सतीश तांबे यांची ‘कोरस’मधील ‘बोबडा पोपट’ ही कथा ज्यांनी वाचली आहे, त्यांना तिचं नाट्यरूपांतर करणं किती कठीण आहे, हे नक्की माहीत आहे. पण, त्या कथेतल्या तपशिलांची पुनर्रचना करताना कथेचा गाभा सुरक्षित ठेवण्यात लेखक गिरीश साळवी पूर्ण यशस्वी झाले आहेत. पुरुषाचं सेक्स, हा विषयच प्रक्षोभक आहे आणि या दोन अंकी नाटकात तो सांकेतिक पद्धतीने साकारलेला नाही. त्यात हे घटनाप्रधान नाटकही नाही, की ज्यात आशय हा घटनांमधूनच स्पष्ट होत जातो; अर्थ जरी हवा तो काढता आला, तरी तो अर्थ हालचालींमधून काढलेला असतो. इथे तसं नाही. जे आहे, ते रोखठोक आहे. स्पष्ट, उघड शब्दांमध्ये मांडलेलं आहे.

अशी मांडणी करताना आविर्भाव आणि आवाजातील चढउतार यांवर नियंत्रण राखणं फारच आवश्यक बनतं. तसं नियंत्रण नसल्यास नाटक हिट अँड हॉट किंवा अन्य प्रकारे आरपार सवंग होऊन जाण्याची शक्यता असते. दिग्दर्शक गिरीश साळवी यांनी तसं अजिबात होऊ दिलं नाही आहे आणि सर्वच नटांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेला तोलून धरलं आहे.

नाटकात तीन पुरुष पात्रं आहेत. तिघांचाही अभिनय चांगला झाला. त्यात बेगडीपणा नव्हता. दिग्दर्शकाला हवं ते करण्यात त्याच्यापैकी कुणी कमी पडलं, असं वाटलं नाही. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांचं उच्चारण. ते नेमकं होतं. नाटकाची भाषा सहजसोपी नाही. वाक्यं छोटी नाहीत. संवाद (सर्ववेळ) चटपटीत नाहीत. संवाद कमीच आहेत, प्रत्येकजण आपापलं म्हणत जातो आणि दुसर्याला त्याचं म्हणता यावं यासाठी जणू क्यू देत रहातो. एकमेकांना प्रतिसाद देत कथानक उलगडत जातंय, असं होत नाही. (पण हा दिग्दर्शकाचा निर्णय. अभिनयात त्रुटी असल्यामुळे असं होतंय, असं म्हणता येत नाही.)

तर, वामन झालेले प्रदीप डोईफोडे, डॉक्टरच्या भूमिकेतले कुशल कोळी आणि मित्राची भूमिका साकारणारे समीर पेणकर, या तिघांचेही उच्चार स्पष्ट होते, वाक्याचा तोल नीट सांभाळला जात होता आणि द्यायला जिथे हवेत तिथेच आघात दिले जात होते आणि एवढा तोल सांभाळताना कृत्रिमपणाही येत नव्हता. हे सोपं, सहज नाही. सेक्सबद्दल बोलताना आवाज वाया जातो, तेसुद्धा नीट मर्यादा सांभाळून होतं.

सावित्रीचं काम करणार्या श्रद्धा चव्हाण यांचे उच्चार तीन पुरुषांच्या तुलनेत कमकुवत होते. आवाज डळमळीत होता. त्यांचं पाठांतर कच्चं होतं असंही काही वेळा वाटलं. मोठी वाक्यं बोलताना आघात देताना त्या गोंधळल्यासारख्या झाल्या. म्हणजे श्रद्धा चव्हाण यांची भूमिका पुरुष पात्रांच्या तुलनेत डावी ठरली, असं म्हणायला हवं. पण तसं अजिबात म्हणता येत नाही. कारण यापेक्षा एक मोठी गोष्ट त्यांनी साध्य करून दाखवली. नाटक सेक्स या विषयावर आहे, असं म्हणण्यापेक्षा पुरुषाच्या सेक्सच्या ऑब्सेशनवर आहे, असं जास्त खरं ठरत असताना नाटकातलं रंगमंचावर येणारं एकमेव स्त्री पात्र निर्वाणीच्या महत्त्वाचं ठरतं. ती स्त्री पुरुषी सेक्सचं ऑब्जेक्ट आहे. तशीच ती दिसते. म्हणजे सेक्सी दिसते. पण उत्तान दिसत नाही! कठीण आहे. हे श्रेय निःसंशय दिग्दर्शकाचंच; पण त्याला हवं ते या अभिनेत्रीने स्वतःच्या देहबोलीतून साध्य करून दाखवलं. त्यांच्या पहिल्या सीनमध्ये सावित्रीची उघडी पाठ प्रेक्षकांना दिसते; पण दिसत रहात नाही. ती तिथे एक उघडी पाठ आहे, हे कळल्यावर प्रेक्षक (विशेषतः पुरुष) चाळवला जातो आणि मनात त्याला ती उघडी पाठ दिसत रहाते. ती सारखी सारखी दाखवण्याची गरज नाही, हे समजून, म्हणजेच सवंगपणाचा मोह टाळून संयम राखल्याबद्दल दिग्दर्शकाचं आणि अभिनेत्रीचं, दोघांचं अभिनंदन. कारण शरीर उघडं असताना तिची देहबोली मोकळी, पापभावनेचा स्पर्श नसलेली होती. (हे कॉम्बिनेशन किती डेडली असतं, हे राज कपूरचे सिनेमे बघून नीट कळतं.)

तिच्या दुसर्या सीनमध्ये ती पूर्ण झग्यात झाकलेली, लहानपणची, बालिश आहे. त्यावेळी तिचं बोलणं वागणं तसंच आहे. जास्त नाटकी नाही, की संकोची नाही. तिसर्या सीनमध्ये ती स्टार आहे. मेकअप केलेली, एका बाजूने स्लिट असलेला पायघोळ गाऊन घालणारी. याही वेळी ती एकदाच पायावर पाय टाकते आणि गुडघ्याच्याही वरपर्यंत मांडी दाखवते. पाय लगेच सरळही करते. नंतर दुसरा पाय वर टाकते; पण तेव्हा मांडीदर्शन होत नाही. इथेही दिग्दर्शक दिसतो आणि इथेही ती अवघडत नाही. दिग्दर्शकाला शरण जाऊन भूमिकेला जिवंत करणार्या या नटीकडून अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

मात्र नाटकाचं नेपथ्य सामान्य आहे. रंगभूमीचा अवकाश वापरलेला नाही. प्रकाशयोजनेकडेसुद्धा दुर्लक्ष झालं आहे. ध्वनीचा उपयोग ऑफिसातल्या सीनच्यावेळी चांगला केला आहे. तेव्हा पार्श्वभूमीवरचे आवाज वातावरण बरोबर निर्माण करतात. एकही जादा पात्र, एकही जादा वस्तू न आणता खूप माणसं काम करत असलेली अशी ही जागा आहे, ही भावना निर्माण होते.

या नाटकाला रूढार्थाने कथानक नाही. मूळ कथेत केलेल्या फेरफारामुळे नाटकात एका पुरुषाची मानसिकता उलगडणं, इतकंच घडतं. पण तरीही पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकाला वाटायला हवीच. नाटक सुरू झाल्यावर प्रेक्षक सुरुवातीच्या प्रसंगांवरून, संवादांवरून, लेखकाने/दिग्दर्शकाने पेरलेल्या सूचक इशार्यावरून स्वतःशी काही ठोकताळे बांधतो आणि त्या अपेक्षांच्या चौकटीत पुढचं नाटक बघतो. मग पुढे त्याला कलात्मक आणि सुखद धक्के बसले; किंवा ते न बसता सुखद अपेक्षापूर्ती होत रहायला हवी. तिथे हे नाटक काहीसं कमी पडतं.

वाईट गोष्ट अशी, की लेखक गिरीश साळवी यांनी कथेवरून नाटक घडवताना जे स्वातंत्र्य घेतलेलं आहे, त्यातूनच खरं तर नाटकाच्या कथानकात आशयप्रकटीकरणाची दिशा निर्माण झाली आहे. तरीही त्याचा वापर नाटकाला चढवत नेण्यासाठी करून घेतलेला नाही. सावित्रीचं शेवटचं भाषण उसनं, उपटसुंभ वाटतं, कारण त्याची चाहूलही अगोदर लागत नाही. पुरुषी मनोवृत्तीचं दर्शन घडवणारा तो सीनच परका वाटतो. यात एक गणित असं असू शकतं की अगोदर जे तीन पुरुष प्रेक्षकाला दिसत रहातात, त्यांच्या, एक प्रकारच्या निरागस, मानसिकतेशी प्रेक्षक समरस झाल्यावर शेवटच्या सीनमधले इतर पुरुष प्रेक्षकाला परके ठरतात. अगोदरच्या तीन पुरुषांच्या बरोबर नेऊन प्रेक्षकाला निरागसतेच्या पार्टीत बसवायचं आणि त्यातून पुरुषी वखवखीचा निषेध तो आपोआप करेलच, असा हिशेब यामागे असू शकतो. हा हिशेब बरोबर आहे; पण अगोदरचे सीन्स आणि शेवटचा सीन यांचा सांधा जुळत नाही. तो सांधा सावित्री आहे; पण ती येते आणि पुरुषी वखवखीचा अपमान करून नायकालाही दोन शब्द सुनावते. पोपट हा शब्द उघडपणे सेक्सच्याच संदर्भात ऐकताना पुरुषांचं जे होतं, ते दाखवण्याचा उद्देश बरोबर आहे; पण तो शब्द उच्चारणार्या स्त्रिचं काय झालेलं असतं, हा संदर्भ आवश्यक आहे. तो मिळत नाही.

एक अतिशय अवघड विषय बीभत्स किंवा अश्लील होऊ न देता, इतक्या सफाईने मांडणार्या लेखकाने संपूर्ण नाटक पहिल्यापासून सावित्रीच्या शेवटच्या भाषणाच्या दिशेने तोंड करून का ठेवलं नाही, कळत नाही. आता जे आहे, ते निश्चित आकर्षक, विचारांना चालना देणारं आहे; पण ते विषयाचा प्रक्षोभकपणा आणि मांडणीतला संयम यांच्या अद्भुत संतुलनावर उभं आहे.

अवघड विषय. जड भाषा. सघन आशय. तरीही पुरुष खाजगीत ज्या पातळीवर उतरून बाई या विषयावर बोलतात, त्याच्या जवळही नाटक जात नाही. मूळ कथेतल्या वैज्ञानिक चिकित्सा करू पहाणार्या धारणेशी बेईमान होत नाही. या विषयावर मराठी रंगभूमीवर आजवर अनेक नाटकं आली. काही चावट होती, काही हॉट, तर काही सामाजिक समस्येच्या अंगाने केलेल्या मांडणीची होती. हे नाटक या सर्वांपेक्षा वेगळं आहे. ते तांत्रिक होत नाही की ओंगळपणाकडे झुकत नाही. उलट, ते स्त्री-पुरुष दोघांना मोकळं करणारं आहे.

हेमंत कर्णिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *