देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमुळे शिवसनेचा लोच्या झालेला आहे. लोकसभा निवडणुकांच्यावेळी भाजपाला आपल्या ताकदीचा अंदाज आलेला नव्हता. कालपरवापर्यंत राज्यातल्या भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाही अशी स्थिती होती. याचं साधं आणि सरळ कारण हे होतं की शिवसेनेकडे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत, याची भाजपाला खात्री होती. शिवाय हे कार्यकर्ते पगारी नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांसाठी जमा झालेले स्वतःला झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते होते. या कार्यकर्त्यांच्या महत्त्वाची जाण अनेक सामाजिक गणितं जमवणार्या गोपीनाथ मुंडे यांना होती. परंतु अचानक ते राजकारणाच्या सारीपाटावरून अस्तंगत झाले आणि शिवसेनेला त्यांच्या तळागाळातील कामाची पोचपावती देणारा भाजपामधला मोहरा हरपला. शिवाय ज्यांचा शब्द पाळावा असे बाळासाहेब ठाकरे हे देखील काळाच्या पडद्याआड गेलेले होते. ते असते तरीही त्यांचंही भाजपाच्या विद्यमान शहा-मोदी नेतृत्वाने ऐकलंच असतं असं सांगता येत नाही, हेही तेवढंच खरं.
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पोरकीच झाली. तिचं पितृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं तेव्हा ते स्वतःच्या आजारपणातून नुकतेच बाहेर पडलेले होते. त्यांनी त्या परिस्थितीतही शिवसेना आपल्यापरीने सांभाळली आणि समर्थपणाने सांभाळली. ते काम कठीण होतं. शिवसेनेत त्यावेळेपर्यंत नाव घेण्यासारखे आणि शिवसेना महाराष्ट्रभर नेणारे असे मोठे नेतेही नव्हते. भुजबळ, गणेश नाईक आधीच गेले होते. तर नारायण राणे आणि त्यांच्याबरोबरचे अनेकजण जय महाराष्ट्र करून बाहेर गेले होते. अशा स्थितीत त्यांच्याबरोबर असलेले लोक हे एकतर लाभासाठी किंवा अन्यत्र त्यांना फारशी किंमत नसल्यामुळे राहिलेले होते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रस्त्यावरचा शिवसैनिक मात्र ठामपणे होता. त्याची उद्धव ठाकरे यांना जाण होती. हा शिवसैनिक बाळासाहेबांनी त्याला शाखेच्या माध्यमातून जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्यामुळे जवळ आलेला होता आणि त्यानंतर त्यात सातत्य ठेवल्यामुळे टिकला होता. बाळासाहेबांनी आपली संघटना बांधताना आमदार-खासदार-मंत्री यांच्यापेक्षा शाखाप्रमुख, गटनेता, विभागप्रमुख यांना सदैव महत्त्व दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून शिवसैनिकांनी शिवसेना सोडण्याचा विचार केला नाही. आजही ते शिवसेनेत घट्टपणे पाय रोवून आहेत. हातात शिवबंधन बांधून घेण्यात त्यांना अभिमान वाटतो. केवळ निवडणुकीच्या काळात जमणारे ते लोक नाहीत. ते स्वतःला शिवसैनिक का म्हणवून घेतात हेही भल्याभल्यांना कळत नाही. पण ते शाखेच्या आधाराने आपले दैनंदिन कारभार करत असतात. हे वास्तव आहे. त्यांची प्रातःकालीन, सायंशाखा नाही. त्यांची ‘नमस्ते सदा वत्सले’ ही प्रार्थना नाही. तरीही ते एकत्र राहतात.
उद्धव ठाकरे यांनी त्या शिवसैनिकाला आपल्या जवळचा मानला. हे शिवसैनिक त्यांची आणि राज ठाकरे यांची तुलना करतात. त्यांच्या मते राज ठाकरे यांच्याकडे पॉवर आहे. म्हणजे काय असं कुणाला विचारलं तर त्यांना ते सांगता येत नाही. पण त्यांना त्या दोन भावांनी एकत्र यायला हवं असं वाटतं. ते एकत्र येणार की नाही हे काळ ठरवेल. परंतु सामान्य शिवसैनिकाला मात्र ते एकत्र येतील याची खात्री वाटते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना सांभाळायची होती याचा विचार केला गेला पाहिजे.
मोदी-शहा जोडगोळीने तयार केलेला विजयाचा फॉर्म्युला कितपत चालेल याची खात्री नसल्यामुळे शिवसेनेला बरोबर घेऊन भाजपाने लोकसभा निवडणुका लढवल्या खर्या परंतु त्या लढतीच्या काळात शिवसेनेला जितकं डावलता येईल तितकं सतत डावलण्याचं कामही भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी कटाक्षाने केलं. तरीही आपला तोल न ढळू देता आपलेही खासदार मोठ्या ताकदीने निवडून यावेत याची खबरदारी उद्धव ठाकरे यांनी घेतली. काही मतदारसंघात ते त्यांना सहज शक्य होतं तर काही ठिकाणी ते काम अवघड होतं. परंतु मोदीलाटेचा लाभ घेत, जातिपातीची गणितं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील हेवेदावे यांची गणितं सांभाळत उद्धव ठाकरे यांनी ते साध्य केलं. प्रश्न उपस्थित झाला तो त्यानंतर. भाजपाच्या बाहूत बळ आल्यानंतर त्यांची मुजोरी कलाकलाने वाढत राहिली. एका बाजूला तोंडाने आपण बालासाहब के बारे मे कुछ नही कहेंगे, असं म्हणायचं, शिवसेना के बारे में हम गलत नही कहेंगे असं घोषवाक्य अधूनमधून टाकायचं, पण कारवाया मात्र त्यांच्याविरोधी करायच्या या संघीय तंत्राचा यथायोग्य वापर भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीत केला. केंद्रात मंत्रिपदं देताना जितका तेजोभंग करता येईल तेवढा करूनही शिवसेना भाजपाच्या बरोबर राहिली. उद्धव ठाकरे यांनी त्याही परिस्थितीत संयम पाळला हे लक्षणीय होतं. भाजपा शिवसेनेला खेळवत होती. परंतु शिवसेनेतील काही नेते विशेषतः संजय राऊत यांच्यासारखे नेते हे आपणच भाजपाला खेळवत आहोत असा आव आणून वावरत होते. जागांचं वाटप होणार-नाही होणार या हिंदोळ्यावर शिवसेनेला बसवून भाजपाने आपले उमेदवारही ठरवून टाकले तेव्हा कुठे शिवसेनेला जाग आली.
तोपर्यंत शिवसनेचे नेते आपण नक्की निवडून येणार आणि मंत्रिमंडळात आपल्याला अमुकतमुक खातं मिळणार असं छातीठोकपणे सांगू लागले होते. सुभाष देसाई यांच्यासारखा शिवसेनेचा ज्येष्ठ नेताही या भुलभुलैय्यात फसला. तर मग आपण गृहराज्यमंत्रीच होणार असं सांगणारे अनिल परब फशी पडले तर त्यात गैर ते काय? निलम गोर्हे तर शपथविधिपर्यंत चमत्काराची वाट पहात थांबल्या होत्या. काही नेत्यांना असं वाटू लागलेलं होतं की हीच वेळ आहे. आताच आपण मंत्री होऊ नाही तर यानंतर कधीच होणार नाही. त्यात अनिल देसाईंसारखा धंदेवाईक माणूसही होता. तर वय जास्त झालेल्या नेत्यांना स्वाभाविकपणे तसं वाटतच होतं. त्यामुळे त्यांना शिवसेनेने दोन पावलं मागे यावं आणि तडजोड करावी असंही वाटत होतं. तडजोड करा पण मंत्रिपदं मिळवा नाही तर शिवसेना फुटेल असा बागूलबुवा उभा केला जात होता. त्यात आघाडीवर एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं जात होतं. मग त्यांना विरोधीपक्षनेतेपदावर बसवा आणि पक्ष फुटण्याची शक्यता टाळा असा सल्ला दिला गेला. यात पक्ष फोडण्याच्या बाबतीतल्या कायद्याच्या नव्या तरतुदी नजरेआड केल्या गेल्या. जर एखाद्याला पक्षच फोडायचा असेल तर त्याला आता राजीनामा देण्याखेरीज पर्याय नाही, हे त्यांच्या कुणी लक्षात आणून दिलं नाही. हळूहळू शिवसेनेत ताणतणाव वाढत चालले होते. त्याचं श्रेय उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या उपटसुंभ नेत्यांना द्यावं लागेल.
देवेंद्र फडणवीस या नव्या मुख्यमंत्र्यांची सुरुवातीपासूनची देहबोली जर एखाद्याने बारकाईने पाहिली तर त्यांच्या हे कधीच लक्षात आलं असतं की हे गृहस्थ शिवसेनेला धक्क्याला लावण्याच्या मनःस्थितीत आहेत. परंतु आपल्या नजरेसमोर असलेला आणि सर्व गोष्टींची उत्तरं माहीत असलेला अपरिपक्व बुद्धीच्या लोकांच्या हाती असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया ओरडूनआरडून सतत सांगत राहिलेला होता की, शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार, आता काही बारीकसारिक अडचणीच आहेत वगैरे. खरं म्हणजे त्यांनी एकत्र यावं हे त्यांच्यापैकी अनेकांना वाटत होतं म्हणून तशा बातम्या तयार केल्या जात होत्या. परंतु भाजपाच्या नेत्यांना प्रारंभापासून हे पक्कं माहीत होतं की आपल्याला आता ही संगत नको. आपल्या स्वच्छ चारित्र्यावरचा हा कलंक आहे. तो धुवून टाकण्याची वेळ आता आलेली आहे.
हे सर्व घडत असताना शिवसेनेचा आधारस्तंभ असलेला शिवसैनिक काय विचार करतो याचा विचार त्यांच्यापासून नाळ तुटलेल्या किंवा त्यांच्याशी ज्यांची नाळ कधीच जुळलेली नव्हती त्यांनी केलाच नाही. एवढी नाचक्की करून घेऊन आपण म्हणजे शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊ नये असं त्यांना वाटत होतं. शाखा शाखांवर जाऊन जर शिवसेनेसाठी कष्ट करणार्या शिवसैनिकांशी संवाद साधला तर जे चित्र समोर येतं ते आम्ही सत्तेसाठी शिवसेना चालवत नाही असं सांगतं. त्यांना कुणीतरी असा नेता हवा असतो की जो आपल्या बाजूने पोलिसांना जाब विचारेल, जर उद्या पोलिसांनी उचललंच तर तो आपल्याला सोडवेल एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यांची पायात चप्पल न घालता फिरण्याची तयारी असते. त्यांना पदं नको असतात.
पण शिवसेनेला सध्या आपण परत सत्तेत येणारच नाही अशी खात्री वाटणार्या लोकांनी घेरलेलं आहे. हा शिवसेनेचा खरा लोच्या आहे. प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केले गेलेले सर्व नेते त्याच लायकीचे होते, हे त्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे. केंद्रात मंत्रिपद प्राप्त झालेले अनंत गीते यांचं मंत्रिपद बकरीच्या शेपटीसारखं आहे. अब्रूही झाकत नाही आणि माशाही हाकलत नाही. हे त्यांना स्वतःला कळत असणारच कारण ते केंद्रात मंत्री होते. परंतु लाचारी पाचवीला पुजलेल्या गीतेंना स्वतःहून आपल्या नेत्यांना सांगण्याची हिंमत असायला हवी होती आणि राजीनामा देऊन त्यांनी परत यायला हवं होतं. गोची तिथेच आहे. त्यांना मंत्रिपदही हवं आणि तो मानसन्मानही हवा. तीच स्थिती इतरांचीही आहे. हाच शिवसेनेचा लोच्या आहे.