एक मच्छर इन्सान को… हा वाक्यांश एकेकाळी बराच गाजला होता. आजही अनेकवेळा प्रसारमाध्यमांना तो चघळायला आवडतो. अर्थात, त्यावेळचा संबंध वेगळा होता. मात्र आज खरोखरच एक मच्छर समस्त महाराष्ट्राला हैराण करत आहे. त्यावर कसं नियंत्रण मिळवायचं हे आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान ठरलं आहे. तो मच्छर म्हणजे डेंग्यू नामक घातक ठरू शकणार्या तापाच्या प्रसाराचं माध्यम ठरणारा एडीस नामक विशिष्ट डास…
वारंवार बातम्यांमधून चालणार्या डेंग्यूविषयक बातम्यांमुळे आपणा सर्वांना आता एवढं नक्की माहीत आहे की, डेंग्यू हा एक विषाणुजन्य ताप आहे. डेंग्यूच्या विषाणुंची लागण/प्रसार डासांमार्फत होतो. यातही केवळ एडीस या विशिष्ट जातिच्या डासांमार्फत डेंग्यूच्या विषाणुंचा प्रसार होतो.
खरंतर मलेरिया आणि अन्य विविध प्रकारच्या विषाणुजन्य तापांच्या विषाणुंचा प्रसार डास नामक किटकच करतात. तेव्हा डासांचा प्रतिबंध, संपूर्ण उच्चाटन करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र डेंग्यू या विषाणुजन्य तापाचा प्रसार केवळ आणि केवळ एडीस नामक जातिचे डासच करतात. या डेंग्यू तापाची सुरुवात भारतात अलीकडच्या काळात २००० सालात झाली. त्यावेळी या विषाणुजन्य तापामुळे रुग्णांच्या मृत्युचं प्रमाण खूप अधिक होतं. म्हणजे एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी १५-२० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडत असत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार आता हेच प्रमाण २.५ टक्के इतकं कमी झालं आहे. यातही वृद्ध, अशक्त, अन्य दीर्घकालीन आजाराने त्रस्त रुग्ण डेंग्यू विषाणुबाधेमुळे मृत्यू पावण्याची शक्यता असते. तेव्हा सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की ‘डेंग्यूचा ताप आला म्हणजे झालं आता रुग्ण जाणारच’ असं समजून घाबरून जाणं चुकीचं आहे. योग्य ती काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार करून घेतल्यास रुग्ण नक्की बरा होऊ शकतो.
यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर डेंग्यू विषाणुंचा प्रसार करणार्या डासांचं समूळ उच्चाटन करणं. त्यासाठी या डासांची उत्पत्ती, वाढ आणि प्रसार समजून घेणं आवश्यक आहे.
‘एडीस एजिप्टी’ या नावाने ओळखल्या जाणार्या या डासांची उत्पत्ती केवळ स्वच्छ, साठलेल्या स्थिर पाण्यावरच होते. त्यातही थंड वातावरणात (थंडीच्या दिवसांत) ही उत्पत्ती मंदावते, कमी होते. म्हणजेच पावसाळ्यानंतर आणि थंडीचा मौसम सुरू होण्यापूर्वीच्या काळातच ‘एडीस’ डासांची उत्पत्ती अधिक होत असते. एडीस डासाची वाढ अन्य सामान्य किटकांप्रमाणेच अंडी-कोष-अळी-डास (पूर्ण वाढीचा डास) याच क्रमाने होते.
एडीस डासांची मादी एकावेळेस १००-२०० अंडी घालते. मात्र या मादीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मादी तिच्या जीवनचक्रात केवळ एकाच ठिकाणी अंडी घालत नाही तर वेगवेगळ्या जागी अंडी घालते. म्हणजेच, ही मादी निर्माण करणार्या डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करत असते. एडीस डासांच्या मादीने घातलेल्या अंड्यापासून संपूर्ण डास तयार होण्याचा काळ साधारणपणे एक आठवडा ते दहा दिवसांचा असतो. तर पूर्ण वाढ झालेल्या नर डासाची आयुष्यमर्यादा आठ-दहा दिवस इतकीच असते. नर एडीस डासाचं काम मादी डासाला प्रजननासाठी सहभाग देणं. नर डास मादीप्रमाणेच मानवी रक्तावर पोसला जातो. मात्र नर डास डेंग्यू विषाणू माणसांपर्यंत पोहचवत नाही. डेंग्यू झालेल्या रुग्णास नर डास चावला आणि त्याने रुग्णाच्या शरीरातील डेंग्यू विषाणुबाधित रक्त शोषलं तरी त्या विषाणुंना कार्यरत (जिवंत) ठेवून दुसर्या माणसांपर्यंत पोहचवण्याची क्षमता नर डासाकडे नाही.
उलट मादी डासाची (एडीस प्रजातीमधील) आयुष्यमर्यादा सुमारे एक महिना असते. या मादी डासाचं काम अंडी घालून नवीन डासांचं प्रजनन करणं. एका वेळेस डास मादी १०० ते २०० अंडी घालते. अशी जास्तीतजास्त चार वेळा एक मादी अंडी घालू शकते. डास मादीचंही मुख्य अन्न मानवी रक्त हेच असतं. मादी डेंग्यूबाधित रुग्णाचा चावा घेते तेव्हा रुग्णाच्या शरीरातील विषाणुबाधित रक्त शोषते. या रक्तातील विषाणू मादी डासाच्या लाळग्रंथीत साठवले जातात. हे विषाणू त्यामध्ये जिवंत राहतात आणि अशी मादी परत पुढच्यावेळी दुसर्या माणसाला चावते तेव्हा चाव्याच्या जागी आपल्या लाळेवाटे हे विषाणू सोडते. परिणामी पुढील व्यक्तिला डेंग्यूची बाधा होते.
थोडक्यात, एडीस प्रजातीचे मादी डास हेच केवळ डेंग्यूच्या विषाणुंचा प्रसार करत असतात. आधी म्हटल्याप्रमाणे डासांची निर्मिती स्वच्छ पाणी साठ्यावरच केवळ होत असते. तसंच अतिथंड वातावरणात या डासांचं उत्पादन होऊ शकत नाही. डासांची निर्मिती सहसा पाणीसाठ्याच्या काठावर होत असते. म्हणजे तळी, पाणी साठलेली डबकी, घरातील पाण्याची (उघडी) पिंपं, रस्त्यावर फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, डबे (पाणी साठलेले), टायर्स किंवा टायर्सचे अर्धे तुकडे, घरातील आणि ऑफिसेसमधील एसीचे पाण्याचे ड्रेन, घरातील फ्रिजमधील पाण्याचे ड्रेन ट्रे, अगदी घराच्या देव्हार्यातील नारळ ठेवलेला पाण्याचा कलश, अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधील पाण्याची डबकी या ठिकाणी या एडीस डासांची उत्पत्ती होते. डासांचं आयुष्य लक्षात घेतलं तर एका ठिकाणी निर्माण झालेले डास फार दूर अंतरापर्यंत जाऊ शकत नाहीत. म्हणजेच एडीस डास त्यांच्या उत्पत्तीच्या आसपासच्या प्रदेशातच फक्त डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत होतात. उलट डेंग्यू विषाणुबाधित रुग्णांच्या प्रवासामुळेच फक्त एका प्रदेशातील डेंग्यूचा प्रसार नव्या, दूरच्या ठिकाणी (अगदी परदेशातसुद्धा) होत असतो.
या ठिकाणी लक्षात घ्यायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वेगवान शहरीकरणामुळे नवीन बांधकामं वाढत आहेत. शुद्ध स्वच्छ पाण्याचे साठे वाढत आहेत. त्यामुळे शहरातून आणि शहरांलगतच्या गावांमधून हीच प्रक्रिया गतिमान झाली आहे. त्यामुळेच एडीस डासांची उत्पत्ती वेगाने वाढली आहे. परिणामी डेंग्यू विषाणुंचा प्रसार आणि डेंग्यू-तापाची लागण वाढली आहे.
याचाच दुसरा अर्थ या नव्या शहरीकरणाशी सुसंगत अशी जीवनशैली आपण जागृतपणे स्वीकारली पाहिजे. म्हणजे काय? तर केवळ महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन संस्थांच्या आरोग्य खात्याने मच्छर निर्मूलन करावं आणि डेंग्यूची साथ किंवा अन्य तापांची साथ आटोक्यात आणावी अशी अपेक्षा ठेवणं साफ चुकीचं ठरतं. विशेषतः आपल्या घरातील साठवलेलं पाणी झाकणबंद ठेवणं, उघडे पाणीसाठे न ठेवणं, साठलेलं पाणी वेळीच साफ करून परिसर कोरडा ठेवणं, घरातील फ्रिजमध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी प्रत्येक कुटुंबाने घेणं आवश्यक आहे. एक लक्षात घेणं आवश्यक आहे की, हाऊसिंग सोसायट्या आणि चाळ कमिट्यांनी जागृतपणे याबाबत पुढाकार घेणं आवश्यक आहे. याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता ही सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे याचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे. डेंग्यूची साथ तरच आटोक्यात येऊ शकेल.
याचबरोबर हे लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक ताप हा डेंग्यूचा ताप नसतो. तेव्हा घाबरून जाऊन उपयोगाचं नाही. मात्र घरात किंवा आसपास डेंग्यूचा रुग्ण आढळला असेल तर वेळीच स्वच्छता मोहीम सुरू करणं, तापाची लागण झाल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरू करणं आवश्यक आहे.
आता सुरू झालेली डेंग्यूची साथ महाराष्ट्रात त्यातही मुख्यतः मुंबई, पुणे, आणि मोठ्या शहरांत पसरत चालली आहे. डेंग्यूचा प्रसार स्थानिक परिसरात डासांमुळेच होतो, तर एका ठिकाणची साथ दुसरीकडे, दुसर्या प्रदेशात पसरते ती डेंग्यू विषाणुबाधित माणसांच्या प्रवासामुळे.
जे डेंग्यूच्याबाबतीत घडतं तेच मलेरिया तापाच्या साथीमध्येही घडतं. मात्र मलेरियाचा प्रसार करणारी डासांची प्रजाती पूर्णपणे वेगळी असते. ते डास कोणत्याही ठिकाणी (म्हणजे स्वच्छ पाणी किंवा अस्वच्छ पाण्याचं डबकं) तयार होतात. म्हणजेच साथाच्या तापांच्याबाबतीत सार्वजनिक स्वच्छता हाच कळीचा मुद्दा ठरतो.
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यावर होतात. तसंच हे डास ओळखणंही सोपं आहे. डेंग्यू विषाणू पसरवणार्या एडीस माद्या नरापेक्षा आकाराने मोठ्या असतात. या डासांच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. (खरंतर अन्य किटकांमध्ये हे डास कीटक म्हणून थोडे आकर्षकच दिसतात असं म्हणू शकतो.) त्यामुळे आपल्या घरात हे डास आहेत का? याचा शोध सहज घेता येतो. नाहीतर ‘एक मच्छर इन्सान को डेंग्यू पेशंट बना सकता है’, असंच म्हणायची वेळ येईल.