खैरलांजीचं हत्याकांड झाल्याला आठ वर्षं लोटली. त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. आरोपींच्या विरोधात, महिलांवर बलात्कार झाला असं सिद्ध करण्याइतपत पुरावे सापडले नाहीत. मृत महिलांच्या गुप्तांगात खुरप्यापासून ते लोखंडी रॉडपर्यंत जे मिळेल ते अत्याचार्यांनी घुसवलेलं असूनही न्यायालयाला पुरावे हवे होते, ही न्यायदानाची शोकांतिका होती. जमिनीच्या एका तुकड्यावरून झालेल्या त्या नृशंस हत्याकांडात पोलीस यंत्रणा कशी काम करते हे स्पष्ट झालं होतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडे-खालसा गावातील जाधव कुटुंबाचा बळी कोणी घेतला, का घेतला आणि त्यासाठी नियोजन कोणी केलं हे अद्याप तरी उघड झालेलं नाही. जाधवांच्या घरात तिघेच जण होते. तिघांनाही जीवे मारण्याइतपत त्यांनी काय केलं असावं हे जाधवांना किंवा त्यांना मारणार्यांनाच माहीत. परंतु मारेकरी सापडत नसल्यामुळे ते आता जगाला कदाचित कधीच माहीत होणार नाही. विशेष म्हणजे या गावातील लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यावरून ग्रामस्थांनी तक्रार केली असल्याचं पुढे आलं आहे. ग्रामस्थांनाही या तिघांचा बळी कोणी आणि का घेतला हे सुतराम माहीत नाही. जवखेडेसारख्या गावात एखाद्या कुटुंबातील व्यक्तिला ताप आला तरी तो गावातल्या सर्वांना माहीत असतो. इथे मात्र घरातील तीनही माणसं निर्घृणपणे ठार मारली जातात, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले जातात तरी ग्रामस्थांना दोन दिवसपर्यंत काहीही कळत नाही, हे गोंधळात टाकणारं आहे, संशयास्पदही आहे.

अकोले तालुक्यातील महिलांवर झालेल्या बलात्काराची घटना असो किंवा कोठेवाडीतील सामूहिक बलात्काराची घटना असो, या घटनांमधून या जिल्ह्याच्या संवेदना हरपलेल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो. सोनईतील दलित तरुणाच्या हत्येची घटना तर अंगावर शहारे आणणारी होती. गेल्याचवर्षी घडलेल्या या घटनेतील सचिन नावाच्या बळीचा मृतदेह कोरड्या विहिरीत सापडला होता. त्या मृतदेहाची आधी ओळख पटली नाही. कारण त्याचे हात, पाय आणि शीर कापून टाकलेले होते. कापून टाकलेले अवयव एका बोअरवेलमध्ये कधीच सापडू नयेत अशा पद्धतीने टाकून देण्यात आलेले होते. या प्रकरणातला एक बळी संदीप, ज्या शैक्षणिक संस्थेत काम करत होता त्याच संस्थेच्या महाविद्यालयातील एका उच्चवर्णीय मुलीच्या प्रेमात पडलेला होता, हा त्याचा अक्षम्य गुन्हा ठरला आणि त्यासाठी त्याला मारून त्याचा मृतदेह संडासाच्या टाकीत टाकून देण्यात आला होता. या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांपैकी पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी तीन जण दरांडाळे या एकाच कुटुंबातील आणि एकमेकांचे भाऊ आहेत. त्या तिघांच्या बहिणीच्या प्रेमात संदीप पडला हा त्याचा गुन्हा होता. या प्रकरणी न्यायालयीन कामकाज मुंबईत व्हावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली होती. ती मान्य करू असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. परंतु आजही ही केस श्रीरामपुरच्या न्यायालयात चाललेली आहे. केस तिथे चालते तेव्हा न्यायालयावर स्थानिक उच्चवर्णियांचा दबाव असतो हे उघड सत्य आहे. परंतु त्याची पर्वा करण्याइतपत संवेदनशीलता राज्याचे गृहमंत्री दाखवतील अशी शक्यता नव्हती. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असंही आश्वासन त्यांनी दिलं होतं. परंतु ते न पाळण्यासाठीच होतं. त्यामुळे ही केस दोन वर्षं रखडत चाललेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया तातडीने झाली असती, त्यातून समाजात हे राज्य कायद्याने चालतं असा संदेश गेला असता, तर अशा प्रकारांची पुनरावृत्ती करण्याचं धाडस करता आलं नसतं. उलट याबाबतीत काहीही होत नाही असं लक्षात आल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला ज्याला संपवायचं आहे त्याचे हातपाय तोडून शीर कापून मागे कोणताही पुरावा न ठेवता संपवायचं, त्याचप्रमाणे जाधव कुटुंबीयांनाही संपवण्यात आलं. ते कुणीही असते तरी पुरावे मागे न ठेवता हे कृत्य करता येतं हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे, असं अनुमान यावरून काढता येईल.

अहमदनगरच्याच जामखेड तालुक्यातील खर्डा गावातील नितीन आगे हा बारावीत शिकणारा मुलगा आपल्या परिचयाच्या मुलीशी बोलताना तिच्या नातेवाईकांनी पाहिलं आणि तिच्या भावाने आणि त्याच्या साथीदाराने नितीन आगेचा बळी घेतला. या प्रकरणात नितीन आगे या मुलाने आत्महत्या केली असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तवात त्या मुलाला आपल्या मालकीच्या वीटभट्टीच्या मागे नेऊन सचिन गोळेकर या त्या मुलीच्या भावाने मारहाण केली आणि त्यानंतर गळा दाबून मारलं. नंतर त्याला झाडाला टांगलं आणि त्याने आत्महत्या केल्याचं चित्र उभं केलं. शवविच्छेदन तपासात त्या मुलाचा झाडाला टांगण्याआधीच मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे हा खून उघडकीस आला. त्या मुलाच्या घरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांचा नितीन हा मुलगा अभ्यासू होता. त्याला आईने सांगितलं होतं की वरच्या जातिच्या लोकांपासून दूर रहा. पण त्याने ऐकलं नाही. खर्डा गावात नितीनचं कुटुंब खडी फोडण्याचा व्यवसाय करतं. नितीन त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आकस्मिक मृत्युने त्याचे आईवडील संभ्रमित झालेले आहेत. ना त्यांचे अश्रू पुसायला कुणी, ना त्यांच्या बाजूने कुणी लढायला अशी स्थिती आहे.

जवखेडेच्या, खर्ड्याच्या आणि सोनईच्या या घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आपण कोणत्या काळात वावरतो आहोत? १७व्या, १६व्या शतकात असं घडणं आपण समजू शकतो. परंतु या काळात, विज्ञान-तंत्रज्ञान एवढं प्रगत असताना, शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव सातत्याने उगाळलं जात असताना, देशात न्यायाचं, समतेचं राज्य स्थापन व्हावं अशी भाषा सतत केली जात असताना हे घडावं हे अनाकलनीय आहे. याच अहमदनगर जिल्ह्याच्या मातीत संत एकनाथांचा जन्म झाला होता, याच मातीत देशाला ललामभूत ठरणारी माणसं जन्माला आली होती यावर या घटनेनंतर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न पडू शकतो.

या जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी देशाच्या पातळीवर नाव घेण्यासारखं काम केलेलं आहे. सहकारमहर्षी विठ्ठलराव विखेपाटील, बाळासाहेब विखेपाटील, भाऊसाहेब थोरात, आठरे पाटील या आधीच्या पिढीतील नेत्यांनी राज्य गाजवलं. जिल्ह्याचं नाव देशपातळीवर नेलं. नंतरच्या काळातील शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, बाळासाहेब थोरात, प्रसाद तनपुरे, मुरकुटे, गडाख अशांनी विद्यमान काळात जिल्हा पुढे नेला. परंतु या कुणीच समाजप्रबोधनाचं काम केलं नाही का असा प्रश्न पडतो. या जिल्ह्याने केवळ शिवाजी कर्डिले किंवा संधिसाधू बबनराव पाचपुतेंचाच आदर्श ठेवला की काय असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे.

देशातील अत्यंत मागासलेले असे समजले जाणारे ६४० जिल्हे आहेत. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो, यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. परंतु हे वास्तव आहे. या जिल्ह्यात १२ लाख ४६ हजार ७२६ मे. टन साखर दरवर्षी तयार होते. जिल्ह्यात १९५० साली सहकारी क्षेत्रातला पहिला साखर कारखाना निघाला. देशाला सहकाराचं बाळकडू या जिल्ह्याने दिलं. सहकार महर्षी विठ्ठलराव विखेपाटील यांनी आपल्या अवतीभोवतीच्या ४४ गावांचा कायापालट घडवणारा सहकारी साखर कारखाना काढला. आज या जिल्ह्यात १७ सहकारी साखर कारखाने आहेत. या जिल्ह्यात गोदावरी आणि भीमा या दोन प्रमुख नद्या असल्या तरी त्यांच्या उपनद्यांची संख्या १७ पर्यंत जाते. हा जिल्हा भीमा नदीच्या खोर्यात वसलेला आणि काळी कसदार माती असलेला जिल्हा आहे. तरीही हा जिल्हा मागास आहे, हे विशेष आहे. या जिल्ह्याचा दक्षिण भाग मराठवाड्याच्या जवळ आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की दलितांवरच्या अत्याचाराच्या घटना या दक्षिण नगरमध्ये प्रकर्षाने होतात. तिथे जातिपातीचा पगडा जास्त आहे. हे चित्र बदलायचं तर त्यासाठी जिल्ह्याच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. राज्यातील दलित नेतृत्वाने केवळ मंत्रिमंडळात आम्हाला जागा किती मिळतील यासाठी आशाळभुतासारखा कोडगेपणा करण्यापेक्षा या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर ते काही प्रमाणात डॉ. बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त होतील. राज्यातील सर्वांनीच या घटनांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.

जातीय अत्याचारांच्या घटना बिहारमध्येही होतात, नुकतीच अशीच एका कोवळ्या तरुणाची हत्या तिथेही झाली. आणि त्यावर कुणी फारशी कारवाई करेल अशी आशाही वाटण्यासारखी परिस्थिती नाही. आपल्या महाराष्ट्रात, जे राज्य आंबेडकरांची जन्मभूमी आहे, दलित चळवळीचं आणि त्यांना मिळालेल्या पाठिंब्याचं जनस्थान आहे तिथेही असले अत्याचार होतात आणि गुन्हेगार मोकळे राहतात हे अत्यंत लाजिरवाणं दुर्दैव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *