सव्वा महिन्यापूर्वी अवघा महाराष्ट्र तिहेरी हत्याकांडाने हादरून गेला… अहमदनगर इथल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावातील संजय जाधव या मागासवर्गीय शेतकर्याची पत्नी आणि एकुलत्या एका मुलासह निर्घृण हत्या करण्यात आली… या हत्याकांडाचे देशभर पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जवखेडेला जाऊन जाधव कुटुंबाचं सांत्वन केलं. मात्र अद्याप संजय जाधव आणि त्यांच्या परिवाराची हत्या करणारे मारेकरी सापडलेले नाहीत… हे हत्याकांड जितकं भीषण आहे त्याहून अधिक भयानक गोष्ट म्हणजे जवखेडे हत्याकांडाचा तपास करणारी यंत्रणा आहे. हत्याकांडाचा तपास करणारे पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी ज्या प्रकारे या हत्याकांडाचा तपास करत आहेत त्याहून तरी या हत्याकांडातले खरे आरोपी समोर येणं कठीण आहे, असंच वाटतंय. कारण पोलीस आता संजय जाधव यांच्याच कुटुंबातील सदस्यांना या हत्याकांडात गोवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं उघडकीस आलंय. ‘पोलीस माझ्या पोरांनाच यात गुंतत आहेत,‘ असा थेट आरोप संजय जाधव यांची आई साखराबाई जाधव यांनी केलाय. पोटच्या पोरासहीत सून आणि नातू गमावलेल्या या आईचा आक्रोश आता दिवसेंदिवस अधिकच उग्र होऊ लागलाय. कारण इथली तपासयंत्रणा आता तिच्या उरलेल्या पोरांनाही खोट्या आरोपांमध्ये अडकवून संपवण्याच्या प्रयत्नात आहे. संजयच्या आईची ही कहाणी हेच विदारक चित्र मांडतेय…
जवखेडे खालसा या गावातच माझी सगळी मुलं लहानची मोठी झाली… दिलीप, सुरेश, राजू आणि संजय या चार भावांची एकुलती एक बहीण कुसूम… ही माझी पाच मुलं. मी आणि माझे धनी जगन्नाथ जाधव आम्ही दोघांनी मिळून, काबाडकष्ट करून या मुलांना वाढवलं. त्यांना कामधंद्याला लावलं. पुढे त्यांची लग्नं होऊन त्यांना मुलंही झाली… माझी नातवंडंही याच गावात शिकली, सवरली… पण आज हे गाव माझ्या पोरांच्याच जीवावर उठलंय… इथले पोलिसही माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत…
२१ ऑक्टोबर २०१४ हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या अख्ख्या कुटुंबासाठी काळा दिवस ठरलाय… माझा मुलगा संजय, त्याची बायको जयश्री आणि मुलगा सुनीलसोबत त्या दिवशी त्याच्या शेतघरात झोपला होता. माझ्या नवर्याने वाटणीवरून पोरांच्यात भांडणं नको म्हणून आधीच ज्याचा त्याला वाटा देऊन टाकलेला. त्यामुळे प्रत्येकजण आपलं आपलं कमावून गुण्यागोविंदाने आपापला संसार करत होता. संजय पण त्याच्या वाटणीला आलेल्या शेतात राबून आणि गवंडी काम करून आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. जयश्रीची त्याला चांगली साथही मिळत होती. माझा नातू आणि संजयचा एकुलता एक पोरगा सुनील याचीही संजयला मोठी मदत होती. माझा सुनील बारावीपर्यंत शिकून पुढं शिकायला मुंबईला गेला होता. त्या काळरात्री तो कॉलेजला दिवाळीची सुट्टी पडली म्हणून गावाला आला होता. बाप शेतात बाजरी काढत होता. म्हणून सुनीलही त्या रात्री त्याच्यासोबत शेतघरातच थांबला होता. तिघांनीही दिवसभर शेतात काम करून थकूनभागून रात्रीचं जेवण केलं आणि बिछान्याला पाठ टेकली होती. कुणाला ठाऊक होतं की, ही माझी तिन्ही पोरं त्या बिछान्यातून पुन्हा कधीच उठणार नाहीत ते… रात्रीच्या सुमारास काही लोक घरात घुसले आणि त्या हरामखोरांनी संजय, जयश्री आणि सुनील या तिघांनाही कापून काढलं… त्यांची खांडोळी केली… सकाळी आम्हाला जेव्हा संजयच्या शेतघराच्या बाजूला राहणार्या हिराबाई अर्जुन वाघ हिने माझ्या नातवाला फोन करून सांगितलं की, इकडे घरात कुणीच नाहीये… बहुतेक कुणालातरी साप चावलाय म्हणून सगळेजण दवाखान्यात गेले असतील. ही वार्ता ऐकताच माझ्या पोरांनी, नातवांनी त्या तिघांची शोधाशोध सुरू केली… खूप शोधल्यानंतर दुपारी त्या तिघांची धडंच सापडली, ती पण खांडोळी करून शेतातल्या विहिरीत टाकलेली… संजयच्या शरीराचे त्या लोकांनी दोन तुकडे केले, जयश्रीच्या डोक्यावर घाव घातला आणि माझ्या नातवाला तर त्यांनी हालहाल करून मारलं. त्याच्या शरीराचे करवतीने तुकडे तुकडे केले. सुनीलचं धड तेवढं त्या विहिरीत सापडलं आणि हातपाय नि डोकं बाजूच्याच बोअरवेलमध्ये सापडलं…
त्या दिवशी हे सारं ऐकून, बघून माझी पार वाचाच बसली… मला काहीच सुधरत नव्हतं. माझ्या या तीन लेकरांनी कुणाचं काय घोडं मारलं होतं म्हणून त्यांची अशी खांडोळी करून त्यांना मारून टाकलं… मी आई आहे. माझ्या पोरांना मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? माझा कुठलाच पोरगा काय किंवा सुना-नातवंडं काय कधीच कुणाच्याच वाट्याला जाणार्यातली नाहीत. आपलं काम भलं नि आपलं घर भलं याच विचारांची माझी सगळी पोरं आहेत. मग असं असताना पण का कुणी माझ्या पोरांना मारलं असेल हेच मला कळत नाहीय…
संजय, जयश्री, सुनील यांच्या खुनाची बातमी सार्या गावात नि तालुक्यात पसरली. तसा अख्खा गाव त्या विहिरीजवळ लोटला. पोलिसांना कळवलं तेव्हा तेही आले. तिथे आलेला प्रत्येकजण हेच बोलत होता की, का मारलं असेल या तिघांना…? पोलिसांना पण काहीच कारण सापडत नव्हतं. पुढे मग पोलिसांचा तपास सुरू झाला. चौकशा सुरू झाल्या. चौकशीत पोलिसांना कळलं की, हिराबाईचा आणि माझ्या पोरांचा संबंध होता. त्या बाईनेच पोलिसांना तशी माहिती दिली. आम्ही पण पोलिसांना ही माहिती खरी असल्याचं सांगितलं आणि तेव्हा माझ्या सर्व पोरांनी सांगितलं की, आमचा या बाईवर आणि तिचा नवरा अर्जुन वाघ यांच्यावरच संशय आहे. पण पोलिसांनी आमचं काहीच ऐकलं नाही. उलट त्या नवरा-बायकोलाच पोलिसांनी संरक्षण दिलं. आज सव्वा महिना उलटलाय माझ्या लेकरांचा खून होऊन पण पोलिसांना अजून खरे मारेकरी सापडले नाहीत. त्यांना खरे मारेकरी पकडता येत नाहीत म्हणून आता ते माझ्या बाकीच्या पोरांना यात गोवायला बघताहेत…
माझ्या तीन लेकरांच्या खुनाच्या दुःखात आजपण माझं अख्खं कुटुंब आहे. पण पोलिसांना याऌची अजिबात दयामाया नाही. तपासाच्या नि चौकशीच्या नावाखाली पोलीस माझ्याच पोरांना, सुनांना, नातवंडांना घेऊन जातात… त्यांना खोटं बोलायला सांगतात… एका बड्या पोलिसाने तर माझ्या धाकट्या पोराला, रविंद्रला सांगितलं की, तुमच्यापैकी कुणी पण दोघांनी कबूल व्हा नि सांगा की, आम्हीच खून केलाय… कुणाबी दोघांची नावं सांगा नाहीतर तुमच्या सगळ्या कुटुंबालाच हा खून केला म्हणून आतमध्ये टाकतो… माझा पोरागा हे ऐकून खूप घाबरलाय…
ज्या पोलिसांवर विश्वास होता तेच पोलीस आता असं वागू, बोलू लागलेत… माझ्या सुनांना रात्री-बेरात्री चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्यांना नको नको ते प्रश्न विचारतात… त्या माझ्या लेकीपण आता पुरत्या बेजार झाल्यात… घाबरल्यात या पोलिसांच्या अरेरावीला… माझ्या एका सुनेला ती कपडे धुवायला गेली होती तेव्हा पोलिसांनी गाठलं आणि उगाचच तिची चौकशी करू लागले. एक पोलीसबाई तिला म्हणाली की, त्या दिवशी तुझा नवरा कुठे होता? खरं खरं सांग… नाहीतर तुझ्या नवर्यालाच अटक होईल. माझ्या सुनेनं तिला सांगितलं, मॅडम, माझा नवरा कुठे होता ते मी आधीच सांगितलंय. आणि माझा नवरा कुठे असतो हे मला माहीत असतं. मी बायको आहे त्यांची… असे भलतेसलते प्रश्न विचारून पोलीस माझ्या सुनांना पण त्रास देताहेत. एकदा तर रात्री उशिरा चौकशीसाठी माझ्या सुनेला घेऊन गेले. तिला थोडा वेळ पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं आणि मग म्हणाले जा आता घरी… तेवढ्या रात्री थंडीत माझी सून घरी परत आली… जे खरे आरोपी आहेत ते चांगले जगताहेत आणि आमची माणसं मारली गेली तरी उलट पोलीस आमचाच जाच करताहेत… याला काय न्याय म्हणायचा का?
मी एक आई आहे. कुठली पण आई आपल्या पोटच्या पोरांना बरोबर ओळखते. मग ती पोरं चुकलेली असली तरी आणि नाही चुकलेली असली तरी त्या आईला बरोबर कळतं सगळं… मला पण ठाऊक आहे माझी सगळी पोरं निर्दोष आहेत. पण मी ठरले अडाणी, माझी पोरं पण अडाणी… मोलमजुरी करून आम्ही जगतोय… अशावेळी या पोलिसांशी सामना करायचा तरी कसा हाच मोठा प्रश्न आता माझ्यासमोर उभा आहे. उद्या हे त्यांच्या पदाच्या जोरावर आमच्याकडून काय पण लिहून घेतील आणि माझ्या पोरांनाच या खुनात अडकवतील, अशी मला पुरी खात्री वाटते… आता तर त्या गावात जायची पण मला भीती वाटते… म्हणूनच आता मायबाप सरकारला माझं एवढंच सांगणं आहे की, मला न्याय द्या… माझ्या पोरांच्या खुन्यांना लवकरात लवकर पकडा आणि जसं त्यांनी माझ्या तिन्ही पोरांना हालहाल करून मारलं तसंच त्या खुन्यांना पण मारा… तरच या आईच्या काळजाला शांती मिळेल… आणि जर काय हे मायबाप सरकार मला न्याय देणार नसेल तर मी मुंबईला येऊन सरकारच्या दारातच आत्महत्या करेन…!
– साखराबाई जगन्नाथ जाधव