नुकताच बालदिन झाला. घराघरातील बच्चेकंपनीला आईवडील आजी-आजोबांकडून पुष्कळ गिफ्टस् मिळाली असतील. तसंच अनेक कलावंत आणि खेळाडूंनी आपली सामाजिक बांधिलकी दर्शवण्यासाठी अनेक अनाथाश्रमांना भेट देऊन त्या मुलांबरोबर वेळ घालवला असेल. हा आता दरवर्षीचा रिवाजच झाला आहे. परंतु समाजातील अतिगरीब वर्गातील मुलांना बालदिन अशाप्रकारे साजरा करायला मिळतोच असं नाही. याचसाठी या मुलांना आपली कला सादर करण्याची संधी यंदा मिळत आहे ‘स्लम थिएटर’ या उपक्रमाच्या माध्यमातून…

वेगवेगळ्या स्तरातील सर्वच लहान मुलांना प्रेमाची आणि पाठीवर शाबासकी मिळण्याची गरज असते. झोपडपट्टीतील मुलंही याला अपवाद नाहीत. सामान्य मुलांप्रमाणे या दुर्लक्षित वर्गातील लहान मुलांना हव्या तशा संधी मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन ठाण्यातील ‘समता विचार प्रसारक संस्था’ आणि ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांची बालनाट्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्लम थिएटर’ या उपक्रमाद्वारे झोपडपट्टीतील मुलांना आपली कला सादर करण्याची संधी प्रत्यक्षात मिळणार आहे.

बालवयातच मुलांच्या आवडीनिवडी पाहून पुढे त्यांच्या आवडीच्या विषयात करिअर करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिलं जातं. नाटक, संगीत, अभिनय या कलाक्षेत्रात येणासाठी रुची आणि संधी या दोन्ही गोष्टींची गरज असते. म्हणूनच शाळेतील विविध उपक्रमात मुलांना सहभागी होण्यासाठी सांगितलं जातं. झोपडपट्टीतील मुलांना कलाक्षेत्राचा अनुभव मिळावा, त्याची माहिती व्हावी यासाठी रत्नाकर मतकरींसारखे ज्येष्ठ नाटककार कार्यशाळेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणार आहेत.

नाट्यक्षेत्रातील अनुभवी कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असलं तरी या कलाकारांचे विचार आणि तंत्र मुलांवर लादली जाणार नाहीत याची काळजी आयोजक घेणार आहेत. किंबहुना या कार्यशाळेचा मूळ उद्देश हाच आहे की, मुलांनी स्वतःच्या विचारांच्या आधारे संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, लेखन अशा कलांचं सादरीकरण करावं. मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या या लहान मुलांना त्यांच्यातली प्रतिभा जागृत करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.

प्रत्येक मुलाचं त्याच्या आयुष्याबाबत एक स्वप्न असतं. सुखवस्तू घरातील मुलांना आपलं स्वप्न कशाप्रकारे साकार करावं यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण मिळतं. मात्र समाजातील सर्वच मुलांना हे मार्गदर्शन मिळत नाही. कलाक्षेत्रात तर केवळ आपल्या कलेच्या जोरावर कलाकार मोठा होऊ शकतो आणि आपली कला सादर करायची इच्छा तो पूर्ण करू शकतो हेच मुळी गरीब, वंचित मुलांना माहीत नसतं. ‘स्लम थिएटर’च्या माध्यमातून काही मुलांना ही संधी नक्कीच उपलब्ध होणार आहे. आपल्या आयुष्यात आपणही काही करू शकतो ही जाणीव मुलांना होणं खूप गरजेचं आहे आणि ते या ‘स्लम थिएटर’च्या माध्यमातून पूर्ण होईल अशी आपण आशा करू शकतो. ठाणे, नवी मुंबईमधील गरीब वस्त्यांमधून १०-१५ मुलांचा एक गट असे साधारण १८ ते २० गट तयार झाल्यावर त्यांना स्वतःचा नाट्याविष्कार सादर करण्याची संधी मिळणार आहे.

‘रंगमंच हा आपल्यासाठी नव्हे’ या भावनेतून या मुलांना बाहेर काढून त्यांना स्वतःच्या टॅलेंटचा शोध घेऊन पुढे यावं ही या उपक्रम मागची कल्पना असल्याचं नाटककार रत्नाकर मतकरी यांनी सांगितलं. या कामासाठी ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या कार्यवाह लतिका सु. मो. आणि युवा कलाकार संजय निवंगुणे यांच्या संयोजनाखाली कलाकार शोध आणि संपर्क समिती निर्माण करण्यात आली आहे. मनीषा जोशी, कल्पना भांडारकर, कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या हर्षदा बोरकर आणि संस्थेच्या हितचिंतक मिनल उत्तुरकर यांचाही यात समावेश आहे. अशाच प्रकारची नाट्य चळवळ कामगारांसाठीही झाली होती, त्याचप्रमाणे ‘स्लम थिएटर’ हेही मोठं व्हावं असं यासाठी काम करणार्या टीमला वाटतं.

या उपक्रमात सध्या १८ गट तयार करण्यात आले असून ही मुलं आपल्या नाट्यनिर्मितीवर डिसेंबर महिन्यात काम करतील आणि साधारण जानेवारीमध्ये निवडक नाट्याविष्कार सादर केले जातील, जेणेकरून या मुलांना रंगमंचावर काम केल्याचा एक अनुभव मिळेल.

सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सादर केला जात असल्यामुळे या थिएटरच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीची गरज भासू शकते. या चांगल्या उपक्रमात आर्थिक मदत देऊन सामील व्हायचं आवाहन रत्नाकर मतकरी यांनी केलं आहे. या उपक्रमाला आर्थिक हातभार लावू इच्छिणार्यांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा.

प्रतिभा मतकरी ः ९८२००५०७१३,

डॉ. संजय मं. गो. ः ९८६९९८४८०३, जगदीश खैरालिया ः ९७६९९८७२३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *