हो, ना, हो, ना करता करता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सामील झाली आणि त्यांचा संसारही सुरू झालाय. मधल्या काळातील वितुष्टात काही घडलंय याचा विसर पाडण्याचा आटोकाट प्रयत्न हे दोन्ही पक्ष आता करतायत. खरंतर भाजपचा शिवसेनेसोबतचा २५ वर्षांचा दोस्ताना या निवडणुकीत संपला आणि दोन्ही पक्ष वैर्यासारखे एकमेकांवर तुटून पडले. भाजपने शिवसेनेच्या जोरावर राज्यात आपले हातपाय पसरले मात्र संख्याबळ वाढताच शिवसेनेला त्यांची पायरी दाखवली. शिवसेनेला नाकदुर्या काढायला लावल्या. अखेर स्वतःची सगळी शोभा होऊन गेल्यावर शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. शिवसेनेने आवंढे गिळत विरोधीपक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं ठरवत असतानाच आगळं नाटक घडलं. राज्यातला विरोधी पक्ष सत्तेत सामील झाला. महाराष्ट्रातली ही अनोखी राजकीय घटनाच म्हणावी लागेल. शिवसेनेच्या सहभागाने अल्पमतात असलेलं फडणवीस यांचं हे सरकार आता संख्याबळाच्या जोरावर मजबूत झालं आहे. पहिल्याच हिवाळी अधिवेशनाला हे सरकार सामोरं गेलं आहे. काही घडलंच नाही या आविर्भावात भाजप आणि शिवसेना आहेत, मात्र सत्तेचा हा खेळ लोक विसरता विसरत नाहीयेत.

या नव्या सरकारबाबतची उलटसुलट चर्चा काही संपत नाहीये. शिवसेनेचा मंत्रिमंडळातील सहभाग म्हणजे काय याची ही चर्चा आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली आहे. या ज्येष्ठांच्या सोयीसाठीच जणू सगळा अट्टाहास केल्याचा आरोप केला जातोय. शिवसेनेला पाच कॅबिनेट मंत्रिपदं तर सात राज्यमंत्रिपदं देण्यात आली आहेत. यात शहरी आमदारांचाच भरणा अधिक आहे. शिवसेनेचा सत्तेतील सहभाग नक्की झाल्यानंतर अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झाले. ‘मातोश्री’वर लाल दिव्यासाठी आमदार आणि त्यांचे समर्थक थडकू लागले. अखेर तिथे प्रवेशबंदी लादण्यात आली. काहींनी परस्पर आपली नावं चर्चेत आणली. कुणाकुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. याच चर्चेत एक नाव पहिल्यापासून होतं ते म्हणजे डॉ. निलम गोर्हे यांचं. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप-शिवसेनेची युती होणार ही चर्चा सुरू झाली तेव्हाही संभाव्य मंत्री म्हणून निलम गोर्हे यांचं नाव त्या चर्चेत होतं. पण भाजपने शिवसेनेला वाकुल्या दाखवत दूर लोटलं. मग विरोधी पक्षाचा फार्स संपल्यावर हिवाळी अधिवेशनाच्या आधी पुन्हा शिवसेनेची सत्तेत सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेतही संभाव्य यादीत निलम गोर्हे यांचं नाव असल्याची चर्चा कायम होती. वर्तमानपत्रात जी नावं प्रसिद्ध होत होती त्यात गोर्हेंचं नाव कायम होतं. एवढंच नव्हे तर त्यांना सार्वजनिक आरोग्य हे खातं मिळणार असंही सांगितलं जात होतं. स्वतः निलम गोर्हेंनीही काही पत्रकारांशी बोलताना यादीत आपलं नाव असल्याचं सूचवलं होतं. खरंतर त्यात वावगं असं काही नाही. ज्या पद्धतीने निलम गोर्हेंनी शिवसेनेत आपलं स्थान तयार केलं होतं ते पहाता त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे अपेक्षित होतं. मंत्रिमंडळाच्या विस्तारात वीस जणांच्या यादीत निलम गोर्हेंचा समावेश गृहीत धरला होता. मात्र ऐनवेळी यादीतील हे नाव बदललं गेलं…

काय आणि कसं हे घडलं?

खरंतर मंत्रिमंडळात सहभागी होणं ही शिवसेनेची गरज होती. निवडून आलेले आमदार फुटू नयेत ही शिवसेनानेत्यांची भीती होती. विरोधी पक्षनेता झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर फुटणार्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. तर रामदास कदम यांनाही ही कामगिरी देण्यात आली होती. मात्र निवडून आलेले आमदार आता कुणालाच जुमानायला तयार नव्हते. त्यामुळे रामदास कदम यांनीही सत्तेसाठी तगादा लावला होता. यातच एक माणूस अचानकपणे ‘मातोश्री’वर येऊन थडकला. त्याचं नाव सुब्रह्मण्यम स्वामी. काँगे्रसविरोधातला झेंडा घेतलेला हा राजकीय मौला. स्वामी भाजपच्यावतीने उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर सत्तेच्या दृष्टीने शिवसेनेची सगळी सूत्रं फिरली. महत्त्वाची खाती वाट्याला आली नसताना शिवसेनेने जे पदरात पडेल त्याला मान डोलावत बोहल्यावर चढण्याची तयारी दर्शवली.

सुब्रह्मण्यम स्वामींनी शिवसेनेला असा काय मंत्र दिला, याचीच उत्सुकता सगळ्यांना होती. एक माहिती अशी आहे की स्वामींनी एक यादीच उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवली होती. शिवसेनेतील कोणकोणते आमदार फुटण्याच्या तयारीत असून भाजपच्या संपर्कात आलेत, त्याची ही सविस्तर यादी होती. म्हणूनच ‘मातोश्री’चं धाबं दणाणलं. निष्ठा नसलेल्या या नव्या आमदारांना सत्तेत अजिबात स्थान न देता आपल्या निष्ठावंत वरिष्ठांना ग्लोव्हज्-पॅड बांधून या संघात सज्ज करण्यात आलं. या खेळाडूंची आदल्या रात्री बैठक झाली. त्यात या सगळ्या पुरुषांनी मिळून निलम गोर्हेंच्या विरोधात गेम केला…

खरंतर निलम गोर्हे यांनी गेल्या १० वर्षांत शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी स्वीकारली. कठीण काळात त्या शिवसेनेची बाजू हिरिरीने मांडत होत्या. विरोधी पक्षनेते जेवढ्या परिणामकारकपणे काम करत नव्हते त्यापेक्षा अधिक क्षमतेने त्या सत्ताधार्यांवर तुटून पडत होत्या. चॅनेलवरच्या कार्यक्रमात त्यांचा आक्रमकपणा वाखाणण्यासारखा होता. या सर्व पार्श्वभूमीवर निलम गोर्हेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणं साहजिकच मानलं जात होतं. मग कुणामुळे त्यांचा पत्ता कटला? मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगदी आदल्या रात्री ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीत निलम गोर्हेंचं नाव कट झालं. सर्व पुरुषांनी एका महिलेचा पत्ता कापला. आधी असं म्हटलं जात होतं की सुभाष देसाई यांच्यामुळेच निलमताईंचं नाव गळालं. देसाई हे पराभूत झाले असले तरी ‘मातोश्री’चे निष्ठावंत आहेत. त्यांना आता सत्तेतील सहभाग मिळाला नाही तर कधीच नाही, त्यामुळे त्यांचं नाव यादीत आलं. मुळात गोर्हेंऐवजी यादीत नाव आलं ते डॉ. दीपक सावंत यांचं. निलम गोर्हेंना अस्वस्थ करणारी ही घटना. कारण त्या स्वतः आयुर्वेद डॉक्टर आहेत. तर दीपक सावंत हे एलसीएच, म्हणजे होमिओपॅथी पदवीधारक.

निलम गोर्हे यांचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांची महिलांविषयक चळवळ, सामाजिक आंदोलनातील सहभाग, अभ्यास आणि आवाका हा शिवसेनेतील इतर कुणाहीपेक्षा अधिक आहे. त्यांना अशा पद्धतीने डावललं गेल्याने समस्त महिला संघटना आणि राजकीय अभ्यासकांनाही वाईट वाटलं. मात्र शिवसेना ही केवळ ‘पुरुषां’ची संघटना आहे, हे आता निलम गोर्हे यांच्या लक्षात आलं असेल. बोरीवलीत विनोद घोसाळकर यांच्याविरोधात गंभीर तक्रारी घेऊन शिवसेनेतील महिलाच ‘मातोश्री’कडे न्याय मागू लागल्या तेव्हाही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर लोकांनीच मतपेटीतून न्याय दिला.

तर अशा पद्धतीने एक अभ्यासू, राजकीयदृष्ट्या सक्षम महिला पुरुषी राजकारणात पुन्हा एकदा डावलली गेली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *