गेल्या सोमवारी शिवाजी पार्क परिसर राजकीय घडामोडींनी गजबजून गेला होता. कालकथित बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसर्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसहित अनेक राजकीय पक्षांचे नेते आले होते. राजकारणात चाणक्य म्हणून चर्चेत असलेले शरद पवारही सपत्निक येऊन गेले. खरंतर सकाळी लवकर पवार आले तेव्हा उद्धव ठाकरेही तिथे आले नव्हते. मात्र पवार गेल्यानंतर मग बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाच्या साक्षीने अनेक घडामोडी घडू लागल्या. नेहमीप्रमाणे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आले होते. भावुकपणे घोषणा देणार्या या शिवसैनिकांना यानिमित्ताने वेगळाच नजारा पहायला मिळाला. ठाकरेंच्या स्मृतिस्थळी उभारण्यात आलेल्या कुंपणाच्या बाहेर शिवसैनिक होते तर आत येणारे नेते. त्यामुळे आत-बाहेर जे चाललं होतं ते वेगळं होतं. शिवसैनिकांच्या तशाच प्रतिक्रियाही व्यक्त होत होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांना आदरांजली वाहायला आले तेव्हा शिवसैनिक ‘चलेजाव’च्या घोषणा देत होते. या घोषणांना गेल्या दोन-तीन आठवडे चाललेल्या घटनांची पार्श्वभूमी आहे हे उघडच. ज्या पद्धतीने भाजपने राष्ट्रवादीसोबत युती करत शिवसेनेला झुलवत ठेवून अवहेलना केली आहे त्याचा राग शिवसैनिकांना होता. तोच त्यांच्या घोषणांतून निघत होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूलाच बसले. तिथे दोघांनी चर्चा केली, मग शिवसैनिकांच्या सगळ्या घोषणा थांबल्या. याठिकाणीच मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचं ‘उचित’ स्मारक करण्याची घोषणा केली. त्यासाठी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याचंही मीडियाला सांगितलं. मुख्यमंत्र्यांची पाठ वळताच विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी तत्काळ स्मारकाचं काय करायचं ते आम्ही बघू असं म्हणत मुख्यमंत्र्यांना फटकारलं. त्याने शिवसैनिकांना जोर आला आणि ते पुन्हा एकदा घोषणा देऊ लागले.

बाळासाहेबांना आदरांजली वाहायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले तेव्हा मात्र सार्यांनाच धक्का बसला. ठाकरेंच्या पहिल्या स्मृतिदिनाला राज आले नव्हते. मात्र या दुसर्या स्मृतिदिनाला ते आले तेव्हा त्यांचं स्वागतच सगळ्या शिवसेनानेत्यांनी आदरपूर्वक केलं. खरंतर कोणत्याही निमित्ताने हे दोन भाऊ एकत्र आले की वारंवार राजकीय मनोमिलनाच्या चर्चा सुरू होतात. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी हिच्या आजारपणात तिला पहायला उद्धव गेले होते, या दोन भावांची हॉस्पिटलमध्ये भेट झाली तेव्हाही अशीच चर्चा सुरू झाली होती. आता शिवाजी पार्कवरील भेटीचं चित्र मात्र वेगळं होतं. मुळात तो प्रसंग वेगळा आणि भावनिक होता. पण राज आल्यानंतर सगळं चित्रच बदललं. राज आले तेव्हा त्यांचं स्वागत करताना संजय राऊत आणि रामदास कदम या दोन शिवसेनानेत्यांत तर स्पर्धाच लागली होती. राज ठाकरे यांच्यासोबत हात मिळवण्यासाठी सगळे रांग लावून उभे होते.

स्मृती उद्यानाची पाहणी करून राज आपल्या सहकार्यांना काही सूचना देत होते. त्यानंतर उद्धव यांच्या बाजूलाच राज यांना बसवण्यात आलं. उद्धव यांच्या खुर्चीमागे हात ठेवत राज रेलून बसले. मग तिथे गप्पा, विनोद रंगले. त्या दोघांच्या आगेमागे उभं रहाण्यासाठी इतरांची मात्र अहमहमिका लागली होती. या गप्पांत सगळेच सहभागी होण्याचाही प्रयत्न करत होते. यातच जसरा नावाचे एक गृहस्थ पुढे झाले. जसरा हे ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत. ठाकरेंशी संबंधित सगळं प्रिंटिंग त्यांच्याकडेच असतं. त्यांनी उद्धव आणि राज यांच्या मधली खुर्ची मिळवली, दोघांचे हात एकमेकांच्या हातात देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतर जसरा यांना बाजूला करत त्या मधल्या खुर्चीवर स्वतः संजय राऊत जाऊन बसले. लग्नात जसं फोटोसेशन असतं तसं मग फोटोसेशन सुरू झालं. कॅमेर्यांचा लखलखाट, वाहिन्यांचा लाइव्हखेळ सुरू झाला. हा सगळा प्रकार कुंपणाबाहेरचे शिवसैनिक थंड डोळ्यांनी पहात होते. काय होतंय याचा अंदाज घेत होते.

ठाकरे बंधू एकत्र येणार याबाबतच्या ब्रेकिंगन्यूज सुरू झाल्या. रात्री सगळ्या चर्चा याच विषयावर. सोशल मीडियावर हीच पोस्टिंग. ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हा जणू महाराष्ट्रासमोरचा गहन विषय झाला आहे. हे दोघंही आपल्या या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं सांगत असताना चर्चा काही थांबत नाहीये. खरंतर ठाकरे बंधुंचे स्वतंत्र राजकीय पक्ष आणि स्वतंत्र वाटचाल आहे. हेखरंय की शिवाजी पार्कवर तेएकत्र येताना सगळ्यांनी पाहिलं तेव्हा या दोघांचीही बॉडीलँग्वेज काही वेगळी होती. निवडणुकांच्या प्रचारांतील कटुता आता कुठे दिसत नव्हती. अर्थात या सगळ्याची कारणं वेगळी आहेत. सत्तेच्या राजकारणात झालेली पिछेहाट या दोघांना हसतखेळतगप्पा मारायला भाग पाडणारी ठरली आहे.

शिवसेना किंवामनसे या ठाकरे बंधुंच्या दोन्ही पक्षांना या निवडणुकीत चांगलाच धडा मिळाला. भाजप सोबत काय धोरण घ्यावं याबाबत संभ्रमात असलेल्या उद्धव यांची नंतर भाजपने संभावनाच केली. भाजप-राष्ट्रवादीने खेळी करत शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला.सत्तेपासून दूर असलेल्या शिवसेनानेत्यांना विरोधी पक्षात बसण्यासाठी मानसिकता बनवताना खूप उशीर झाला. काही असो, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बाबतच्या बातम्यांना नेहमीच चांगला टीआरपी मिळतो. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पहिल्यांदाच ६३ जागा मिळाल्या आहेत. खरंतर शिवसेनेला सत्तेच्या जवळ नेईल असा कौल मात्र त्यांना महाराष्ट्रातील जनतेने दिला नाही. तर राज ठाकरे यांचं मतदारांनी काय भजं केलं ते वेगळं सांगायला नको. एवढं होऊनही या दोघांना वाहिन्या आणि चॅनेल्सच्या बातम्यांत मात्र अग्रक्रम असतो. माल विको न विको दोन्ही दुकानांची जाहिरातच मोठी होत असते. मीडिया कंपनीला सगळ्यात आवडती बातमी म्हणजे ठाकरे ब्रदर्सच्या मनोमिलनाची.

आता पुढची दोन वर्षं म्हणजे मुंबई महापालिकेचीनिवडणूक येईपर्यंत अशाच बातम्या येत रहाणार. या निवडणुकीत जर एकत्र आले नाहीत तर पवारांनी भाकीत केल्याप्रमाणे मध्यावधी निवडणुका होईपर्यंत हा खेळ रंगेलच. यात शिवसैनिक आणि मनसैनिक मात्र काय घोषणा द्याव्यात या गोंधळाने बेजार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *