शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत बसण्याच्या धडपडीत सूर लावला होता तो… सैनिक हो तुमच्यासाठी. मात्र भाजपने कोणताच प्रतिसाद न दिल्याने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही त्यांचा सूर होतो तो… सैनिक हो तुमच्यासाठी… विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही. एकट्याने आता निवडणुकीला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसैनिकात उत्साह निर्माण करण्यासाठी १४ सप्टेंबरला रंगशारदामध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. असा आक्रमकपणा आजवर कुणी पाहिला नव्हता. या त्यांच्या आक्रमक शैलीचा प्रभाव शिवसैनिकांवर झाला. जिंकायच्या त्वेषाने सगळी संघटना कार्यरत झाली. विशेष म्हणजे बंडखोरी कमी झाली. एकमेकांतील संघर्ष यावेळच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी दाखवला नाही. याचाच परिणाम असा झाला की, शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतही स्वबळावर एवढे आमदार निवडून आले नव्हते. मात्र उद्धव यांनी ते साध्य केलं.

६३ आमदार निवडून आले खरे मात्र या सगळ्यांची मोट नीट ठेवणं हे आव्हान होतं. जर सत्ता मिळाली नाही तर शिवसेनेत फूट पडणार अशी अटकळ होती. सत्तेतील सहभागासाठी मग मिन्नतवार्या सुरू झाल्या. दिल्लीला जाऊन तहाची बोलणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. सन्मानाने सहभागी होऊ, प्रस्ताव आला तर विचार करू… सत्तेसाठी लाचार होणार नाही… अशी जाहीर वक्तव्यं करणं सुरू झालं. मात्र आतून जुळवाजुळवीचे प्रयत्न पराकाष्ठेने होत होते. शिवसेनेने काही बोलावं आणि तेच भाजपने खोडून काढावं असा खेळ बराच काळ चालला. शिवसेनेला भाजपने अंगाशी येऊ दिलं नाही. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बिनशर्त पाठिंबा आधीच जाहीर करून शिवसेनेची कोंडी बेमालूमपणे केली होती. तेच पवारांचं फडफडणारं निशाण शिवसेनेची पिसं काढणारं ठरलं.

भाजप काहीच प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर मग मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला. एवढंच नव्हे तर अध्यक्ष पदासाठीही अर्ज सादर केला.आता तहाची बोलणी मार्गी न लागल्याने पुन्हा हरहर महादेव म्हणत उद्धव ठाकरे सज्ज झालेत. दहा नोव्हेंबरला रंगशारदा गाठत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीकेची आणि शेलक्याविश्लेषणांची झोड उठवली.

उद्धव ठाकरे यांनी रा.स्व.संघाचीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने निवडणूक संपल्यानंतरही हिंदुत्वाची नारेबाजी सुरू ठेवली. आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही असं उद्धव ठाकरे वारंवार बोलत होते. संघाच्या नेतृत्वाने किमान हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजप नेत्यांना सांगावं हा डाव होता. राष्ट्रवादीचा पाठींबा म्हणजे हिंदुत्त्वद्रोह अशा पद्धतीने आपलं म्हणणं रेटण्याचा उद्धव ठाकरे यांनी सर्व पद्धतीने प्रयत्न केला. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आदेश कोण देणार? खरंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडेंची शिवसेनेला अनुकुलता होती. मात्र अमित शहा यांनी जी व्यूहरचना केली ती वजा शिवसेना अशीच होती. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं तेव्हा पाठिंब्याबद्दल असाच कल्ला झाला होता. मात्र ते अल्पमतातलं सरकार तेरा दिवसांनी कोसळलं. त्यानंतर मात्र भाजपाच्या रणनितीने आपलं शतप्रतिशत हे यश मिळवलं. आताही राज्यातील भाजपचं सरकार अल्पमतात असलं आणि ते फार चाललं नाही तरी पुढच्या वेळी इथेही शतप्रतिशत बळ उभं राहिल हा विश्वास भाजपाच्या नेतृत्वाला वाटतो आहे. आतातरी सगळ्यात अधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून भाजपने मजल मारली आहे. इथे सत्तेला चिकटून असलेल्यांना फेकून देण्याची ताकद भाजपने दाखवली आहे. याचाच कित्ता पुढच्या काळात अधिक प्रकर्षाने गिरवल्यास एकहाती सत्ता येईल या विश्वासावरच शिवसेनेला बेदखल करण्याचा निर्णय भाजपने घेतला. शिवसेनेला भाजपच्या धोरणाचा अंदाज ना निवडणुकीआधी आला ना नंतर. त्यांच्या धरसोडपणानेच फुकाची लाज मात्र घालवून घ्यावी लागली.

मात्र हे होत असतानाच शिवसेना फुटणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे यांना आहे आणि याचसाठी संसदीय नेता निवडताना त्यांनी पहिली सुपारी दिलीय ती एकनाथ शिंदे यांना. ६३ आमदारांवर वचक राहिल आणि फुटीचा ते विचारही करणार नाहीत याची काळजी घेण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलं आहे. मात्र हे आव्हान एकनाथ शिंदे यांना पेलवेल का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. गटनेता म्हणजे अर्थातच विरोधी पक्षनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागलीय. एकनाथ शिंदे यांची ही चौथी वेळ असली तरी सभागृहात ते आपला फार प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे अल्पमतातील सरकारला कोंडीत पकडण्यात, संसदीय आयुधांचा परिणामकारक उपयोग करण्यात ते कितपत यशस्वी होतील याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. दुसर्या बाजूला त्यांचा म्हणावा तसा वचक आमदारांवर राहिल याचीही अनेकांना शंका वाटते. एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी विरोधी पक्षनेतेपद ग्रामीण भागात यायला हवं होतं हे शिवसेनेतूनच बोललं जात आहे. जालनाचे अर्जून खोपकर किंवा जळगावच्या गुलाबराव पाटील यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. त्यांच्यापैकी कुणाली तरी ही जबाबदारी दिली असती तर शिवसेनेला त्याचा फायदा झाला असता हे खरंय.

काही असो शिवसेनेचा संघर्ष संपलेला नाही. उद्धव ठाकरे आपापल्या दृष्टीने प्रयोग करत आहेत. या प्रत्येक प्रयोगाची कारणमिमांसा करताना ते एकच सूर लावतात – सैनिक हो तुमच्यासाठी… पुढच्या काळात हे गाणं शिवसैनिक किती आणि कशा प्रकारे मनावर घेतात ते पहायचंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *