एड्स प्रतिबंधासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेने २०११ ते २०१५ या काळासाठी विशेष रणनीती आखली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्लोबल झालेलं जग आता कला, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा कितीतरी क्षेत्रात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. या प्रगतीच्या वाटेवर अनेक संकटं मानवजातीवर येत आहेत. यातील काही संकटं आपल्या बुद्धी कौशल्याने मानवाने परतवून लावली आहेत. तर काही आजही मानवासमोर यक्षप्रश्न बनून उभे आहेत. यातील मानवासमोर आव्हान बनून ठाकलेला प्रश्न म्हणजे एड्स हा आजार आणि त्यावरील उपचार होय.

या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने एड्स प्रसारात शून्य गाठण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियेन्सी सिंड्रोम (एचआयव्ही) विषाणुच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती निकामी बनते. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते.

एचआयव्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईटस्वर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसंच क्षयासारखे भयंकर रोग होण्याची शक्यता असते. त्यावर इलाज करणंही अवघड होतं. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही.ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते. एड्सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणं आहेत. यात असुरक्षित लैंगिक संबंधातून, बाधित रक्तातून तसंच बाधित आईकडून अर्भकाला आदींचा समावेश आहे. नॅशनल एड्स कन्ट्रोल प्रोग्राम आणि यूएन एड्स यांच्यानुसार भारतात ८० ते ८५ टक्के संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरत आहे.

अजूनही एड्सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत. एड्सवर सध्या कोणतंही औषध वा लस नाही. त्यामुळे एड्सला पूर्णपणे रोखणं सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंध हाच महत्त्वाचा उपाय ठरतो. एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतंही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत.

एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो. पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. एड्सबाबतची काही लक्षणं पुढीलप्रमाणे सांगता येतील. ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि भूक कमी होणं, लसिकांची सूज, नागीण, वजन कमी होणं (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त), वारंवार तोंड येणं, वारंवार जुलाब, वारंवार आजारी पडणं ही सर्व लक्षणं साध्या रोगात दिसून येतात.

त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचं संक्रमण निश्चितच ओळखता येत नाही. एड्स टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तिंबरोबर लैंगिक संबंध टाळणं अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करणं, असुरक्षित यौनसंबंध टाळणं हेच यावरील ठोस उपाय आहेत. तसंच एड्सग्रस्त व्यक्तिने आपल्या साथीदाराला त्याची कल्पना देणंही खूप आवश्यक आहे.

असुरक्षित संबंध ठेवू नये. त्यामुळे एड्स साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते. जर एखादी व्यक्ती एचआयव्हीने संक्रमित असेल तर अशा व्यक्तिने रक्तदान करू नये. रक्त चढवण्यापूर्वी ते एचआयव्हीमुक्त आहे याची खात्री करून घेणं. इंजेक्शन घेताना प्रत्येकवेळी नवीन सुईचा वापर करणं, या गोष्टींची काळजी घेतल्यास एड्सला प्रतिबंध घालता येऊ शकतो.

याअंतर्गत लैंगिक संबंधाद्वारे होणारा एचआयव्ही प्रसार, एड्ससंबंधातील माता मृत्यूचं प्रमाण, टीबीने होणारे मृत्यू निम्म्यावर आणणं तसंच अंमली पदार्थ सेवनातून होणार्या एचआयव्ही प्रसारास प्रतिबंध करणं, एचआयव्हीसह जगणार्या आणि उपचाराच्या माध्यमातून बरं होऊ शकणार्या लोकांना अॅन्टिरेट्रोव्हायरल थेरपी उपलब्ध करून देणं यांसारखे आणि इतर उद्देश साध्य करून एड्सचा प्रसार थांबवण्याचं लक्ष्य संयुक्त राष्ट्र संघाने ठेवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर एड्स प्रतिबंधाचा शून्य गाठण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होत असताना लोकांनीदेखील यात सहभाग नोंदवायला हवा.

एड्सचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतानाच एड्ससह जीवन जगणार्या व्यक्तिंच्याबाबतीत भेदभाव टाळणं, एड्सच्या प्रसाराबाबत इतरांमध्ये जनजागृती केल्यास ते प्रयत्नदेखील एड्स प्रतिबंधासाठीचं योगदान ठरणार आहे. अशा छोट्या योगदानातूनच एड्स प्रसाराचा शून्य गाठणं शक्य होणार आहे.

डॉ. पूनम खेत्रपाल सिंग

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *