जादूटोणाविरोधी कायद्याला एक वर्षं पूर्ण होत असतानाच राज्यात अजून एक अघोरी विद्येमुळे नरबळी जाण्याची भयंकर घटना घडली आहे. स्वतःला सुख मिळावं म्हणून जन्मदात्या आईचीच हत्या करण्याची धक्कादायक घटना नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये घडलीय… अघोरी विधीसाठी महिला मांत्रिकाच्या सल्ल्याने दोन मुलांनी स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केल्याने सध्या नाशिक जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष या गावात ही घटना घडली आहे. टाके हर्ष गावाजवळ मांत्रिक महिलेने एका महिलेचा बळी दिल्याची माहिती श्रमजिवी संघटनेचे भगवान मधे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती तात्काळ घोटी पोलिसांना दिली आणि तेव्हाच तपासचक्र वेगाने फिरू लागली… यावेळी मठ बांधण्याच्या नावाखाली एका मांत्रिक महिलेला सात बळी द्यायाचे असून त्यापैकी एक बळी देण्यात आलाय, तर एका महिलेने सुटका करून घेतल्याने ती बचावली असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.

मोखाडा तालुक्यातील दांडवळ येथील काशिनाथ दोरे आणि गोविंद दोरे यांची बहीण टाके हर्ष इथे राहाते. आपणास सुख मिळत नसल्याची व्यथा या भावांनी बहिणीकडे मांडली होती. यावर तिने टाके हर्षमधील महिला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला या दोघांना दिला होता. त्यानुसार या दोघांनी त्या महिला मांत्रिकाकडे धाव घेतली. तेव्हा त्या महिला मांत्रिकाने तुमची आई आणि बहीण चेटकीण असल्यानेच तुम्हाला सुख मिळत नसल्याचं दोघा भावांना सांगितलं. तसंच या दोघींचा बळी द्यावा लागेल असंही तिने सांगितलं. दोघा भावांनी आपली आई दुधाबाई दोरे आणि बहिण राही पिंगळे यांना मांत्रिकाकडे आणलं. मंदिर बांधण्यासाठी पूजा असल्याचा बनाव रचला गेला आणि त्या महिला मांत्रिकाने दोघींना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच दुधाबाई यांचा बळी देण्यात आला, तर राहीबाई आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाल्या…

यानंतर पोलिसांनी राहीबाई यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांने संपूर्ण घटनेची कबुली दिली. यानंतर घोटी पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी काशिनाथ आणि गोविंद दोरे या दोघा भावांना आणि त्या महिला मांत्रिकाला अटक केली. तसंच या कृत्यात सामील असलेल्या अन्य सात जणांनाही पोलिसांनी अटक केलीय…

 

जमीन अधिग्रहण सुधारणा अध्यादेशाला मंजुरी

विकासाच्या नावावर निवडणुका जिंकून सत्ता काबीज केलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आता आपल्या अजेंड्याप्रमाणे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. देशभरात धर्माच्या नावावर गदारोळ माजत असताना आणि सामान्य जनता त्या गदारोळात मश्गूल असतानाच दुसरीकडे भाजप सरकारने अतिशय शिताफीने जमीन अधिग्रहण कायद्यातील अडसर दूर करून घेतलाय… जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक ठरणारे नियम शिथिल करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करणार्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेशाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलीय.

जमीन अधिग्रहण कायद्यातील या सुधारणांमुळे आता जमीन अधिग्रहीत केलेल्यांना मिळणार्या परताव्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असंही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तसंच जमीन अधिग्रहण करताना शेतकर्याच्या आणि समाजाच्या विकासाची गरज असल्याने, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या अध्यादेशामुळे ऊर्जा, गृह आणि संरक्षण या क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलंय. बिल्डर लॉबी आणि उद्योजकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालंय… यामुळे या कायद्यातील सुधारणांमुळे नेमका फायदा कुणाला होणार आहे, हेही आता उघड झालंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *