सरलेलं २०१४ हे वर्ष नरेंद्र मोदी यांनी गाजवलं. गेल्या वर्षभरात त्यांनी आपला माहौल तयार केला. घोटाळ्यांच्या आरोपांनी गांजलेली आणि निर्नायक झालेली काँग्रेस, विरोधी पक्षात पडलेली फूट… अशी देशातील सगळी राजकीय परिस्थिती पथ्यावर पडली आणि नवे मसिहा म्हणून नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. देशात आता भ्रष्टाचार, घोटाळे यांचं साम्राज्य संपलं… विकासाचा वारू चारी दिशांना दौडत जाणार हा विश्वास उभ्या देशाने मोदींवर भरभरून दाखवला. खरंतर मोदींनी गुजरात मध्ये आपल्या पद्धतीने कारभार केला. तिथे त्यांना आव्हान देणारं कुणी नव्हतं. गेल्या वीस वर्षात त्यांनी गुजरातच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. मात्र मोदींना केंद्री सत्तेत काम करण्याचा कोणताच अनुभव नव्हता. पण ज्या संख्येने त्यांना बहुमत मिळालंय ते पहाता त्यांनी इथेही आपल्याच पद्धतीने कारभार चालवला आहे. मोदींनी सत्तेची सूत्र हाती घेताच परदेश दौर्यांचा सपाटा लावला. अगदी त्यांना व्हिसा नाकारणार्या अमेरिकेचा दौरा करत ओबामांना ‘केम छो’ करायला लावलं. सगळा गाजावाजा या सगळ्याचा झाला. हे परदेश दौरे करताना परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज कुठेच चर्चेत नव्हत्या. हीच मोदी स्टाईल.

आता मात्र मोदी विरूद्ध संघ परिवार असं चित्र तयार झालंय. म्हणजे हे सगळं एकमेकांत मिसळलेलं आहे. मोदी विकासाची भाषा बोलणार आणि त्यांचे सहकारी मात्र धार्मिक अजेंड्याच्या बाहेर पडायला तयार नाहीत. हा प्रकार आता अधिकच ताणला जातोय. भविष्यवाल्यापुढे हात दाखवणारे मंत्री, गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करा, राममंदिर उभारा अशा होणार्या घोषणा… अशा घोषणा जोरजोरात सुरू आहेत. यातच घर वापसी कार्यक्रमाने संविधानालाच जो तडा देण्याचा प्रकार सुरू आहे तो मोदी सरकारचा एक भयानक चेहरा दाखवणारा आहे. विश्व हिंदू परिषदेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपला कार्यक्रम बाहेर काढला आहे. भाजपचं सरकार असल्याने आता ही माणसं हैदोस घालायला मोकळी झाली आहेत. धर्मांतर हा विहिंपचा महत्त्वाचा अजेंडा आहे. ख्रिश्चन आणि मुस्लीम या दोन धर्मांना टार्गेट केलंय. संसदेत याबाबत घणाघाती चर्चा झाली, या चर्चेला सामोरं जाण्याचं धाडस नरेंद्र मोदींनी दाखवलं नाही. आता तर मोदींचा विकासाचा जो अजेंडा आहे त्यातच ‘घर वापसी’ हा कार्यक्रम अंतर्भूत आहे, असं विहिंपनेच जाहीर केलंय.

ज्या हिंदू समाजातील लोकांनी धर्मांतर करीत ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारलाय त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची मोहिम विहिंपने आखलीय. ही मोहिम मोदींच्या सबका साथ, सबके साथ… या घोषणेशी मिळती जुळती आहे असं सांगण्याचा प्रयत्न होतोय. नुकतंच मुस्लीम धर्मातील काही लोकांना जाहीरपणे गाजावाजा करीत ‘घर वापसी’ करण्यात आली. गेल्या मंगळवारी विहिंपच्या कार्यकारिणीची बैठक हैदराबाद इथे पार पडली. तिथे जबरदस्तीने होणार्या धर्मांतराच्या विरोधात कायदा करावा असा ठराव संमत करण्यात आला आहे. सरकारवर यासाठी आता दबाव आणला जाईल हे उघड आहे. प्रवीण तोगडीया हे अडगळीत गेलेले वाचाळ नेते पुन्हा नव्या ताकदीने कार्यरत झाले आहेत. त्यांच्या घर वापसीवर टीकेचं मोहोळ उठल्यानंतर त्यांनी वेगळाच आव आणला आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय देताना म्हटलंय की हिंदुत्व हा धर्म नाही तर ती जीवनशैली सांगणारी मार्गदर्शिका आहे. याच वाक्याचा आधार घेत तोगडिया सांगतात की, घर वापसी हा कुठे धार्मिक कार्यक्रम आहे. या जीवनशैलीत लोकांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. घर वापसी हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे असे तारेही त्यांनी तोडले आहेत. या बैठकीत संघाचे सरकार्यवाह सुरेशभय्याजी जोशी हेही उपस्थित होते हे विशेष.

यातही विहिंपचे सरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणतात की, घर वापसी या कार्यक्रमामुळे मुस्लीम समाजाला देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यात मदत होणार आहे. या समाजातील महिलांना तलाक, बुरखा यापासून मुक्ती मिळेल. महिलांचा विकास होईल. मुलांना मदरशा पेक्षा इतर शाळांत चांगलं शिक्षण मिळेल… ही माणसं किती बनेल असतात याचंच हे प्रत्यंतर आहे. आपला धार्मिक विद्वेष पसरवण्याच्या कार्यक्रमाला वेगळ्या वेष्टनात बांधण्याचा हा प्रयत्न आहे. मुस्लीम महिलांची परिस्थिती वाईट असेल, पण सर्व हिंदू महिलांची स्थिती चांगली आहे? त्यांना कुटुंबात मिळणारी वागणूक मानवी आहे? कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं गंभीर आहेत. सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता वाढतेय. या सगळ्याला घर वापसी हे उत्तर आहे? मुस्लीम मुलांच्या शिक्षणाबाबत आत्मियतेने बोलतायत? आज हिंदू म्हणून ज्या जाती-जमाती आहेत त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी आधी काय प्रयत्न केलेत ते यांनी सांगावं. एकीकडे शाळांचं खाजगीकरण जोरात सुरू आहे. विज्ञानापेक्षा भाकडकथा मुलांना शिकवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. गरीब मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळणं दुरापास्त झालंय. गावागावातील शाळांचे गोठे होतायत. ही परिस्थिती असताना यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे लोकांना कळत नाही की काय?

या सगळ्यात मोदींच्या विकासाची घोषणा अडगळीत पडते आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी होत असल्याने इथेही पेट्रोलचे दर कमी होतायत. यात मोदी सरकारचं कर्तृत्व नाही. मात्र ही परिस्थिती जर पुढे उलटी झाली आणि महागाई वाढली तर मोदी मात्र चांगलेच अडचणीत येऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या विश्वासाने लोकांनी सत्तेचं सोपान मोदींच्या हाती सोपवलं ते देशात धार्मिक विद्वेष पसरवायला? मोदींनी आपल्या सर्व सहकार्यांना कानपिचक्या दिल्यात म्हणे. राजीनामा देण्याची धमकीही दिलीय म्हणे. याचा अर्थ मोदी हतबल आहेत असं म्हणायचं का? लोहपुरूषाची ही हतबलता कोणामुळे आलीय? मग ज्या घोषणा केल्या त्याचं काय होणार?

मोदींनी सतत विकासाची भाषा केलीय. पण हा विकास कुणाचा? लोक कल्याणाचं काय? भूमी अधिग्रहण सुधारणा अध्यादेशाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. काँगे्रस प्रणीत युपीए सरकारने हे विधेयक आणलं होतं. मात्र यातील उद्योजकांच्या दृष्टीने असलेल्या अटी वगळण्यात आल्या आहेत. आता हे नवं विधेयक बड्या पैसेवाल्यांच्या हाती सहजरित्या जमिनी देऊन शेतकरी, भूमिपुत्राला भूमीहीन करणारं आहे. सरकार-खाजगी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना ७० टक्के लोकमान्यतेची अटच काढण्यात आली आहे. जमिनीसाठी मोबदला देण्याची किंमत वाढवली आहे. म्हणजे काहीही करून जमिनी ताब्यात घ्या हे धोरण. यातून सगळे उद्योजक, दलाल, बिल्डर एकदम खूष झाले आहेत.

एका बाजूला लोकांना धर्माच्या नादी लावायचं आणि दुसर्या बाजूला अदानी, अंबानींचं हित पाहायचं… मोदींच्या विकासाचा रोख कोणत्या बाजूने आहे, अच्छे दिन कुणाचे आहेत, हे सहा-सात महिन्यांतच पुढे आलं आहे… गेलं वर्ष मोदींच्या लोकप्रियतेचं होतं, हे वर्ष त्यांचा आलेख मांडणारं असणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *