भारतात अलीकडे बुवा, बापू, स्वयंघोषित जगद्गुरूयांचं आणि त्यांच्या भक्तांचं एवढं पेव फुटलं आहे की हा पुरता देशच आध्यात्मिक झाला आहे की काय असं वाटावं. बरं तसं समजावं तर देशातील भ्रष्टाचार, वंचितांवरील अत्याचार, बलात्कार यात मात्र कमी न होता वाढच होत असल्याचं दिसतं. म्हणजे हा अध्यात्माचा पूर वस्तुतः निरुपयोगी, व्यर्थ आणि पोकळ बुडबुडा असल्याचं दिसून येईल. त्यातच हे स्वयंघोषित गुरू-जगद्गुरू ज्या गतीने एकामागोमाग तुरुंगात जाऊ लागले आहेत ते पाहता आणि त्यांच्यावरील गंभीर आरोप पाहता या सद्गुरूंच्या आश्रमांतून अध्यात्म वाहतं की पाप, अन्याय, स्त्रियांचं शोषण याच्या ‘मैल्या गंगा’ वाहताहेत हा संभ्रम पडावा आणि असं असूनही या महान सद्गुरूंचे चेले ज्या हिरिरीने आपल्या तुरुंगवासी बाबांची भलामण करतात ते पाहता भारतीय लोकांमधील विवेक केवढा सडलेला आहे याची जाणीव होते.

बरं, हे शिष्य अडाणी, अशिक्षित असते तर एक वेळ त्यांच्या अंधभावनांना समजावून घेत प्रबोधन करता आलं असतं. प्रत्यक्षात हे चेले उच्चशिक्षित, प्रस्थापित आणि अनेकदा धनाढ्यही असल्याचं पहायला मिळतं. अध्यात्माबद्दलची ओढ, ते पुरेपूर अवैज्ञानिक असलं तरी, आपण समजावून घेऊ शकतो. जीवनातील असुरक्षितता, ताण-तणाव आणि संभाव्य संकटाचं भय यातून माणूस असल्या निरर्थकतेत आपलं समाधान आणि सुरक्षितता शोधू इच्छितो हे आपण समजावून घेतलं तरी ज्यांच्या ‘बुवागिरीच्या’ माध्यमातून ते हे सारं मिळवू पाहतात, अंधभक्तिने पिसाट होत जातात त्या बुवांची लायकी पाहिली तर थक्क व्हायला होतं. आजवर आसारामबापू ते रामपाल यांच्या आश्रमांतून जे काही साहित्य जप्त झालं आहे त्यात लैंगिकतेशी संबंधित साधनंच अधिक आहेत. गर्भनिरोधकांपासून ते कामासक्ती वाढवणारी औषधं त्यात आहेत. म्हणजे आश्रमांत भक्तिणी स्त्रियाही कोणत्या लीला करत असतील याचा तर्क बांधता येतो. सर्वच वेळीस जबरदस्ती केली जात असेल याची शक्यता नाही. अध्यात्माची पिपासा स्त्री-पुरुषांना एवढं अंध बनवते की कामपिपासा, हाही प्रश्न यातून निर्माण झाला नाही तरच नवल!

रामपालबाबा

आसारामबापूनंतर सर्वाधिक गाजत असलेलं रामपालबाबाचं प्रकरण तर विलक्षण आहे. स्वतःचं सैन्य भारतीय भूमिवर बाळगणारा, शस्त्रास्त्रांचे साठे करणार्या या बाबांच्या अनुयायांनी चक्क पोलिसांशीही युद्ध पुकारलं. त्याला शेवटी अटक झाली असली तरी भारतीय कायद्यांना, न्यायालयांच्या आदेशांना न जुमानणार्या या बाबाचं आपण आधी कर्तृत्व आणि तत्त्वज्ञान पाहुयात.

रामपालचा जन्म झाला १९५१ साली सोनिपत (हरियाणा) जिल्ह्यातील एका गावात. सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा घेऊन हे महोदय पाटबंधारे खात्यात कनिष्ठ इंजिनिअर म्हणून कामाला लागले. असं असलं तरी त्याला लहानपणापासून अध्यात्माची आवड होती असं म्हणतात. प्रथम रामपाल कृष्णभक्त होता. हनुमान चालिसाचेही पाठ करायचा. पण पुढे त्याची भेट स्वामी रामदेवानंद या कबीरपंथी बाबाशी भेट झाली. यानंतर कबीरपंथाकडे रामपालचा ओढा वाढला. १९९४पासून कबीरच सर्वोच्च दैवत आहे आणि कबीर तसंच गरीबदासाच्या वाणीला वेद, गीता आणि पुराणांचंही समर्थन आहे असं तो सांगू लागला. उपदेश करू लागला. खरं म्हणजे सर्वच बुवा, बापू आणि प्रवचनकार/किर्तनकार जशी मूलभूत तत्त्वज्ञानाची मोडतोड करतात तशीच रामपालही करत होता. लोकांना नवनवीन दैवतांची हौस असते. मध्यंतरी एक अशीच ‘संतोषीमाता’ पडद्यावर अवतरली आणि तिची व्रतं-उद्यापनं कशी सुरूझाली हे आपल्याला माहीतच आहे.

खरं तर कबीर हे समतेचे उद्गाते, रूढी-परंपरांचे कट्टर विरोधक. हिंदू-मुस्लिमांतील अनिष्ट परंपरांवरही त्यांनी अनवरत आघात केले. ते एकेश्वरी होते आणि कोणताही धर्मग्रंथ त्यांना मान्य नव्हता. ‘पाहन पूजे हरि मिलैं, तो मैं पूजौं पहार। वा ते तो चाकी भली, पीसी खाय संसार।।’ असं कबीर रोखठोक बोलतात. काशीला मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो असं त्यांना त्यांच्या अंतकाळी कोणी म्हणालं तर त्यांनी त्यालाही विरोध केला. असं कबीर यांना सर्वोच्च देवतेच्या ठिकाणी ठेवत आणि तत्त्वज्ञानांची मोडतोड करत, प्रसंगी मूळ श्लोकांचे हवे तसे अर्थ काढत प्रवचनं देत रामपालने आपलं ‘आध्यात्मिक’ बस्तान बसवायला सुरुवात केली. एवढंच करून स्वारी थांबली नाही तर स्वतःला कबीरांचे अवतार घोषित केलं.

नवीन बाबा यायला लागले की जुन्यांना स्पर्धेचा धोका वाटू लागतो. आर्य समाजाचं प्रस्थ भारतात आजचं नाही. दयानंद सरस्वतींनी सुरू केलेला हा समाज आणि वेदमान्यता हाच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार. हरियाणात हा समाज अजून बर्यापैकी प्रबळ आहे. संघवाद्यांना हवा असलेला आर्य-अनार्य आणि वेद आर्यांचेच हा सिद्धांत आर्य समाजींना मान्य आहे. त्यामुळे सांस्कृतिक वर्चस्वतावादाची आयती संधी मिळते. कबीरपंथी बुवाचं उत्थान त्यांनाही सहन होणं शक्य नव्हतं आणि रामपालबाबाला प्रसिद्धीसाठी कोणालातरी टार्गेट करणं भाग होतं. त्यामुळे या दोन संप्रदायांत खटके उडणं स्वाभाविक होतं. त्यात २००६ साली रामपालने दयानंद सरस्वतींविरुद्ध वादग्रस्त विधानं केली. त्यामुळे संतप्त आर्य समाजींनी कोरोंथा (रोहटक) येथील रामपालच्या आश्रमावर अक्षरशः चाल केली. रामपालचे शिष्य आणि आर्य समाजींत घमासान हाणामारी झाली. त्यात आश्रमातून झाडल्या गेलेल्या बंदुकीची गोळी लागून एक आर्य समाजी तरुण ठार झाला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत रामपाल आणि काही अनुयायांना अटक केली. आश्रमही जप्त केला गेला.

या घटनेने रामपालला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. त्याच्या अनुयायांत घट होण्याऐवजी वाढच होत गेली. जप्त झालेल्या आश्रमाचा ताबा मिळावा म्हणून रामपालने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्च २०१३मध्ये न्यायालयाने ताबा देण्याचा निर्णय घेतला असता त्याची प्रक्रिया सुरू असताना आर्य समाजींनी त्यात अडथळा आणण्याचा हिंसक प्रयत्न केला. यावेळीस पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोन ठार तर शंभराहून अधिक जखमी झाले.

२००६मध्ये रामपालवर खून आणि खुनाचे प्रयत्न हे आरोप दाखल झाले होते. दोन वर्षं जेलमध्ये राहून जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयाला तोंड दाखवणं बहुदा रामपालला अवमानास्पद वाटलं असावं. त्याने आपल्या करोंथा येथील आश्रमालाच एक सुसज्ज किल्ल्यात बनवायचा घाट घातला. स्वतःची सेनाही उभी केली. न्यायालयीन समन्सला कचर्याची टोपली दाखवण्यात येऊ लागली. थोडक्यात, भारतीय संविधानालाच हे आव्हान होतं. हा गृहस्थ समन्सला दाद देत नाही म्हणून अटक वॉरंट काढावं लागलं.

सतलोक आश्रमात वॉरंटची अंमलबजावणी करायला आलेल्या पोलिसांना रामपालच्या सेनेने अटकाव केला. पोलीस आत शिरायचा प्रयत्न करू लागताच त्यांनी चक्क पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांनी स्थिती पाहून माघार घेतली खरी पण हा संघर्ष तब्बल दोन आठवडे चालला. या संघर्षात (खरं म्हणजे युद्धात) पाच स्त्रिया आणि एका लहानग्याचा मृत्यू झाला. ७० पत्रकारांसह, १०५ पोलिसांसह दोनेकशे लोक जखमी झाले. यानंतर कोठे रामपाल शरण आला आणि पोलीस कोठडीत न पडता पंचकुला येथील इस्पितळात दाखल झाला. या कारवाईच्यावेळीस जवळपास १४ हजार अनुयायांना आश्रमातून जबरीने काढावं लागलं.

वरील घटनाक्रम पाहता कबीराच्या तत्त्वज्ञानाची ऐशी की तैशी करणारा हा रामपाल लाखोंच्या संख्येत अनुयायी बनवू शकला कसा या प्रश्नाचं उत्तर समाजाच्या खोट्या आध्यात्मिक हावरेपणात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आर्य समाजीही सुरुवातीपासून आक्रमक राहिले कारण वेद मान्यता सोडून हा प्राणी वेदांचेच नव्हे तर गीता-पुराणांचे विसंगत अर्थ काढत कबीराला एकमात्र श्रेष्ठ सर्वोच्च परमेश्वर मानत तसा प्रसार करत अनुयायी बनवत राहिला हे त्यांना सहन होण्यासारखं नव्हतं. संघ विचारसरणीला मुस्लीम असलेला, हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला बंडखोर संत साक्षात परमेश्वराच्या स्थानी ठेवला गेलेला कसा सहन होईल?

बरं, रामपालला खरंच कबीराच्या तत्त्वज्ञानाशी काही घेणंदेणं नाही हे त्याच्या वेबसाइटवरील तत्त्वज्ञानावरूनच सिद्ध होतं. कबीरवचनार्थांचीही त्याने मोडतोड केलेली आहे. आश्रमाचं रूपांतर गढीत करणं, विरोधकांशी हिंसक आणि अश्लाघ्य वर्तन करणं, शासनाशी युद्ध पुकारणं हे कुठल्या कबीरपंथी तत्त्वज्ञानात बसतं? खरं तर आपलं बस्तान बसवण्यासाठी आणि अस्तित्वात असलेल्या प्रभावी आर्यसमाजींशी मुद्दाम विरोध पत्करत, स्वतःची कारणं देत प्रसिद्धीच्या झोतात राहत अनुयायी वाढवण्याची ही चाल होती हे कोण नाकारेल?

म्हणजे हा संघर्ष आध्यात्मिक नसून केवळ धर्मसत्ता गाजवण्याच्या पिपासेतून उद्भवलेला आहे आणि ही गंभीर परिस्थिती आहे. खुनी, बलात्कारी म्हणून गाजणार्या स्वयंघोषित जगद्गुरूंच्या-संतांच्या रांगेत आता देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्या एका जगद्गुरूची भर पडली आहे. आर्य समाजीसुद्धा खरं तर तेवढेच अपराधी आहेत. अवैदिक मूर्तिपूजेला दयानंद सरस्वतींनी विरोध करत वैदिक धर्माची पाठराखण करताना त्यांनीही वैदिक धर्माची सोईस्कर मांडणी केली. रा. स्व. संघालाही ती सोईस्कर असल्याने ते आर्य समाजींचे पाठीराखे राहिलेले आहेत. रामपालने त्यांना आव्हान दिल्याने काही विचारवंतांना बरंच वाटत आहे. केवळ संघाला विरोध केला म्हणून भाजपाच्या राज्यात रामपालला अटक झाली असा आरोप करणं म्हणजे वस्तुस्थितीला बगल देण्यासारखं आहे.

त्यामुळे या प्रकाराकडे एवढ्या उथळपणे पाहून चालणार नाही. आर्य समाज वेदांची तोडमोड करत वैदिक माहात्म्य वाढवतो म्हणून कबीरवचनांची मोडतोड करत स्वमहत्ता वाढवण्यासाठी युद्धखोरपणा, हिंसकता आणि संविधानाविरुद्ध युद्धायमानता दाखवणं हे अधिक गंभीर आहे. सर्वच प्रकारच्या आध्यात्मिक (?) संस्थानांकडे आपण अधिक गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कायद्यानेही आता सर्वच आश्रमांच्या नियमित तपासण्या करण्याची गरज आहे. आता पोलीस/न्यायाधीशही कोणानाकोणा बाबाचे अनुयायी असतील तर मात्र अवघड आहे.

आपण देश म्हणून सुजाण नागरिक नव्हे हे आपण वारंवार सिद्ध करत आहोत. कोट्यवधी लोकांना अजूनही असले भोंदू आध्यात्मिक गुरू लागत असतील तर हा देश कालत्रयी महासत्ता बनू शकणार नाही याचं भान आपल्याला आलं पाहिजे. अध्यात्म हा धंदा आहे. योग हा त्याहूनही मोठा उद्योग आहे. असे फोफावते उद्योग देशाची मानसिकता दुर्बळ करत नेतात, अर्थव्यवस्था पोखरत नेतात याचं भान असलं पाहिजे!

– संजय सोनवणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *