भारतीय लग्नव्यवस्थेनुसारसुद्धा एका माणसाचं लग्न ठरवताना त्याला अनेक विजातीय व्यक्ती दाखवल्या जातात. त्यातली एक पसंत करायला सांगितली जाते. माणूस प्रत्येक पाहिलेल्या व्यक्तीची काही ना काही कल्पनाचित्रं मनाशी रंगवतोच. हासुद्धा व्यभिचाराचाच एक प्रकार. कुणा फक्त एकाच व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडलाय, कुणा फक्त एकाच व्यक्तीला पसंत केलंय आणि तिच्याशीच मनानं आणि शरीरानं माणूस रत झालाय, असं सहसा कुठल्याच माणसाचं घडत नाही. अनेक व्यक्तींशी मानसिक खेळ केल्यावरच माणूस आपल्याला हवी ती व्यक्ती निवडतो किंवा त्याला ती मिळते. हा मानसिक व्यभिचारच आहे. ही कथा माणसाऌच्या लैंगिक वयाऌच्या प्रारंभिक काळात घडते. मग शारीरिक पातळीवरची एक विजातीय व्यक्ती आपली आपल्याला गवसली तरी दुसर्या विजातीय व्यक्ती आवडणं थांबत नाही. त्यांच्याबरोबरचे मानसिक खेळही थांबत नाहीत. ते चालत राहतात. भारतीय समाजव्यवस्था अशा मानसिक खेळांना परवानगी देत नाही. ती त्या गोष्टींना पाप, प्रतारणा समजते. प्रत्यक्ष शारीरिक पातळीवर उतरलेले प्रतारणेचे खेळ तर दुष्कर्म आणि गुन्हा म्हणूनच गणले जातात आणि ते उघड झाले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षाही आहेत. शारीरिक खेळ उघड होण्याची थोडीफार तरी शक्यता असते, पण मानसिक खेळ उघड होण्याची शक्यता अतिशय पुसट असते आणि या नैसर्गिक मानसिक खेळांना पायबंद घालायची काहीही प्रत्यक्ष सोय समाजव्यवस्थेत सध्या तरी नाही. समाजव्यवस्था निष्ठेचे संस्कार चारही बाजूंनी माणसावर करते, पण संस्कारांवर निसर्ग मात करतो. निसर्ग याबाबतीत प्रभावी ठरतो.

पण हेही खरं की, मानसिक असो वा शारीरिक, समाजव्यवस्थेचं व्यभिचाराच्या बाबतीत माणसावर प्रचंड दडपण असतं. समाजात व्यभिचारी माणसाला प्रतिष्ठा नसते न् विविध प्रकारची अवहेलना भोगावी लागते. माणूस नात्यांच्या जीवावर जगतो आणि व्यभिचार उघड झाला तर नाती विस्कळित होतात. माणसाला तीही भीती वाटते. त्यामुळं समाजाच्या दबावाखाली बहुतेक माणसं प्रत्यक्ष व्यभिचार करायचं टाळू पाहतात. इथं निसर्गाला समाज थेट आडवा उभा राहतो.

पण व्यभिचार टाळण्यात माणूस यशस्वी होतोच असं नाही. तो मग समाजाला लपवून व्यभिचार करतो. समाजाच्या दबावामुळे माणसाच्या मनातलं प्रत्यक्ष व्यभिचाराचं गूढ खूप वाढतं आणि माणसाला तर गूढाचं आकर्षण असतं. तीही त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच असते. (म्हणून तर गेल्या लाखो वर्षात माणसाचा मेंदू तुफान विकसित झालाय आणि म्हणूनच माणसानं कित्येक शोध लावलेत.) त्यातच भारतीय संकेतानुसार तारुण्यानंतर स्त्रीपुरुषांनी एकमेकांपासून लांबच राहायचं असतं. समाजाने मान्यता दिलेल्या कुणाही दोघा स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी खाजगी मानसिक आणि शारीरिक संबंध ठेवायचे असतात. बाकीच्या स्त्रीपुरुषांनी एकमेकांना परकं राहायचं असतं. एकमेकांपासून शरीरं आणि मनं दडवायची असतात. त्यामुळे मग परक्या स्त्रीपुरुषांत एकमेकांबद्दल मानसिक, शारीरिक गूढंही निर्माण होतात. त्याही गूढांचं आकर्षण असतंच लोकांना. ही असली गूढं माणूस आयुष्यभर अखंड बाळगतो. (विजातीय परक्या व्यक्तीच्या कपड्यांऌच्या आतलं शरीर कसं असेल, ती व्यक्ती लैंगिक वर्तणुकीत कशी असेल, ही काही साध्या गूढांची उदाहरणं.) आणि तशात पस्तिशी येते तेव्हा माणूस आपल्या अस्तित्वाला घाबरून, स्वतःला विसरायला काही गूढ शोधायच्या जास्त तयारीत असतो न् त्याला वास्तवात, प्रत्यक्षात जवळपासच असलेल्या या विजातीय गूढाचा आधार घ्यावासा वाटतो. मिळाला तर माणूस तो घेतोही, नाही तर त्या गूढाच्या मानसिक खेळात रमतो.

१४.

पण इथंच माणसाच्या अंगात मुरलेली समाजव्यवस्था आणि माणसाच्या अंगातला निसर्ग यांचा संघर्ष सुरू होतो आणि माणसाच्या मनातला गोंधळ सुरू होतो. इथंच काही प्रश्नही निर्माण होतात. पस्तिशीच्या काळात सहसा प्रत्येक माणसाला आपला एक लैंगिक जोडीदार समाजमान्येतनं उपलब्ध असतो. मग आपली पस्तिशीतली सगळी गूढं तो त्याच एका जोडीदारावर का भागवून घेत नाही? किंवा खरं तर लैंगिक बाबतीत त्याला तसं अनुभवातनं सगळं कळलेलं असतं, तर मग तो त्याचं परकं, आणखीचं आकर्षण का बाळगतो? आणि मुळात आकर्षण नैसर्गिक असलं तरी त्याला मग गोंधळायला का होतं? आपण अस्तित्वात आहोत, आपलं आयुष्य स्थिर आहे, हे कळायला माणसाला समागम हवा असतो आणि मानसिक, शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्याला हा समागम हवा असतो, तर माणूस ते दोन्ही समागम आधीच उपलब्ध असलेल्या जोडीदाराशीच नुसते का करत नाही? तो दुसर्या जोडीदाराच्या मोहात का पडतो?

आपल्याला उपलब्ध असलेल्या लैंगिक जोडीदारापेक्षा आणखी वेगळ्या जोडीदाराच्या मनानं मोहात पडणं किंवा शरीरानं तो मोह अंमलात आणणं याला व्यभिचार म्हणून ओळखलं जातं. (अर्थात व्यभिचार हा समाजाचा शब्द, निसर्गाच्यादृष्टीनं ती फक्त लैंगिक कृती.)

मुद्दा असा आहे की, मानसिक, लैंगिक, बौद्धिक आणि पोटाची भूक भागवायची आधीची सोय असताना माणूस व्यभिचारी का होतो? त्याबाबतीत समाजाचे नियम गुंडाळून ठेवून तो गुपचूप का होईना व्यभिचाराचा नैसर्गिक मार्ग का धरतो? आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पस्तिशीत त्याची ही व्यभिचाराची ओढ का वाढते?

या प्रश्नाला अनेक कारणं आहेत. त्यातली काही अंशीः एक, माणसाला मृत्यूबद्दलची वाटणारी भीती. त्या भीतीतून सातत्याच्या समागमांची अस्तित्ववादी गरज. दोन, तारुण्यागत गूढाऌच्या, उत्सुकतेच्या नशेत स्वतःला हरवण्याची इच्छा. तीन, निसर्गाकडून वयात आल्यापासून मिळालेले व्यभिचाराचे संस्कार. चार, समाजनियमांनी बंदी घातलेल्या विषयांचं आकर्षण. पाच, पस्तिशीत मनाला आलेलं रितेपण. सहा, तोवर आयुष्यात आलेल्या सर्व मानसिक, बौद्धिक, शारीरिक अनुभवांचा तोच तोपणाचा आलेला कंटाळा. सात, अतिशय महत्त्वाचं कारण, माणसांनी माणसांना, एकमेकांना दुखावणं आणि त्यातून भोवतीच्या माणसांबद्दल निरिच्छा आणि तरीही जगायला माणसांचा आधार लागतो म्हणून, मानसिक आधारासाठी शोधलेली नवी माणसं. (आणि मानसिक आधार म्हणून काय देणार, घेणार? तर त्यासाठी पुन्हा शरीर हेच माध्यम वापरलं जातं.)

या कारणांमध्ये अनेकानेक उपकारणं आहेत. आतापर्यंत आपण जे इथं मांडलंय त्यातही काही कारणं, उपकारणं सापडतील. पण मला इथल्या मुख्य सहाव्या कारणांविषयी प्रामुख्याने बोलायचंय.

माणूस माणसाशिवाय जगू शकत नाही ही अतिशय सत्य गोष्ट आहे, पण माणूस माणसाला खपवूनही घेत नाही, हीसुद्धा जबरदस्त सत्य गोष्ट आहे. माणसाचं प्रेम म्हणजे काय? तर इतर माणसांचा गरजेपुरता वापर. मला नाही वाटत, माणूस अजून खर्या प्रेमाला आलाय म्हणून. माणूस कुणावरच प्रेम करत नाही, स्वतःवरच प्रेम करतो, पण बाकीच्या सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करावं मनापासून अशी जोरदार अपेक्षा मात्र ठेवतो. माणसाचं प्रेम हे प्रेम नसतं, तर देण्याघेण्याचा एक व्यवहार ठरतो. जगात असा एकही माणूस सापडत नाही, जो दुसर्यावर निरपेक्ष, कसलीही अपेक्षा नसलेलं प्रेम करील! अपेक्षेशिवाय प्रेम नाही. अपेक्षा पूर्ण करा, प्रेम मिळेल. अपेक्षा संपल्या की प्रेम संपलं.

मला वाटतं, माणसाची ही जी प्रवृती आहे, ती जगात व्यभिचार वाढवते.

मला असंही वाटतं की, माणसं माणसांशी निरपेक्ष प्रेमानं वागली तरी जगात व्यभिचार घडणार नाही.

मग मला आणखी असंही वाटतं की, माणसाच्या मनात जोवर मृत्यूची भीती आहे, स्वतःच्या अस्तित्वाची भीती आहे तोवर माणूस स्वतःसोडून दुसर्यावर कधीही निरपेक्ष प्रेम करू शकणार नाही.

माणसाला मृत्यू येणारच ही नैसर्गिक सत्याची बाब आहे. हा मृत्यू यायचा तेव्हा येईल, पण तो येईपर्यंत माणूस सुखानं जगला पाहिजे. यासाठी माणसांची समाजरचना तयार झाली. समाजरचना म्हणजे माणसानं माणसाशी प्रेमानं गुंफलेली साखळी. (यात नुसतं शरीर नाही, तर मनमुख्यतः गृहीत धरलेलं आहे आणि लैंगिक प्रेमाशिवायसुद्धा इतर सर्व प्रकारच्या श्रद्धा, आस्था, माया या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत.) ही प्रेमाची साखळीच माणसाला जगवायला, तगवायला उपयोगी आहे असा समाजरचेनाचा धडा आहे आणि प्रेमासाठीसुद्धा समाजरचनेनं नियम तयार केलेले आहेत.

 

निसर्ग पे्रमबिम काही जाणत नाही. पण माणसानं निसर्गावर मात करण्यासाठी प्रेम नावाचं हत्यार तयार केलं. ते वापरूनच माणसाच्या जगानं जगण्याचा आजवरचा प्रवास केला, निसर्ग बर्यापैकी जिंकला, ताब्यात घेतला. पण समाजरचनेला या पद्धतीच्या प्रेमाची अपेक्षा आहे, तिथपर्यंत माणूस अजून पोहोचलेला नाही. माणसात आज प्रेम आहे, पण ते निसर्गनियमानुसार फक्त स्वतःवरचं आहे, दुसर्यावर प्रेम करायला अजून माणूस शिकायचाय.

आपण इथं मुद्दा सोपा करायला नवरा-बायको हे नातं घेऊ. (अर्थात जगातली सर्वच नाती या मुद्यात घेता येतील.) समाजरचना या नवराबायकोच्या नात्याबद्दल असं सांगते की, या दोघांचं आयुष्य पूर्ण सुखी, समाधानी, आनंदी, मृत्यूच्या भीतीपासून दूर असं जायचं असेल, तर या दोघांनी एकमेकांवर परिपूर्ण असं प्रेम केलं पाहिजे. नवर्यानं बायकोवर आणि बायकोनं नवर्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, माया केली पाहिजे. एकमेकांच्या प्रेमात पूर्ण विरघळून गेलं पाहिजे. मन, मेंदू, शरीरानं फक्त एकमेकांचं असलं पाहिजे.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *