महेंद्र सिंग धोनीसाठी अनेक विशेषणं वापरता येतील. कूल, शांत, टफ, आत्मविश्वासाने परिपूर्ण, मॅच विनर इत्यादी इत्यादी. पण या खेळाडूचं वर्णन जर एकाच शब्दात करायचं असेल, तर ‘अपारंपरिक’ असंच करावं लागेल. पुस्तकातल्या नियमानुसार हा माणूस कधीच खेळला नाही. कप्तान म्हणून किंवा फलंदाज म्हणून किंवा यष्टीरक्षक म्हणून त्याने नेहमीच स्वतःचा वेगळा मार्ग धुंडाळला आणि त्या रस्त्याने प्रवास केला. मुख्य म्हणजे, कप्तान म्हणून आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच त्याने याची प्रचिती दिली. २००७ साली पाकिस्तान विरुद्धच्या टी-२०च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात त्याने शेवटचं षटक जोगिंदर शर्माला टाकायला दिलं तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याच्या क्रिकेटला नेहमीच अनिश्चिततेची आणि आश्चर्याच्या धक्क्यांची जोड असायची.

कसोटी क्रिकेटमधली आपली निवृत्ती धोनीने जाहीर केली तीसुद्धा आपल्या या खेळाला साजेशीच होती. ऑस्ट्रेलियात मेलबर्नला तिसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्यानंतर त्याने १५ मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात हसर्या चेहर्याने त्याने संघाच्या खेळाबाबत चर्चा केली आणि त्यानंतर काही मिनिटांनी भारतीय क्रिकेट मंडळाने प्रसार माध्यमांकडे पाठवलेल्या पत्रकाने सगळ्यांवर बॉम्बशेल टाकला.

प्रामाणिकपणे सांगायचं, तर भारतीय कसोटी संघाला नेतृत्व बदलाची गरज होतीच. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एमएसडी हा सर्वोत्तम कप्तानांपैकी एक गणला जातो. म्हणूनच त्याने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पण पाच दिवसांचं क्रिकेट खेळताना त्याचा हा मिडास टच कधी जाणवला नाही. गेला काही काळ क्रिकेट तज्ज्ञ त्याच्या नेतृत्वामध्ये काल्पनिकतेचा अभाव दिसतोय असं म्हणतच होते. मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाची झलक दाखवली आणि भारताला हवा होता तो पर्याय त्याच्यात दिसला.

पण धोनीच्या कप्तानपदाचं विश्लेषण आपण नंतर कधीतरी करायला हवं. आज महत्त्वाचं आहे ते एमएसडी नावाच्या या माणसाने भारतीय क्रिकेटला आणि भारतीय समाजाला जे दिलं त्याला सलाम करणं. दूध पिणारा, लांब केसांचा, ओबडधोबड खेळाडूपासून पिकू लागलेल्या केसांचा, प्रगल्भ, शांत आणि तरुण, उत्साही खेळाडूंच्या मागे दिशादर्शकासारखा उभा ठाकणारा कप्तान म्हणून झालेला त्याचा प्रवास केवळ स्फूर्तिदायक आणि आशा जागवणारा आहे.

एक काळ असा होता जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये अकरापैकी आठ जण मुंबईचे असत. मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळणं म्हणजे आंतरराष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवण्यापासून केवळ एक पाऊल दूर असल्याचं मानलं जायचं. गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची वानवा मुंबईमध्ये कधीच नव्हती आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबईचा संघ इतर स्थानिक संघांवर दादागिरी गाजवायचा. ९०च्या आणि २०००च्या दशकात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबादमधले खेळाडू आपला ठसा उमटवू लागले. पण तेही मोठ्या शहरांमधून आलेले होते. कपिल देवसारखा एखादा अपवाद. आधुनिक सुविधा आणि सोयी उपलब्ध असल्यामुळे तसंच निवड समितीचं सगळं लक्ष शहरांकडे केंद्रित झालेलं असल्याने शहरातल्या मुलांचं कर्तृत्व सहजी नजरेत भरायचं. छोट्या शहरांमधल्या काहीतरी करू इच्छिणार्या मुलांच्या तुलनेत तर अधिकच.

एमएसडीने भारतीय संघाची कॅप घालण्याचं स्वप्न बघितलं तेव्हा रांचीही काही वेगळं नव्हतं. शहराची अर्थव्यवस्था मेन रोड नावाच्या एका रस्त्यावर केंद्रित झालेली होती. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली दुकानं या रस्त्यावर होती. काही पक्षांसाठी राजकारण जसा कौटुंबिक व्यवसाय असतो तसे व्यवसाय इथे चालत. अशा छोट्याशा शहरातून आलेल्या एमएसडीने इथवर मजल मारली ती केवळ कठोर परिश्रम, जिद्द यांच्या जिवावर. कोणीही गॉडफादर नसताना. त्याची कारकीर्द म्हणजे एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमासाठी उत्तम कथानक आहे. दिग्दर्शकाला फारसं स्वातंत्र्यही घ्यावं लागणार नाही इतकं नाट्य त्यात आहे. (त्याच्या जीवनावर एक सिनेमा येतोय याची कल्पना आहे मला).

२००७मध्ये वयाच्या २६व्या वर्षी एमएसडीकडे राहुल द्रविडकडून भारतीय क्रिकेटच्या एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आली. त्यानंतर वर्षभराने अनिल कुंबळे निवृत्त झाला आणि कसोटी संघाचं कर्णधारपदही धोनीकडे आलं आणि खरंच, गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचा तो बॉस होता. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, झहीर खान अशा दिग्गजांच्या संघाचं नेतृत्व त्याने समर्थपणे केलं. एमएसडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा यातले बहुतेक जण सुपरस्टारपदाला पोहोचलेले होते. पण तरीही तो कधी त्यांच्या वलयाच्या दबावाखाली आलाय असं दिसलं नाही. या रथीमहारथींच्या गराड्यातही खेळाची सूत्रं कायम त्याच्याच हातात असायची.

एमएसडी हा सर्वोत्कृष्ट कसोटी कप्तान होता असं कुणीच म्हणणार नाही, कारण आशिया खंडाच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्ये त्याचा रेकॉर्ड काही फार चांगला नाही. पण तरीही त्याच्या निवृत्तीने एक पोकळी निर्माण होणार आहे. प्रसंग बिकट असो किंवा आनंदाचा, चेहरा शांत कसा ठेवायचा हे कुणी एमएसडीकडून शिकावं. बिऑन बोर्ग या टेनिसपटूची आठवण करून देणारा हा थंडपणा होता. ‘काकडीसारखा थंड’ या वाक्प्रचाराला त्याने एक नवीन अर्थ दिला. दबावाच्या परिस्थितीमध्ये त्याच्या शांत रहाण्याचा चांगला परिणाम संघावर व्हायचा. केवळ कर्णधार म्हणून नाही तर फलंदाज म्हणूनही. फलंदाज म्हणून तो खालच्या क्रमांकावर खेळायला यायचा आणि भारतासाठी त्याने काही निर्णायक खेळी केलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये सुरुवातीचे फलंदाज बॅटवर चेंडू येण्यासाठी धडपड करत असताना एमएसडीने फलंदाजीच्या आपल्या अपारंपरिक तंत्राने काही धडाकेबाज अर्धशतकं ठोकली.

एमएसडीच्या या संघामध्ये उमेश यादव, मोहम्मद शामी, वरूण अॅरॉन, कर्ण शर्मा यासारखे खेळाडू आलेले आहेत. भारताच्या एकदिवसीय संघात तर धोनीप्रमाणेच झगडून वरपर्यंत प्रवास केलेले आणखी जास्त खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये झालेले हे बदल अचंबित करतात. एमएसडीचं आगमन झाल्यानंतर त्याच्यासारख्याच साध्या, छोट्या शहरातून आलेल्या मुलांची संख्या लक्षात येण्याएवढी वाढलीये. असे अनेक खेळाडू आज भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करताहेत. एमएसडीच्या आधी ही संख्या किती होती हे बघितलं की त्याचं महत्त्व लक्षात येतं.

जम्मू आणि काश्मीर, राजस्थान यासारखे संघ आज रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवताहेत. आयपीएलमधून दर वर्षी आपल्याला नवीन स्टार्स मिळताहेत. शहराच्या बाहेर राहणारे तरुण आता मोठी स्वप्न बघण्याचं धैर्य करू लागले आहेत. असं स्वप्न साकार करणारं एक जिवंत उदाहरण त्यांच्यासमोर आहे. ज्याच्यापासून स्फूर्ती घ्यावी असा खेळाडू त्यांच्यासमोर आहे. आकड्यांच्याही पलीकडे एक गोष्ट आहे ज्याचं प्रतिनिधित्व एमएसडी करतो आणि ती आहे आशा…!

– पार्थ मीना निखिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *