‘बरद्वान स्फोट’ हे प्रकरण गेले काही महिने वर्तमानपत्रात गाजत आहे. संसदेतही ते चर्चिलं गेलं. भाजपने असं म्हटलं की तो स्फोट आंतरराष्ट्रीय मुस्लीम अतिरेक्यांनी घडवला. त्या भागातले काही मदरसे त्यांचे अड्डे बनले आहेत. पश्चिम बंगाल राज्यात वादळी ठरलेल्या शारदा चिट फंडद्वारा तृणमूल काँग्रेसच्या पुढार्यांनी अनेक कोटी रुपयांचा अपहार केला. एवढंच नाही तर बरद्वानचे स्फोट घडवण्यासाठीही तो पैसा वापरला गेला. त्या पक्षाने बंगाल राज्यात या विषयावर आक्रमक प्रचारमोहीम चालवली. केंद्रात तो पक्ष सध्या सत्तेवर असल्याने राष्ट्रीय गुप्तहेर यंत्रणे (नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी- एनआयए) चे अधिकारी तिथे तपासासाठी गेले.

लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने म्हटलं की, बरद्वान स्फोटासाठी शारदा चिट फंडचा पैसा वापरला गेला असा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही.

या कृत्यामागे त्या भागातील मदरशांचा काही सहभाग आहे काय याची चौकशी करण्यासाठी सेक्युलर फोरम ऑफ इंडिया या संघटनेचे संयोजक डॉ. सुरेश खैरनार हे काही सहकार्यांबरोबर त्या भागात जाऊन आले. त्यांनी तयार केलेल्या सत्यशोधन अहवालाचा संक्षिप्त अनुवाद पुढे देत आहे.

तारीख २ ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बरद्वान शहरातील खाग्रागढ या मध्यवर्गीय वस्तीत प्रचंड स्फोट झाला. त्यात शकील गाझीच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. शोभन मंडल आणि अब्दुल हकीम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. हॉस्पिटलमध्ये नेताना वाटेतच मंडलने प्राण सोडला. हकीम मात्र उपचारामुळे बचावला. त्यांच्या बायका आणि एक मुलगी शेजारच्या खोलीत असल्याने बचावल्या.

मृत गाझीची पत्नी रजिया आणि हकीमची पत्नी अमीना बीबी या एनआयएच्या कस्टडीत आहेत. तिथली बरीच स्फोटकं पोलिसांनी जप्त केली.

हा प्रकार घडला ती इमारत, दाजी हसन चौधरी यांच्या मालकीची आहे. (मोहल्ला खाग्रागढ, पो. राजनाती, बरद्वान, पिन ४१३१०४) ते समोरच्या त्यांच्या घरात राहतात. अपघाताची खोली गेल्या २ जून २०१४ रोजी, मृत शकील गाझी आणि कौसर अली यांनी दरमहा ४२०० रुपये भाड्याने घेतली होती. तळमजल्याची खोली तृणमूल काँग्रेसने भाड्याने घेतलेली आहे. शेजारी एक होमिओपॅथी दवाखाना असून पलीकडे गॅरेज आहे.

बरद्वान, नदिया, वीरप्रभू आणि मुर्शिदावाद हा भाग तृणमूल काँग्रेस, माकप आणि इतर काही पक्षांदरम्यान चालणार्या संघर्षासाठी प्रसिद्ध आहे. सध्या जास्त संघर्ष तृणमूल आणि भाजप यांच्यात सुरू आहे. त्या राजकीय दंगलीसाठी गावठी बॉम्बचा सर्रास वापर होत असतो. (बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतही तसं होत आलं आहे.) त्यासाठी कमी किमतीचे बॉम्ब लागतात. त्यामुळे ते तयार करणं हा त्या भागातला राजरोस कुटीरोद्योग झाला आहे. पाईप आणि तत्सम वस्तुंत स्फोटकं ठासून भरायची आणि दोन्हीकडली तोंडं बंद करायची म्हणजे झाला गावठी बॉम्ब तयार. त्या भागात भूमिहिन आणि शेतमजुरांची संख्या मोठी आहे. गरिबी आणि बेकारी भरपूर आहे. मृत शकील गाझी, शोभन मंडल, अब्दुल हकीम यांसारखे अनेकजण त्या तीन-चार जिल्ह्यांत गावठी बॉम्ब तयार करण्यात गुंतले आहेत. गिर्हाईक चालत येतात आणि रोख पैसे देऊन माल घेऊन जातात. २ ऑक्टोबर रोजी झालेला स्फोट म्हणजे त्या प्रक्रियेत झालेला अपघात आहे. मागे नांदेड इथे रा.स्व.संघाचे दोन कार्यकर्ते असे बॉम्ब बनवताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले होते. तो सगळा तपशील सरकारी तपासात बाहेर आला होता. (स्फोटकांचं मिश्रण करताना/पाईपात दाबून भरताना प्रमाण चुकलं की अचानक स्फोट होतो. त्याला अपघाती स्फोट म्हणतात.) ५ ऑक्टोबर २०१४ च्या ‘संडे एक्सप्रेस’मध्ये वरील वृत्तांत आला होता.

‘अमृत बझार पत्रिके’च्या ८ ऑक्टोबरच्या अंकात बातमी होती की, ते स्फोट आंतरराष्ट्रीय मुस्लीम अतिरेक्यांच्या संघटनांनी घडवले आणि ते लोक जवळपासच्या मदरशात जाऊन-येऊन असतात. त्यातले आठ जण फरार झाले आहेत आणि पाच विद्यार्थी बांगलादेशात गेले आहेत, असंही बातमीत म्हटलं आहे. मात्र त्यांची नावं दिलेली नाहीत.

स्फोट झाला त्या जागेपासून २०० मीटरवर मदरसा दिनीया मदनिया आहे. १९६८ साली तो सुरू झाला. सध्या त्यात ९ ते २२ वयोगटातील ३१ विद्यार्थी आहेत. २ ते १७ ऑक्टोबर ईदच्या सुट्टीनिमित्त विद्यार्थी गावी गेले होते. तो मदरसा भरवस्तीत आहे. शेजारी अनेक घरं आहेत.

दुसरा मुलींसाठीचा मदरसा ३० कि.मी.वरील मंगलकोट गावात आहे. (गावची लोकसंख्या ७/८ हजार.) २०१० साली सुरू झालेल्या त्या मदरशात सध्या ४० मुली आहेत. ती इमारत साधी मातीच्या भिंती आणि वर कुडाचं छप्पर असलेली आहे. एका गृहस्थाने दान दिलेल्या दोन बिघा जमिनीत आहे. त्यातल्या बर्याच भागांत शिक्षकच भातशेती करतात. त्या दोन्ही मदरशांत पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. अरबी भाषेतील कुराण आणि इतर ग्रंथ यांच्या बर्याच प्रती पोलिसांनी जप्त केल्या आणि ते जिहादी साहित्य आहे असं म्हटलं. थोड्या हवाई बंदुकीच्या रबरी गोळ्याही त्यांना सापडल्या.

वर्तमानपत्रीप्रचार आणि पोलीस/एनआयएचा तपास यामुळे त्या भागातील मुस्लीम (जे जवळपास निम्मे आहेत) लोकांकडे संशयी नजरेने पाहिलं जातं. त्या भागातील तीन तरुण बांधकाम व्यवसायात कामगार म्हणून एर्नाकुलमला काम करतात. ईदसाठी ते गावी आले होते. पण त्या स्फोटानंतर त्यांना एर्नाकुलमला जायची रेल्वे तिकिटं द्यायला बुकिंग क्लार्कने नकार दिला.

काही घरांत सापडलेल्या पांढर्या आणि काळ्या पावडरी ‘स्फोटकं’ म्हणून पोलिसांनी जप्त केल्या. पृथक्करणात त्या दंतमंजन असल्याचं निष्पन्न झालं.

अनेक गरीब तरुण आणि चाळीस-पन्नाशीच्या बाया यांना एनआयएने अटक केली आहे. त्यांचं शेतातलं काम आणि इतर छोटे व्यवसाय बंद पडले आहेत.

हा सगळा तपशील पाहता भाजपने आणि काही वृत्तपत्रांनी राईचा पर्वत करून हिंदू-मुस्लीम तेढ वाढवली आहे असं म्हणणं भाग पडतं.

पन्नालाल सुराणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *