आपल्या सोशल नेटवर्किंग प्रोफाइलवर आपण अनेक फोटो अपलोड करत असतो. आपल्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींनी तो पहावा, त्या फोटोला खूप लाइक्स मिळावेत असं नेटिझन्सला नेहमीच वाटतं. परंतु या फोटोंचा दुरुपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीची काही माणसं करतात आणि आपल्याला याचा नुसता मनस्ताप होतो. याचं प्रत्यंतर मुंबई, नागपाडामधल्या सिल्व्हीला आलं.

 

 

सोशल नेटवर्किंग प्रोफाइल प्रायव्हेट नसतो!

माहिती-तंत्रज्ञानाचा खरा फायदा कोणी घेतला असेल तर तो सोशल नेटवर्किंग साइटने. यावर अनेक प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध असतेच परंतु सोशल नेटवर्किंग साइटमुळे आपण कुठल्याही देशातील व्यक्तिशी ऑनलाइन मैत्री करू शकतात. क्षणात आपण माहितीची देवाण-घेवाण करू शकतो. ही माहिती मल्टिमीडिया स्वरूपात असल्यामुळे ती आपण स्टोअरही करून ठेवू शकतो. या माहिती-तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साइटवरून अनेक गोष्टींची देवाण-घेवाणही सतत सुरू असते. हल्ली तर राजकीय नेते आणि पक्षही सोशल नेटवर्किंगचं साहाय्य घेताना दिसून येतात. सोशल नेटवर्किंगच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक लोकांशी आपण संवाद साधू शकतो. या सगळ्या जमेच्या बाजू असूनही आज सर्वात जास्त सायबर गुन्हे हे सोशल नेटवर्किंग साइट्स या माध्यमातून होताना दिसून येतात. याचं एक कारण की, आपला ऑनलाइन प्रोफाइल हा प्रायव्हेट नसून पब्लिक असतो हेच मुळी अनेकदा आपण विसरून जातो. आपली वैयक्तिक माहिती आपण फेसबुकसारख्या साइटवर टाकतो, फोटो, व्हिडीओही आपण शेअर करतो. ते ऑनलाइन पाहिले जातात, त्यावर कॉमेंट केली जाते. परंतु या फोटोंचा दुरुपयोगही कोणीतरी करू शकतो ही शक्यतादेखील आपण विचारात घेतली पाहिजे. शेवटी आपला प्रोफाइल  प्रायव्हेट नसून पब्लिक असतात.

सिल्व्हीलाही इतरांसारखंच आपला सोशल नेटवर्किंग प्रोफाइल हा केवळ आपल्या फें्रडसाठीच आहे असं वाटत होतं. २५ वर्षीय सिल्व्ही एका ख्रिस्ती सामाजिक संस्थेमध्ये काम करत होती. आपल्या कामात तिला रस होता. नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये कामात असताना तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिने सिल्व्हीला सांगितलं की, ‘तिच्या फेसबुक प्रोफाइलवरचा फोटो हा तिचा न्यूड फोटो आहे. सिल्व्हीला मैत्रीण काय बोलत आहे तेही नीट कळेना. आपला न्यूड फोटो हे ऐकूनच तिला धक्का बसला होता, ती घाबरलीसुद्धा होती. मात्र स्वतःला सावरत आपण कधी कुठला फोटो अपडेट केला हे  आठवण्याचा ती प्रयत्न करू लागली.

सायबर गुन्ह्याची तक्रार व्हायलाच पाहिजे

खात्री करण्यासाठी सिल्व्हीने लॉगिन करून आपला फोटो पाहिला, तेव्हाच कोणीतरी आपल्याला त्रास देण्यासाठी असं केलं असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळे आपला प्रोफाइल आणि फोटो खराब करणार्याला पकडायच्या उद्देशाने तिने सायबर पोलीस स्टेशन गाठलं. खरंतर सायबर गुन्हे जितक्या प्रमाणात होतात, तितक्या प्रमाणात त्यांच्या तक्रारी दाखल होत नाहीत असं दिसून येतं. सिल्व्हीने मात्र गुन्हेगाराला पडण्यासाठी तक्रार केली.सायबर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी प्रथम फेसबुक या कंपनीला संपर्क करून सिल्व्हीचा प्रोफाइल डिलीट करायला सांगितला. त्यानंतर तो फोटो जिथून अपडेट झाला तो आय.पी. अॅड्रेस मागून घेतला. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरवरून त्या आय.पी.चा पत्ता शोधून काढला. तो पत्ता नेमका दक्षिण मुंबईमधील एका ख्रिस्ती शाळेचा निघाला.

वड्याचं तेल वांग्यावर!

पोलिसांनी त्या शाळेला त्वरित भेट दिली. तिथे त्यांना समजलं की ज्या इंटरनेट डेटा कार्डचा तो आय.पी. अॅड्रेस होता, तो त्या शाळेत आधी काम करत असलेल्या परेरा बाईंना दिलेल्या कार्डचा होता. लगेचच शाळेतून पत्ता घेऊन पोलीस त्या परेरा यांना भेटायला गेले. तिथे गेल्यावर त्यांना कळलं की, ते डेटा कार्ड त्या परेराबाईंचा होणारा जावई राहुल वापरतो म्हणून. पोलिसांनी त्वरित राहुलला ताब्यात घेऊन त्याची कसून चोकशी केल्यावर कळून आलं की, आपल्या सासुबरोबर काही किरकोळ कारणावरून वाद झाल्याने तिला बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याने अनोळखी सिल्व्हीचा प्रोफाइल फोटो खराब केलेला होता. इथे राहुल आणि त्याच्या सासुमधल्या किरकोळ वादाचा त्रास मात्र सिल्व्हीला झाला. काही एक संबंध नसताना राहुलने केवळ सासुला त्रास देण्य्याच्या उद्देशाने सिल्व्हीचा खराब केलेला फोटो अपडेट करून सायबर गुन्हा केलेला होता.

आपण आपल्या सोशल नेटवर्किंग प्रोफाइलची काळजी घेतलीच पाहिजे; नाहीतर राहुलसारखी माणसं कधी त्याचा गैरफायदा घेतील हे सांगता येणार नाही.

 

सायबर अॅलर्ट

१. गरज असतील आणि सांभाळता येतील एवढेच अकाऊंट सोशल नेटवर्किंग साइटवर उघडावेत.

२. सोशल नेटवर्किंगवर असलेल्या प्रायव्हसी सेटिंग्ज्चा उपयोग करायचा नसल्यास कमीत कमी स्टेटस आणि मल्टिमीडिया अपडेट करा.

३. आपले फोटो अपडेट करताना कमीत कमी साइझचे फोटो वापरा;  जेणेकरून कोणी त्याचा दुरुपयोग करायचा ठरवला तरी करू शकणार नाही.

४. वरचेवर आपल्या प्रोफाइलमधील फोटो, स्टेट्स अपडेट्स गरज नसल्यास डिलीट करा.

५. तुमचा प्रोफाइल हॅक झालाय असं कळल्यास सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा.

पूनम सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *