समाजरचनेचा हा नियम किती लोक पाळतात? निसर्गनियमानुसार माणूस फक्त स्वतःचा असतो. स्वतःपुरता असतो. तो फक्त स्वतःच्याच प्रेमात विरघळून गेलेला असतो. पण त्याला जगायला भोवती माणसांचीही गरज असतेच. त्यासाठी तो मग गरजेपुरतं प्रेमाचं सोंग आणतो. जेवढी गरज लघु-दीर्घ, तेवढंच प्रेमही लघु-दीर्घ. (माणूस निसर्ग नियमानं गरजेपुरतं प्रेम करतो, समाजनियमानं विरघळून जाणारं कायमचं प्रेम करत नाही.) गरज संपली की प्रेमाचा शेवट. माणसाच्या या नैसर्गिक गुणधर्मामुळं माणसं एकमेकांपासून दुखावतात. एकमेकांवर पूर्ण, शेवटपर्यंतचा विश्वास ठेवत नाहीत आणि सतत मग समाजरचनेनं सांगितलेल्या विरघळत्या प्रेमाच्या शोधात राहतात. पस्तिशीत माणसाला विशिष्ट एकटेपणा येतो, त्यावेळी त्याला प्रेमाची गरज वाटते आणि तो व्यभिचारासाठी त्यावेळी जोरात उद्युक्त होतो. प्रेमाचा शोध माणसाला व्यभिचाराकडं वळवतो.

नवराबायकोच्या नात्यात तर एकमेकांना प्रत्यक्ष दुखावणं खूप वेळा घडतं. नवरा हा नवरा होताना आणि बायको ही बायको होताना एकमेकांबद्दल जी एकमेकांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक गूढं असतात, ती पस्तिशी येईयेईपर्यत संपून जातात. दोघांना एकमेकांचा आतून बाहेरून पूर्ण परिचय झालेला असतो. एकमेकांकडची गूढं संपलेली असतात आणि स्वतःला विसरायला तर माणसाला गूढं हवी असतात. ती एकमेकांकडची संपल्यामुळंही एकमेकांचा कंटाळा येतो आणि माणूस नव्या गूढांच्या शोधात निघतो. त्यातून मग किमान मानसिक आणि जमलं तर प्रत्यक्ष शारीरिक व्यभिचार घडतो. पण या व्यभिचारात आणखी एक खोल मुद्दा असतो. माणूस स्वतःच्याच मानसिक अथवा शारीरिक व्यभिचारामुळंही स्वतःच दुखावतो. समाजरचनेनं शिकवलेला प्रेमाचा नियम त्याला एवढा पाठ असतो की, व्यभिचार (मानसिक अथवा शारीरिक) करताना त्याला वाटतं की, आपल्याला योग्य प्रेम मिळालं नाही, म्हणूनच आपल्याला व्यभिचार करावा लागतोय. कोणताही व्यभिचार माणसाला प्रेमाचं पूर्ण समाधान देऊ शकत नाही. आपली प्रेमाची भूक भागत नाही म्हणून आपण व्यभिचार करतोय, या माणसाच्या म्हणण्यात भूक न भागण्याचं शल्य असतं. ते त्याला बोचत राहतं. वर व्यभिचार हे पाप असतं असा एक समाजरचनेच्या नियमाचा पगडा माणसाच्या मनावर असतोच, ही आणखी एक गोळ. तिच्यामुळंही कुणीही माणूस व्यभिचाराचा निर्भेळ, पूर्ण मुक्त असा आनंद घेऊ शकत नाही. एका बाजूला मन दुखावलेलं असल्यानं व्यभिचाराचा, दुसर्या आधाराचा ओढा तर असतो, पण त्याचवेळी व्यभिचार हे पाप आहे ही बोचणीही असते न् त्या ओढ्यात आणि बोचणीत मध्येच अडकून माणसाच्या मनाचा गोंधळ उडतो. आपण करतोय ते चूक की बरोबर असा कल्ला त्याच्या मनात होतो. व्यभिचार करणारा कोणताही माणूस पूर्ण मोकळ्या मनानं तो कधीच करत नाही. त्यामुळे व्यभिचाराचा आयुष्याच्या अंतिम टोकापर्यंतचा आनंद माणसाला कधीच घेता येत नाही. हा माणसाचा पस्तिशीत होणारा निसर्गनियम आणि समाजनियम यांच्यात होणारा भरडा.

पुन्हा आणखी एक दुखावणं असतं. व्यभिचार पूर्णत्वाला गेला की, त्यातंलही गूढत्व संपतं. म्हणजे नवराबायकोच्या नात्यात अतिपरिचयामुळे जे जे घडतं, ते सगळं व्यभिचारातल्या स्त्रीपुरुषांच्या नात्यातही घडतंच. एकमेकांना एकमेक माहीत होतात. कळतात आणि माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीने मग त्यातही एकमेकांचा कंटाळा येऊ लागतो आणि माणूस पुन्हा नव्या व्यभिचाराकडं वळतो. पहिल्या व्यभिचारात दम राहिला नाही, आपल्याला जे वाटलं होतं, व्यभिचारातलं गूढ टिकेल, तसं झालं नाही, याने तर माणूस स्वतःशीच दुखावतो, पुन्हा एक व्यभिचार सोडून आणखी दुसरा व्यभिचार करावा लागतोय यानंही दुखावतो. पुन्हा जर ते व्यभिचार फुटले तर मग माणसाच्या दुखावण्याला सीमा राहत नाही. म्हणजे माणूस सुखावण्यासाठी व्यभिचार (मानसिक अथवा शारीरिक) करतो, पण प्रत्यक्षात व्यभिचार ही दुखावण्याची (स्वतःच दुखावण्याची) मालिका ठरते आणि म्हणूनच व्यभिचार करणारी माणसं व्यभिचाराचा आनंद घेत असूनही दुखावलेलीच दिसतात. पस्तिशीच्या माणसांची तोंडं ओढल्यासारखी दिसतात, चिडचिडल्यासारखी दिसतात आणि पस्तिशीत माणसाचा भांडकुदळपणा वाढतो यामागचं खरं कारण माणसाला (मानसिक अथवा शारीरिक) व्यभिचारातून आलेलं दुखावलेपण हे असतं.

थोडक्यात व्यभिचारानं इतर माणसं दुखावण्यापेक्षाही माणूस स्वतःच्या स्वतःच जास्त दुखावतो आणि मृत्यूची भीती घालवायला तो जे इतर शरीरांचं गूढत्व शोधायला निघतो ते काही त्याला पूर्णपणाने मिळत नाही. त्याला मग सतत अधुरेपण, अपुरेपण जाणवायला लागतं. (आणि भविष्यात तर लैंगिक उर्मीही संपते.) अशी माणसं मग जास्त जोरात व्यसनं, देवधर्म आणि करमणुकी यांऌच्या मागे लागतात. पण त्यातूनही माणसाला पूर्णत्वाला जाणारं समाधान मिळत नाही. त्यातून मग माणूस सगळं आयुष्य अधुरेपण, अपुरेपणाच्या भावनेनंच काढतो. (त्या भावनेवर मात करण्यासाठी पुन्हा देवधर्म, व्यसनं, भांडणं, करमणुकी यांचाच आधार घेत राहतो.) अधिकाधिक एकटा पडत जातो. माणसांपासून तुटत जातो. माणूस मनाने जगतो, पण जगायला मन इतर माणसांमध्ये गुरफटलेलं असावं लागतं, ते तसं गुरफटण्याऐवजी माणूस मनाने एकटा एकटाच होत जातो आणि अशा जगण्याला मग काही अर्थ राहत नाही. जगणं वाया जातं.

१५.

या सगळ्या भानगडी आयुष्यात घडू नयेत, म्हणून याला एकच इलाज आहे. माणूस स्वतःवर प्रेम करण्याऐवजी इतरांवर प्रेम करायला शिकला पाहिजे. दुसर्यावर स्वतःचं अस्तित्व, आयुष्य विरघळून जाण्याइतकी निरपेक्ष श्रद्धा ठेवायला माणूस शिकला, तर त्याच्या आयुष्यात नैसर्गिक आणि मानवी अशी कोणतीच समस्या येणार नाही. माणूस मग मृत्यूला घाबरणार नाही. माणूस मग छंदीफंदी, व्यसनी, मतभेदी, भांडकुंदळ, व्यभिचारी, असमाधानी, असुखी होणार नाही. माणूस मग पंधरा ते वीस आणि पस्तीस ते चाळीस (आणि त्याच्या आसपास) या वयात जो संभ्रमतो, गोंधळतो, चूक-बरोबर काय ते ठरवू शकत नाही, इतरांना दुखावत जातो न् स्वतःही दुखावत जातो, तेही पूर्णपणे बंद होईल. माणूस आयुष्याचा पूर्ण सुखी होईल.

फक्त त्यासाठी त्याने स्वतःवर प्रेम करण्याऐवजी इतरांवर मनापासून, निरपेक्ष, खरं प्रेम केलं पाहिजे. ते आताच्या मनुष्यजातीला अवघड असलं तरी भविष्यातल्या पिढ्यांना जमेल असं वाटतं. कारण माणूस हा स्वतःचं शिक्षण स्वतःकडून घेणारा प्राणी आहे आणि एखाद्या गोष्टीचे संस्कार व्हायला त्याला हजारो वर्षं लागतात. कधी ना कधी इतरांवर खरं आणि निष्ठावान प्रेम करायला शिकेलच तो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *