सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उरलेसुरले लोक खूश आहेत. का तर, त्यांच्या साहेबांनी असा दगड मारला की त्यात दोनच नाही तर अनेक पक्षी मेले… धारातीर्थी पतन पावले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या लोकांनी जाहीर नृत्य करायचंच बाकी ठेवलं. विशेष म्हणजे आपण भाजपाच्या सरकारला विनाअट पाठिंबा देणार आहोत याची पक्षांतर्गत चर्चा सुद्धा होऊ न देता पाठिंबा जाहीर करण्याची करामत पवार-पटेल या द्वयीने करून दाखवली, त्याचंही त्यांच्या पक्षात कौतुक आहे. बाकीचे काय फरफटत मागे येतातच, असा त्यातला हिशेब असावा. कदाचित अजित पवार त्यांच्या सवयीनुसार फटकळपणाने काही बोलले तर काय घ्या असाही विचार त्यामागे असावा. रा. स्व. संघाच्या अर्ध्या चड्डीला उद्देशून निवडणुकीच्या काळात शरद पवार जे काही बोलले तो प्रचाराचा भाग होता. ते फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं आता भाजपा नेते खाजगीत सांगताहेत. एवढंच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीबाबत ‘लोकसत्ता’च्या अड्डा कार्यक्रमात कुणीतरी विचारलं तेव्हा ते म्हणाले की, प्रचाराच्या दरम्यान जे बोललो ते जरा बेतानेच घ्यायचं असतं. म्हणजे प्रचाराच्या दरम्यान जे काही बोललं जातं ते सर्व काही बेतानेच घेतलं तर सर्वजण बाइज्जत रिहा! त्यामुळे संघाबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मवाळ असणं स्वाभाविक आहे. त्यांना जेवढा शिवसेनेचा राग आहे तेवढा संघाबद्दल नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आजही संघ ही एक सांस्कृतिक, सामाजिक संघटना आहे असं मनोमन वाटतं. ते स्वाभाविकपणे संघाच्या लोकांच्या बाबतीत बोटचेपेपणा करतात. परंतु त्यात भाबडेपणाचा भाग जास्त आहे.

काँग्रेस पक्षाचं तसं नाही. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांना असा भाबडेपणा परवडणार नाही. तरीही त्यांचं भान सुटलं आणि पकडही गेली. देशात भाजपाची सत्ता आणण्यात मोदी-शहा यांचा जसा वाटा आहे तसा तो स्वतः काँग्रेसचाही आहेच. त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात जसा मोदींचा वाटा मोठा आहे तसाच तो राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही आहे. ते स्वतः काँग्रेसमध्ये पक्षाची तिसरी पिढी म्हणून किंवा किमान दुसरी पिढी म्हणून वावरत होते. आपण शरद पवार यांची जी काही बदनामी करत आहोत त्या खड्ड्यात आपणही पडणार आहोत याचं त्यांना भान नव्हतं. त्यांच्या कारकिर्दीबाबत मित्रांशी बोलताना सहजपणाने एक गोष्ट कळली. तो मित्र म्हणाला, विधिमंडळातील कामकाजाच्या नोंदी काढून पहा. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषणाच्या दरम्यान मागणी केलेली प्रत्येक गोष्ट या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. मग त्या मागणीसाठी अंदाजपत्रकीय तरतूद असो अथवा नसो. त्यांनी मागणी करायचा अवकाश की आपल्या भाषणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ती मागणी आवर्जून आपल्याला मान्य असल्याचं आणि त्यासाठी आपण प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊ आणि तरतुदही करू असं जाहीरपणाने सांगत असत. हे करताना त्यांना आपण अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कट्टर स्वयंसेवकाला पुढे नेत आहोत याचं त्यांना भान नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा काँग्रेसचे राज्यकर्ते काय यांना कुणालाही भारतीय जनता पार्टी ही कोणत्या विचाराने पुढे चाललेली आहे, त्यांची मातृसंघटना काय विचारांची आहे याचं भान नाही. अर्थात, त्यासाठी काँग्रेसच्या चिरकूट नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही. अनभ्यस्त असणं हा त्यांचा सर्वात मोठा गुण असल्यामुळे त्यांना भाजपाची मूळ विचारधारा आणि तिला विरोध करणार्या वल्लभभाई पटेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध का होता याचं भान असण्याचं कारण नाही. बाबरी मशीद पाडली जाणार हे देशातील शेंबड्या पोरालाही माहीत असताना डोळ्यांवर कातडं ओढून बसलेले पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासारखे पंतप्रधान या देशाला काँग्रेसनेच दिलेले होते हे विसरून चालणार नाही.

आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना कधीही विसर पडणार नाही याची खबरदारी त्यांचे प्रचारक किंवा पदाधिकारी घेत असतात, याची साधी माहिती घेण्याची तसदी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसने घेतली नाही. ही दखल घेणारा कम्युनिस्ट पक्ष काळाच्या ओघात नष्ट झाला आणि ती प्रक्रिया झपाट्याने व्हावी याची सर्व तयारी प्रस्थापित पक्षांनी केली. त्यासाठी सर्वजण एकत्र आले. त्यांच्या कर्माने ते मरणारच होते. पण त्यांच्या मृत्युबरोबर एका जागल्याचाही मृत्यू झाला.

नरेंद्र मोदी यांनी ‘ज्योतीपुंज’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. याचं मराठी भाषांतर रवींद्र दाणी यांनी केलेलं आहे. हे पुस्तक म्हणजे संघ स्वयंसेवकांना परमपूज्य असलेल्या मा. स. गोळवलकर गुरुजींच्या ‘देदिप्यमान’ आयुष्याचा मागोवा आहे. १९२८ साली कॉलेजचं पदव्युत्तर शिक्षण संपवलेले गुरुजी १९३९ सालापर्यंत शिक्षक होते. बनारस हिंदू विश्वविद्यापीठात शिकवत असताना त्यांना गुरुजी हे बिरूद दिलं गेलं. ते या काळात जाणिवपूर्वक स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त राहिले. १९४० साली ते सरसंघचालक झाले तरीही ते स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित झाले नाहीत. त्या काळात ते संघाच्या प्रचाराचं, संघटना बांधण्याचं काम करत होते, परंतु ‘चलेजाव’ चळवळ किंवा त्या काळात चालणार्या कोणत्याही स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांचा सहभाग नव्हता. संघाचे लोक ही बाब जाणिवपूर्वक नजरेआड करतात आणि त्यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दल, त्यांच्या ओजस्वी विचारांबाबत बोलतात. त्यावर नरेंद्र मोदी यांची ‘ज्योतीपुंज’ ही कडी आहे. या पुस्तकाला डॉ. मोहनराव भागवतांची प्रस्तावना आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातीत लिहिलेल्या या पुस्तकाचं काँग्रेसच्या लोकांनी अवलोकन केलं असतं तरी त्यांना भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज आला असता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना रा. स्व. संघ म्हणजे काय हे चांगलं कळतं. ते पुण्यात राहिलेले आहेत. परंतु ते त्या संघटनेला गंभीरपणे घेत नाहीत. त्यांना कदाचित असं वाटत असावं की या संघटनेची, त्यांच्या अर्ध्या चड्डीची खिल्ली उडवून त्यांना नेस्तनाबूत करता येईल. त्यांनी पुन्हा एकदा टिळक-फुले यांच्यातील वादविषय काय होता, या संघटनेची नाळ कुठे आणि कशी बांधलेली होती हे वाचलं पाहिजे आणि पुन्हा एकदा समजावून घेतलं पाहिजे.

काँग्रेसच्या तंबूत साराच आनंद आहे. तिथे राहुल गांधी यांचे गुरू पृथ्वीराज चव्हाण आहेत. हे म्हणजे, उंटाच्या लग्नात गाढवाने मंगलाष्टकं म्हणायची आणि त्यात गाढवाने उंटाच्या दिसण्याचं कौतुक करायचं आणि गाढवाच्या गाण्यांचं उंटाने कौतुक करायचं असा प्रकार आहे. राहुल गांधी यांना हा देश कशाशी खातात हे माहीत नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांना तर तो त्याहूनही माहीत नाही. महाराष्ट्र तर दुरान्वयानेही माहीत नाही. त्यांचे वडील दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण यांनी त्यांची पहिली निवडणूक संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकिटावर लढवलेली होती. त्यानंतर ते महाराष्ट्रात फारसे येतच नसत. त्यांना निवडून आणणं ही जणू यशवंतराव चव्हाण यांचीच जबाबदारी होती. त्यांच्या निधनानंतर प्रेमलाकाकी चव्हाण लोकसभेत निवडून जात. त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्त केलं गेलं होतं. तिथे असताना त्या वसंतदादांना जितका त्रास देता येईल तेवढा देत असत. त्या काळात पृथ्वीराज चव्हाण राजकारणात नव्हते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, त्यांची राजकीय भूमिका काय, त्यांची उद्दिष्टं काय याची सुतराम कल्पना नाही. हा विषय त्यांच्या आयटीचा भाग नाही. त्यांना एकच शत्रू माहीत आहे, तो म्हणजे शरद पवार. त्यांना नेस्तनाबूत करणं हे आपलं जीवनकार्य असं समजून ते महाराष्ट्रात काम करत होते. ते करताना त्यांना आपला पक्ष जगवला पाहिजे याचंही भान राहिलं नाही.

नरेंद्र मोदींनी दिलेली ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा खरी करून दाखवण्याची जबाबदारी जणू आपल्यावरच आहे अशाप्रकारे काँग्रेस पक्ष सध्यातरी वागताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे अशा राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा तत्सम छुटमुट पक्षांची वाटचाल आपण कोणत्या पक्षात जावं याचा विचार करण्याच्या मार्गावरून चाललेली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शरपंजरी पडलेला पक्ष अशा स्थितीत आहे. भारतीय जनता पार्टीला ठामपणे विरोध करून त्यांचा जमिनीपासून दशांगुळे वर उचलला गेलेला रथ जमिनीवर आणण्याची कुणाची तयारी आहे असं चिन्ह सध्या तरी दिसत नाही.

मॅडिसन स्क्वेअर पाठोपाठ ऑस्ट्रेलियात नरेंद्र मोदींनी दिग्विजय मिळवलेला आहे. आता युरोपची भूमी पादाक्रांत करायची बाकी आहे. तिथले गुर्जर बांधव कामाला लागलेही असतील. एका गुजराती बनियाने आपल्या हातातून काँग्रेस हिसकावून घेतली म्हणून स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपा या अपत्याचं पितृत्व आपतः गुजरातकडेच गेलं हा काव्यगत न्याय की विधिलिखित याचा विचार करण्याची गरज आता संघाच्या अध्वर्युंना राहिलेली नाही आणि काँग्रेसला तर विचार करायची सवय राहिलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *