१.

आपण भारतीय आहोत आणि भारतीय असण्याचा आपल्याला अभिमानही आहे. भारतीय असणं म्हणजे काय! तर त्याचीही काही वैशिष्ट्यं आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी त्याच्या त्या वैशिष्ट्यांमुळे भारतीय माणूस सहज ओळखता येतो. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे, याला स्वतःच्या प्राचीन परंपरांचा भयंकर अभिमान वाटतो, तो भारतीय माणूस. मग भलेही त्याला ‘परंपरा’ या शब्दाचा अर्थही न कळू दे, पण तो त्याचा अभिमान बाळगणारच. पुन्हा त्या परंपरा तो काटेकोर पाळत असेलच याचीही खात्री नाही. पण तरीही त्याला परंपरांचा अभिमान मात्र मुबलक.

भारतीयांचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा आळस. जगभर त्यांचं हे वैशिष्ट्य तुफान गाजलेलं आहे. समजा, एक चांगला रस्ता खणायचं काम काढलं आणि त्यासाठी जगाच्या प्रत्येक देशातून एकेक माणूस कामावर बोलवला, तर एक दृश्य हमखास दिसेल. सर्व माणसं मनापासून किंवा नाइलाज म्हणून कमरा मोडून मोडून राबत असतील. पण त्यांच्यात एक माणूस असा असेल, याला दोन कुदळी मारताच लगेच कामाचा कंटाळा येईल. छ्या, काय फालतू उद्योग चाललाय, अशी त्याची भावना होईल. आणि मग तो मुकादमाची नजर चुकवून आणि ते नाहीच जमलं तर मुकादमाला करंगळी वर दाखवून, जरा बाजूला जाऊन येतो, असं सुचवून कामातून बाजूला होईल. आडबाजूला जाईल. तंबाखू काढील. निवांत मळून गोळी तोंडात धरील आणि समाधी लागल्यासारखा डोळे मिटून शांत बसून राहील, तेव्हा पक्कं ओळखायचं की, हा आपला भारतीय माणूस. आपला बंधू.

तंबाखू लावून, डोळे मिटून शांत बसलं की, बहुधा माणसाला निरनिराळे विचार सुचतात. पण भारतीय माणसाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य असं की, तो विचार करत नाही. विचार करणं त्याला नको वाटतं. विचार करायचाही कंटाळाच त्याला. आपण विचार केला आणि त्यातून चुकून चांगलं काही घडलं तर काय घ्या, अशी भीती त्याला वाटत असते. त्यामुळे विचार करण्याची तकतक त्याला नको असते. बघा, भारतीय माणसाने, तंबाखू लावून का होईना पण शांतपणे नीट विचार केला असता तर आज आपल्या देशाची जी दैना चालू आहे, सर्वच पातळ्यांवर, ती झाली असती का? भारतीय माणसाने जर विचार केला असता तर देशावर, आपल्या भूमीवर, आपल्या जनतेवर अजिबात प्रेम नसलेले बांडगूळ जातीचे पुढारी आणि राजकारणी जन्माला आले असते का? राजकारणाच्या नावाखाली त्यांचा जो नंगानाच चाललाय, तो चालला असता का? भारतीय माणसाने विचार केला असता तर शेती, कारखानदारी, शिक्षण, शासन या क्षेत्रात जे मागासलेपण आहे, ते राहिलं असतं का? भारतीय माणसाने विचार केला असता तर, महागाई, भ्रष्टाचार, फसवणूक अशी जी भुतं बोकांडी थैमान घालतायंत ती जिवंत राहिली असती का? भारतीय माणसाने जर विचार केला असता तर कला, भाषा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात जो दुय्यम दर्जाचा आणि गणंग लोकांचा धिंगाणा चाललेला आहे, तो चालला असता का? अजिबात नाही. भारतीय माणसाने विचार केला असता तर या भूमीत जे जे वाईट चाललंय, त्याची जन्म घेण्याचीसुद्धा हिंमत झाली नसती. पण भारतीय माणसाचं विचार न करणं हे गोड आणि आवडतं वैशिष्ट्य आहे आणि काही झालं तरी ते तो सोडायला तयार नाही. सोडणार नाही. याबाबतीत तो परंपरेप्रमाणे पूर्ण साधू वृत्तीचा आहे. जगाचं तिकडे काहीही होवो, मी आपला डोळे मिटून शांत समाधी लावून बसणार, ही ती खास वृत्ती आहे. या त्याच्या साधू वृत्तीतूनच भारतीय माणूस म्हणून त्याचं आणखी एक आधुनिक वैशिष्ट्य जन्माला आलेलं आहे. या आधुनिक वैशिष्ट्यामुळेही भारतीय माणूस ‘भारतीय’ म्हणून जास्त ठळक झालेला आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे त्याचं राजकारण, खेळ आणि चित्रपटांवरचं प्रेम. या तिन्ही क्षेत्रांवर भारतीय माणसाचं जवळजवळ नाही, तर पूर्णपणे आंधळं प्रेम आहे. अगदी अंधश्रद्धा म्हणावं इतकं. त्यातही राजकारणापैकी त्याला देश-परदेशाच्या राजकारणापेक्षा, आपल्या गावाचं आणि प्रदेशाचं राजकारण जास्त आवडतं. खेळांमध्ये त्याचं इतर सर्व खेळांपेक्षा क्रिकेट नावाच्या भोंदू खेळावर अधिकच प्रेम आहे आणि चित्रपटांमध्ये त्याला प्रादेशिक आणि जागतिक चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट जास्त प्रिय आहेत.

नीट पाहिलं तर भारताचं आजचं राजकारण, भारताचं आजचं क्रिकेट, भारताचे आजचे चित्रपट यांचा सगळा मिळून इतिहास केवळ सव्वाशे वर्षांच्या आतला आहे. शंभर – सव्वाशे वर्षांपूर्वी या तिन्ही गोष्टी भारतात उदय पावल्या. त्यांचा काळ पाचदहा वर्षांनी थोडा आगंमागं आहे, पण साधारणपणे त्या एकाच काळात जन्माला आल्या, हा एक महत्त्वाचा योगायोग आहे आणि या तिन्ही गोष्टी इथे जन्माला घालण्यात, इंग्रजांचा मोठा हात आहे, हाही एक सुदैवी म्हणा किंवा दुर्दैवी म्हणा, पण एक मोठा योग आहे. आजच्या या तिन्ही क्षेत्रांना जन्म देताना इंग्रजांनी सुईण म्हणून फार महत्त्वाचा हातभार लावलेला आहे आणि आजही या क्षेत्रांवर इंग्रजांचा कळता, नकळता असा बराच छाप दिसून येतो. या तिन्ही क्षेत्रांवरचा इंग्रजाळलेला स्पर्श अजूनही संपलेला नाही.

इंग्रज सौजन्यशील म्हणून प्रसिद्ध. त्यांनीच क्रिकेट पांढर्या कपड्यात भारतात आणला. त्याला एकशे पंचवीस वर्षं झाली. आज स्थिती अशी आहे की आपण रानटीपणे, आक्रमकपणे खेळलो नाही, तर आपलं गत्यंतर नाही, सौजन्याची तर ऐशीतैशी, असं जगातले बहुतेक संघ वागू लागले आहेत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांचे खेळ आणि आक्रमकपणा आठवा. स्वतः इंग्लंडच्या खेळाडूंनाही आपल्या मुळच्या सौजन्यशीलतेची आठवण आज फारशी राहिलेली दिसत नाही. पण त्यांच्याकडून उसनं घेतलेलं सौजन्य मात्र भारतीय संघात अजूनही अबाधित दिसतं. भारतीय क्रिकेट खेळाडू मैदानात उतरल्यावर दुसर्या संघाशी शत्रूशी लढावे तसं खेळलेले कधी आठवतात का? कधीच नाही. कारण? इंग्रजांकडून देणगीत मिळालेलं सौजन्य. हे आपले कायम मित्रांशी मैत्रीपूर्ण सामना खेळत असल्यासारखे खेळणार. त्यामुळे मग हार काय आणि जीत काय, काही फरक नाही. वर तत्त्वज्ञान तयार की, हारना-जितना तो चलता रहेता है यार. आखिर यह खेल है. ही एवढी खिलाडू वृत्ती मुळची इंग्रजांची. ती त्यांनी सोडली. आपण मात्र अजून नाही. श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेच्या संघांमधल्या लोकांचे चेहरे आठवा. कसे रगेल आणि माजलेले दिसतात. उलट आपल्या खेळाडूंचे चेहरे बघा, अगदी मैदानाबाहेर बघा, नाही तर मैदानात प्रत्यक्ष खेळ चालू असताना किंवा दुसरे लोक आपल्याला बेसुमार चोपत असतानाही बघा, यांच्या तोंडावर कायम गरीब आणि लाचार हसू. परिस्थिती कितीही कठीण असो, यांचे खसखस घासलेले आणि पेस्टींच्या जाहिरातींचे पैसे मिळवायचे दात कायम वासलेले. आणि तोंडं कायम दुष्काळातून ओढून आणल्यासारखी दीनदुबळी. एकेकाचं वार्षिक उत्पन्न आठ आठ दहा दहा कोटी. पण तोंडं सतत दुष्काळी. महिन्याचा उपास घडल्यासारखी. असं का? तर इंग्रजांनी बहाल केलेलं सौजन्य. त्या सौजन्याशी यांचं इमान अजूनही कायम आणि ठाम.

अठराशे सत्तावन्न साली भारतातले सगळे राजेरजवाडे इंग्रजांसमोर आडवे पडले. त्यानंतर इंग्रजांना आपलं बस्तान इथे व्यवस्थित बसवायला तीसपस्तीस वर्षांचा काळ लागला. तोवर अठराशेचं शतक संपायला आलं होतं. म्हणजे आजपासून शेसव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ. त्याच काळात आजच्या भारतीय राजकारणाचा जन्म झाला. बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, सिंध प्रांतातून पहिले राजकारणी पुढारी त्याच काळात उदयाला आले. इंग्रज स्वतः साम्राज्यशाही गाजवायला आले होते. पण त्यांच्यामुळे आपल्या लोकांना लोकशाही कळली. तेच लोकशाहीचे धडे घेऊन आपले राजकारणी पुढारी उभे राहिले. राजेरजवाडे होते तोवर, कुणीही उठतं आणि राजकारण करतं, अशा पद्धतीची आपल्याला सवय नव्हती. ती पद्धत इंग्रजांनी शिकवली आणि ती आजही चालू आहे. कुणीही सोम्या गोम्या कापशे उठून राजकारणाचा खेळ मांडतो, ही इंग्रजांचीच देणगी.

इंग्रजांनी राजकारणात जात आणली. धर्मांचे, गरीबश्रीमंतीचे, वरचेखालचे असे भेद आणले. इंग्रजांनीच राजकारणासाठी बाई, बाटली आणि लाचलुचपतीचा वापर केला. ते त्यांनी दिलेले धडे आपण अजूनही सोडलेले नाहीत. आपली घटनासुद्धा बहुतांशी इंग्लंडच्या घटनेवर आधारलेली आहे, ही इंग्रजांचा अजूनही आपल्यामागे पिच्छा आहे, याचीच निदर्शक घटना आहे.

इंग्रजांना भारतीय जनतेबद्दल, भारतभूबद्दल खरी आत्मीयता नव्हती. खरं प्रेम नव्हतं. तसं असण्याचं काही कारण नव्हतं. ते या देशाला लुटून, स्वतःची गारदच भरायला आले होते. ते काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. त्यांचं इथल्या लोकांशी केलेलं सगळं राजकारण ढोंगी, फसवं आणि लोकांमध्ये आपापसात आगी भडकवून देणारं होतं. भारताला पुरेसं पिळून झाल्यावर इंग्रज इथून गेले, पण जाताना आपल्या ढोंगी, फसव्या, लोकांमध्ये आगी लावून देणार्या, स्वतःचीच फक्त गारद भरणार्या, प्रेम नसणार्या राजकारणाचा गलिच्छ वसा इथल्या लोकांना देऊन गेले. तो वसा आपण आणि आपल्या राजकारण्यांनी फार निष्ठेने अजूनही पाळलेला आहे.

चित्रपट ही तर थेट इंग्रजांनीच शोधलेली आणि विकसित केलेली कला. अठराशे पंच्च्याण्णव सालाच्या शेवटी जगातला पहिला चित्रपट तयार झाला. म्हणजे शंभरसव्वाशे वर्षांपूर्वी आणि अठराशे शहाण्णवच्या सुरुवातीला तो चित्रपट भारतात आलासुद्धा. आपण शोधलेल्या कोणत्याही चांगल्यावाईट गोष्टीला कुठल्या ठिकाणचे बावळट लोक घाऊक प्रमाणात पाठिंबा देतील, याचा इंग्रजांचा अभ्यास दांडगा असावा. त्यामुळे इंग्लंडात पहिला चित्रपट दाखवून झाल्यावर, त्यानंतरच्या तीनचार महिन्यांतच अमेरिका वगैरे अपवाद वगळता तो पहिला चित्रपट त्यांनी भारतात आणून त्वरेने दाखवला. जगात गोर्या कातडीचे देश फार थोडे आहेत. बाकी सगळा मामला, किमान इंग्रजांच्यादृष्टीने, काळ्या कातडीचा. यात आधी दोनतीन गोर्या देशांनी जगातला पहिला चित्रपट पाहून झाल्या झाल्या, ज्या पहिल्या काळ्या देशाला इंग्रजांनी चित्रपट दाखवला, तो देश भारत होता. बाकीचं सगळं जग बाजूला सारून, इंग्रजांनी भारतातच पहिला चित्रपट दाखवायची घाई का केली? मला वाटतं, त्यांनी भारतीय लोकांची आळशी मानसिकता पक्की ओळखली असावी. आपल्या स्वतःच्या अंगाला काही मेहनत पडणार नसेल, डोक्याला काही खाज किंवा कल्हई होणार नसेल, तर भारतीय माणूस पटकन त्या गोष्टीत सामील होतो, हे इंग्रजांनी जाणलं असणार. ती जांभळाच्या झाडाखाली झोपलेल्या आळशी आणि वरून एक जांभूळ आयतं आपल्या तोंडात पडलं तर किती बरं होईल, असा विचार करत तास न् तास हालचाल न करता पडून राहणार्या माणसाची कथा आहे ना, तसाच प्रत्येक भारतीय माणूस आहे. किंबहुना हा सगळा देशच जांभळांनी लहडलेल्या झाडाखाली सुस्त झोपलेल्या लोकांचा आहे, हे त्यांना पुरतं ठाऊक असणार. अशा लोकांना सुस्त पडून राहून अनुभवता येतील अशा गोष्टी कोणकोणत्या, याचा विचार इंग्रजांनी फार बारकाईने केलेला असणार. त्यामुळेच आपल्याला काहीही न करता केवळ बघता येण्याची सोय असलेला चित्रपट त्यांनी इथे आणला. लोक केवळ बघत राहतील असे एका चेंडूमागे अनेकांनी धावण्याचे खेळ आणले. लोक केवळ बघत राहतील असं लोकशाही राजकारण त्यांनी इथे आणलं. इंग्रजांना खात्री होती, भारतीय लोक या नुसत्या बघत राहण्याच्या बाबतीत फार थोर आहेत, त्यामुळे आपण तसलं काही नेलं तर ते निश्चितच लोकप्रिय होईल. लोक त्या गोष्टींच्या प्रेमातच पडतील. आणि आज ते पूर्ण खरं झालेलं आपण पाहतोच आहोत.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *