अहमदनगर जिल्हा सध्या देशभर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दलित हत्याकांडांमुळे या जिल्ह्याचा ‘नावलौकिक’ चारी दिशांनी पसरला जातोय. महाराष्ट्र पुरोगामी आहे का यावरूनही अनेकांमध्ये मतभेद होत आहेत. मात्र इथल्या मातीतच अनेक समाजसुधारकांनी आपल्या चळवळी रूजवल्यात, या चळवळीतूनच महाराष्ट्र हा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ‘पुरोगामी’ म्हणवला जातो. शिवाजी महाराज ते बाबासाहेब आंबेडकर असा या पुरोगामीत्वाचा मोठा वारसा देशाला या राज्यातूनच अनुभवास आला आहे. अगदी अलीकडच्या काळाचा विचार करायचा झाला तर, याच राज्यात जातीय अत्याचाराला वैचारिक तोंड देण्यासाठी दलित पँथर निर्माण होते आणि याच राज्यात पाण्यावरून दलित, मागास समाजाला वंचित ठेवलं जात असताना ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ जोर धरते. देशातल्या कोणत्याही राज्यात अशा प्रखर सामाजिक चळवळींचा वारसा नाही. मात्र सध्या महाराष्ट्राच्या पुरोगामीपणावर प्रश्नचिन्ह उभी राहतायत ती राज्यातल्या एका जिल्ह्यामुळे. अहमदनगरमधील सातत्याने घडणार्या अत्याचाराच्या घटनांनी उभा महाराष्ट्र काय करणार असा आता प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपने ‘काँगे्रसमुक्तभारत’ असा नारा देऊन केंद्रात आणि आता महाराष्ट्रात सत्ता हातात घेतली आहे. याच धर्तीवर अहमदनगरमधील तथाकथित सवर्ण समाजाने ‘दलित मुक्त’ नगर अशा आशयाची प्रतिज्ञा केलीय बहुदा. सोनईतील तीन तरुणांचं हत्याकांड, नंतर नितीन आगेला दिवसाढवळ्या छळाची परिसीमा गाठत ठार मारणं आणि आता जवखेड्यात जाधव कुटुंबाची शांत डोक्याने केलेली खांडोळी… या तिन्ही घटना अगदी एकापाठोपाठ घडलेल्या. तिन्ही घटना अगदी नीट ठरवून, सारख्याच क्रूरतेने घडवून आणल्याचं दिसतंय. हल्लेखोरांची टोळी असावी वा त्यांच्यात काही धागेदोरे असावेत असंच या घटना पाहिल्यावर लक्षात येतं. या घटनांनी दलित मागास समाजामध्ये तीव्र असंतोष आहे. मुळात हा असंतोष का असू नये? आपले समाजबांधव अशा क्रूरपणे मारले जात असताना ज्याला राग येणार नाही त्याला माणूस तरी का म्हणावं? कायद्याचं राज्य हे आहे का?

खरंतर या घटना घडतात तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की या घटनांच्या मागे जातव्यवस्था हा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. ब्राह्मणी चातुर्वर्ण्याच्या संकल्पनेनुसार दलित, मागास समाज हा शुद्र ठरवला गेला तो त्याच्या पूर्वजन्मीच्या पापामुळेच. या पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी केवळ पशुंसारखंच जगायचं हा त्यावर उतारा सांगितला गेला होता. पेशवाईत ही परंपरा कायम होती. मात्र नंतर या समाजाला गुलाम म्हणून वापरलं गेलं, त्यांची खरेदी-विक्री होऊ लागली. सरंजामी व्यवस्थेत तर या गुलामगिरीचा कहर होत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या गुलामांत अस्मितेचा हुंकार फुंकल्याने एक परिवर्तन घडलं. पूर्वजन्मीचं पाप वगैरे भ्रामक कल्पनेतून या समाजाला बाहेर काढलं. यामुळेच जातव्यवस्थेच्या मानसिकतेतून मागास समाज हळूहळू का होईना बाहेर पडला, मात्र ब्राह्मण्येतर समाज या ब्राह्मणी पगड्यातून आजही बाहेर पडत नाहीये. स्वतः बाबासाहेबांनी ३ मे १९२६ रोजी रहिमतपूर, कोरेगाव येथील परिषदेत मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू पडत आहेत. बाबासाहेब म्हणतात – ‘ब्राह्मणेतर समाज आणि अस्पृश्य समाज हे आतापर्यंत ब्राह्मणांच्या या मानसिक माजोरीपणाला व बौद्धिक व्यभिचाराला भिऊन, त्यांचे गुलाम म्हणून गुपचूपपणे वागत आलेले आहेत. परंतु या दोन्ही समाजांना आपली चूक कळून आलेली आहे आणि हे दोन्ही समाज एकत्र होवून जर आत्मप्रगतीची चळवळ चालवतील, तर ते या पांढरपेशा समाजाच्या गुलामगिरीतून लवकरच मुक्त होतील. परंतु हे घडणे फारच दुरापास्त आहे. कारण मोठे मराठे कितीही वल्गना मारीत असले, तरी ते अद्याप मनाने व बुद्धीने ब्राह्मणी विचारसरणीचे बंदे गुलाम आहेत…’

खरंतर बाबासाहेबांनी नेमकं बोट ठेवलंय. ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने जातव्यवस्था निर्माण केली ती जातव्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम मराठा आणि ओबीसी समाजातील काही घटक करत आहेत. भट बोलावून सत्यनारायणाची पूजा घातल्याशिवाय त्यांना पुण्य मिळत नसतं. खरंतर ब्राह्मणेतर समाजाची हीच मागास मानसिकता आहे हे त्यांना सांगणारं आज कुणी नाही. मात्र आपण जातीय समीकरणात वरचे आहोत याचं समाधानही मिळवायचं असतं. कुठेतरी याच मानसिकतेतून मग मागास समाजावरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सगळ्या घटना पाहिल्या तरी अत्याचार करणारे आणि अत्याचारग्रस्त हेकोणत्या समाजातील आहेत याचं चित्र स्पष्ट होतं. आम्ही कुणात जाणार नाही, कुणाला आमच्यात घेणार नाही ही कालबाह्य मानसिकता बहुजन समाजात जोपासली जातेय. या गोष्टींतून या समाजातील मंडळी कोणत्याही थराला जाऊन क्रूर हिंसाचार करत आहेत. या समाजाचा राजकीय, आर्थिक क्षेत्रात दबदबा आहे. सगळ्या महत्त्वाच्या संस्था, जागा, जमिनी याच लोकांच्या हातात आहेत. त्याच जोरावर आपली जातीय हुकूमत चालवणं ही ब्राह्मणी परंपरा हा समाज जोपासत आहे. केवळ मागास समाजाबाबत नव्हे तर आपल्या घरातील महिलांबाबतही या समाजातील लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा जुनाट आहे. ही मानसिकता अराजकतेकडे जाणारी आहे. अर्थात या कृत्याला मराठा आणि इतर समाजातील सर्वच लोकांचा पाठिंबा आहे असं म्हणता येणार नाही. ते खरंही नाही. मात्र समाजातून या घटनांच्या विरोधात जो आवाज उठायला हवा ते मात्र अजून होत नाहीये. ते जेव्हा होईल तेव्हा खर्या अर्थाने माणुसकी जिवंत होईल आणि या गोष्टींना पायबंद बसेल.

उभ्या महाराष्ट्राला खरंच या घटनांनी काही लाज वाटतेय का? ज्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे गोडवे आपण गातो त्या महाराष्ट्रातील या वर्तमान घटनांनी आपण व्यथित होत नाही? या महाराष्ट्राचा अभिमान आपण बाळगावा? मग आपण बोलणार की नाही? याबाबत जिथे निषेधाचा सूर उमटतोय तिथे आपण सहभागी होणार की नाही? आज जातीच्या नावाने जे क्रूरकर्मा लोकांना निर्घृणपणे ठार मारत आहेत, तेच उद्या प्रत्येकाच्या घरात घुसणार आहेत हा इतिहास आहे. कोणत्याही हिंसेच्या विरोधात आपण गप्प होऊन गुमान प्रेक्षक बनतो, पुढे त्याच हिंसेचा फास आपल्या गळ्यापर्यंत येतो तेव्हा आपली बाजू घेणारं कुणी नसतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *