैफींच्या आजचा चाहत्यांनाही कवि सतेंद्र कुमार ‘जानकी कुटीर’ (कैफी आझमी को याद करते हुवे) या कवितेत शेवटी म्हणतो तसंच वाटेल आणि कदाचित पुढे मागे ‘इन्कलाब’चा ‘जिम्मा’ घ्यायला तरुण पिढी पुढे येईल.
‘‘राजमहलों से दूर गांवो मे दिख रहे है परिवर्तन
मजवां गांव मे हो रहे है नये परिवर्तन’
वे जान गये है कहा है राक्षस के प्राण
भलेही उन लोगों को नही हो रहा है विश्वास
लेकिन राक्षस की अंतिम चीख उनतक जल्दही पहुंचेगी

तब ‘जानकी निवास’ मे होगा नया जश्न
जानकी की आंखो मे होंगे खुशी के आंसू
एक नयी अयोध्या बसने लगेगी उनके अंदर
खत्म होगा राम का ‘दुसरा बनवास’
राम रहीम जीजस गायेंगे, नाचेंगे
और कबीर अपने एक तारे पर
छेडेंगे अपनी तान –
‘मोकों कहां ढूंढे बंदे, मै तो तेरे पास मे
न मै देवल, ना मै मस्जिद, न काबे कैलास मे’
आणि मग हुडकायला निघाल्यावर हवा असणारा ‘जहां’ मिळेल, नवी जमीन, नवे आकाशपण मिळेल.. आणि एक दिवस ‘प्यार का जश्न’ नव्या पद्धतीने ‘मनवला’ जाईल. माणसाचं ‘गम’ मिटलं जाईल.. तेव्हा केवळ विश्वास नाही तर आनंदानं कैफींचं स्मरण करीत सारे वाचक गुणगुणतील,
‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा |
गम किसी दिल मे सही गम को मिटाना होगा ॥

-लेखक – लक्ष्मीकांत देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *