प्रत्येक शुक्रवारी बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. यातील काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर घसघशीत यश मिळतं. तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड आपटतात. काही चित्रपटांना तर चित्रपटगृहात पहिला शो करणंही शक्य होत नाही. पण काही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग झालेली असते. सध्या बॉलिवूडमध्ये तीन खान म्हणजेच आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान तसंच हृतिक रोशन, अजय देवगण, अक्षय कुमार यांचा बोलबाला आहे. त्यांचे चित्रपट म्हटले की ते बॉक्स ऑफिसवर हिट होणारच असं मानलं जातं. या अभिनेत्यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच बॉक्स ऑफिसवर चित्रपट किती गल्ला जमवणार याची गणितं मांडली जातात. त्यामुळे या अभिनेत्यांचा चित्रपट कधी येणार याची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागलेली असते.

सध्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये चित्रपटाचा ट्रेलर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडला तर ते नक्कीच आपले पैसे खर्च करून चित्रपट पाहण्यास जातात. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कित्येक महिने अगोदरच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येतो. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करतानाही तो कोणत्या चित्रपटासोबत करावा याचाही विचार केला जातो. एखाद्या चांगल्या बॅनरच्या चित्रपटासोबत तो रिलीज केला गेला तर प्रेक्षक अधिक संख्येने हा ट्रेलर पाहतात. तसंच या ट्रेलरचं सोशल मीडियावर मार्केटिंग करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे एक प्रमोशनचा भाग म्हणूनच याकडे पाहिलं जातं. आजकाल तर चित्रपटांची घोषणा झाल्यानंतर त्या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा येईल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. पण आपल्याला उत्सुकता असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर लवकरात लवकर यावा यासाठी फॅन्सने काही प्रयत्न केले असं आतापर्यंततरी ऐकिवात नव्हतं. मात्र अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास घडवलाय. ‘बेबी’ या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. पण त्याचसोबत या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज पांडे करत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नीरज पांडेने आतापर्यंत ‘अ वेन्सडे’, ‘स्पेशल २६’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘अ वेन्सडे’ या चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतही प्रेक्षकांचा चांगला रिसपॉन्स मिळाला होता. तसंच अनेक आंतराराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट गाजला होता. त्यामुळे नीरज पांडे प्रेक्षकांसाठी चांगलाच चित्रपट घेऊन येणार अशी प्रेक्षकांना खात्री आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाचा फर्स्ट लूक, टीझर, ट्रेलर यांची प्रेक्षक वाट पाहत होते.

‘बेबी’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि २५ ऑगस्टला अक्षयने त्याच्या फेसबुकच्या अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर टाकल्यावर तर या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर रिलीज केला जावा अशी अनेक प्रेक्षकांची इच्छा होती. पण चित्रपटाच्या टीमकडून टीझर, ट्रेलर रिलीज करण्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर अक्षयच्या फॅन्सनी ‘वेटिंग फॉर बेबी ट्रेलर’ नावाचं अभियान सुरू केलं. ‘वेटिंग फॉर बेबी ट्रेलर’ याचं लोण इतकं पसरत गेलं की, जवळजवळ १० दिवस तरी ट्विटरच्या ट्रेंड्समध्ये ही मोहीम होती. यावर अक्षय कुमारने ट्वीट केलं होतं की, ‘बेबी’ या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी तुमची उत्सुकता आणि प्रेम पहाता आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यामुळे केवळ तुमच्यासाठी काहीच दिवसांत आम्ही ‘बेबी’ चित्रपटाचा स्पेशल ट्रेलर रिलीज करत आहे आणि अक्षयने आपल्या फॅन्सना सांगितल्याप्रमाणे २० नोव्हेंबरला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आणि ३ डिसेंबरला ट्रेलर रिलीज करण्यात येईल असंही त्याने त्यावेळी ट्वीट केलं होतं. ३ डिसेंबरला ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दोन दिवसांत दोन दशलक्षपेक्षाही अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला.

‘बेबी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर या चित्रपटाचा विषय आणि या चित्रपटातील अक्षयची भूमिका प्रेक्षकांच्या लगेचच लक्षात येतेय. या ट्रेलरमध्ये अक्षय आपल्याला अनेक स्टंट करताना पहायला मिळतोय. दहशतवादाच्या विरोधात लढणार्या नायकाची भूमिका तो या चित्रपटात साकारत आहे. या चित्रपटाचा हा ट्रेलर बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या ट्रेलर्सपैकी आहे अशा प्रतिक्रिया अनेकजणांनी व्यक्त केल्या आहेत. या ट्रेलरमुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिक वाढली असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अनुपम खेर, डॅनी डेन्झोपा, के.के. मेनन, तपसी पन्नू, राणा दग्गूबती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच पाकिस्तानी अभिनेता रशिद राझ दहशतवाद्यांच्या म्होरक्याच्या भूमिकेत आहे.

‘बेबी’ हा चित्रपट २३ जानेवारीला प्रदर्शित होत असला तरी सोशल नेटवर्किंगवर या चित्रपटाची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. त्यामुळे ‘बेबी’ प्रदर्शनापूर्वीच हिट झालाय असं म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *