दुष्काळ आणि मराठवाडा यांचं नात्याने नव्याने सांगण्याची गरज नाहीय. दुष्काळ आणि त्यानंतर आत्महत्या हे मराठवाड्यातील एक समीकरणच बनलं आहे. गेल्या वर्षभरात तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. एकटया बीड जिल्ह्यात शेतकर्यांनी एका वर्षात ८७ आत्महत्या केल्या आहेत. एकूण मराठवाड्यातच ४१३ शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवलीय. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतोय हे मराठवाड्यातील भयानक दृश्य आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देऊन शेतकर्यांना तत्काळ मदत दिली तर या आत्महत्या रोखण्यास नक्कीच मोठी मदत होईल. मराठवाड्यात दुष्काळाचं विदारक चित्र पहायला मिळतंय. पाण्यासाठी महिला कित्येक मैल वणवण करत आहेत. तसंच जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यात कित्येक वर्षांपासून अनेक समस्या आहेत. हा प्रदेश नेहमीच मागास राहिला आहे. त्यामुळे मराठवाड्याला केंद्रात असलेलं नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि राज्यात असणारं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ‘अच्छे दिन’ दाखवतील काय हाच खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय.

गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात पडणार्या दुष्काळाची भयानकता वाढत चालली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे इथले शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. महिलांना पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांत तर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्येक गावात गेलं की अर्ध गाव वाडी वस्तीच्या ठिकाणी राहण्यास गेलेलं आहे असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील सहा लाख लोक गाव सोडून रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी या जिल्ह्यात निर्माण झालीय ही विचार करायला लावणारी बाब आहे. आधीच्या सरकारने लोकांची निराशा केल्यामुळे भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने कौल दिला आहे आणि राज्यातही भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला संधी दिली आहे. परंतु हे राज्य चालवत असताना मराठवाड्याकडे लक्ष देण्याची मोठी गरज निर्माण झालीय. मराठवाड्यात उद्योग-व्यवसाय नाहीत, पाण्याची भयानकता आहे, ती दूर केली तर भविष्यात चांगले दिवस मराठवाड्यातल्या नागरिकांना पहायला मिळतील.

बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः आष्टी तालुक्यात दूध उत्पादन अतिशय कमी झालं आहे. पाच वर्षांपूर्वी इथे अडीच लाख लिटर दुधाचं संकलन होत होतं. परंतु आज दुष्काळामुळे हे प्रमाण दीड लाखांवर आलं आहे. तब्बल एक लाख लिटर दूध उत्पादन घटलं आहे. पशुधनाची संख्याही लाखभराने कमी झाली आहे. अशा भयानक परिस्थितीमुळे बळीराजा अडचणीत आलाय. फळबागवाल्यांची अवस्थाही वेगळी नाही. फळांचं उत्पादन करणारे शेतकरी टँकरने पाणी विकत घेत असून विकतच्या पाण्यावर झाडं जगवण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. हीच

परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्यांची आहे. या सगळ्यामुळे मराठवाड्याला आज खमक्या नेतृत्वाची आठवण होत आहे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर चांगल्या नेतृत्वाची गरज मराठवाड्यात निर्माण झालीय. ही उणीव कोण भरून काढणार असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून उभा राहिला आहे. मराठवाड्याच्या अपेक्षा सध्या पंकजा मुंडे आणि अमित देशमुख या युवा नेतृत्वाकडून आहेत. पण ते येणार्या काळात मराठवाड्याची बाजू मांडून काय काय योजना इथे खेचून आणतात यावरच त्यांचं यश अवलंबून आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असल्याने पंकजा मुडेंना आपलं नेतृत्व सिद्ध करायची मोठी संधी आहे.

येणार्या काळात दुष्काळामुळे पीडित झालेल्या शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई आणि पीक विमा मिळाला तरच येथील परिस्थिती बदलेल. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशीच अवस्था मराठवाड्यातील लोकांची होईल. गेल्या वर्षभरात मराठवाड्यात झालेल्या आत्महत्यांची संख्या प्रचंड आहे. आता येत्या काळात तरी हा आत्महत्यांचा आकडा शून्यावर आणण्यास फडणवीस सरकार यशस्वी ठरेल काय हा खरा प्रश्न आहे.

अविशांत कुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *