जवखेडे खालसा जातीय हत्याकांडामुळे देश पुन्हा एकदा हादरलाय. महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामीपणावरच या हत्याकांडामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. एका पाठोपाठ एक अशी सलग तीन हत्याकांडं तीही एकाच अहमदनगर जिल्ह्यात… हा निव्वळ योगायोग नाही. तर ही या जिल्ह्यात नांदत असलेल्या सरंजामशाहीची पावती आहे. सोनई हत्याकांड, खर्डा हत्याकांड ते आता जवखेडे खालसा हत्याकांड या तिन्ही जातीय हत्याकांडांच्या कारणांच्या मुळाशी नगर जिल्ह्यातील सरंजामशाही प्रवृत्ती आणि जातीय अभिमानची पोकळ भावनाच आहे, हे सातत्याने उघड झालंय. इतक्या उघडपणे एकाच जातसमूहातील माणसं कापली जात असतानाही या जिल्ह्याकडे कुणीच गांभीर्याने पाहत नसल्यामुळेच हा जातीय हत्याकांडांचा सिलसिला आजही सुरूच आहे. पण जवखेडे खालसा जातीय हत्याकांडाने समाजातील संवेदनशील लोकांचा अंत पाहिलाय. त्यामुळेच आता या हत्याकांडाच्या निमित्ताने राज्यभरातून न्यायाच्या लढाईला सुरुवात झालीय. मात्र हा त्याचवेळेस सत्ताधारी आणि तपासयंत्रणा यांच्याकडून हा न्यायाचा लढाही चिरडण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. आणि म्हणूनच जवखेडे हत्याकांडाच्या तपशिलांकडे अधिक बारकाईने पाहिलं गेलं पाहिजे. सोबतच हा हत्याकांडाचा तपास ज्या दिशेने सुरू आहे त्या तपासकामावरही अधिक जागरूकपणे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. हत्याकांडाचा तपशील आणि काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं सोबतच्या लेखात दिलेली आहेत. मात्र तरीही तपासाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष घटनास्थळी राहून केलेल्या निरीक्षणातून समोर आलेल्या काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न…

जवखेडे खालसा जातीय हत्याकांडाची महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याला उकल करणं प्रचंड जिकरीचं बनलंय. कारण या हत्याकांडाचा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपास अधिकार्यांना अद्याप सापडलेला नाही. तसंच ज्या हत्यारांचा वापर करून जाधव कुटुंबियांच्या शरीराचे भाग कापून काढण्यात आलेत त्या हत्यारांपैकी एकही हत्यार अद्याप पोलिसांना जप्त करता आलेलं नाही. हत्याकांडाच्या ठोस नि नेमक्या कारणापर्यंतही तपास अधिकारी अद्याप पोचू शकलेले नाहीत. त्यातच नव्या सरकारचा या अधिकार्यांवर गुन्हा लवकर उघडकीस आणून आरोपिंना त्वरीत अटक करण्यासाठीचा दबाव आहे. अशा सर्व परिस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांचे पोलीस अधिकारी या हत्याकांडाचा तपास करत आहेत.

ज्या रात्री जवखेडे खालसा हत्याकांड झालं त्याच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी पोलीस घटनास्थळी पोचले. यानंतर घेण्यात आलेल्या शोधातून जाधव कुटुंबियांचे मृतदेह शेताजवळीलच एका विहिरीतून हस्तगत करण्यात आले. यात संजय जाधव आणि सुनील जाधव या बापलेकांच्या मृतदेहाचेच तुकडे करण्यात आले होते तर जयश्री जाधव यांच्या केवळ डोक्यावर घाव घालण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यातही संजय जाधव यांचा देह थेट कंबरेपासून वेगळा कापून काढण्यात आला होता. यामुळे त्यांच्या मृतदेहाचे दोन्ही भाग विहिरीतच आढळून आले. मात्र सुनील जाधवच्या शरीराची विल्हेवाट लावण्याच्याच उद्देशाने मारेकर्यांनी त्याच्यावर हा हल्ला केला होता. परिणामी सुनीलचं धड आणि हात विहिरीत सापडले तर त्याचं डोकं आणि पाय विहिरीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका बोअरवेलमध्ये सापडले. बोअरवेलच्या खड्ड्यात मारेकर्यांना सुनीलचे पाय सहज पुरता आले मात्र त्याच्या डोक्याने मारेकर्यांची गोची केली. म्हणून त्या मारेकर्यांनी सुनीलच्या डोक्याचेही दोन तुकडे केले आणि मग ते दोन्ही तुकडे त्याच बोअरवेलमध्ये कोंबून बोअरवेलचं तोंड बुजवण्याचा प्रयत्न केला गेला. हा सर्व तपशिल पोलिसांकडे आहे. या तपशिलावरून तपास अधिकारी हत्याकांडाचा छडा लावत आहेत.

मात्र तपास अधिकारी डीवाय एसपी सुनील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हे हत्याकांड जातीय हत्याकांड नसून ते अनैतिक संबंधांतूनच झालंय, असं म्हटलं जातंय. तसंच ज्या शेजारी राहणार्या महिलेचं या हत्याकांडात नाव समोर येतंय त्या महिलेनेही आपल्या जबानीत मयत व्यक्तिंशी संबंध असल्याचं कबूल केलंय. मात्र हत्येशी आपला काहीच संबंध नाही, असा जबाबही त्या महिलेने पोलिसांकडे नोंदवलाय. आजघडीला हे प्रकरण राज्यभरात होत असलेलया सामाजिक आंदोलनांमुळे अतिशय संवेदनशील वळणावर येऊन ठेपलंय. अशातच नव सरकारमधील सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आरोपिंना ४८ तासांत हजर करू अशी घोषणा प्रसार माध्यमांतून केल्यामुळे पोलिसांवरील दबाव अधिकच वाढलाय. याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांच्या तपासकामाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

मुंबई ते वाशिम कनेक्शन

सुनील मुंबईतील गोरेगाव इथल्या कॉलेजात शिकत होता. यामुळे सहाजिकच पोलीसांचं एक पथक मुंबईत तपासासाठी येणारच. मात्र गोरेगावात शिकत असलेल्या सुनीलच्या हत्येचा तपास नवी मुंबईतील वाशी शहरात का केला जातोय, हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. खरं तर यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हत्येनंतर सुनीलचा मोबाईल गहाळ झालाय आणि तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीय. हा मोबाईल जितक्या लवकर पोलिसांना सापडेल तितक्या लवकर या हत्याकांडाचं गूढ उकलणार आहे. पण तरीही हत्याकांडातील मुंबई कनेक्शनबद्दलचं प्रश्नचिन्ह तसंच उभं राहतंय. दुसरा मुद्दा म्हणजे सुनील जाधव हा कॉलेज तरुण असल्यामुळे तो आजच्या जमान्यातील सर्वच आधुनिक साधनसुविधांचा वापर करत होता. सोशल मीडियातील माध्यमांचाही तो वापर करत होता. म्हणूनच सुनीलच्या फेसबुक अकाऊंटवरील काही पोस्टच्या अनुषंगाने पोलिसांचं तपासपथक मुंबईत दाखल झालं होतं. म्हणूनच सुनीलचा अँड्रॉईड मोबाईल न सापडणं हीदेखील पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

फेसबुकवरील माहितीच्या आधारे आणखी एक पथक वाशिम जिल्ह्याच्या दिशेनेही रवाना झालंय. या ठिकाणीही सुनीलच्या एका मित्राची कसून चौकशी करण्यात आलीय. मात्र तिथूनही तपास पथकाला फारशी माहिती उपलब्ध झाली नसल्याचं कळतंय. तर दुसरीकडे गावातीलच एका मुस्लीम तरुणाला चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण करण्यात आल्याची माहितीही स्थानिक सूत्रांकडून मिळतेय. या संपूर्ण माहितीवरून पोलिसांची तपासयंत्रणा जातीय हत्याकांडातून हे हत्याकांड झालं नसून अनैतिक संबंधातूनच झालं असल्याचं सिद्ध करण्यात एकवटली आहे, का असा प्रश्न उभा राहिलाय. आणि म्हणूनच हे हत्याकांड जातीय हत्याकांड नसून अनैतिक संबंधांतूनच घडवून आणण्यात आलंय असं सिद्ध करण्यामागेही नव सरकारचा दबाव तर नाही ना, असाही प्रश्न विचारता येऊ शकतो. कारण तपासाच्या सर्व दिशा या सुनीलच्या तरुण वयातील वर्तवणुकीला सामोरं ठेऊनच आखल्या जाताना दिसताहेत. कारण जर हे हत्याकांड अनैतिक संबंधांतून झालेलं आहे असं क्षणभर गृहित जरी धरलं तरीही मारेकरी सुनीलच्या आईवडिलांची अशी क्रूर हत्या का करतील, या साध्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे नाहीय.

यामुळेच आता जवखेडे खालसा जातीय हत्याकांडाचा योग्य तपास लावण्याचं आव्हान राज्याच्या पोलीस यंत्रणेसमोर आहे. येत्या काही दिवसांतच आरोपी सर्वांसमोर आणण्याचा दावा पोलिसांकडूनही केला जातोय. त्यामुळे आता काही दिवसांतच या हत्याकांडाचं नेमकं कारण आणि खरे आरोपी सर्वांसमोर येतील का हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

राकेश शिर्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *