संदीप जावळे लिखित ‘कोण होते स्वामी विवेकानंद?’ या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं. नवता बुक वर्ल्ड प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकाची ही संक्षिप्त ओळख…

स्वामी विवेकानंद हा भारतीय समाजाच्या विशेषतः हिंदू समाजाचा केवळ औत्सुक्याचा, कुतूहलाचा, अभिमानाचाच नव्हे, तर तो विविध प्रकारच्या समज-गैरसमजांचाही विषय आहे. विवेकानंदांच्या नावाने राजकारण-समाजकारण करणारेही बरेचजण आहेत. त्यांचं सांस्कृतिक अपहरण करून त्यांना वेठीला धरणार्या संस्था-संघटनाही पुष्कळ आहेत. त्यांनी वेदांताचा, त्यातील अध्यात्माचा अधूनमधून उच्चार केल्यामुळे अपहरणकर्त्यांच्या गराड्यात ते अलगद घेरले गेले.

या अजगरी विळख्यातून विवेकानंदांना मुक्त करून खरा विवेकानंद सांगण्याची नितांत गरज होती. हिच गरज ओळखून संदीप जावळे यांनी ‘कोण होते स्वामी विवेकानंद?’ हे पुस्तक वाचकांसमोर आणलं आहे.

विवेकानंद म्हटलं की, पहिल्यांदा आठवतं ते अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत गाजलेलं त्यांचं ऐतिहासिक भाषण! मात्र, या भाषणात आणि नंतरही कधी विवेकानंद हिंदू धर्माचे प्रचारक नव्हते, हे लेखकाने या पुस्तकाद्वारे दाखवून दिलं आहे. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी मी इथे आलेलो नाही, हे विवेकानंदांनी अमेरिकेत आणि युरोपमध्ये अनेक ठिकाणी स्पष्ट केलं होतं. त्या दौर्यात ते सर्व धर्मांची चिकित्सा करत होते. त्यांचे

ज्वालाग्राही विचार ठाऊक असल्यामुळेच शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना भारतातील एकाही हिंदू-वैदिक धर्मसंस्थेने ‘हिंदू धर्माचा अधिकृत प्रतिनिधी’ म्हणून शिफारसपत्र दिलं नाही. ते स्वतःच्या खर्चाने, जीवघेण्या हालअपेष्टा आणि स्वधर्मीय धर्ममार्तंडांची जिव्हारी लागणारी निंदानालस्ती सहन करत तिकडे गेले आणि आपल्या तेजस्वी वक्तृत्वाने अमेरिका दुमदुमून टाकली.

प्रस्तुत पुस्तकात संदीप जावळे यांनी विवेकानंदांच्या विचारांवर, कार्यावर आणि प्रेरणांवर प्रकाश टाकला आहे. चार मुख्य गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव होता. बालपणी कुटुंबात झालेले सर्वधर्मसमभावी संस्कार, ब्राह्मो समाजाच्या चळवळीतला सहभाग, रामकृष्ण परमहंसांचा सहवास आणि गौतम बुद्धांच्या विचारकार्याचा पगडा! हे या पुस्तकात तपशिलासह आणि खुद्द विवेकानंदांच्या अनेक विधानांवरून अधोरेखित करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, बुद्धाबद्दलच्या आपल्या परमश्रद्धेच्या भावना व्यक्त करताना विवेकानंद म्हणतात, ‘भगवान बुद्धांनी ईश्वरवादाचा उपदेश केला नाही. हा माझा दृढ विश्वास आहे.’ एके ठिकाणी ते लिहितात, ‘बुद्धांच्या चरित्रात एक विशेष आकर्षणशक्ती आहे. मला त्यांचे चरित्र नेहमीच आवडत आले आहे. त्यांचे ते धैर्य, त्यांचा तो निर्भयपणा आणि त्यांचे ते अमर्याद प्रेम! ते मानवाच्या कल्याणासाठी जन्मले होते.’

आणखी एका लेखात विवेकानंद लिहितात, ‘हा थोर महापुरुष एका यःकश्चित प्राण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असे. या पुरुषोत्तमाने मनुष्यजाती, पक्षी सर्वोच्च ठरतील अशा ऊर्जस्वल आदर्शांचा प्रसार केला. जिथे जिथे म्हणून नीतिनियम आढळून येतील तिथे तिथे त्या महामानवाचा-बुद्धदेवांचा प्रभाव कार्य करीत आहे, त्यांच्याच उपदेशसूर्याचा एक कवडसा चकाकत आहे, असे समजा.’

अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेत त्यांनी जसं हिंदू धर्मावर भाषण केलं तसं बौद्ध धर्मावरही केलं. परिषद संपल्यानंतर बर्याच ठिकाणी त्यांनी ‘गौतम बुद्ध’ या विषयावर व्याख्यानं दिली. Brooklyn Ethical Society मध्ये झालेल्या भाषणात ते म्हणाले – ‘I have a message to the west, as Buddha had a message to the east.’ (बुद्धाने जो संदेश पूर्वेकडील देशात दिला तोच संदेश पाश्चिमात्य देशांना देण्यासाठी मी इथे आलो आहे.)

असं असलं तरी विवेकानंदांचं आयुष्य हा एक प्रकारचा गुंता होता, याच्यावरही जावळे यांनी नेमकं बोट ठेवलं आहे. मात्र, या गुंत्यातून कसं बाहेर पडायचं, हेही त्यांनी सांगितलं आहे. विवेकानंद बर्याच वेळा हिंदू धर्मावर जहरी टीका करत आणि अधूनमधून वेद-वेदांताचं गुणगानही गात. त्यामुळे विवेकानंदांबाबत विचार करताना अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. परंतु हा गोंधळ त्यांनी आयुष्यभर जे कृतिकार्यक्रम मांडले त्याचा आशय तपासताना ओसरू लागतो आणि ते वेद-वेदांताच्या नव्हे, तर गौतम बुद्धाच्या मार्गाने चालले आहेत, हे स्पष्ट होऊ लागतं. ‘आपण हिंदू आहोत’ ही धारणा परंपरेने मनात पक्की केलेली असल्यामुळे वेद-वेदांताचा जयजयकार करणं त्यांना ‘बाय डिफॉल्ट’ भाग पडत होतं, परंतु भारत हे जगातलं एक शक्तिशाली, विज्ञानवादी, आधुनिक राष्ट्र बनवायचं असेल तर वेद-वेदांताचा उपयोग नाही, हेही त्यांच्या लक्षात येत होतं. या मानसिक-वैचारिक संघर्षमय अवस्थेत त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यतीत झालं. त्यांनी म्हणताना वेद चांगले आहेत असं म्हटलं, परंतु वेदांचा जो आत्मा, त्या यज्ञसंस्कृतिला धुडकावलं. यज्ञसंस्कृतिचा जो गाभा, त्या कर्मकांडांना झुगारलं. वैदिक परंपरेने संस्कृतिच्या क्षेत्रात शब्दप्रामाण्याचा जो दबदबा उभा केला होता तो त्यांनी निर्धाराने नाकारला आणि ज्ञानाला, बुद्धिप्रामाण्याला प्राधान्य दिलं. दुःखमुक्ती, दारिद्र्यनिर्मूलन, सेवाभाव, करुणा, परोपकार यासाठी प्रसंगी उपनिषदांतील अद्वैत वेदांताचा सिद्धांत खुंटीवर टांगण्याची तयारी दर्शवली. समाजातील सुख-दुःखाशी सोयरसुतक न मानणार्या आणि रात्रंदिवस वैयक्तिक मोक्षाच्या पाठीमागे लागलेल्यांची थट्टा केली. ही सर्व लक्षणं आणि पावलं निश्चितपणे वैदिक परंपरेची नव्हती. ती वैदिकांच्या विरोधातील बंडखोरीची होती. तोंडाने ते प्रस्थापित परंपरेची भाषा बोलत होते, परंतु प्रत्यक्ष कृतिकार्यक्रमातून विद्रोह शिलगावत होते. त्यांचा हा मार्ग बुद्धाच्या मार्गावर येऊन पोहचत होता, हे उघड होतं. कारण भारतीय इतिहासात बुद्धमार्ग हा सतत सेवाभाव, करुणा, परोपकार, ऐहिकता, विवेक, समता यांचा कृतिशील पुरस्कार करत होता.

वरवर धार्मिक वाटणार्या परंतु प्रत्यक्षात धर्माशी विद्रोह पुकारणार्या बंडखोराची ही संक्षिप्त कहाणी अभिनव आणि वाचनीय आहे, हे निश्चित!

मोहिनी अणावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *