इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. पण तिथली राजेशाहीसुद्धा त्यांनी अजून जिवंत ठेवली आहे. राजेशाही आणि लोकशाहीचा अजब संकर तिथे आहे. भारतीय राजेशाहीचं मात्र इंग्रजांनी पुरतं कंबरडं मोडलं. लोकांना पिळायची अक्कल असणारा कुणीही गोंद्या माणूस राजा होऊ शकेल, अशी लोकशाही त्यांनी भारतात रुजवली. ते ओझं आपण अजून बाळगतो आहोत. क्रिकेटची तर आपल्या देशाला जबरदस्त नशाच आहे आणि चित्रपटांच्या आपल्या वेडेपणाबद्दल आपला आज जगात पहिला क्रमांक लागतो. हे वेगळं सांगायला नकोच.

खरं तर राजकारण हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, क्रिकेट हे माणसाच्या शरीराच्या विकासासाठी आणि मनाच्या आनंदासाठी आणि चित्रपट हे माणसाच्या मानसिक, बौद्धिक म्हणजेच पर्यायाने सांस्कृतिक, सामाजिक विकासासाठी उपयुक्त माध्यम आहे. अशा अर्थांनी या तिन्ही गोष्टींकडे पाहिलं जायला हवं. प्रत्यक्ष इंग्रज आज तसं पाहतात असं दिसतं. पण यांच्या माथ्यावर इंग्रजांनी या तिन्ही गोष्टी थोपल्या, ते भारतीय लोक, या तिन्ही गोष्टींचा विचार कसा करतात, हे शोधायचं ठरलं तर एकूणच विदारक आणि दयनीय चित्र या तिन्ही क्षेत्रांच्या बाबतीत आपल्याला दिसतं. या तिन्हींतून देशाचा किंवा समाजाच्या कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. ही तिन्ही क्षेत्रं केवळ निरर्थक, वेळकाढू आणि जमेल तशी दुसर्याची फसवणूक करणारीच ठरलेली आहेत. त्यांच्यातले मूळ आणि चांगले उद्देश कधीच फलून गेलेले आहेत. तिन्हींमध्ये केवळ खेळखंडोबा उरलेला आहे.

इंग्रज येण्याआधी आपल्या देशाला खेळ, कला, राजकारण यांची एक दीर्घ आणि अखंड अशी, खरोखर अभिमान बाळगावा अशी परंपरा होती. इंग्रजांनी या परंपरेवर आपल्या खेळ, कला आणि राजकारणाने जोरदार आघात केला. आपली परंपरा मोडली नाही किंवा मेली नाही. पण तीव्रपणे गंभीर जखमी झाली. आजही ती परंपरा वेदनांनी कण्हते आहे. दुखावलेली आहे आणि आपण इंग्रजांनी देणगीत दिलेल्या आधुनिक राजकारण, कला आणि खेळांच्या मोहात पुरते बुडालेले आहोत. हा मोह असणं अजिबात वाईट नाही, उलट ते चांगलंच आहे. पण त्या तिन्ही गोष्टींच्या मूळ उद्दिष्ट आणि उद्देशांशी आपण नेहमीच प्रतारणा, विश्वासघात करत आलेलो आहोत, आजही करतो आहोत, ही यातली सर्वांत भयंकर आणि दुःखद बाब आहे. देशाच्या विकासाच्यादृष्टीने आपण ही तिन्ही माध्यमं पुरती वांझ आणि निकामी करून टाकलेली आहेत हे जास्तच भयंकर आहे आणि ते देशाच्या आणि तिन्ही क्षेत्रांच्या विनाशाला कारणीभूत ठरणारं आहे.

सर्वात जास्त गंभीर आणि राग आणणारी बाब अशी आहे की, स्वतःला सर्वात प्राचीन संस्कृतीचे लोक असल्याचं वायफळ म्हणणं मिरवणार्या भारतीय माणसाला चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण यांची अजून पुरेशी जाण आणि अक्कलच आलेली नाही. आपल्या आळसामुळे आपल्याकडे ती अक्कल येऊच द्यायची नाही, असं त्याने पक्कं ठरवलेलं आहे. त्यामुळे या माध्यमाचं महत्त्व आणि उपयोगिता त्याच्या आवाक्यात आलेली नाही आणि म्हणूनच आज तरी ही तिन्ही माध्यमं भारतीय समाज किंवा देश यांच्यादृष्टीने केवळ पोकळ, वेळ घालवायची साधनं आणि तकलादू ठरलेली आहेत.

२.

एक मुद्दा राहिला. आजच्या भारतीय राजकारणात आणि क्रिकेटमध्ये या न् त्या रूपात जसे इंग्रज डोकावताना दिसतात किंवा जशी इंग्रजांची छाप दिसते, तशी ती चित्रपटांमध्येही दिसते. उलट इतर माध्यमांपेक्षा जास्त दिसते. काही साधी आणि गंमतीची उदाहरणं पाहू.

दहापैकी सात ते आठ भारतीय चित्रपटांत एक सुंदर, नक्षीदार पेटारा दाखवतात. त्याचं एका दांडीवर उभं असलेलं झाकण असतं. त्या पेटार्याला आपल्या वाजवायच्या पेटीसारखी काळी पांढरी बटनं असतात. एका उंची हवेलीत हा पेटारा ठेवलेला असतो. हा पेटारा म्हणजे एक वाद्य असतं. या वाद्याला काय म्हणतात हे जर भारतीयांना विचारलं, तर शेकडा नव्वद टक्के भारतीयांना ते नाव सांगता येणार नाही. पण अनेक चित्रपटांमध्ये नायक किंवा नायिका उदास असतील किंवा एकमेकांना टोमणे मारायचे असतील तर या पेटार्यावर गाणी म्हणून दाखवतात. नायकनायिका भारतीय असतात पण तो पेटारा मात्र इंग्रजी. तो किती भारतीय घरांमध्ये असतो? तर जवळजवळ नसतो आणि बहुतेक भारतीयांना तो वाजवताही येत नाही. तरीही तो असतोच. कारण काय? तर इंग्रजांनी ती सवय लावून ठेवलीय. ती सवय मोडली तर इंग्रजांना राग नाही का येणार? इंग्रजांचं मन मोडू नये म्हणून तो पेटारा उर्फ पियानो अजूनही नको असताना भारतीय चित्रपटात अडकून पडलाय आणि भारतीय प्रेक्षकही बथ्थडपणे सतत तो बघत आलेले आहेत.

दुसरं उदाहरण पोषाखाचं. भारतातली बहुतेक जनता धोतर, साड्या, पायजमे, सदरे, लुंग्या, फेटे, टोप्या घालण्यात पटाईत. पण बहुतेक चित्रपटांच्या नटनट्या बघा. सगळा थाट इंग्रजी. कोट काय, बूट काय न् सूट काय! फराकी काय न् चड्ड्या काय! निव्वळ काळे इंग्रजच की हे. सगळं आपल्याशी न जुळणारं आणि नकली. भारतीयपणाचा कसला स्पर्शच नाही त्याच्याशी आणि आपण तेही आवडीने सहन करतो. वर निगरगट्टपणे इथल्या चित्रपटांना भारतीय चित्रपट म्हणतो. कशासाठी?

आणखी एक साधी गोष्ट. भारतातले बहुतेक चित्रपट तयार होतात भारतीय भाषेत किंवा प्रादेशिक भाषेत किंवा राष्ट्रभाषेत. पण बहुतेक चित्रपटांच्या श्रेयनामावल्या, म्हणजे चित्रपटाचं नाव, कलाकारांची, तंत्रज्ञांची नावं हमखास इंग्रजीत असतात. ही काय मजा आहे? भारतातल्या फक्त दीड टक्के लोकांनाच इंग्रजी येतं आणि इंग्रज कधीही आवडीने हिंदी किंवा प्रादशिक भाषेतले चित्रपट पाहत नाहीत. मग ही श्रेयनामावली कायम इंग्रजीत असण्याचं कारण काय? कुणाची गरज आहे ती? हा इंग्रजी छाप कशासाठी? तर काही नाही, इंग्रजांच्या गुलामीची सवय अजून जात नाही.

मराठी भाषेच्या चित्रपटांच्या दैनेला पारावर नाही. भारतभर जाऊ द्या, पण दस्तुरखुद्द महाराष्ट्रातही मराठी चित्रपट माणसं पाहत नाहीत. तरीही मराठी चित्रपटांच्या श्रेयनामावल्या इंग्रजीतल्या असतात. असं का? तर तीच लाचार आणि निरर्थक गुलामी.

आता दूरचित्रवाणी संच घरोघरी आले आहेत. तुम्ही त्याच्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नटनट्यांच्या मुलाखती पाहिल्या असतील. ह्या नटनट्या धड दहावीबारावीपर्यंतही शिकलेल्या नसतात. पण मुलाखतीत बोलताना ते कोणत्या भाषेत बोलतात? प्रश्न हिंदीत विचारा, मराठीत विचारा किंवा कानडीत विचारा, नटनट्या त्याचं उत्तर हमखास अर्धवट आणि चुकीच्या इंग्रजीत देणार. असं का? तर त्यांचे खरे पिताश्री तिकडे इंग्लंडात राहतायंत म्हणून. त्यांचं पोट ते इथल्या भाषांवर भरतात. पण त्यांच्या निष्ठा इंग्रजी भाषेवर. कारण खर्या पित्याशी इमान राखलं पाहिजे!

पुन्हा हे एवढे इंग्लिश बोलतात म्हणून इंग्लंड-अमेरिकेतल्या कुणा निर्माता-दिग्दर्शकाने त्यांना तिकडच्या चित्रपटात काम करायला बोलावलंय, असं होतं का? तर अजिबात नाही. हे फक्त इथल्या अडाणी आणि भोळ्या जनतेवर राज्य करणारे ‘स्टार’ जणू इंग्रजांनी ऐकाव्यात म्हणून मुलाखती देत असतात. जे लोक यांना डोक्यावर घेतात, त्यांच्यासाठी, त्या लोकांच्या भाषेत काही बोलावं अशी त्यांना गरज वाटत नाही. आच वाटत नाही आणि हे म्हणे भारतीय कलाकार. भारतीयपणाची एवढी चावट चेष्टा दुसरी नसेल आणि आपणही यांना डोक्यावर घेऊन नाचतो, हा तर आपला शहाजोग विनोदच. बावळटपणाचा कळस अगदी.

हा इंग्रजी छापाचा प्रकार आहे, त्याची अजून शेकडो उदाहरणं आहेत. ती सर्वांनाच बरीच ठाऊक असतील. त्यामुळे इथे तो विषय वाढवण्यात अर्थही नाही. पण हे एकूण वाईट आहे हे नीट नमूद केलंच पाहिजे.

३.

मी लहान होतो तेव्हाचा शाळेच्या तुळईवर लिहिलेला एक सुविचार मला अजून आठवतो. ‘झिपर्या वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.’

सुविचार छानच होता आणि आपल्याकडे सुविचार छानच असतात. फक्त त्यांचा अंमल करायला आपल्याला कधीच जमत नाही. आपण ते तुळईवर छान अक्षरात लिहून ठेवतो आणि पुढे त्यावर छानपैकी धूळही साठते. पण आपण तो तेवढ्याच छानपणे डोक्यात मात्र शिरू देत नाही. कारण काय? तर सुविचार डोक्यात शिरू दिला, तर आपली अक्कल वाढेल आणि आपलं तर आधीच ठरलंय की काहीही झालं तरी अक्कल वाढू द्यायची नाही म्हणून.

हे असले सुविचार आपल्याला पदोपदी दिसतात, पण मी पाहिलंय, त्यांचा परिणाम नेहमी उलटाच झालेला दिसतो. या काळात मी हा सुविचार वाचला, देवानंद-विवेकानंदाचा, त्यानंतर थोड्याच काळात माझी पिढी वयात आली आणि माझ्या भोवताली मी वळून पाहिलं तर विवेकानंद कुठं दिसला नाही. पण शेपाऊणशे राजेश खन्ना, शेपाऊणशे अमिताभ बच्चन, पाचुंदाभर विनोद खन्ना तर आणखी पाचुंदाभर शत्रुघ्न सिन्हा असे लोक दिसत राहिले. दुसर्या बाजूला जया भादुर्या, हेमामालिन्या यांचा बेसुमार ढीग लागलेला. थोडं मोठं झालो. पिढी बदलली. तर शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, हा खान आणि तो खान. खानांची खाण लागलेली. नव्या पिढीत राजन खान मात्र कुणी दिसेना. पोरींमध्ये माधुरी दीक्षित, जुही चावला न् काजोल न् मनीषा कोईराला यांची गर्दी. विवेकानंद आणि त्यांचे विचार आणि तुळईवरचे सुविचार, सगळे जागच्या जागेवर. सगळ्या देशभर निव्वळ नट न् नट्याच.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *