सध्याचं युग हे ऑनलाइन जगण्याचं युग आहे. सोशल नेटवर्किंग हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. त्यामुळे आता लग्नही ऑनलाइन जुळवण्याकडे अनेक मुलामुलींचा कल असतो. त्यासाठी ते मॅट्रिमोनिअल साइटस्चा आधार घेतात. मात्र या मॅट्रिमोनिअल साइट्स आणि सोशल नेटवर्किंगवरील प्रोफाइल लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी किती विश्वासार्ह असतात याबाबत मात्र शंकाच आहे. कारण मॅट्रिमोनिअल साइट आणि सोशल नेटवर्किंग प्रोफाइलद्वारे किरण बागवे या २७ वर्षीय तरुणाने २२ मुलींना लग्नाची मागणी घातली आणि पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. या भामट्याला गेल्या महिन्यातच नागपूर इथून सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी अटक केली.

डोंबिवलीत राहणार्या बारावी ड्रॉपआऊट किरण बागवेने प्रसिद्ध मॅट्रिमोनिअल साइटवर आपण आय. टी. इंजिनिअर असल्याचं नमूद करून लग्नासाठी आवश्यक अशी एक प्रोफाइल बनवली. यामध्ये त्यानेस्वतःचा फोटो न लावता आपल्या एका चांगल्या दिसणार्या मॉडेल मित्राचा फोटो वापरून एक खोटी प्रोफाइल बनवली होती. किरण आपल्या फेसबुक आणि मॅट्रिमोनिअल अकाऊंटवरून तर अनेक मुलींच्या प्रोफाइलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि मुलींनी त्या स्वीकारल्यावर त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी चॅट करायचा. आपण अत्यंत श्रीमंत कुटुंबातील असून सुशिक्षित असल्याची खोटी माहिती तो द्यायचा. पुढे हळूहळू मुलींना आपण लग्न करण्यास इच्छुक असल्याचं सांगून त्यांच्या प्रेमात असल्याचा तो दावा करायचा. मग आपण आजारी असल्याचं कारण सांगून, आपला अपघात झालेला आहे किंवा अन्य काही पटण्यासारखी खोटी कारणं सांगून बागवे मुलींकडून पैसे उकळायचा. पैसे आणायला कुणी माणूस पाठवतो म्हणून चक्क स्वतःच जाऊन तो पैसे घ्यायचा. २०११पासून जवळपास २२ मुलींना बागवेने फसवलेलं होतं. सप्टेंबर महिन्यात एका मुलीने किरण बागवे विरुद्ध १.५७ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मग सायबर पोलिसांनी किरण बागवेची सोशल नेटवर्किंग प्रोफाइल ट्रेस केली आणि ते प्रोफाइल फोटोमधील व्यक्तिपर्यंत पोहोचले. परंतु त्याने तो किरणचा मित्र असल्याचं सांगून किरणविषयी माहिती दिली. किरण बागवे त्याच दरम्यान नागपूर इथे एका मुलीकडून पैसे उकळण्यासाठी गेला असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडलं.

उच्चशिक्षित आणि बड्या कंपनीतील मुली टार्गेट!

किरण बागवे आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवरील अकाऊंटवरून केवळ सुशिक्षित घरातील उच्चशिक्षित, बड्या पगाराची नोकरी असणार्या, आय.टी. इंजिनिअर, वकील अशा मुलींनाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. हल्ली अनेकजण आपल्या कुटुंबातील व्यक्तिंचे फोटो तसंच आयुष्यातील घडामोडींचे प्रसंग फोटोद्वारा आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवण्यासाठी अपडेट करतात. किरणही प्रोफाइल बघताना या गोष्टी आवर्जून पाहायचा. यामुळे एकूण प्रोफाइल पाहून मुलीच्या घराविषयी महत्त्वाचं म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत याची त्याला कल्पना यायची. पैसे उकळणं हा एकमात्र उद्देश असल्यामुळे तो अशा मुलींनाच फसवायचा ज्या सधन आहेत. एकदा का फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली की त्या मुलीशी किरण चॅट करायला सुरुवात करायचा. आपली खोटी कौटुंबिक माहिती अत्यंत विश्वासाने सांगायचा, ज्यामुळे मुली स्वतःहून आपल्या कुटुंबाची माहिती त्याला बहाल करायच्या. आपले आईवडील साऊथ आफ्रिकेत राहत आहेत, आपण इथे कामानिमित्त एकटेच रहात आहोत अशी अनेक कारणं देऊन तो मुलींशी जवळीक साधण्याचा आणि विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करायचा.

व्हॉइस चेंजर अॅप्लिकेशनचा दुरुपयोग!

सध्या Android मार्केटमध्ये अनेक नवनवीन अॅप्लिकेशन्स मिनिटामिनिटाला तयार होत असतात. काही कामाची असतातही तर काहींचा चुकीच्याप्रकारे उपयोग होण्याचीही शक्यता असते. व्हॉइस चेंजर अॅप्लिकेशन हा त्यातलाच एक प्रकार. मित्रमैत्रिणींमध्ये प्रॅन्क्स करण्याच्या उद्देशाने याचा निरुपद्रवी वापर केला जातो. परंतु चुकीच्या पद्धतीनेही याचा वापर केला तर तो गुन्हा ठरतो.

किरण बागवे जेव्हा मुलींचा विश्वास संपादन करण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी चॅट करायचा तेव्हा तो कधीही प्रत्यक्ष भेटण्याबद्दल बोलत नसे. केवळ चॅटद्वारेच पुढे तो मुलींना लग्नाची मागणी घालायचा. एखाद्या मुलीने त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तिंशी बोलण्याची इच्छा दर्शवली तर याच व्हॉइस चेंजर App चा उपयोग करून किरण वेगवेगळ्या व्यक्ती बोलतायत असं भासवून तो त्या मुलीशी बोलायचा. यामुळे मुलीचा किरणवरचा विश्वास आणखी वाढायचा. किरण एकाचवेळी अनेक मुलींना अशाप्रकारे फसवत होता. गुन्ह्यांमध्येही अशा App चा वापर होऊ लागला तर यात चूक ही वापरणार्याचीच असते.

पैसा मोठा की विश्वास?

किरण बागवे हा पोकर या जुगाराच्या व्यसनाधीन असल्यामुळे त्याला कायमच पैशाची गरज भासायची. त्यामुळे त्यासाठी त्याने सोशल नेटवर्किंगद्वारे मुलींना फसवण्याचा गैर मार्ग अवलंबला होता. लवकरात लवकर पैसे उकळण्याच्यादृष्टीने किरण सर्वतोपरी प्रयत्न करायचा. जेव्हा टार्गेटेड मुलीशी चांगली मैत्री जुळली आहे असं वाटलं की हळूहळू किरण पैशांची मागणी करायला लागायचा. आपला अपघात झालेला आहे आणि ट्रीटमेंटच्या खर्चासाठी पैशाची निकड असल्याचं सांगितल्यावर त्याच्या प्रेमात असल्यामुळे मुली त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे द्यायला तयार व्हायच्या. एखादी मुलगी जेव्हा आय.टी. इंजिनिअर असूनही त्याच्याकडे अजिबात पैसे कसे नाहीत विचारायची तेव्हा किरण आपण आपल्या एका मित्राच्या कर्जात गॅरेंटर होतो आणि आता बँकेने त्याचं अकाऊंट फ्रीझ केल्यामुळे त्याच्याकडे पैसे नाहीत असं कारण द्यायचा. कारण न पटण्यासारखं असलं तरी प्रेमाखातर, विश्वासाखातर मूर्खपणा केल्यामुळे या मुलींचं आर्थिक नुकसान किरण करू शकला. मुलींकडून पैसे घेण्यासाठी किरण स्वतःच जायचा आणि एकदा का पैसे मिळाले की मग त्या मुलीकडे दुर्लक्ष करून नंतर कुठल्याही प्रकारचे संबंधही ठेवायचा नाही. मुलींना मात्र नंतर आपण फसवले गेल्याची जाणीव व्हायची. ज्या मुलीच्या तक्रारीनंतर किरण बागवेला अटक करण्यात आली तिला किरणने १.५७ लाख रुपयांना फसवलं होतं. तसंच तिचं ATM कार्ड वापरून खरेदीही केल्याचं पोलिसांना आढळलं.

किरण बागवेसारखे गुन्हेगार इतक्या मुलींना फसवू शकतात कारण त्या मुलींनी इंटरनेटच्या जगात वावरताना म्हणावी तेवढी दक्षता घेतलेली नाहीये.मॅट्रिमोनिअल साइटवर प्रोफाइल पाहून कधीच कुणाला त्याच्या खरेपणाची शंका कशी येत नाही? जी माहिती प्रोफाइलमध्ये दिली आहे ती तपासून मग पुढे बोलणी का केली जात नाहीत? लग्न ठरवताना मुलाला-मुलीला प्रत्यक्ष न पाहता केवळ चॅट करून आणि मॅसेजेस पाठवून अनोळखी व्यक्तिला आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या माहितीचा कोणीही दुरुपयोग करू शकतं हेच मुळी त्यांच्या लक्षात येत नाही. अशा निष्काळजीपणामुळे व्यक्तिला आर्थिक फसवणुकीलाही सामोरं जावं लागतं.

वेळ वाचवण्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाचं साहाय्य घेतलं जातं, परंतु हल्ली आपण सगळ्याच गोष्टींकरता केवळ तंत्रज्ञानावर विसंबून असतो. लग्न जमवण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बराच वेळ जात असल्यामुळे मॅट्रिमोनिअल साइट अस्तित्वात आल्या. ज्यामुळे घरबसल्या कमीत कमी वेळात वधू-वरांच्या प्रोफाइल पाहून त्या प्रोफाइलला निवडायचं की नाही हे ठरवता येतं. पण यामध्ये प्रोफाइलमधील माहिती खरीच असेल याची खात्री कोणीही देत नाही. थेट संपर्क करून भेटण्यापेक्षा मॅसेजेस, चॅट करून व्यक्तिला पारखायची पद्धत हळूहळू रूढ झाली आहे, ज्यामध्ये पटलं तरच भेटून लग्न जमवण्यावर चर्चा नाहीतर बाय बाय! परंतु चॅट करणारी व्यक्ती नेमकी तीच आहे का? याची खात्री नसूनही चर्चा केली जाते. वैयक्तिक माहिती दिली जाते आणि पुढे किरणसारखे गुन्हेगार याच गोष्टींचा फायदा उठवतात.

सोशल नेटवर्किंग साइटविषयीही अगदी हेच लागू होतं. आपली वैयक्तिक माहिती, फोटो, संपर्क नंबर आपण आपल्या प्रोफाइलमध्ये टाकतो आणि त्याचा फायदा चुकीची माणसं घेतात. यावर आपल्याला प्रायव्हसी सेटिंगचा पर्याय असतो पण त्याचा वापर कितीजण करतात? ही प्रायव्हसी सेटिंग पब्लिक आणि फ्रेंडसाठी वेगवेगळी असते. तसंच फ्रेंडलिस्टमध्येही आपला कोणता फ्रेंड आपली काय माहिती पाहू शकतो याबद्दलही सेटिंग असतं. पण हे पाहण्यासाठी फारसे कष्ट कोणीही घेताना दिसत नाही. सामान्यतः प्रायव्हसी सेटिंग केवळ पब्लिकपुरत्या केल्या जातात आणि एकदा का फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली की आपली सर्वच माहिती सर्वांना उघड होते. काही नेटिझन्सना तर सर्व प्रायव्हसी सेटिंगविषयी चांगलंच ‘ज्ञान’ असतं. तरीही केवळ प्रायव्हसी सेटिंग Active केल्यामुळे Comment, Likes मिळत नाहीत. कारण फेसबुकच्या राज्यात ज्याला जास्त Likes आणि Comments असतात तो राजा असतो, भलेही एक तासाचा राजा असला तरी चालतो!

किरण बागवेसारख्या गुन्हेगारांना जर आळा घालायचा असेल तर आपल्यालाच काळजी घ्यायला पाहिजे! सायबर जगातात Prevention Is Always Better Than Cure!

 

सायबर अॅलर्टः खासकरून मुलींसाठी

१.सोशल नेटवर्किंगच्या प्रोफाइलमध्ये आपले फोटो, कुटुंबाचे फोटो आणि वैयक्तिक माहिती तसंच अनोळखी व्यक्तिला आपल्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येईल अशी कोणतीही माहिती ठेवू नये.

२. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट वापरत असाल तर त्यात आपल्या शाळेची, महाविद्यालयाची, ऑफिसची माहिती भरणं काही गरजेचं नसतं. या माहितीवरून गुन्हेगारांना अनेक प्रकारची माहिती आपोआप मिळू शकते.

३. कुठल्याही सोशल नेटवर्किंग साइटवर प्रायव्हसी सेटिंग असते ती नीट तपासून मगच त्यात अकाऊंट ओपन करावं.

४. अनोळखी व्यक्तिशी चॅट करू नये.

५. लग्न जुळवण्याच्या उद्देशाने जर कोणाशी चॅट करत असाल तर प्रथम प्रत्यक्ष भेटा, वेळ वाचवण्यासाठी चॅटचा शॉर्टकट निवडू नका!

६. मॅट्रिमोनिअल साइटवरील माहितीवर आंधळा विश्वास ठेवू नका. प्रोफाइलवर संपर्क नंबर असल्यास तिथे संपर्क करून प्रत्यक्ष भेटूनच माहितीची शहानिशा करून घ्यावी.

७. आपल्या ओळखीच्या व्यक्तिबरोबरही आर्थिक गोष्टींविषयी चॅटिंगद्वारे चर्चा करू नये. आपल्या बँकेचं नाव, आपली जन्मतारीख, अकाऊंट नंबर यापैकी कुठलीही माहिती इंटरनेटच्या कुठल्याही माध्यमातून कुणाशीही शेअर करू नये.

८. आपल्या माहितीचा दुरुपयोग करून आपण आर्थिकदृष्ट्या फसवले गेल्याची जाणीव झाल्यास त्यावर दुःख करण्यापेक्षा सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. त्यामुळे गुन्हेगारास पकडण्यास मदत होऊ शकते.

 पूनम सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *