जंत हा आजार लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. हा आजार मोठ्या माणसांनाही होऊ शकतो. बारीक सुतासारखे, वाटोळे, लांब किंवा चपटे, असे आतड्यात होणारे तीन प्रकारचे जंत साधारणपणे आढळून येतात. सुतासारख्या बारीक कृमिमुळे गुदद्वाराच्या ठिकाणी अतिशय खाज सुटते. स्त्रियांमध्ये केव्हा केव्हा हे कृमी गर्भाशय मार्गात जातात, त्यावेळी तिथे अतिशय खाज सुटते. नाकास खाज सुटणं, वारंवार दचकणं आणि दात खाणं, भूक कधी जास्त कधी कमी, पोटात दुखणं, ओकारी आणि रेच होणं, शौचावाटे आव पडणं तसंच कधी कधी गुदद्वार आणि जननेंद्रिय या ठिकाणी खाज सुटणं ही वाटोळ्या जंताची प्रमुख लक्षणं आहेत.

याखेरीज ताप असणं, पोट मोठं दिसणं, फिकट चेहरा, स्वभाव चिडखोर बनणं वगैरे लक्षणंही या आजारात दिसून येतात. चपटे कृमी मोठ्या मनुष्याच्या पोटात होतात. उदर भागात विशेषतः जेवणानंतर पोटात दुखणं, मळमळ, भूक कमी जास्त असणं, कधी अवरोध तर कधी हगवण, नाकास खाज सुटणं, डोके दुखणं, चक्कर येणं, कानात आवाज होणं, डोळ्यांपुढे अंधार येणं वगैरे लक्षणं असतात. पटकीची भावना होणं हे प्रकारसुद्धा जंतामुळे होऊ शकतात. जंत होऊ नयेत म्हणून भाजीपाला आणि इतर अन्न स्वच्छ करून खावेत. हात जेवणापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवावेत. लहान मुलांमध्ये बर्याच वेळेला नख व्यवस्थित कापलेली नसतील तर नखांमध्ये माती, घाण अडकलेली असते आणि जेवतेवेळी ती पोटात जाते. गुदद्वार, गर्भाशय मार्ग वगैरे स्वच्छ ठेवावेत. उघड्यावरच्या वस्तू खाऊ नयेत. रेचक औषध दिल्याने जंत बाहेर पडले जातात. होमिओपॅथिक किंवा बाराक्षरी औषधांच्या उपयोगाने बर्याचवेळेस कृमी आतल्या आत विरून नाहीशा होतात. साधारण २१ दिवसानंतर अंड्यातून नवीन जंत निर्माण होतात. म्हणून जंत पडल्यानंतर २१ दिवसांनी पुन्हा कृमी औषधोपचार करणं आवश्यक आहे…

सिना हे सर्व प्रकारच्या जंतावरील महत्त्वाचं औषध आहे. हे औषध वाटोळ्या जंतावर विशेष उपयोगी पडतं. जंतांचा त्रास होत असलेलं मूल चिडखोर आणि त्रासिक असतं. हे मूल सतत वेगवेगळे पदार्थ मागतं आणि ते पदार्थ त्याला दिल्यास ते नाकारतं. त्याचं कशातच समाधान होत नाही. झोपेतून किंचाळून उठणं, दात वाजणं, नाक खाजवणं, भूक अतिशय किंवा न लागणं, गुदद्वारात खाज सुटणं, लघवी गढूळ होणं, राहून-राहून खोकला येणं, अशी आणखीही काही लक्षणं या मुलामध्ये दिसून येतात. तसंच अशा मुलात खेळण्याची प्रवृत्ती नसते.

सॅटोनाइन हे वाटोळ्या जंतावर विशेष उपयोगी पडतं. तर कॅलेडियम जंत होऊन ते पेरिनियममध्ये फिरतात. जनंद्रियेच्याखालील बाजूस माकडहाड आणि दोन बाजूंस वस्तीच्या हाडांचे गट्टू यांच्यामधील जागेस पेरिनियम म्हणतात. ट्यूक्रीकम हे सुतासारख्या बारीक कृमीवर उपयोगी पडतं. यात भयंकर खाज सुटते. गुदाद्वारात खाज येते. मुल रात्री अस्वस्थ असून, त्यास झोप येत नाही. तोंडास घाण वास येतो… सिक्युटा हे जंतामुळे येणार्या आकडीवर उपयुक्त असं औषध आहे.

स्पायजेलीया हे औषध जंतामुळे नजर तिरळी होणं, डोळ्यांभोवती निळी वलयं असणं, मळमळल्यासारखं होणं, मुर्च्छा येणं यावर अत्यंत उपयोगी आहे. या जंतांच्या त्रासामध्ये सकाळी मळमळ असली तर खाल्याने बरं वाटतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सॅबडिला हे ओकारीवाटे वाटोळे जंत ओकून पडतात. मळमळ, ओकारी, पोटात बेंबीजवळ जोराची कळ येणं, तोंडात लाळ सुटणं, ओटीपोटात आग होणं आणि ढवळल्यासारखं होणं, हे या जंताच्या त्रासाचे प्रकार आहेत. टेरेबिंथीनामध्ये गुदद्वारात आग होऊन झणझणतं. त्या ठिकाणी कृमिच्या हालचालींचा भास होतो. थंड पाणी लागताच आग कमी होते. लघवी झोंबणारी असते. तर भूक लागली की लगेच खावंसं वाटतं आणि खाल्ल्यानंतर लगेच भूक लागते. यामुळे मूल रात्री दचकतं किंवा ओरडतं, हेही पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

मधून मधून पोटात कळ येणं आणि त्यावेळी पोट घट्ट दाबून धरावंसं वाटणं ही प्रमुख लक्षणं आहेत. तोंडास घाण वास येणं, अतिशय भूक लागणं, खाल्ल्यानंतर मळमळणं, रात्री कण्हणं, फिकट चेहरा आणि सुस्ती यावर त्वरित स्टॅनममेट या औषधाचे उपचार घ्यावेत. तसंच अशा रुग्णास पोटावर निजण्याने बरं वाटतं. गुदद्वाराभोवती बारीक जंत असून ते रात्रीच्या वेळेत कुल्ले इत्यादी भागात फिरत असतात. यामुळे गुदद्वारात खाज येते. भूक भरपूर लागते. मूल भरपूर खाऊनसुद्धा अशक्त होत जातं. त्याला सतत लाळ सुटते. तसंच बाराक्षरी (जीवनरसायन) शास्त्रातील नेट्रम फॉस हे सर्व प्रकारच्या जंतावर लागू पडणारं औषध आहे.

डॉ. सेल्वकुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *