काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर त्या दोन्ही पक्षांनी जाहीरपणाने आत्मपरीक्षण करून आपल्या ज्या काही चुका झाल्या त्यांची जाहीर कबुली महाराष्ट्राच्या जनतेसमोर देण्याची गरज होती आणि आहे. परंतु या दोन्ही पक्षांचा निर्ढावलेपणा एवढा टोकाला गेलेला आहे की दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्याबद्दल हुं की चूं ही केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निदान आपल्या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी पक्षातील आपल्या सहकार्यांना एकत्र बसवून विचारविनिमय तरी केला. चिंतन शिबिर घेतलं. त्या शिबिरात आलेले पक्षाचे लोक कितपत स्पष्टपणे बोलले हे बाहेर कुणाला कळू शकत नाही. परंतु त्या पक्षाने हा सोपस्कार तरी पार पाडला. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे या बाजारबुणग्या नेत्यांना एवढं करणंही सुचलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसचा आत्मसंतुष्टपणा एवढा पराकोटीचा की त्यांच्या केंद्रातील राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यासारख्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन चार खडे बोल या उठवळ नेत्यांना सुनवावे असंही वाटलं नाही, आत्मपरीक्षण तर दूरची गोष्ट. टिळक भवनात निवडणुकीनंतर झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत तर कुणीही कुणावरही टीका करायची नाही, असा फतवाच जारी केला गेला होता. काँग्रेस पक्ष असा नव्हता. तो या स्थितीला आणून ठेवणार्यांना लोकांनी योग्य धडा शिकवला.

पक्षाच्या लोकांनी आपल्या पराभवाचं जाहीरपणे विश्लेषण करण्याची गरजच काय असा साळसूद प्रश्न हे पक्ष विचारू शकतात. या दोन्ही पक्षांना राज्यातील जनतेने सरकार चालवण्यासाठी सलग तीन निवडणुकांमध्ये कौल दिला होता, म्हणून तरी लोकांना त्यांनी आपल्या चुकांची माहिती देणं किंवा कबुली देणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यातील पक्षाचं चालकत्व जरी अजित पवार यांच्याकडे असलं तरी पक्षावर शरद पवार यांचीच पकड होती. त्यांनी पक्ष-कार्यालयात जमा केलेला गोतावळा एवढा बकवास होता की त्या गोतावळ्यातील प्रत्येकजण कार्यालयात येणार्या पक्ष-कार्यकर्त्यांकडून पैसे कसे काढता येतील याचाच विचार करून त्याप्रकारे योजना आखण्याचं काम करत असे. यात एकमेकांच्या विरोधात एकमेकांचे कान भरण्यापासून ते नगरपालिका, नगरपरिषदा किंवा जिल्हा परिषदेपासून ते विधानसभेपर्यंत उमेदवार्या मिळवून देण्यासाठी पैसे कमवण्याकडे त्यांचं सतत लक्ष असे आणि त्यासाठी नियोजन करण्यात ते मश्गूल असत. येणार्यांशी गोड गोड बोलायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग ठगी पद्धतीने त्यांचा गळा रेशमी रुमालाने आवळायचा हे तंत्र या गोतावळ्याने सिद्ध केलेलं होतं. पवार यांनी पक्षाला राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून दिलेली जी एकेक रत्नं होती त्यांचा त्यांनीच एकदा विचार करायला हवा. त्यापैकी बबनराव पाचपुते तर महिनोन्महिने घरी जात नसत. त्यांचा पवारसाहेबांना अभिमान वाटत असे. पण खरी मेख अशी होती की त्यांच्या सर्व गरजा ते राष्ट्रवादीच्या कार्यालयातच भागवून घेत असत, हे साहेबांना माहीत नव्हतं. त्यांच्या चाहत्या महिला कार्यकर्त्यांची उठबस करणार्या महानबाप्पा कार्यकर्त्यांची कार्यालयात चलती होती. एक गजानन देसाई नावाचा गृहस्थ त्या कार्यालयात एवढा मातब्बर झाला होता की त्याने अजित पवार यांच्याकडे या निवडणुकीत नांदगावची जागा मागितली. त्यासाठी दोनशे लोकांचा मोर्चा आणला. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार म्हणून पंकज भुजबळ निवडून आले होते आणि याही निवडणुकीत ते निवडून आले. हे देसाई नावाचे गृहस्थ कार्यालयात भुजबळ कुंटुंबाची जेवढी नालस्ती करता येईल तेवढी करत असत. हे सर्व मेटे नावाच्या बाजारबुणग्या नेत्यांचे पाठीराखे समजले जात.

अजित पवार यांना मध्यंतरी कोकण विकासाचा पुळका आला होता. त्यांनी संजय यादवराव यांना जवळ केलं. यादवरावांनी कोकण विकास प्रतिष्ठान स्थापन केलं होतं. हा वास्तवात अभाविपचा व्हिजेटीआयमधील कार्यकर्ता. परंतु मुंबईतील या गोष्टींची माहिती नसल्यामुळे अजित पवार यांना त्याची पार्श्वभूमी कळण्याचा संबंध नव्हता. त्याने जेव्हा कोकण महोत्सव आयोजित केला. त्याला आर्थिकसाह्य करण्यात अजित पवार आघाडीवर होते. दुसर्यांदा कोकण महोत्सव केला त्याला गणेश नाईकांनी सर्वतोपरीने साह्य केलं. स्वतः शरद पवार त्या महोत्सवाला पाहुणे म्हणून गेले. तो संजय यादवराव भाजपाचा लांजामधला उमेदवार म्हणून उभा राहिला. तो खरं तर विनोद तावडेंचा कार्यकर्ता. प्रमोद जठार त्याला सांभाळत असत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात वसंत वाणी नावाच्या माणसाकडे पक्षाची सर्व सूत्रं बहाल करण्यात आली होती. हे वाणी रास्वसंघाचे कट्टर कार्यकर्ते आणि भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते होते. तर भाजपाच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या भारती लव्हेकर या राष्ट्रवादीच्या नियतकालिकाच्या तीन वर्षं संपादक होत्या. त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात विनायक मेटे यांनीच आणलं होतं. राष्ट्रवादीचं नियतकालिक सोडल्यानंतर त्यांना ‘ती’ नावाचं एक नियतकालिकही त्यांनी काढून दिलं होतं. विनायक मेटे यांना तर बबनराव पाचपुते यांनी मांडीवरच घेतलेलं होतं. ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत होते. तिथेच कार्यालयात हेमंत टकले हे तर पक्ष संपवण्याचा विडा उचलूनच आलेले होते. ते शरद पवार यांच्या थेट मर्जीतले असल्याने त्यांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीच्या अंगणातलं पानही हलत नसे. आधी त्यांचं आणि बिनसाळे यांचं बरं होतं. नंतर मात्र बिनसलं. ते बिनसाळेंना पाण्यात बघू लागले. तसे ते अनेकांना पाण्यात बघतच असत. अगदी अजित पवार यांनाही. पण त्यांना कुठे थांबावं हे कळत असल्याने ते केवळ पक्षाचं वाटोळं करूनच थांबले. हे कार्यालयातलं कमी की काय म्हणून बाहेर आपल्याच कार्यकर्त्यांना धक्क्याला लावण्याचं नवं तंत्र स्वतः अजित पवार यांनीच विकसित केलं होतं. तिकिटं कापणं, उमेदवार पाडणं हे उद्योग त्यांनी अगदी हिरिरीने केले. सर्वात कडी म्हणजे सिंचन घोटाळ्याचे ढोल वाजू लागल्यानंतर ते जे बिळात शिरून गप्प बसले ते बाहेरच येईनात. त्यांचा त्या घोटाळ्याशी संबंध नव्हता असं आपण गृहीत धरलं तरीही त्यांनी छातीठोकपणाने तसं सांगण्याची गरज होती. ज्यांनी तसे आरोप केले त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज होती. तसं त्यांनी काहीही केलं नाही. उलट आर. आर. पाटील यांच्यासारख्या नादान गृहमंत्र्याच्या भरवश्यावर राहून ते वाट पाहत राहिले. पोलीस खात्यातील एकाही माणसाला (त्यांच्या स्वतःच्या भावासह) गृहमंत्र्याबद्दल आदर वाटवा असं त्यांनी काहीही केलं नाही. भ्रष्टाचार होईल या भीतीने आणि आपली प्रतिमा स्वच्छच दिसली पाहिजे या हट्टापोटी संपूर्ण दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पोलिसांसाठी एकही घर बांधू दिलं नाही. सीसीटीव्ही कॅमेरे, किनारागस्त मजबूत करणं हे विषय तर दूरच. या सार्या गोष्टींचा परिणाम पक्ष पराभूत होण्यात झाला.

कर्तृत्वहीन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून राज्यात येताक्षणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार यांची बदनामी सुरू केली होती. हे उघड्या डोळ्यांनी पहात आणि कानांनी ऐकत राहण्याऐवजी सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवायला हवी होती. परंतु सत्तेचा मोह त्यांना सोडता आला नाही, हेही त्यांच्या मुळावर आलं.

गलथान कारभार करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत मुंबईतीलच नव्हे तर पुणे, नाशिक, कोल्हापूर ते अगदी चिपळूणपर्यंतच्या दुय्यम शहरांतीलही घरांच्या किमती भरमसाठ वाढल्या. त्याला मागणी आणि पुरवठा हे गणित लागू नव्हतं. तर कृत्रिम रितीने घरांची निर्मिती होणार नाही याची खातरजमा त्यांनी केली होती. गृहनिर्माणसारखं खातं त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. मुंबई महानगरपालिकेत सुबोधकुमार या त्यांच्या लाडक्या बाळाने शहरातील नव्या बांधल्या जाणार्या इमारतींच्या जिने आणि ओपन डेफिशिन्सीचं शुल्क १० टक्क्यांवरून १०० टक्के केलं. याचा परिणाम म्हणून फ्लॅट्सच्या किमतीत दर चौरसफुटामागे तीन हजार ते चार हजार रुपयांची वाढ झाली. याची साधी दखलही पृथ्वीराज चव्हाण या स्वच्छ कारभार करणार्या माणसाने घेतली नाही. शिवाय ज्या ज्या प्रकारे लोकांना नाडता येईल त्या त्या प्रकारे प्रशासनाने त्यांना नाडावं अशा नियमांची तरतूद करून ठेवली आणि कारभार स्वच्छ करण्याऐवजी आपला स्वतःचा पक्ष सफाचट करून टाकला. माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलावं? जे बबनराव पाचपुते राष्ट्रवादीच्या कार्यालयात करत होते तेच माणिकराव काँग्रेसच्या कार्यालयात करत होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यात साधा कार्यकर्ता मेळावाही घेतला नाही. कार्यकर्त्यांना ताकद देण्याची तर गोष्ट दूरचीच.

परिणामतः दोन्ही पक्षांचं राज्यातल्या जनतेने तर्पण केलं. शेवटच्या टप्प्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपाच्या रस्त्यावर आहेत. त्यांना स्वीकारण्याची संधी भाजपाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे जवळ आलेली आहे. त्यानंतर काँग्रेसची पाळंमुळं खणून काढणं भाजपाला फारसं अवघड ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *