भारतामध्ये जेव्हापासून राजकीय सत्ताबदल झाला तेव्हापासून उघडपणे धर्मांतर करण्याचं धाडसत्र सुरू झालं. संघ आणि त्यांच्या विविध शाखा यांच्यात नवीन ऊर्जा निर्माण झालेली दिसते. संघ आजपर्यंत दबा धरून गुप्तपणे बजरंग दल, विहिंप आणि दुर्गावाहिनी यांच्यासारख्या अनेक संघटनांमार्फत आक्रमकपणे हिंदुत्वाच्या पडद्यामागून सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाचं काम करायचा. चुलीवर झाकण ठेवलेल्या गरम पातेल्यातील पाण्याची वाफ जशी आतमध्येच खवळत गुदमुरत असते, बाहेर येण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो. परंतु पातेल्याचं झाकण उघडताच त्याची वाफ भपकन बाहेर येऊन भाजून काढते. काहीसं तसंच संघाच्या बाबतीत झालं आहे. भाजपा सत्तेमध्ये येताच दबा धरून बसलेला संघ एकदम आक्रमक झाला. कोणाला खाऊ, कोणाचे किती मुडदे पाडू? अशी संघाची अवस्था झाली आहे. या देशातील दलित, मागासवर्गीय आणि बौद्ध यांना कधीही निपटता येईल. परंतु प्रथम मोठ्या माशांना टिपलं पाहिजे, या मानसिकतेतून त्यांनी मुस्लीम आणि इसाई यांना आपलं भक्ष्य केलं आहे. यासाठी प्रथम ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली. त्यातून पोषक वातावरण निर्माण होताच धर्मांतराचा विषय ऐरणीवर आणला. बांगलादेशीय निर्वासित मुस्लिमांना विविध प्रलोभनं दाखवून त्यांचं धर्मांतर करवून घेतलं. त्यावर देशात टीकेची झोड उठताच आणि राज्यसभा ठप्प होताच त्याला ‘घर वापसी’ असं गोंडस नाव देण्यात आलं. असे शब्द वापरल्यास प्रसारमाध्यमांत आणि लोकांत सहानुभूती मिळते हे समजण्यास संघाचा हातखंडा आहे. आता मोहन भागवत म्हणू लागले, ‘ये सब मेरा माल है, मै मेरे माल को अपने घर लेके जा रहा हूँ, इसके लिये मुझे जो जो करना पडेगा वो मैं करुंगा.’ भारतातील समस्त मुस्लीम आणि इसाईंना ते आपला माल समजत आहेत. यावरून संघाची विचारसरणी किती उच्च कोटीची आहे? याचा प्रत्यय येतो.
मुख्यत्वे धर्मांतराचे तीन प्रकार पाडता येतात. एक जबरदस्तीचं, दुसरं परतफेडीच्या स्वरूपात स्वच्छेने केलेलं तर तिसरं म्हणजे अन्याय-अत्याचार आणि गुलामी टाळण्यासाठी स्वतःहून निवडलेल्या नवजीवनाचा पर्याय. भारतात मोगलांनी जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा जो कांगावा केला जातो त्यात तथ्यांश आढळत नाही. मोगलांच्या काळात धर्म स्वीकारण्याच्या बदल्यात वतनदार्या, जहागिरदारी मिळायच्या. त्यामुळे स्वतःहून लालसेने राजे आणि सरदार मुसलमान होत असत, तर दुसर्या बाजूला ब्राह्मणाच्या सनातनी धर्माचा जातीयवाद, शिवाशिवीला कंटाळून, अपमान आणि अवहेलनापासून सुटका करून घेण्यासाठी खालच्या जातिंनी मुसलमान धर्म स्वीकारल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. मुसलमानांसोबत युद्ध करताना हिंदू सैनिक धर्मशास्त्राच्या शिक्षेच्या भयाने मुसलमानांच्या सैन्यात घुसून युद्ध करत नसत. कारण मुसलमान सैनिकाचा स्पर्श झाल्यास धर्मबहिष्कृत जीवन जगावं लागत असायचं. एवढंच कशाला वरच्या जातिच्या हिंदू सैनिकांना खालच्या अस्पृश्य हिंदू जातिच्या सैनिकाचा स्पर्श झाला तरी त्यांना धर्म आणि जातिबाहेर काढण्यात येत असे. शुद्धीकरणासाठी कठोर शिक्षेला सामोरं जावं लागत असे. त्यामुळे अशा अनेक हजारो हिंदू सैनिकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. कारण त्या धर्मात अस्पृश्यता आणि शिवाशिवी नव्हती. याला बळजबरीचं धर्मांतर कसं म्हणणार? भारतीय लोक इतिहास न वाचता केवळ काल्पनिक अशा पौराणिक कथा वाचत असतात. त्यामुळे त्यांना वास्तव इतिहासाची माहिती मिळणं दुरापास्तच झालं आहे.
धर्मांतराचा इतिहासच बघितला तर मोगलांच्या काळातील परिस्थितीपेक्षा ब्राह्मण राजा पुष्यमित्र शुंग यांच्या काळात झालेलं धर्मांतर हे फारच जुलमी आणि छळवादी होतं. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध भिक्षुकाचं शीर कलम करून आणणार्यांना बक्षिसं जाहीर केली होती. त्याकाळात ब्राह्मण सोडले तर बहुसंख्य जनता ही बौद्ध धर्मीय होती. परंतु पुष्यमित्र शुंग आणि राजा शशांक यांच्या धास्तीमुळे जनता आम्ही बौद्ध नसल्याचा दिखावा करत होती आणि त्यानंतरच्या पिढ्या आपलं संपूर्ण बौद्धपण विसरून गेल्या, तर परतफेडीच्या स्वरूपात स्वच्छेने केलेल्या धर्मांतराचा काळ हा ब्रिटिश काळ होय. या काळात चर्च मिशनरींनी हिंदू धर्मशास्त्रानुसार या देशातील मागासवर्गीय, पददलित आणि आदिवासी यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांची गरिबी आणि अशिक्षितपणा आणि वेगळेपणा बघितला. चर्चचा हेतू धर्म वाढवण्याचा असला तरी त्यांनी या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, मोफत शिक्षण दिलं, आर्थिक संसाधन प्राप्त करून दिलीत, त्याहीपेक्षा सर्व लोक समान असून ती सारी देवाची लेकरं आहेत अशी शिकवण देऊन चर्चच्या प्रार्थनेत सगळ्यांना सहभागी करून घेतले. याचा परिणाम म्हणून ख्रिश्चन धर्म आणि मिशनरी लोक इतरांपेक्षा त्यांना जवळचे वाटू लागले म्हणून त्यांनी तो धर्म स्वीकारला. धर्मांतरापेक्षा या गरिबांना त्यांनी जगवलं, माणूसपण देऊन माणसात आणलं हे महत्त्वाचं नाही काय? अशिक्षित लोकांनीच नव्हे तर पंडिता रमाबाई आणि रेव्हरंड टिळक यासारख्यांना आपल्या मुळच्या ब्राह्मणी धर्माची तत्त्वं ख्रिस्ती धर्मापेक्षा दुय्यम वाटली आणि त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
तिसरा धर्मांतराचा प्रकार हा महत्त्वाचा आहे, कारण तिसर्या धर्मांतरासारखं धर्मांतर या देशात पुन्हा घडू नये यासाठीच धर्मांतराच्या कायद्याचा बागुलबुवा निर्माण करण्यात आला आहे. या देशात अनेक कष्टकरी जातिंना कित्येक शतकं अपमानाची, तुच्छतेची आणि वेळप्रसंगी जनावरापेक्षाही तुच्छतेची वागणूक देण्यात आली. गुलामासारखं जीवन जगण्यास विवश करण्यात आलं होतं. या लोकांनी योग्य नेता मिळेपर्यंत अपमान सहन केला. नेता मिळताच त्यांनी धर्मशास्त्रं आणि समाजव्यवस्थाविरोधी बंड करणं सुरू केलं. त्याचीच परिणती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली जगातील सर्वात मोठं धर्मांतर घडवून आणलं. आंबेडकरांच्या या धर्मांतरामागे लालूच वा प्रलोभन होतं का? हे तथाकथित लोकांनी तपासून पहावं. आत्मसन्मानाचा मार्ग म्हणून, होणारी अवहेलना थांबवण्यासाठी एक कर्मकांडमुक्त विज्ञानवादी बौद्ध धर्म येथील कष्टकर्यांना दिला. आंबेडकरांनी हे धर्मांतर राजकीय फायद्यासाठी, संख्याबळाच्या हिशेबासाठी आणि देवाणघेवाणीसाठी केलं नाही. तसं असतं तर त्यांनी मुस्लीम वा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता. असं असतानाही हा देश आंबेडकरांना सन्मान देत नाही. याचं कारण म्हणजे मनुस्मृतिऐवजी त्यांनी दिलेली मानवतावादी राज्यघटना होय.
वरील तीन प्रकारच्या धर्मांतरात ‘घर वापसी’चा प्रश्न येतोच कुठे? ज्या कारणासाठी धर्मांतरं झालीत ती कारणं आजही संपली नाहीत. ज्यांनी धर्मांतरं केलीत त्यांनी आपल्या देशाला, देशाच्या सार्वभौमत्वाला, इथल्या संस्कृतिला, राज्यघटनेला आव्हान दिलं आहे काय? ते इथल्या मातीशी एकरूप आहेत, कारण ते या मातीतलेच मूळनिवासी आहेत. देशाच्या रक्षणासाठी ते कधीही तत्पर आहेत. उलट या देशात काही समाजघटक हे स्वतःला असुरक्षित समजतात. तेच घटक या देशात दंगली घडवून आणताना दिसतात. संस्कृती, गर्व से कहो, मंदिर वही बनायेंगे, धार्मिक शिक्षण आणि दुसर्या धर्माच्या अस्मिता पुसणं या गोंडस नावाखाली देश सतत अस्थिर ठेवू पहात आहेत.
या देशात ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, अफगाण आले. त्यांनी भारताच्या विविध भागांत आपापली राज्यं निर्माण केलीत. परदेशातून मुठभर आलेल्या लोकांनी या देशावर शेकडो वर्षं का राज्य केलं? याच्या खोलात कोणीच जाऊ बघत नाहीत. फ्रेंच राज्यक्रांती आणि ब्रिटनमधील उदारमतवाद आणि युरोपात झालेले सामाजिक आणि राजकीय बदल हे भारतातील स्वातंत्र्याच्या चळवळीस ठरलेले पोषक घटक होत. भारतात झालेल्या उठावामुळे बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपली सत्ता येथील लोकांकडे सुपूर्द करून आपल्या स्वतःच्या देशात पलायन केलं, याला ‘घर वापसी’ म्हणतात. संघाची ‘घर वापसी’ची व्याख्या ही संकुचित आणि उन्माद निर्माण करणारी आहे. या उलट या देशात घरवापसी न झालेला मोठा घटक हजर आहे. हजारो वर्षांपासून तो या देशात दबा धरून बसलेला आहे. तो स्वतःची घर वापसी न बघता दुसर्याची घर वापसी करायला लागला आहे. या देशात हजारो वर्षांपूर्वी युरेशियातून खैबरखिंडीच्या मार्गे भारतात युरेशियन आर्यांनी घुसखोरी केली. लोकमान्य टिळकांसारख्या अनेक विचारवंतांनी त्याची पुष्टी केली आहे. मग एक प्रश्न पडतो? या देशात बाहेरून आलेले ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, अफगाणी यांनी आपल्या देशात घर वापसी केली तर मग या आर्यांनी आपापल्या मुळच्या युरेशियन देशात घर वापसी का केली नाही?, की यांनी फक्त दुसर्यांना घर वापसीचे सल्ले द्यायचे? तेही या देशातील मूळनिवासी लोकांना? कोणत्या तत्त्वात याचा समावेश होतो? हे संघाने या देशातील बहुजन समाजाला सांगितलं पाहिजे. अन्यथा एक दिवस बहुजन समाजच युरेशियन आर्यांना देशाबाहेर हाकलून त्यांची घर वापसी घडवून आणेल.
धर्मांतराच्या कार्यक्रमात एक बाब प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे धर्मांतराचं नियोजन, आयोजन आणि संयोजन करण्यात तसंच त्या त्या एरियामध्ये जाऊन मुस्लीम आणि ख्रिस्ती जनतेला पटवण्यात मुख्यतः मागासवर्गीय आणि खालच्या जातितील लोकांचा सहभाग दिसतो. पोलीस केसेस लागल्या तर त्या तुमच्यावर लागतील, तुरुंगात जावं लागलं तर तुम्ही जा. आम्ही मात्र नामनिराळे, परंतु काम आमचंच झालं पाहिजे ही संघाची व्यूहनिती आहे. म्हणूनच साध्वी निरंजन, उमा भारती, साक्षी महाराज आणि नंदकिशोर वाल्मिकी यांसारख्या खालच्या जातितील लोकांना साधू आणि साध्वी बनवून त्यांचा शस्त्रासारखा वापर केला जात आहे.
आदर्श समाजरचनेत विभिन्न गट एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, यालाच सामाजिक एकात्मता म्हणतात. लोकशाही म्हणजे प्रथम सामाजिक सहजीवनाची व्यवस्था. हिंदुंची धर्मशास्त्रं मात्र अशा समाजव्यवस्थेला मान्यता देत नाही. कारण धर्म सनातन असून त्यात परिवर्तन अपेक्षित नसतं. घटनेने प्रत्येकाला नवजीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु नवजीवन मृत शरीरात निर्माण करता येत नाही. नवीन शरीरातच ते शक्य असतं. त्यासाठी प्रथम जुन्या शरीराची कात टाकून नवीन शरीर धारण केलं पाहिजे. म्हणजेच परंपरावादी धर्मशास्त्राचा त्याग आणि नाश करूनच नवजीवन प्राप्त करता येतं. असं नवजीवन संघ धर्मांतरित मुस्लिमांना आणि ख्रिस्तींना प्राप्त करून देणार आहे का? या बांगलादेशी मुसलमानांना हिंदू धर्माच्या कोणत्या जातिमध्ये टाकणार? प्रत्येकाला उच्चदर्जाची जात हवी असते. भारतात ब्राह्मणाशिवाय दुसरी कोणतीही उच्च जात होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना ब्राह्मण या जातिमध्ये टाकण्यात यावं. त्यांची ब्राह्मणाप्रमाणे मुंज करण्यात येऊन गळ्यात धागे घालून पूजा करण्याचा पाठ शिकवण्यात यावा, जेणेकरून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं करणार आहे का? असं झालं तर भारतातील सगळ्या जातिंना ब्राह्मण करून जातिसंस्थेचं उच्चाटन करता येईल.
– बापू राऊत