भारतीय सिनेमा जगभरात नावाजला जात असतानाच स्वतःच्या देशातच मात्र हा भारतीय सिनेमा टिकेचा धनी बनतोय. भारतामध्ये सातत्याने नाटक/सिनेमांवर बंदी आणण्याच्या घटना घडतात. समाजातील काही शक्ती आणि विचारप्रवृत्ती समाजप्रबोधनाच्या या कार्यात सातत्याने अडथळा निर्माण करतात. असा प्रयत्न आता पुन्हा होतोय… राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमीर खान अभिनित ‘पीके’ या हिंदी सिनेमावर देशभरातील हिंदू धर्मरक्षक टिकेची झोड उठवत आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनवार बंदी आणण्याची मागणीदेखील ही मंडळी करत आहेत. यात विश्व हिंदू परिषद सारखी धार्मिक संघटना आघाडीवर असतानाच ‘पीके’च्या वादाला खरं तोंडफोडलंय ते योगगुरू बाबा रामदेव यांनी… रामदेव बाबांनी प्रथम या सिनेमावर आक्षेप घेतला. या आक्षेपामागील ते सांगत असलेली कारणं धर्माविषयीची असली तरी नेमकं कारण भलतंच आहे…

विधू विनोद चोप्रा निर्मित ‘पीके’ हा सिनेमा आज देशभरात मोठ्या दणक्यात प्रदर्शित होतोय. सर्वसामान्य प्रेक्षकाने ‘पीके’ला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलंय. एकीकडे सिनेमाला तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र हा सिनेमा तुफान कमाई करतोय. अभिजात जोशी आणि राजकुमार हिरानी यांनी हा सिनेमा लिहिलाय… जनसामान्यांचं मत लक्षात घेता ‘पीके’मध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाहीय, हे उघड आहे. तरीही या सिनेमाला विरोध करणार्यांनी काही कळीचे मुद्दे उपस्थित केले आहेत. या सिनेमामुळे हिंदुधर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हा नेहमीचाच मुद्दा याही वेळी उपस्थित करण्यात आलाय. तसंच या सिनेमामुळे हिंदु-मुस्लीम यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असंही टिकाकारांनी म्हटलंय. लव्ह जिहाद सारख्या वादग्रस्त मुद्याचाही टिका करण्यासाठी वापर केला गेलाय आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिनेमाकर्त्यांनी या सिनेमाच्या माध्यमांतून हिंदु देवांचं विडबंन केलं गेलंय, असं ‘पीके’चे विरोधक टाहोफोडून सांगताहेत…

‘पीके’ची कथा देशातील आजच्या वास्तव परिस्थितीवर सखोल भाष्य करणारी आहे. देवाच्या नावाखाली धर्माचा आणि अंधश्रद्धांचा जो बाजार मांडला गेलाय त्या बाजारावर आणि तो बाजार चालवणार्या दुकानदारांवर ‘पीके’ कडक शब्दांत भाष्य करतो. देशात सर्वत्रच बाबा-बुवांनी धुमाकूळ घातलाय. आसाराम बापू, रामपाल बाबासारखे बुवा-महाराज तर आज तुरुंगात आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली मनुष्यबळी दिले जाताहेत. देवाधर्माच्या नावाखाली समाजाचे, देशाचे तुकडे पाडण्याचं राजकारण तर राजरोसपणे सुरू आहे. समाजातील याच वाईट गोष्टींना ‘पीके’च्या टिमने रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणूनच आज विश्व हिंदू परिषद सारख्या धर्माचं राजकारण करणार्या संघटना खवळल्यात… या सिनेमामुळे देव आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये जे दलाल निर्माण झालेत त्या दलालांचं पित्तळ उघडं पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय… याचाही राग या विरोधकांना आलाय… सिनेमात आमीर खानचा एक डायलॉग आहे… तो म्हणतो, ‘जो डरता है, वही मंदिर जाता है…’ या डायलॉगचा सरळ अर्थ असा आहे की, जी व्यक्ती कोणत्याही कारणांमुळे घाबरते तेव्हाच ती व्यक्ती देवळात जाते… माणसामध्ये हे भयकोण निर्माण करतं? अर्थातच देव हे भय निर्माण करत नाही तर देवाचे ठेकेदारच लोकांमध्ये हे भय निर्माण करतात. अशाच दांभिकांना चव्हाट्यावर आणण्याचं काम ‘पीके’ने केलंय…

खरंतर हा वादंग उभा राहिलाय तो योगगुरू रामदेव बाबांमुळे… रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन ‘पीके’वर सामाजिक बहिष्कार घालण्याची जाहीर मागणी केली… त्यांच्यामते हा सिनेमा हिंदू धर्मावर आणि संस्कृतीवर घाला घालणारा सिनेमा आहे. काळ्या पैशांच्या मुद्यावरून काँग्रेसप्रणित यूपीए सरकारशी पंगा घेणारे बाबा रामदेव आता काळ्या पैशांच्या मुद्यावर काहीच न बोलता सिनेमावर आक्षेप घेत आहेत. बाबा रामदेव यांच्या पातंजली आश्रमाचा वार्षिक उत्पन्न जवळपास १० हजार करोड रुपयांहून अधिक आहे. याची चौकशी करण्याचे आदेश यूपीए सरकारच्या काळात देण्यात आले होते. मात्र पुढे या चौकशीचं काय झालं ते आजवर कळलेलं नाही. बाबा रामदेव यांच्या आश्रमाच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलाय. ही माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, एकदा बाबा रामदेव त्यांना म्हणाले की, तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. यावर गडकरींनी उत्तर दिलं होतं की, मग वारसाहक्काप्रमाणे तुमची मालमत्ता माझ्या नावावर करा… याचवेळी नितीन गडकरी यांनी बाबा रामदेव यांना त्यांच्या आश्रमाच्या वार्षिक उत्पन्नाविषयी विचारलं होतं. तेव्हा बाबा रामदेव यांना १० हजार करोड रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचं गडकरींकडे कबूल केलं… इतकंच नाही तर पातंजली आश्रमात बनवण्यात येणार्या औषधांच्या उत्त्पादनावरही आक्षेप घेऊन त्या औषधांच्या उत्पादनाचीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश पुढे धाब्यावर बसवण्यात आले. स्वतःवरील या सर्व आक्षेपांवरून लक्ष हटवण्यासाठीच बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा धर्माचं राजकरण करण्यास सुरुवात केलीय. यासाठी त्यांना ‘पीके’चं आयतंच निमित्त मिळालंय. योगगुरू बाबा रामदेव यांनी ‘पीके’वर आक्षेप घेण्यामागे खंर कारण म्हणजे, या सिनेमात देवाच्या नावावर जे दुकानदारी करताहेत त्यांच्यावर टाकण्यात आलेला जळजळीत प्रकाश हेच आहे. या अतिसंवेदनशील मुद्यावर अतिशय मार्मिकपणे आणि परखडपणे भाष्य केल्यामुळे आज सर्वच बाबा, बुवा, महाराजांकडे सामान्य जनता प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलीय. यामुळे देशभरातील सर्वच धर्ममार्तंड, धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजणार्या संघटना आणि धर्माचा अजेंडा घेऊन सत्ता चालवणारे राजकीय पक्ष यांचं चांगलंच धाबं दणाणलंय. अन्यथा ‘पीके’सारख्या महत्त्वाच्या सिनेमाला विरोध करण्याचं दुसरं काही कारणच असू शकत नाही… बाबा रामदेव यांनी या सिनेमाला विरोध केल्यामुळे सोशल मीडियातही त्यांची येथेच्छ खिल्ली उडवली जात आहे. यासंदर्भातला एक विनोद सध्या व्हॉटस अपवर भलताच प्रसिद्ध झालाय… तो विनोद असा की, बाबा रामदेव ‘पीके’ सिनेमाला विरोध करताहेत. कारण सिनेमात आमीर खानने जो घागरा घातलाय तो बाबा रामदेव यांचा आहे. हाच घागरा घालून बाबा रामदेव यांनी पोलिसांना गुंगारा देऊन उपोषणाच्या स्टेजवरून उडी मारून पळ काढला होता… दुसरा मुद्दा म्हणजे जर या सिनेमाला सेन्सॉरबोर्डाने संमती दिलेली आहे आणि सामन्य प्रेक्षकांनाही सिनेमात काहीच वावगं वाटत नसताना या धार्मिक संघटनांनी विरोध करण्याचं काही कारणच नाहीय… तरीही धर्माचं राजकारण करून देशात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशानेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटना आणि रामदेव बाबासारखे बाबा, बुवा, महाराज ‘पीके’ला विरोध करताहेत… भारतीय जनता पक्षाचं सरकार देशात असल्यामुळेच या विरोधकांचं अधिक फावतंय, असा थेट आरोपही आता होऊ लागलाय. या आरोपातही तथ्य आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखालीच भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि बंजरंग दल सारख्या संघटना कार्यरत आहेत, हे जगजाहीर आहे. यामुळेच आगामी काळात समाजात धार्मिक तेढ निर्माण झाल्यास यास ‘पीके’ जबाबदार नसून हे धर्माचे ठेकेदारच जबाबदार असतील, असं गृहीत धरायला काहीच हरकत नाहीय…

 

 

सिनेकलावंतांनी देखील ‘पीके’वर लादण्यात येणार्या या अलिखित सेन्सॉरशीपच्याविरोधात तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्यात…

दबावतंत्रांना बळी पडण्याचं कारण नाही…

आपल्याकडे आजही कुठल्याही कलाकृतीवर आक्षेप घेणं सुरूच आहे. मी ‘पीके’ हा सिनेमा पाहिलाय. या सिनेमाचा विषय प्रचंड व्यापक आहे. कोणाच्याही धर्मावर टिका करणं हा या सिनेमाचा उद्देश नाहीय… मात्र तरीही अशा सिनेमावर आक्षेप घेताना विरोधकांनी विषयाची व्यापकता लक्षात घ्यायला हवी. ‘पीके’ या सिनेमात माणुसकीबद्दल अतिशय मार्मिकपणे नि व्यापकतेने भाष्य केलं गेलंय. कुठल्याच धर्मांवर टिका केली गेली नाहीय, असं माझं ठाम मत आहे. आणि सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला संमती देऊनही अशा प्रकारे बंदीची मागणी करणं हेच मुळात चुकीचं आहे, असंही मला वाटतं. पण प्रत्येकाचं स्वतःचं असं म्हणून एक दबावतंत्र असतं… यामुळे ‘पीके’ला विरोध करणारेदेखील अशाच दबावतंत्राचा वापर करताहेत. अशा दबावतंत्रांना बळी पडण्याचं काही कारण नाही.

– सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

विरोधकांचीच परीक्षा घ्यायला हवी!

घटनेचं उल्लंघन करून अशाप्रकारे विरोध करणार्यांवर कडक कारवाईची करण्याची गरज आज निर्माण झालीय. खरंतर आपल्या सेन्सॉर बोर्डानेच अशांवर कारवाई करायला हवी. याचं कारण असं की, सेन्सॉर बोर्ड ही काही खाजगी संस्था नाही. शासनाने ही संस्था बनवलेली आहे. तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभ्यास करणारी मंडळी अशा समिती/बोर्डावर नेमलेली असतात. पण तरीही कुणाच्या तरी मेंदूत काही तरी येतं आणि ते नाटक/सिनेमांवर आक्षेप घेत उगाचच विरोध करतात. खरंतर या विरोधकांचीच परीक्षा घ्यायला हवी असं मला वाटतं. अशा विरोध करणार्यांना बोलावून घेतलं पाहिजे आणि त्यांना बा. सी. मर्ढेकरांची ‘पिपात बुडालेले उंदीर’ही कविता द्यावी नि त्या कवितेचा अर्थ सांगायला लावायला हवा… म्हणजे कळेल तरी या विरोध करणार्यांना साहित्यातलं, कलाकृतीतलं कितपत ज्ञान आहे ते… ‘पीके’ हा सिनेमा खरंतर देव आणि सृजनता यातील जे दलाल आहेत त्यांच्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. हा सिनेमा कुठल्याच धर्मावर किंवा कोणाच्याच देवावर टिका करत नाही.

– नंदू माधव, अभिनेता

त्यांचा ‘राँग नंबर’ लागलाय

सेन्सॉर बोर्डाने सिनेमा पास केल्यानंतर पुन्हा त्या सिनेमावर बंदी आणण्याचा प्रश्नच नाही. यामुळे अशा विरोधकांना उत्तर देणं ही सरकारची जबाबदारी आहे. कारण कायद्याने अशी बंदी आणता येत नाही. नाही तर मग सेन्सॉर बोर्डाला काही अर्थच उरणार नाही… या सिनेमात कोणत्याही विशिष्ट अशा एका धर्माबद्दल भाष्यच केलं गेलेलं नाही. सर्वच धर्मातील त्रुटींबाबत भाष्य केलं गेलंय. म्हणून आपल्याला हा मुद्दा इतक्या सहजी घेता येणार नाही. विशेष म्हणजे लोकांनाही हा सिनेमा आवडतोय. खरंतर धर्माचं राजकारण करणारेच या सिनेमाला विरोध करताहेत. त्यांचा ‘राँग नंबर’ लागलाय सगळीकडेच. हिंदू-मुस्लीम असा कोणताच मुद्दा या सिनेमात नाहीय.

– आनंद पटवर्धन, लघुपट दिग्दर्शक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *