एका विशेष केसबाबत ‘मलबार हिल’ला चाललेले. मलबार हिल म्हणजे मुंबईतला अत्यंत उच्चभ्रू भाग. साक्षात मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तिथेच असल्याने त्या भागात कडक बंदोबस्त. पत्त्यात लिहिलेलं इमारतीचं नाव सापडलं, टॅक्सीवाल्याला पैसे दिले आणि इमारतीच्या बंदोबस्ताचे सोपस्कार उरकून वर आले. बेल वाजवली. अगदी जुन्या पद्धतीचं कलाकुसर केलेलं घर. सगळ्या वस्तुंना पारसी साज. मुंबईत स्वतःचं घर असल्याचं स्वप्न बाळगणार्या मी लगेचच घराची आताची किंमत काय असावी याचं गणित डोक्यात मांडलं आणि जीभ चावली. सुमारे नऊ खोल्या असलेल्या त्या आलिशान घरात मात्र काही नकोशा लहरी जाणवत होत्या.

घरातल्या एका नोकरमंडळीने मला बसायला सांगितलं. समोर ठेवलेल्या ‘फिक्शन’ आणि ‘क्लासिक लव्ह स्टोरीज्’नी माझं लक्ष वेधलं. एका कल्पनाविलासी व्यक्तिशी माझी भेट होतेय याची चाहूल मला लागली. इतक्यात ८४ वर्षांचे एक गृहस्थ आले. ‘हॅलो प्रग्ना’, अगदी इंग्रजाळलेल्या सुरात त्यांनी स्वागत केलं. मी ‘हॅलो अंकल’ म्हणत माझं नाव ‘प्रज्ञा’ असल्याचं सांगितलं. त्यांनी गोड हसून लागलीच चूक सुधारली. हे म्हातारे पारसी लईच क्युट असतात बुवा! त्यांनी माझी विचारपूस करून माझ्या क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल विचारलं. थोडी खात्री झाल्यावर ज्यासाठी मला बोलावलेलं त्याबाबत सांगायला सुरुवात केली.

त्यांची मुलगी ही गेली ३० वर्षं ‘स्किझोफ्रेनिया’च्या गर्तेत आहे. सुमारे आठ एपिसोड्स तिला यादरम्यान आले आणि त्यानंतर ती बर्याचदा ‘पोस्ट साय्कोटिक डिप्रेशन’मध्ये असते. हे नैराश्य कधी कधी तिला इतकं खातं की ती आत्महत्येचा विचार करते.

सध्या ती स्किझोफ्रेनियाच्या (Active Phase) सक्रिय टप्प्यात नाही, त्यामुळे, रोजच्या आयुष्यात तिने थोडं रुळावं याकरता तिचे वडील प्रयत्नशील आहेत. शिवाय अंकल आज ना उद्या या जगात नसतील. तिला अंकलव्यतिरिक्त कोणीच नाही त्यामुळे पुढे हे सगळं वैभव हिला फसवून कोणी लुबाडू नये याचीही त्यांना चिंता. तिच्याशी निगडित अनेक गोष्टींवर चर्चा झाल्यावर अंकलनी तिला प्रेमाने हाक मारली.

‘मिरांडा’ लहान मुलासारखी घाबरत घाबरत एक एक पाऊल टाकत बाहेर आली. गोरी गोरी पान, टपोरे डोळे आणि एकंदर राहणीमानामुळे-गोळ्यांमुळे शरीरयष्टी अत्यंत जाड. ती अपराध्यासारखी उभी राहिली. अंकलनी आमची ओळख करून दिली. ४८ वर्षांच्या मिरांडामध्ये त्या वयाचं एकही गुणवैशिष्ट्य नव्हतं. तिने छोटंसं स्मित केलं. मी मिरांडाला तिच्या हसण्यावरून ‘कॉम्प्लिमेंट’ दिली. तिचा चेहरा किंचित फुलला. मागच्या तीन दशकात तिला कोणीच कधीच कॉम्प्लिमेंट नव्हती दिली. मिरांडा माझ्या बाजूला बसली आणि मी विचारलेल्या प्रश्नांची जमतील तितकी लहान उत्तरं दिली.

मिरांडाला वयाच्या सोळाव्यावर्षी पहिला एपिसोड आला. तेव्हा ती दारू आणि सिगारेटच्या अधीन झाली. वाईट संगतीमुळे ड्रग्सही मित्र झाले. आई-वडील दोघंही कामात असल्याने बोलायला कोणीच नव्हतं. ती अजून अजून नैराश्यात गेली. तिला वेगवेगळे चुकीचे समज (delusions) आणि भूल-भास (hallucinations) व्हायला लागले. आपले विचार कोणीतरी ऐकतंय, कोणीतरी ते काबू करतंय, कोणीतरी आपल्या मागावर आहे, कोणीतरी आपला जीव घेईल असे विचार यायला लागले. त्याशिवाय, कोणीतरी आपल्याशी बोलतंय, आपल्याबद्दल बोलतंय, ओळखीचे-अनोळखी चेहरे दिसतायत असे भास व्हायला लागले. मिरांडाने घराबाहेर पडणं बंद केलं, शिक्षण थांबवलं, मित्रमैत्रिणी तोडले, एकटी राहायला लागली. प्रचंड संशयी झाली.

आल्या-गेल्या माणसांवर, ड्रायव्हरवर, शेजार्यांवर, घरातल्या नोकर माणसांवर प्रचंड संशय घेऊ लागली. सगळी पुरुषमाणसं आपला लैंगिक छळ करतील या विचारांनी ती अस्वस्थ झाली. अजूनही, ३० वर्षांनीही, थोड्या-अधिक फरकाने परिस्थिती तशीच आहे.

मागच्या काही महिन्यांत ती थोडी ‘माणसाळलेली’ वाटते. मला स्वतःहून एकदा ‘कॉफी डे’ला चलण्याची विनंती केली. तिथे स्वतः ऑर्डर केली. एकेकाळी घरातल्या गाऊनवर माझ्यासमोर बसणारी ती हळूहळू चांगले-आवडते कपडे, कधी केस छान मोकळे सोडून बसू लागली. रोज अंकलना पेपर वाचून दाखवू लागली, पुस्तकं वाचून दाखवायला लागली. स्वतःची thought diary लिहायला लागली. सुदैवाने मी तिच्या कोणत्याही ‘डील्युजन’चा भाग नसल्याने एक नातं, एक विश्वास निर्माण झाला. तिच्यातला बदल रोज मला थोडं थोडं समाधान देऊन जात होता.

दिवाळीचे दिवस होते. तिने मला गिफ्ट म्हणून खास ‘रम चॉकलेट्स’ आणलेले. आम्ही ते खात खात छान गप्पा मारत होतो. ती बोलता बोलता जोरात हसायला लागली आणि अचानक ढसाढसा रडली. ती मोकळी होत होती हे बघून मला बरं वाटलं. ती माझे हात पकडून शांत बसली. घरी येताना मला त्यांचं सगळं वैभव, ते उच्चभ्रू वातावरण, आलिशान राहणीमान कोतं वाटायला लागलं. मनाला शांती आणि सुख नसेल तर हे सगळं शून्य असतं.

“To talk about the other me,

Is not done quite so easily,

For I’m not sure which me is me,

And who’s the me that you cant see.

It’s something of a tragedy,

I’m always trapped when I am free,

But me plus me equals to three;

Two souls, one body, makes a team.”

‘बेन लावरी’ नावाच्या एका स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तिने त्याच्या आजारांदरम्यान लिहिलेली ही कविता. पेरानॉइड स्किझोफ्रेनिया-सगळ्या मानसिक आजारातला कदाचित सगळ्यात वाईट समजला जाणारा आजार. पण स्कीझ झालेली व्यक्ती ‘स्किझोफ्रेनिक’ नसते. ते त्या व्यक्तिचं विशेषण नाही. कुठल्याही अन्य शारीरिक आजाराप्रमाणे समाज जोपर्यंत याला पाहायला शिकत नाही. तोपर्यंत अशा अनेक ‘मिरांडा’ स्वतःहून स्वतःला निराशेच्या खोल गर्तेत ढकलत राहणार.

 प्रज्ञा माने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *