२.

स्वतःच्याच धर्माबद्दल अज्ञान हा तर एक मुद्दा आहेच, पण दुसर्यांच्या धर्मांबद्दल अज्ञान असणं हाही एक जहाल मुद्दा आहे. त्यानेही जगाचं भरपूर वाटोळं केलेलं आहे. याही बाबतीत सगळा अडाण्यांचाच बाजार आहे. आधी मी जे म्हणालो, प्रत्येकाची स्वतःच्याच धर्माची परीक्षा घेतली तर सगळे जण नापास होतील, तर ते खरंच आहे, पण तशा परीक्षेत किमान काही लोक साताठ साताठ गुण मिळवून तरी नापास होतील. प्रत्येकाला नापास होण्यापुरते तरी गुण त्यात मिळतील. पण समजा, या सर्व लोकांची दुसर्या धर्मांबद्दल परीक्षा घेतली तर काय होईल? तर प्रत्येकजण फक्त शून्य गुण मिळवूनच नापास होईल. शून्याच्या पुढं कुणीही जाणार नाही. जिथं माणसांचा स्वतःच्या धर्मांचा अभ्यास नाही, तिथे हे लोक दुसर्याच्या धर्मांचा काय बोडक्याचा अभ्यास करणार? आणि आपण आपलं उगीच म्हणायचं, जग ज्ञानी होत चाललंय. आधुनिक होत चाललंय. घराघरात माहितीचे ढिगारेच्या ढिगारे ओतले जातायंत. पण माझं निरीक्षण आहे, हे जग काही ज्ञानीबिनी नाही. कसलीही खरी माहिती कुणालाच नाही. चुकीच्या माहितीचे ढीग फक्त सगळीकडे ओतले जाऊन त्यातून जातीय विद्वेष भडकवला जातोय. धार्मिक उन्माद वाढवला जातोय. जग आधुनिक होत चाललंय ते फक्त वस्तूंनी, मेंदूंनी नाही. खरं तर मेंदू आधुनिक झाले पाहिजेत. त्यांनी स्वतःहून रोज खरी आणि अस्सल अक्कल मिळवली पाहिजे. ज्ञान घेतलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. एकमेकांबद्दल खूपच चुकीची आणि गैरसमजूत पसरवणारी माहिती एकमेकांना असते. कुणीही खरी माहिती मिळवायचा प्रयत्न करत नाही. जग अशांत, अस्वस्थ राहायला हेही एक जबरदस्त कारण आहे.

साधा प्रश्न आहे, किती हिंदूंना मुसलमान म्हणजे नेमकं काय ते माहीत आहे? किती मुसलमानांना हिंदू म्हणजे नेमकं काय ते माहीत आहे? प्रत्येक धर्म, धर्मांचे ग्रंथ, नियम, आचरण पद्धती यांची माहिती बारकाईने असलेले लोक किती सापडतील जगात? फार अवघड आहे. या जगातला प्रत्येकजण स्वतःला फार ब्रह्मज्ञानी समजतो, आपल्याला फार कळतं असं मानतो, पण आपल्या शेजारच्या घरात नांदणार्या धर्माचा त्याला गंध नसतो. असलं ब्रह्मज्ञान काय कामाचं? हा तर निखळ मूर्खपणाच. मला वाटतं, हा मूर्खपणा झटकला आणि प्रत्येक माणसाने आपल्या धर्माबरोबरच दुसर्याही धर्मांचा अभ्यास केला तर खरंच जग शांत होण्याच्या दृष्टीने ते फार आवश्यक ठरेल.

३.

मला काही प्रश्न पडतात. हे जग एक आहे, आभाळ एक, पृथ्वी एक, सूर्य एक, माणसंही सगळी एकसारखीच असतात. प्रत्येक माणसाची माणूस म्हणून सर्वत्र एकच नक्षी असते. नाकाच्या ठिकाणी नाक, कानाच्या ठिकाणी कान, हाताच्या ठिकाणी हात असं सगळ्यांचं सगळं एकसारखंच असतं. तरीही माणसाला एवढे वेगवेगळे धर्म कशाला लागतात? एकाच एका मानवजातीला धर्मांची एवढी विविधता कशाला हवी असते? जगात एवढे धर्म का आहेत? पुन्हा त्या धर्मांमध्ये जाती, उपजाती, पंथ, विचार, लिंग यांचे भेद का आहेत? माणसं एकमेकांना पाण्यात का पाहतात? एकमेकांना खालचंवरचं का समजतात? एकमेकांशी वैर का बाळगतात? सगळे अवयव एकसारखे असलेली, सगळ्या अवयवांच्या क्रिया एकसारख्या असलेली, प्रत्येकाच्याच अंगात रक्त वाहतं आणि ते लालच असतं म्हणणारी मानवजात एकमेकांना का मारते? साध्या भांडणांपासून मोठमोठ्या युद्धांपर्यंत माणसं सतत एकमेकांना खलासच करायचं का ठरवतात? या पृथ्वीचं आयुष्य अब्जावधी वर्षांचं आहे आणि मानवजातीचं आयुष्य कोट्यावधी वर्षाचं आहे. आज जेवढे धर्म अस्तित्वात आहेत, त्यांचा इतिहास कितीही ताणला तरी तीनचार हजार वर्षं एवढा नगण्य असूनही फक्त एवढ्याशा काळात धर्माधर्मांचा एवढा कालवा आणि गलबला का झाला आहे? हे धर्म आपापसात का भांडतात? या धर्मांचा भविष्यकाळ काय असेल? माणसाला जगण्यासाठी खरंच धर्मांची गरज असते का? माणसाला लागते हवा, लागतं पाणी आणि अन्न. या हवा, अन्न, पाण्याला कोणता धर्म असतो? मी मुसलमान धर्माची भाकरी खातो, हिंदू धर्माचं कालवण आणि ख्रिश्चन धर्माचा भात असं कुणी म्हणतं का? माणसाला नुसत्या धर्माशिवाय जगता येत नाही का? नुसतं माणूस म्हणून जगता येऊ नये का? फक्त तीनचार हजार वर्षांपूर्वी तर हे जग धर्मांशिवाय, धर्ममुक्त जगत होतं. मग आताच त्याला धर्मांची गरज का वाटते न् एवढे धर्म लागतातच कशाला? धर्म म्हणजे आचरण. माणसासारखं आचरण करणं म्हणजे धर्म. माणसाचं आचरण म्हणजे काय? तर कष्ट करावेत, अन्न खावं, पाणी प्यावं, शौचाला जावं, मैथुन करावं, एकमेकांना मदत करावी, एकमेकांना सांभाळून घ्यावं, एकमेकांशी चांगलं वागावं. हे सगळं करण्यासाठी धर्म कशाला लागतो? हे तर नैसर्गिक जगणं आहे आणि ते माणूस कुठल्याही धर्माशिवाय नुसतं माणूस म्हणूनही जगू शकतो की. धर्मांशिवायसुद्धा माणूस नैतिक राहू शकतो. नैतिक राहणं ही मनाची धारणा आहे. मनातच माणूस चांगलं वागायचं की वाईट ते ठरवतो. गंमत म्हणजे मन नावाचा अवयवच अस्तित्वात नसतो. तो आपण गृहीत धरतो. त्या मनाला कुठला धर्म असू शकतो? मनातल्या इच्छा-आकांक्षांना कुठला धर्म असू शकतो? कुणी म्हणेल, आमचे धर्मसुद्धा नैतिकताच शिकवतात. मलाही ते मान्य आहे. तरीही प्रश्न पडतो की, जर सर्व धर्म नैतिकता शिकवतात आणि प्रत्येक माणूस कोणत्या न कोणत्या धर्माचा पाईकच आहे, तर मग जगात एवढी अनैतिकता का आहे? हे धार्मिक लोकच ही अनैतिकता पसरवतात ना? अनैतिक वागताना या लोकांची धार्मिकता कुठे लोप पावते? खून करणं, भ्रष्टाचार करणं, बलात्कार करणं, नवराबायकोची भांडणं, स्त्रीपुरुष भेद, सगळीकडे होणारी लूटमार, एकमेकांना फसवणं, अतिक्रमणं, भोंदूपणा, जातिभेद, धर्मभेद या गोष्टी अनैतिकच आहेत आणि माझ्या माहितीनुसार सगळेच धर्म ही अनैतिकता नाकारतात. अनैतिक वागू नका म्हणतात. मग आसपास पाहिलं तर सर्रास एवढी अनैतिकता का दिसते? अनैतिकतेचा एवढा बुजबुजाट का दिसतो? कुठल्या न कुठल्या धर्माचे लोकच ही अनैतिकता करतात ना? मग ते धार्मिक कसे? त्यांच्या धर्माला काय अर्थ? मग तेच लोक धर्माचा अभिमान का बाळगतात?

मी आताच म्हणालो, मानवजातीचा इतिहास कोट्यावधी वर्षांचा आहे. त्या तुलनेने प्रत्येक माणसाचं आयुष्य तर फारच नगण्य असतं. फक्त शंभर वर्षं. कोट्यावधी वर्षांसमोर ही शंभर वर्षं म्हणजे किस झाडकी पत्ती. एवढंसं घटकाभर जगतो मनुष्य आणि त्याला हे आयुष्य एकदाच मिळतं. तर मग मला प्रश्न पडतो की, दुसर्याला हे घटकाभर आयुष्य त्याचं त्याला सुखानं जगू देण्याऐवजी, माणूस त्या दुसर्याला खलास कसं करू शकतो? निसर्गाने दिलेलं एखाद्याचं आयुष्य दुसरा माणूस खंडित कसं करू शकतो? तेही धर्माच्या नावाखाली? प्रत्येकाला शेवटी मरायचंच असतं. मारणाराही कधी तरी मरणारच असतो. मरणाला पर्याय अजिबात नाही. तरीही एक माणूस दुसर्या माणसाला का मारतो? मारून काय मिळवतो? दुसर्या माणसाच्या जगण्याचे दिवस वाया का घालवतो? दुसर्याला मारण्यासाठी धार्मिक दंगली, धार्मिक युद्धं का करतो? लाखो वर्षांपूर्वी माणसं माणसांचीच शिकार करून खात. धार्मिकतेच्या नावाखाली आज जगात सर्वत्र जे एकमेकांना खलास करणं आहे ते, माणसांनी माणसांना खाण्याच्याच प्रकाराचं आहे. माणसं तेवढी रानटी राहू नयेत म्हणून म्हणे धर्म जन्माला आले. मग आज हेच सर्व धर्म एकमेकांच्या बोकांडी बसून एकमेकांना खाऊ का गिळू का करतायंत? ते रानटीपणाचंच नाही का? याच धर्मांनी शांतीचे, सहिष्णुतेचे, साहचर्याचे, मानवतेचे संदेश दिले होते ना? मग ते संदेश आज कुठंयंत? मग हे धर्म आज अस्तित्वात आहेत म्हणजे काय आहे?

४.

मला रडायला येतं. कुठेही भावनाशीलतेचं, प्रेमाचं, मायेचं दर्शन घडलं की मला रडायला येतं. नाटक, चित्रपटांत, पुस्तकांत मायेचे प्रसंग आले की मी रडतो. भारतीय घटनेचा सरनामा वाचताना मला रडायला येतं. देशाची गाणी ऐकताना आणि लहान मुलांचं निरागस हसू पाहताना मला रडायला येतं.

पूर्वी मी रडताना लाजायचो. वाटायचं, कुणी बघितलं आपल्याला रडताना तर काय म्हणतील? नामर्द समजतील आपल्याला. आज मात्र कळतं, रडणारा माणूस नामर्द नसतो. रडू यायला माणसाकडे मन असावं लागतं. त्या मनात करुणा असावी लागते. आजकालच्या जगात करुणा पेलवायला माणसाचं मनही तेवढंच तगडं असावं लागतं. आजकालचं जग क्रौर्याचा ठोक बाजार झालंय. क्रौर्य हीच आता सर्वसामान्य बाब झालीय. ती अगदी सहज आणि रस्तोरस्ती मिळते. मिळत नाही ती करुणा. करुणा आजकाल दुर्मीळच गोष्ट झालीय आणि कुठलीही दुर्मीळ गोष्ट सांभाळायला भक्कम ताकदच असावी लागते. हिंमत असावी लागते. हिंमत असणारालाच मर्द म्हणतात. आपल्याला रडू येतं म्हणजे आपल्यात करुणा आहे. करुणेसारखी दुर्मीळ गोष्ट पेलवण्याची आजच्या क्रुरतेच्या बुजबुजीतही आपल्यात हिंमत आणि ताकद आहे. म्हणजे आपण मर्दच आहोत आणि रडू येणं हे आजकाल मर्दाचंच काम आहे. मी आता नेहमी मोकळेपणाने आणि उघडपणे रडतो. मनात रडू असणं हाच मला आता माझा धर्म वाटतो.

मी आता नेहमी मोकळेपणाने आणि उघडपणे रडतो.

जगातले सर्व धर्म मानणारे आणि न मानणारेही लोक माझ्यासारखेच मर्द व्हावेत अशी मी तगड्या मनाने प्रार्थना करतो.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *