सायबर गुन्ह्यांना जर वेळीच आळा घालायचा असेल तर त्यावर त्वरित पावलं उचलणं अपरिहार्य आहे. खास करून महिलांच्याबाबतीत जे सायबर गुन्हे घडतात, तेव्हा घाबरून, लाज वाटून आपण जर गप्प बसलो तर या गुन्हेगारांना अजून गुन्हे करण्यासाठी चेव चढतो. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भा.दं.वि. कायद्यात सायबर गुन्हेगारांना शिक्षा होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे…

मूळ गुजरातची शबाना २१ वर्षांपूर्वी निकाह करून गुजरातवरून मुंबईत आली होती. पती अहमद आणि इतर नातेवाईकांबरोबर शबाना मुंबई उपनगरात आनंदात राहत होती. ३९ वर्षीय शबाना बीकॉम झालेली होती, त्यामुळे कुटुंबाला हातभार लागेल असं काहीतरी काम आपण करू शकतो असा तिचा विश्वास होता. तिने आपली काम करण्याची इच्छा तिची नणंद आफरीनकडे बोलून दाखवली. आफरीनलाही काम करण्याची इच्छा असल्यामुळे तिने रीदा (बोहरी लोकांचा बुरखा) बनवून त्यावर डिझाइन करून तो विकायचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. शबाना आणि आफरीनने फार कमी वेळात पार्टनरशिपमध्ये रीदा बनवण्याचा हा व्यवसाय सुरू केला. या कामात आफरीनला आणि शबानाला आफरीनचा पती सलमान मदत करत होता. रीदा बनवण्यासाठी कापड आणून देणं, मार्केटला जाणं तसंच बाहेरची अन्य कामं सलमान करायचा. व्यवसाय वाढवण्याच्यादृष्टीने सलमानने दोघींना फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर अकाऊंट ओपन करण्याचा सल्ला दिला. फेसबुकवर अकाऊंट ओपन करायचं म्हणजे त्याला इमेल आय.डी. असणं गरजेचं होतं. शबानाचं इमेल अकाऊंट नव्हतं त्यामुळे सलमानने स्वतःहून शबानाला इमेल अकाऊंट ओपन करून दिलं. त्या अकाऊंटचा यूझर आय.डी. आणि पासवर्ड हा शबानाबरोबरच सलमानलाही माहीत होता आणि तो कुटुंबातील असल्यामुळे शबानाला काही वावगं वाटलं नाही. शबाना आणि आफरीनचा रीदा बनवण्याचा हा व्यवसाय एक वर्षभर खूप चांगल्याप्रकारे सुरू होता. मात्र काही महिन्यांनी अचानक शबानाला मायग्रेनचा त्रास सुरू झाला. त्यासाठी तिच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मायग्रेनमुळे डोकेदुखी वाढल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शबानाला काही गोळ्या देण्यात आल्या होत्या. रोज वेळच्यावेळी या गोळ्या घेणं शबानाला अपरिहार्य होतं. तिच्या या आजराविषयी कुटुंबात सर्वांनाच माहीत होतं. मात्र कळतनकळतपणे याचा थोडाफार परिणाम त्यांच्या व्यवसायावरही झाला.

एकेदिवशी नेहमीप्रमाणे शबानाने सकाळी दहाच्या सुमारास आपल्या मायग्रेनच्या गोळा घेतल्या आणि काही वेळातच ती झोपायला जाणार इतक्यात तिच्या घराची बेल वाजली. तिने पेंगुळलेल्या अवस्थेतच दरवाजा उघडला.समोर दोन अनोळखी माणसं होती. मात्र तरीही ती दोघं वेळ न दवडता शबानाच्या घरात घुसली आणि त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला. शबानाने गोळ्या घेतल्या असल्यामुळे तिला काय घडतंय तेही नीट कळत नव्हतं. ती काही बोलणार, करणार इतक्यात त्या दोघांनी तिचे कपडे काढले आणि विवस्त्र अवस्थेत तिचे अनेक फोटो काढले. शबाना औषधांच्या अमलाखाली असल्यामुळे तिला विरोध करणं जमलं नाही. फोटो काढून झाल्यानंतर दोघंही निघून गेले. शबानाला शुद्धीत आल्यानंतरही नक्की काय घडलंय ते कळेना. तिने याबद्दल कोणालाच सांगितलं नाही.

अंदाजे दहा दिवसांनंतर शबानाचा पती अहमद याच्या इमेल अकाऊंटला एका अनोळखी इमेल आय.डी.वरून निनावी इमेल आला, ज्यात शबानाचा विवस्त्र अवस्थेतील एक फोटो पाठवलेला होता. तो फोटो पाहून अहमद चांगलाच हादरला. त्याने लगेचच याविषयी शबानाला विचारलं. शबानाने जितकं आठवलं तेवढं सगळं आपला पती अहमदला सांगितलं. पुढे अधूनमधून अहमदला त्याच्या मोबाइलवर अर्वाच्य शिव्या आणि शबानाबाबतचे घाणेरडे मेसेजेस् येत होते. सगळे मेसेजेस् आणि फोन कॉल्स हे सलमानच्या मोबाइलवरून येत होते. तसंच अनेकवेळा सलमान फोन करून शबाना कुठे आहे? काय करत आहे? शबानावर प्रेम आहे का? असे अनेक अश्लील प्रश्न तो अहमदला विचारायचा. कुटुंबात कोणालाच या गोष्टीची कल्पना नव्हती. लाज वाटून दोघांनी याविषयी, सलमानविषयी काहीच सांगितलं नव्हतं. काही दिवसांनी एका इंटरनेट नंबरच्या माध्यमातून सलमानचे फोन येऊ लागले. ज्यात अश्लील मेसेजेस्बरोबरच शबानाने कुटुंबातल्या कुठल्या समारंभांना जाऊ नये अशी धमकी देण्यात आली होती आणि जर ती कोणत्याही समारंभाला गेली तर तिचे ‘ते’ फोटो सगळ्यांना पाठवण्यात येतील अशी धमकीही देण्यात आली होती. शबानाने घराबाहेर जायचं जवळजवळ बंद केलं होतं तसंच अहमदनेही कंटाळून आफरीन बरोबर असलेली शबानाची व्यावसायिक पार्टनरशिपही तोडून टाकली आणि सलमान आणि आफरीनशी असलेलं नातंही कायमचं तोडलं. कदाचित एवढ्यावर सलमान थांबेल असं अहमदला वाटलं होतं परंतु अहमद मात्र थांबणार्यातला नव्हता. त्याचे नको ते उद्योग सुरूच होते.

सलमानने शबानासाठी जो इमेल आय.डी. बनवलेला होता, त्याचा उपयोग करून त्याने शबानाचे ‘ते’ फोटो त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना आणि शबानाच्या मैत्रिणींना पाठवले, तसंच स्वतःच्या इमेल आय.डी.वरून शबानाचं आणि स्वतःचं अश्लील संभाषण असलेले इमेल्सही नातेवाईकांना पाठवले. शबानाच्या कुटुंबात अहमदचे मामाही राहत होते, त्यांच्या नावे पोस्टाने सलमानने शबानाचे ‘ते’ फोटो पाठवले. एवढंच नव्हे तर गुजरातमध्ये राहणार्या शबानाच्या वडिलांनाही ‘त्या’ फोटोंचा लिफाफा पाठवला. ही गोष्ट जेव्हा शबानाला कळली, तेव्हा तिने अहमदशी चर्चा केली आणि मग त्या दोघांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार करायचं ठरवलं.

सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी त्वरित कारवाई करताना, Facebook, Email यांच्या नोडल ऑफिसर यांना या फेसबुक प्रोफाइलबाबतची माहिती मिळण्यासाठी इमेल पाठवण्यात आला. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांना आय.पी. अॅड्रेस मिळाला. तो आय.पी. अॅड्रेस सलमानच्या घरचाच निघाला. त्यानुसार सलमानच्या घरी पोलिसांनी जाऊन तपास केला आणि तपासादरम्यान त्यांनी दोन लॅपटॉप्स, दोन मोबाइल फोन्स, कॅमेरा, pendrive जप्त केले. तसंच सलमानवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ, ६६ क, ६६ ड, ६६ इ, ६७ तसंच भा.दं.वि.मधील कलम ४१९, ४५२, ३४९, ३५४ – अ,ब,क,ड, ५०९, ५०६ च्या अंतर्गत सलमानवर गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच सलमानला अटक करून त्यावर कारवाई सुरू केली.

शबाना आणि तिचा पती अहमद याने हिंमत करून जर त्वरित तक्रार केली असती तर कदाचित ‘ते’ फोटो तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहचले नसते. आणि सलमानवर योग्य कारवाई योग्यवेळी करता आली असती. शबाना आणि अहमद लाजेपोटी तक्रार करणार नाहीत याची सलमानला खात्री असल्यामुळेच तो अशाप्रकारे त्या दोघांना त्रास देऊ शकला. सायबर गुन्ह्यांना आळा घालायचा असेल तर ते न होऊ देण्याची काळजी घेणं आणि गुन्हा झालाच तर त्यावर त्वरित कारवाई करणं हेच उपाय आहेत. सायबर जगतात वावरत आहात तर सतर्क आणि सुरक्षित राहणं अत्यंत गरजेचं आहे.

 

सायबर अॅलर्टः

१. सायबर गुन्ह्याच्या कचाट्यात सापडले असाल तर त्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे.

२. फेक प्रोफाइल करणं, अश्लील फोटो, मेसेजेस् पाठवणं हा गुन्हा आहे आणि त्यावर कारवाई होऊ शकते, त्यामुळे न घाबरता तक्रार करायला पाहिजे.

३. महिलांच्याबाबतीत जे गुन्हे घडतात त्याकडे विशेष करून लक्ष देण्यात येतं, त्यामुळे कुठल्याही महिलांबाबतच्या सायबर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे.

४. आपला पासवर्ड वरचेवर बदलणं, तो कुणालाही न देणं, सोशल नेटवर्किंग साइटवर फोटोज् शेअर न करणं या सध्याच्या काळातल्या अपरिहार्य गोष्टी आहेत.

 मुंबई सायबरचं यश

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गेली १४ वर्षं मुंबई पोलीस आणि त्यांची सायबर लॅब कार्यरत आहे. तसंच सायबर गुन्हेगारीला सामोरं जाण्यासाठी आणि सायबर गुन्हे नोंदवून त्यांचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रातील पहिलं आणि भारतातील तिसर्या क्रमांकाचं सायबर पोलीस स्टेशन बांद्रा-कुर्ला संकुलात २००९ मध्ये कार्यान्वित करण्यात आलं. तसंच गुन्हे यशस्वीरित्या हाताळण्यासाठी इनहाऊस फोरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली. या सर्व गोष्टींची दाखल घेऊन यंदाच्या NASSCOM/DSCI Excellence Awards, २०१४ मधील Capacity Building Of Law Enforcement Agencies या श्रेणीमध्ये मुंबई पोलीस दलास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं, याबद्दल ‘कलमनामा’कडून त्यांचं हार्दिक अभिनंदन!

 

पूनम सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *