उशिरा का होईना या गोष्टी होणारच होत्या. मागील काही वर्षांपासून अतिशय भयानक समजल्या जाणार्या या अॅण्टिबायोटिक्स मेडिसीनचा ज्या प्रकारे दुरुपयोग होत होता हे पाहता हे लवकरच होणार होतं. जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे म्हणण्यात आलंय की, जिवाणुंमुळे होणार्या रोगापासून मानव जातिला संरक्षण देणारी अॅण्टिबायोटिक्स मेडिसीन त्यांची परिणामकारकता गमावत आहेत, अनेक जीवाणू आता अशा मेडिसीनला जुमानत नाहीत. जीवाणू अशाप्रकारे बलवान होण्यामागचं कारण म्हणजे अॅण्टिबायोटिक्स मेडिसीनचा जास्त प्रमाणातील वापर आणि काहीजण त्यांचा करत असलेला अयोग्य वापर.

२०१४मध्ये National Pharmaceutical Price Authority  ने मधुमेह, उच्चरक्तदाब, पोटदुखी, खरूज, जखमासह सलाईनसारख्या वारंवार लागणार्या अॅण्टिबायोटिक्स मेडिसीनच्या किमती कमी केल्या आहेत. तीन ते चार प्रकारच्या मेडिसीनचं संयुक्त मिश्रण असलेल्या महागड्या अॅण्टिबायोटिक्सच्या किमती ३० ते ४० टक्के कमी केल्याने पेशंटला त्याचा फायदा तर होणारच पण त्याचसोबत साध्या आजरासाठी अॅण्टिबायोटिक्सची गरज नसतानाही कमी किमतीमध्ये मिळत असल्यामुळे पेशंट ते घेतील ही एक चिंतेचीच गोष्ट म्हणावी लागेल. आजही भारतातील कितीतरी लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषध घेतात किंवा फार्मासिस्टकडे जाऊन अॅण्टिबायोटिक्स घेतात. फार्मासिस्टही पेशंटने मागणी केल्यामुळे सहजपणे अॅण्टिबायोटिक्स देऊन टाकतो.

जगामध्ये सगळ्यात जास्त जीवाणुंचा संसर्ग भारतामध्ये होतो आणि त्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी पेशंट अॅण्टिबायोटिक्सचा बिनधास्तपणे वापर करताना दिसतोय. चार दिवसांचा आजार जर दोन दिवसांमध्ये बरा होत असेल तर का बरं या अॅण्टिबायोटिक्सचा वापर वाढणार नाही. याला जबाबदार डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि पेशंट स्वतः आहेत. भारतामध्ये जिवाणुंमुळे होणारा सर्वात मोठा आजार टीबी आहे. टीबीचे जीवाणू अतिजास्त प्रमाणामध्ये पसरून माणसाला पूर्णपणे पोखरून काढतात. तसंच जीवाणुंमुळे न्यूमोनिया, टायफाईड, कॉलरा, त्वचेचे, साथीचे रोग, मेंदूचे आजार असे विविध प्रकारचे आजार होतात. यातील मोठ्या प्रमाणातील रोगांना काबूत ठेवण्यासाठी अॅण्टिबायोटिक्स हे अत्यंत अचूक मेडिसीन आहे. पण या मेडिसीनचा वापर अतिप्रमाणामध्ये आणि अयोग्य पद्धतीने होत असल्यामुळे हे मेडिसीन आता पूर्वीसारखं लागू पडत नाही. गेल्या काही वर्षामध्ये अॅण्टिबायोटिक्सचा वापर भारतामध्ये सात ते आठ पटीने वाढलाय, त्याला सर्वस्वी जबाबदार वर उल्लेख केल्याप्रमाणे काही अंशी डॉक्टर्स, फार्मासिस्ट आणि पेशंट स्वतः आहेत. आपण पाहतोय की गावापासून ते शहरी भागामध्ये एखाद्या माणसाला थोडा ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तरी उपाय म्हणून अॅण्टिबायोटिक्स देण्यात येतात. मुळात अॅण्टिबायोटिक्सची काहीही गरज नसतानाही पेशंट अॅण्टिबायोटिक्स घेत आहेत. बहुतेकवेळा पेशंट सरळ फार्मासिस्टकडे जाऊन अॅण्टिबायोटिक्सची मागणी करतात. मग काय फार्मासिस्टही त्याच्या फायद्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनशिवाय मेडिसीन देऊन टाकतो. या गोष्टीला लवकरात लवकर आळा बसला तर अॅण्टिबायोटिक्सचे धोके टळतील.

लहानपणापासून मुलाला अॅण्टिबायोटिक्सची सवय होणं त्याच्यासाठी खूपच धोकेदायक आहे. कारण काही वर्षांनंतर हे अॅण्टिबायोटिक्स त्याच्यावर काहीच परिणाम करताना दिसत नाहीत अशावेळी त्याच्यावर उपचार करणं ही अतिशय कठीण होतं. त्यामुळे अॅण्टिबायोटिक्सचा वापर कमीत कमी लहान मुलांवर तरी करू नये असं वाटतंय. अॅण्टिबायोटिक्सचा अधिक प्रमाणातील वापर जसा नुकसानकारक आहे त्याचप्रमाणे या मेडिसीनचा डोस योग्य प्रमाणात न घेणंही हानिकारक आहे. त्यामुळे जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि ते अधिक त्वरेने अॅण्टिबायोटिक्स मेडिसीन विरोधामध्ये स्वतःचं सुरक्षाकवच बनवतात.

आज जगामध्ये आणि भारतामध्ये अनेक मेडिकल असोसिएशन आहेत की ज्या अॅण्टिबायोटिक्सचा वापर कमीत कमी करण्यात यावा म्हणून वेगवेगळ्या मोहिमाही राबवत आहेत. कारण लोकांमध्ये अॅण्टिबायोटिक्सविषयी जागरुकता करणं खूपच महत्त्वाचं आहे. मेडिसीनची विक्री करणार्या फार्मासिस्टला Over the counter मध्ये मिळणारं अॅण्टिबायोटिक्स मेडिसीन कोणत्याही प्रकारे डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनशिवाय पेशंटला देण्यात येऊ नये हा एक खूपच महत्त्वाचा मार्ग होऊ शकेल. शेवटी एक चिंतेची गोष्ट म्हणजे मागील दोन दशकांमध्ये नवीन कोणतंही अॅण्टिबायोटिक्स शोधलं गेलेलं नाही ही बाब खूपच भयानक आहे. तरी येणार्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून जागृती केली तर नक्कीच अॅण्टिबायोटिक्सचा वापर कमीत कमी होईल ही सदिच्छा!

प्रफुल्ल घोरपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *